विसावा – अध्याय १४

 

॥ श्री ॥
॥ अथ चतुर्दशोऽध्याय: ॥

श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: । श्रोतीं व्हावें सावधान । तुम्हां कथिलें गुरुचें जीवन । वाचितां होईल आत्मज्ञान । सद्गुरुभक्ती करावयाचें ॥1॥ सद्गुरुभक्ती करावी कैशी । गुरु-गीतेंत कथिली जैशी । संवाद करिती शिव पार्वतीशी । त्याच ओव्या कथितो ॥2॥ पार्वती पुसे शिवासी । की भवार्णव तरावयासी । जीव कैसे पावती ब्रह्मत्वाशी । उपाय कोणता असे ॥3॥ दु:खें गांजला धरणीवर । मनुष्यमात्र होई बेजार । तरीं हे करूणाकर । कैवल्यपंथा मज दावी ॥4॥ प्रश्न ऐकून श्रीशंकर । प्रसन्न होती पार्वतीवर । म्हणें प्रश्न पुसिला सुंदर । लोकोपकारक, कल्याणदायी ॥5॥ त्रिभुवनांत आहे दुर्लभ । सद्गुरु ब्रह्माचा लाभ । परि गुरुचरण धरितां लोभ । सुलभ प्राप्त होईल ॥6॥ वेदशास्त्र पुराणांनी । मंत्रतंत्रादि विद्यांनीं । तीर्थव्रत, साधनांनी । भवबंध मोचना न पावती ॥7॥ जया चाड पराभक्ती । तेणें सद्गुरु सेवावा एकांती । गुरुतत्व न जाणती । मूढ मति जन कोणी ॥8॥ होवोनि नि:संशय । सेवावे सद्गुरुपाय । भवसिंधू तरणोपाय । तत्काळ होया जड जीवां ॥9॥ गूढ अविद्या जगन्माया । अज्ञान संहारित जीवा या। मोहांधकार गुरु सूर्या । सन्मुख यावया मुख कैचें ॥10॥ जीव ब्रह्मत्व त्याचिये कृपा । होती निरसोनी सर्वपापा । सद्गुरु स्वयंप्रकाशदीपा । शरण निर्विकल्पा रिघावें ॥11॥ सर्व तिर्थांचे माहेर । सद्गुरुचरण तीर्थ निरंतर । सद्भावे सत्शिष्य नर । सेवितां परपार पावले ॥12॥ शोषण पापपंकाचें । ज्ञानतेज करी सांचें । वंदितां चरणतीर्थ सद्गुरुचे । भवाब्धींचे भय काय ॥13॥ अज्ञानमूलहरण । जन्मकर्म निवारण । ज्ञान सिद्धीचें कारण । गुरुचरण तीर्थ तें ॥14॥ गुरुचरणतीर्थप्राशनं । गुरुआज्ञा उच्छिष्ट भोजन । गुरुमूर्तीचें अंतरी ध्यान । गुरुमंत्र वदनीं जपे सदा ॥15॥ गुरुसान्निध्य तो काशीवास । जान्हवी चरणोदक नि:शेष। गुरुविश्वेश्वर निर्विशेष । तारक मंत्र उपदेशिता ॥16॥ गुरुचरणतीर्थ पडे शिरीं । प्रयागस्नान तें निर्धारी । गया गदाधर सबाह्यांतरी । सर्वांतरी साधका ॥17॥ गुरुमूर्ति नित्य स्मरे । गुरुनाम जपे आदरें । गुरु आज्ञा पालक नरें । नेणिजे दुसरें गुरुविना ॥18॥ गुरुस्मरण मुखी राहे । तोचि ब्रह्मरुप पाहे । गुरुमूर्ती ध्यानीं वाहे । जैशी कां हे स्वैरिणी ॥19॥ वर्णाश्रमधर्में सत्कीर्ती । वाढवावी सद्वृत्ती । अन्यत्र त्यजोनी गुंती । सद्गुरुभक्ती करावी ॥20॥ अनन्यभावें गुरुसी भजतां । सुलभ परमपद तत्त्वतां । तस्मात् सर्व प्रयत्ने आतां । सद्गुरुनाथा आराधी ॥21॥ गुरुमुखीचें महावाक्य बीज । गुरुभक्तीस्तव लाभे सहज । त्रैलोकीं नाचे भोज । तो पूज्य सुरनरां ॥22॥ गुकार तो अज्ञान अंधकार । रुकार वर्ण तो दिनकर । स्वयंप्रकाश तेजासमोर । न राहे तिमिर क्षणभर ॥23॥ प्रथम गुकार शब्द । गुणमयी मायास्पद । रुकार तो ब्रह्मानंद । करी विच्छेद मायेचा ॥24॥ ऐसें गुरुपद श्रेष्ठ । देवा दुर्लभ उत्कृष्ठ । गणगंधर्वादि वरिष्ठ । महिमा स्पष्ट नेणती ॥25॥ शाश्वत सर्वी सर्वदाही । गुरुपरतें तत्त्व नाहीं । काया वाचा मनें पाही । जिवित तेंही समर्पावें ॥26॥ म्हणोनि आराधावा श्रीगुरु । करोनि दीर्घदंड नमसकारु । निर्लज्ज होवोनियां परपारु । भवसागर तरावा ॥27॥ जे संसारवृक्षारुढ झाले । पतन नरकार्णवी पावले । ते गुरुरायें उद्धरिले । सुखी केले निजभजनीं ॥28॥ ब्रह्मा, विष्णू, सदाशिव । गुरुरुप ते स्वयमेव । गुरु परब्रह्म सर्वथैव । गुरुगौरव न वर्णवे ॥29॥ अज्ञानतिमिर अंध । ज्ञानांजन शलाका या प्रसिद्ध । दिव्यचक्षुशुद्धबुद्ध । महानिधी दाखविला ॥30॥ अखंडमंडलाकार । जेणें व्यापिलें चराचर । तये पदीं केलें स्थिर । नमस्कार या गुरुवर्या ॥31॥ श्रुतिसार शिरोरत्न । चरणांबुज परम पावन । वेदांत कमलीनी चित्भानू । तया नमन गुरुवर्या ॥32॥ ज्याचे स्मरणमात्रें ज्ञान । साधका होय उत्पन्न । जे निज संपत्ती जाण । दिधली संपूर्ण गुरुररायें ॥33॥ चैतन्य शाश्वत शांत । नित्य निरंजन अच्युत । नाद-बिंदू कलातीत । नमन प्रणिपात गुरुवर्या ॥34॥ अनेक जन्मींचे सुकृत । निरहंकृती निर्हेत । तरीच प्रबोध प्राप्त । जरी श्रीगुरुहस्त मस्तकीं ॥35॥ जगन्नाथ जगद्गुरु एक । तो माझा स्वामी देशिक । ममात्मा सर्वभूत व्यापक । वैकुण्ठनायक श्रीगुरु ॥36॥ ध्यानमूल गुरुराय । पूजामूल गुरुपाय । मंत्रमूल नि:संशय । मोक्षमूल गुरुकृपा ॥37॥ सप्तसिंधू अनेक तीर्थी । स्नानेंपानें जी फलप्राप्ती । एक बिंदूसम नाहीं ती । सद्गुरुचरण तीर्थाच्या ॥38॥ ज्ञानेवीण सायुज्यपद । अलभ्य लाभे अगाध । सद्भक्तीनें प्रबोध । स्वत:सिद्ध पाविजे ॥39॥ सद्गुरुहून परात्पर । नाहीं नाहीं वो साचार । नेति शब्दे निरंतर । श्रुति शास्त्रें गर्जती ॥40॥ ऐके वो देवी ध्यान सुख । सर्वानंद प्रदायक । मोहमायार्णवतारक । चित्सुखकारक श्रीगुरु ॥41॥ ब्रह्मानंदपरमअद्भुत । ज्ञानबिंदू कलातीत । निरतिशय सुख सतत । साक्षसूत सद्गुरु ॥42॥ नित्यशुद्ध निराभास । नित्यबोध चिदाकाश । नित्यानंद स्वयंप्रकाश । सद्गुरु ईस सर्वांचा ॥43॥ हृदयकमलीं सिंहासनी । सद्गुरुमूर्ती चिंतावी ध्यानीं । श्वेतांबर दिव्यभूषणीं । चिद् रत्नकिरणीं सुशोभित ॥44॥ आनंदकंद करप्रसन्न । ज्ञानस्वरुप निजबोधपूर्ण । भवरोग भेषज जाण । सद्वैद्यचिद्धन सद्गुरु ॥45॥ सद्गुरुपरतें अधिक कांहीं। आहे ऐसा पदार्थ नाहीं । अवलोकितां दिशा दाहीं । न दिसे त्रिभुवनीं ॥46॥ क्षोभता देवऋषीकाळ । सद्गुरु रक्षी न लगे पळ । दीनानाथ दीनदयाळ । भक्तवत्सल सद्गुरु ॥47॥ सद्गुरुचा क्षोभ होतां । देवर्षिमुनी तत्वतां । रक्षिती हे दुर्वातां । मुर्खही सर्वथा ना ऐकती ॥48॥ मंत्रराज हे देवी । गुरु हीं दोन अक्षरें बरवीं। वेदार्थ वचनें जाणावी । ब्रह्मपदवी प्रत्यक्ष ॥49॥ श्रुतिस्मृति न जाणती । गुरुभक्तीची परम प्रीति । ते संन्यासी निश्चिती । इतर दुर्मती वेषधारी ॥50॥ नित्यब्रह्म निराकार । निर्गुणबोध परात्पर । तो सद्गुरु पूर्णावतार । दीपासी दीपांतर नाही जैसे ॥51॥ गुरुकृपा प्रसादें । निजात्मदर्शन स्वानंदे । पावोनिया पूर्णपदें । पेलती दोघे मुक्तीसी ॥52॥ परात्पर तर ध्यान । नित्यानंद सनातन । हृदयीं सिंहासनीं बैसवून । चित्तीं चिंतन करावें ॥53॥ अगोचर अगम्य सर्वगत । नामरुप विवर्जिंत । नि:शब्द आणि निभ्रांत । ब्रह्म सदोदित पार्वती ॥54॥ ऐसें ध्यान करींता नित्य । तादृश होय सत्य सत्य । कीटकी भृकुटीचे निमित्य । तद्रुप जाहली ते तैसी ॥55॥ अवलोकिता तयाप्रती । सर्वसंग विनि:र्मुक्ती । एकाकी निस्पृहता शांती । आत्मस्थितीं रहावें ॥56॥ सर्वज्ञपद त्या बोलती । जेणें देहीं ब्रह्म होती । सदानंदे स्वरुप प्राप्ती । योगी रमती पैं जेथें ॥57॥ उपदेश होतां पार्वती । गुरुमार्गी होय मुक्ती । म्हणोनी करावी गुरुभक्ती । हे तुजप्रती बोलतसें ॥58॥ ह्या वरून श्रोतेजन । घ्यावें हें उमजून । सद्गुरुभक्ती श्रेठ जाण । शिवपार्वती संवादें ॥59॥ विषयाचे कराया स्पष्टीकरण । त्याच ओव्या कथिल्या म्हणून । वाटे नवनीत निघे संवादातून । तुम्हांलागी द्यावया ॥60॥ नवनीताचें करावें सेवन । आनंद हृदयीं भरून । तेणें कायाकल्प होईल जाण । सबाह्य आंतरी तुझा ॥61॥ जरी ना घडेल जपतप साधन । करी रे मानस पूजन । सहज सुलभ श्रेष्ठ जाण । ह्याहून अन्य कांहीं नसे ॥62॥ या न लागे कवडी दमडी । तुला फक्त पाहिजे आवडी । सर्व सुखा त्वरित जोडी । मानसपूजा श्रीगुरुची ॥63॥ निर्मल करोनियां मन । आसनावरी बैसावें आपण । सद्गुरुंचे आगमन प्रार्थून । मनोमनीं सुस्वागतम् म्हणावें ॥64॥ यावें यावें भाऊराया । मानसपूजा माझी घ्यायां । मी विनवितसे तव पायां । वाट पाहतों नयनीं ॥65॥ तुम्ही न करावा उशीर । माझा जीव होतो अधीर । तरी हे करूणाकर मजवर । कृपापाखर करावी ॥66। जैसें बालक आणि माता । वाट पाहे भेटीं करीता । तैसेंच मी दर्शनाकरितां वाट पाहे भाऊराया ॥67॥ रत्नजडित मयूरासन । मी हृदयीं कल्पिलें जाण । त्यावरी स्वस्थ बैसोन । विश्राम करी भाऊराया ॥68॥ भाऊ बैसलें मयूरासनी । मनी ऐसी कल्पना करोनी । विंझण केले स्वहस्तानी । श्रमपरिहार कराया ॥69॥ स्वहस्तें पुसला घाम । पावन करी हृदय धाम । ऐसेंच राहुं दे प्रेम । म्हणोनि विनवितो परोपरी ॥70॥ विविध सुगंधित तेलांनी । पदप्रक्षालन केलें झणीं । भवभयहारक चरणीं । नतमस्तक झालो मनोमनीं ॥71॥ तेल घातलें शिरावरी । भाऊ संतोषतील जरी । आवडे तयांना खरोखरीं । तेंच मीही करीतसें ॥72॥ गोरस, दधि, घृत । मधु, शर्करा पंचामृत । करोनियां त्वरित । स्नानालागीं बोलाविले ॥73॥ गंगायमुना गोदावरी । नर्मदा सिंधू कावेरी । चांदीच्या भरोनी घागरी । स्नानालागीं आणिल्या ॥74॥ केशरमिश्रित उटी घेऊनी । भाऊंचे सर्वांगा चर्चुनी । एकेक पवित्र जलांनीं । अभिषेक करीतों मनोमनीं ॥75॥ सुवर्णपात्र घेतलें भरोनी । हरगंगे, नर्मदे म्हणोनी । सोडिलें श्रीगुरुशिरावरुनी । मनोमनी आनंदूनी ॥76॥ चरणतीर्थ केले प्राशन । स्वशरीरीं केलें प्रोक्षण । करावयातें पापक्षालन । मी प्रार्थिंले भाऊराया ॥77॥ अंग पुसिलें स्वकरांनीं । शुभ्र धोतर दिले नेसवोनी । ब्रह्मसूत्रादि देऊनीं । झब्बाही दिला सुंदरसा ॥78॥ ऐसं वस्त्रातें देऊनी । पुनरपि मयुरासनीं बैसवोनी । गंधाक्षता शिरीं लावुनी । मी मनोमनीं पुजिलें ॥79॥ बहुविध सुगंधित पुष्पांनीं । शमि, बिल्वादिक गुलाबांनीं । मोगरा चंपक गुंफोनी । पुष्प माला घातली ॥80॥ भस्म कस्तुरी केशर । लाविलें हिना केवडा अत्तर । ललाटीं लाविलें सुंदर । भाऊंना प्रिय असे म्हणोनी ॥81॥ विविध अर्पिले वस्रालंकार । जे तयांना प्रिय फार । कल्पना करोनी अतिसुंदर । लेवविले मनोमनीं ॥82॥ मनीं भाऊंना सालंकृत करोनी । धूप दीप दिले उजळोनी । शुद्ध भावानें प्रेमें भरोनी । आरती भाऊंची करीतसे ॥83॥ जयजयाजी भाऊराया । नमनें अनंत तुमचे पायां । जडजीवां उद्धरावया । अवतारलासी भूवरी ॥84॥ जे त्रिविध तापें पोळले । त्यावरी तुम्ही प्रेम केलें । दु:ख तापादि हरिले । सुखी केले सकल भक्त ॥85॥ जे तवपदकमलीं रमले । त्यांना तुम्हींच हो तारिले । उच्चनीच न पहिलें । सर्वांसारखें वागविलें ॥86॥ तरी मज द्यावा विसावा । तुमचे पायीच तो असावा । आता विलंब न करावा । सद्गुरुराया माउली ॥87॥ ऐसें करीता गुण-गान । अष्टभाव आले दाटून भाऊंचे धरुनियां चरण । आनंदाश्रूंनी धुतले ॥88॥ आतां भूक लागली म्हणून । सुवर्णांचे ताट घेतलें कल्पून । षड्रस परिकर पक्वान्न । मिष्टान्न वाढिलें मनोंमनीं ॥89॥ स्वकरें भरविला गोडघास । जेवण्यास कथिले सावकाश । जें जें आवडले भाऊंस । पोटभरुन वाढिलें ॥90॥ उशिर झाला म्हणून । क्षमा घेतलीसे मागून । शेष मजकरीं देती उचलोन । तो प्रसाद म्हणूनी भक्षिला ॥91॥ ऐसें प्रेमें केल्या भोजन । आणि करितां मुख प्रक्षालन । तांबूल श्रीफल देऊन । सुवर्ण दक्षिणा दिधल्या मी ॥92॥ रत्नदिपांची पंचारती कल्पुनी । श्रीभाऊंना ओवाळुनी । प्रदक्षिणा गुरुभोवतीं करूनी । लीन झालों त्यांचे पायीं ॥93॥ आतां करितों गायन भजन । जयजयाची भाऊ म्हणून । तुमचे कराया गुणगायन । स्फूर्ति द्यावी मजला ॥94॥ पूर्वी बापू केणी म्हणून । अवतरलासी भूवरी जाण । पंढरीची वारी करून । जडमूढ उद्धरिले ॥95॥ शिरोडें ते पंढरपूर । वारी करुनी वारंवार । भागवत धर्माचा प्रचार । तुम्हींच असे वाढविला ॥96॥ पांडुरंग दळवीला । जिवंत तुम्हींच असे केला । वंशवेल वाढविला । कृपाप्रसादे तुम्हींच ॥97॥ परी राजाचें दुष्टपण पाहून । तुम्हीं गुप्त झालां तेथून । आणि भाऊ दळवी म्हणून । जन्म घेतला पुनरपि ॥98॥ जन्म घेऊनी संसारांत । सुखदु:ख जवळून पहात । राहुनी परोपकार करत । केली माया सुभक्तांवरी ॥99॥ कोणाचा जुळवी संसार । कीं ज्यांना तो वाटे असार । देऊनी तयांना आधार । सुभक्त तुम्हीं बनविलें ॥100॥ नयनीं घालून अंजन । कोणा दिधलें दिव्य जीवन । कित्येकां अध्यात्म देऊन । उजळिलें भाऊराया ॥101॥ ऐसें भाऊंना आळवून । भाव पुष्पांजली अर्पून । प्रदक्षिणा सभोंवताली करून । मानसपूजा पूर्ण केली ॥102॥ मयूरासनीं भाऊ बैसले । अर्धोन्मीलित नेत्र केले । सुहास्यवदनें मज न्याहाळिलें । शिरीं अभयकर ठेवुनी ॥103॥ मधु बैलासे पायाशीं । येवढेंच मागणें गुरुपाशीं । नित्य दिसावें चित्र मानसीं । दान द्यावें गुरुवर्या ॥104॥ ऐसा हा माझा विसावा । तुमचे पायीं नित्य असावा । मधु करीतसे धांवा । श्रीगुरुवर्यां पायाशीं ॥105॥ भाऊ मनांत संतोषती । मानसपूजा स्वीकारिती । वरी शुभाशीर्वाद देती । प्रसन्न जाहलो म्हणोनी ॥106॥ भाऊ असतां नित्य विचारिती । मी इहलोक सोडल्यावरती । तुला काय वाटेल मजप्रती । ते तूं मज सांगावें ॥107॥ तेव्हां नव्हते कांही उत्तर । आता सांगतों सत्वर ।विसावा घडला खरोखर । हेंचि उत्तर त्यावरी ॥108॥ जें ेजें मला वाटले । तें विसाव्यात अवतरलें । माझे मनोरथ पूर्ण झाले । श्रीगुरुकृपेकरुनी ॥109॥ आतां नमन वेतोबाला । ग्रंथ परिपूर्ण झाला । श्रीगुरु विसावा लाभला । तव कृपेनें मजला ॥110॥ प्रथम अध्यायाचें श्रीफल केलें । ते तुज सांगणें करोनी वाहिलें । तेणें मज आशीर्वाद लाभले । सकल देव संतांचे ॥111॥ एकशें आठ केळीं असलेला । अध्यायरुपी घड असे रचिला । ऐसे पांच घड श्रीवेतोबाला । संतोषुनी अर्पितसे ॥112॥ मधुर भरलेल्या गरांनी । तीन अध्यायाचे घड घेऊनी । वाहतों श्रीसातेरीचे चरणीं । भावभक्तीनें मनोमनीं ॥113॥ भाऊंचे लाडके नवनाथ । श्रीभूमिया असतां प्रख्यात । दोन अध्यायरुपी घडवाहत । त्यांचही पवित्र पायांवरी ॥।114॥ परी नाथ पूर्वस येती हांसत । त्यांना मी एक घड अर्पित । वरी केळ्यांची गोडी चाखत । अपूर्व आहे सांगत ॥115॥ हांक मारिती श्रीसिद्धेश्वर । मी त्वरित गेलो समोर । घड एक अर्पुनी त्यांचेसमोर । प्रघात पूर्ण केला असे ॥116॥ ऐसे तेरा अध्याय अर्पून । चौदावा अर्पिला शर्करा म्हणून । सर्वांपुढें ठेविला सारखा वाटून । अक्षय ठरो त्याचा गोडवा ॥117॥ चरित्ररूपी विसावा झाला । तो श्री वेतोबासी अर्पिला । आतां माझा कांही न राहिला ।हक्क म्हणोनी कोणता ॥118॥ जें काहीं आहे चांगले । तें श्रीगुरुंनी लिहविलें । न्यून म्हणोनी कांही दिसलें । तो दोष माझा समजावा ॥119॥ जो केला असे प्रयत्न । त्याचा भाव घ्यावा जाणून दोष मना न आणून । क्षमादृष्टीनें पाहावें ॥120॥ परीं तुमचें व्हावें कल्याण । म्हणोनी मागतों पसायदान । श्रीवेतोबाचे पायी नमून । सकल भक्तांकरितां ॥121॥ जो सुभक्त वाचेल विसावा । त्याचा भाव जाणुनी घ्यावा । विश्वास त्यांचा पूर्ण बसावा । श्रीगुरुचणांवरी ॥122॥ तो जें इच्छिल मनांत । त्याचे पुरोत मनोरथ । वाचनें संतोष चिथांत । सकल भक्तां लाभावा ॥123॥ ज्यांना हवें संसारसुख । अथवा कुणा भक्तीची भूक । कुणी ईच्छिती चिरसुख । ते ही तयां प्राप्त व्हावें ॥124॥ गुरु हाचि विसावा । जो सर्व सुखाचा ठेवा ।गुरु तयांना भेटावा । हेंचि मागणे पायांशी ॥125॥ प्रसन्न होऊनी श्रीवेतोबा । म्हणे नि:संशय ग्रंथ वाचावा । तुझा हा ग्रंथ ‘विसावा’ । फलदायी जाहला पूर्ण ॥126॥ माझ्या सुभक्ताचें चरित । मज प्रिय असे बहुत । रहा भाव भक्तीनें वाचित । मनोरथ पूर्ण करीन ॥127॥ ऐसें देवाचें आश्वासन । म्हणोनी हा ‘विसावा’ जाण । सुभक्ता करी देऊन । कृतार्थ जाहलों जीवनी ॥128॥

इति श्रीभाऊचरित्रामृत कथनं नाम चतुर्दशोऽध्याय: । श्रीदेव वेतोबार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।

<< सावली – अध्याय १३

Click to rate this post!
[Total: 2 Average: 4]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *