विसावा – अध्याय १३

 

॥ श्री ॥
॥ अथ त्रयोदशोऽध्याय: ॥

श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रोते मज म्हणती । अमृतघट लाविला ओठीं । चरित्राची अवीट गोडी । चाखावी वाटे वारंवार ॥1॥ जैसें जैसें श्रवण करितों । वेगवेगळा अनुभव येतो । भक्तांना कैसा दिसतो । नानाविध रुपांत ॥2॥ गुरु आहे सागरापरी । जो डुंबेल त्याच्या अंतरी । रत्नमाणिकांच्या सरी । काढाव्या त्यानें त्यांतुनी ॥3॥ चौदा रत्नें निघालीं । त्याहून अधिक दाटलीं । गुरुसिंधूत रे भरलीं । दिव्य रत्नें असंख्य ॥4॥ सागराचा न लागे अंत । गुरु आहे तैसाची अगाध । आणि व्योमाचे उंची सम । उदाहरण आहे तयाचें ॥5॥ तरीही सगुणरुप घेऊन । भक्तां सारिखाच होऊन । सर्वा सांगाती राहून । वावरतो संसारांत ॥6॥ मनुष्य म्हणूनि येतो । मनुष्य म्हणोनी जगतो । भले आचरण करितो । भले बुरें साहुनी ॥7॥ परि काणी न ओळखिती । गुरु सारिख्या विभूति । असाधारण असते । मानवता तयांची ॥8॥ म्हणोनि सांगे गीता । ऐशा व्यक्तिंची योग्यता । जो सर्वसंग परित्यक्त । असतो राहूनि सर्वांत ॥9॥त्याला नसे राग लोभ । त्याला नसे प्रेम क्षोभ । सर्व स्थितीत असतो संतुष्ट । स्थितप्रज्ञा सारिखा ॥10॥ त्याला न कोणी शत्रु मित्र । सारिखेच वाटे सर्वत्र । ऐसें हें जीवन सूत्र । असे तयाचें वेगळें ॥11॥ प्रेम करिती अपार । सागरा न जैसा तीर । माया करिती अपरंपार । ओसंडून जाय किती तरी ॥12॥ गुरु असती प्रेमळ । गुरु असती निर्मळ । वाटे जैसें बाळ । निष्पाप असतें जीवनीं ॥13॥ जैसा श्रीनारायण । तुलसीपत्रानेचि प्रसन्न । तैसा केवळ भाव पाहुन । गुरु प्रसन्न होइ, कृपा करी ॥14॥ असो मागील अध्यायीं कथिले । तुम्हींही असे पाहिलें । भाऊ आरतीला आलें । कीं बैसती खुर्चीत ॥15॥ आजही मी ती । खुर्ची ठेवीत असतों पुढतीं । जेव्हां करीत असतो आरती । श्रीदत्ताची गुरुवारी ॥16॥ श्रद्धा आहे अंतरी । कीं भाऊ येतात माझे घरीं । आणि बैसती खुर्चीवरी । प्रत्येक गुरुवारीं ॥17॥ त्यांच्या नांवाचें आसन । मी घेतलें असें म्हणोन । ते ठेवितों पसरुन । खुर्चीवरी सदैव ॥18॥ ऐशाच एका गुरुवारीं । आरती पूर्ण झाल्यावरी। आम्ही बैसलों बाहेरी । येऊनियां सगळे जण ॥19॥ माझे एक शेजारी । दर्शनास येती गुरुवारी । परि न कळत खुर्चींवरी । सहज कैसे बैसले ॥20॥ बैसतां ते खुर्चीवरी । वीज वाह शरीरांतरीं । चटके बैसती अंगावरी । घाबरोनी उठले ॥21॥ बाहेर येऊनी सांगती । खुर्चीत चटके बैसती । काय आहे चमत्कृति । अंग शहारलें तयांचे ॥22॥ आम्ही तयांना कथिलें । की भाऊ असतां बैसले । काय तुम्ही लाडके चेले । मांडीवरी बैसलात ॥23॥ परी तुमच्या या चुकीमुळें । आम्हालाही असें कळलें । कीं भाऊ येऊनि बैसले । पहिल्यासारखे खुर्चीत ॥24॥ धन्यता वाटे बहुत । कीं गुरु वचनाला पाळीत । आणि नित्य असती येत । आरतीला माझेकडे ॥25॥ जेव्हां भेटती मित्रपरिवार । गोष्टी निघती वारंवार । भाऊ कैसे देती सहकार । सन्मित्र म्हणोनी ॥26॥ भाऊंच्या निघती गोष्टी । मनांत होती बहुत कष्टी । तेव्हां न होती कुणा दृष्टी । भाऊंच्या मोठेपणाची ॥27॥ नित्य जवळ होते म्हणून त्यांचे न कळे मोठेपण । दुरावतांच आलें कळून ।दैवत्व त्यांचे आम्हांला ॥28॥ हळहळ वाटे आतां । कीं त्यांची न जाणिली महत्ता । केवळ सद्गृहस्थ होता । इतुकेंच वाटले आम्हांला ॥29॥ चित्रे तयांचे सन्मित्र । भेटती वारंवार एकत्र । गोष्टी करिती मात्र । अध्यात्म विषयाच्या ॥30॥ भाऊ न पडती वादात । जरी जाणत असती बहुत ।अनुभवाविण आहे व्यर्थ । चर्चा, सांगती तयांना ॥31॥ चर्चा चाले जपावरी । चर्चा चालें ध्यानावरी । चर्चा चाले योगावरी । विषय न राही एकही ॥32॥ अशी तयांची मैत्री होती । परि भाऊ स्वप्नांतहि न भेटती। म्हणोनियां नित्य हळहळती । आम्हा सांगती खंत ॥33॥ एकदां अण्णांसवें चित्र्यांची । चर्चा चाले भाऊंची । तकरार करिती स्वप्नाची । भाऊ न भेटती म्हणोनी ॥34॥ जगी असता येती बहुत । वारंवार मज भेटत । वाटे रुसले कीं मजसंगत । ओळख येथे संपली ॥35॥ ऐसें ते असतां बोलत । हृदयांतुनी येई उत्स्फूर्त । आवाज कोणी बोलत । ऐकलासे अंतरीं ॥36॥ अरे तू संबंध न ठेविला । परि दूषण देशी मजला । गुरु हृदयांतुनी वदला । संशय फेडिला त्वरित ॥37॥ त्यांना आले कळून । कीं चूक आपुलीच म्हणून । भाऊ न येती दिसून । बैसले असती अंतर्यामीं ॥38॥ चित्रें जाती भाऊंचे घरी । आपुली लाविती हजेरी । साथ न सोडावी परी । मित्र गेला म्हणोनीयां ॥39॥ म्हणोनी भाऊ सांगती । यावें माझे घराप्रती । माझी तेथेंच आहे वसती । वाट तुमची मी पहात ॥40॥ छोट्या बहिणीचे यजमान । नांव तयांचें सुरेश म्हणून । बडोद्यास येती सुट्टींत जाण मुलाबाळांसहित ॥41॥ जेव्हां येती बडोद्यात । भाऊंचिये घरीं जात । आशीर्वाद घेती प्रसादयुक्त । प्रघात असे तयांचा ॥42॥ येऊनियां एका सुट्टींत । एकटेच जाती जोधपुरांत । बहिण बडोद्यासी राहत । जाणार होती नंतर ॥43॥ जे दिनीं जोधपुरांत गेले । तयांचे छातीतं दुखूं लागलें । दु:ख तें असह्य झालें । कळा वाढल्या अधिक ॥44॥ वेळ होती रात्रीची । भीति वाढली अंतरीची। सकाळ कैसी उजडायची । तगमग होई जीवाची ॥45॥ कोणी न होता शेजार। धन्वन्तरी कैसा बोलावणार । देवावरी घालुनियां भार ।देवखोलींत बैसले ॥46॥ उदयीक येईल पत्नी । तिज काय दिसेल नयनीं । अश्रू भरल्या लोचनी । चिंता वाढे अधिक ॥47॥ तोंच स्फुरे तयांना ।भाऊंची आरती कवना । न कळत भावना । हेलावल्या तयांच्या ॥48॥ ऐसें असतां बैसले । अर्धवट कांहीसें निजले । तोच खिडकींतून दिसले ।प्रकाश बिंदू येतांना ॥49॥ प्रकाश बिंदू जवळ आले । सुरेश जवळी स्थिरावले । हळू हळू ते साकार झाले । भाऊ प्रकटले समोर ॥50॥ उभे राहुनी अधांतरीं । आशीर्वादाचा हस्त शिरीं । ठेवूनि बोलती न घरी । चित्तीं भय मुळींच ॥51॥ सर्व गुरुमय आहे जगत् । म्हणूनि न व्हावें भयभीत । मी नित्य राहे तुज सोबत । ऐसें म्हणूनि झाले अदृष्य ॥52॥ दर्शन होता अघटीत ॥ दु:ख पळालें त्वरित । परि आनंदाच्या उर्मींत । असतां झाली पहांट ॥53॥ तेच दिनी पोहोंचली पत्नी । न येती स्टेशनवरी म्हणोनी । धांवत जाई अपुले सदनी । यजमान होते निद्रिस्त ॥54॥ रात्रींचा कळला प्रकार । सुरेशें कथिला सविस्तर । पाठीशीं होते गुरुवार । म्हणूनी दिसला सुदिन ॥55॥ म्हणोनियां श्रोते जन । श्रीगुरु वाहती चिंता जाण । परि पाहिजे शुद्ध-मन । एकात्मता भावनेची ॥56॥ नित्य गुरुवारची आरती । असतां माझे घराप्रती । एक मित्र येउनी बैसती । सहज म्हणूनि आरतीला ॥57॥ मित्र जरी नव्हता सुभक्त। तरिही नव्हता तो अभक्त । परि आरतीची पहावया गंमत । सहज येऊनि बैसला ॥58॥ आमुची आरती संपली । परि मित्राची नजर खिळली । ती जराही न चळली । फोटोवरून दत्ताच्या ॥59॥ तो हालवितसे हात । परि मुख त्याचे न हालत । अखेर झाला नतमस्तक । देवापुढे आमुच्या ॥60॥ आम्ही विचारलें तयाला । काय जाहले रे तुजला । मित्र हसुनि खरें बोलला । कीं शंका आलीं मनांत ॥61॥ तुम्ही जी करिता आरती । त्यांत सत्याची किती प्रचीति । खरोखरीच काय देव असती । शंका उद्भवली मनांत ॥62॥ ऐसा विचार येता मनांत । नेत्र खिळले फोटोंत । दत्त वाटे आहे जागृत । हलूं लागले फोटोंत ॥63॥ ऐसें प्रत्यक्ष असतां दिसत । भयभीत झालों मनांत । म्हणोनी साष्टांग नमस्कारित । शरण गेलों देवाला ॥64॥ ऐसा हा प्रकार घडला । तेच दिनीं भाचा अनूप आला । त्याचेही मनांत आला । प्रश्न ऐसाच कांहीं ॥65॥ म्हणे लोकांना घडतें दर्शन । मग आमच्यात काय न्यून । आमुचा शुद्ध भाव पाहुन । दर्शन देई गुरुवारा ॥66॥ द्वितीय दिनीं सकाळीं । करोनियां आंघोळी । बैसला तो देवाजवळी । ध्यान धरुनि स्वस्थ ॥67॥ रवि गेला देवखोलींत। सहज पाहे भाच्या प्रत । त्याचें शरिर होतें कंपित । म्हणुनि बोलवी आईला ॥68॥ नंदा जाऊनियां पाहत । तो अनूप होता बेशुद्धींत । कळे न त्या काय होत । जागृत केलें तयाला ॥69॥ सर्वजण हसूं लागले । म्हणे तुज काय खूळ लागलें । काय तुझ्या मनांत आलें । ध्यानस्थ बसुनी देवापुढें ॥70॥ तेव्हां तो सांगू लागला । मीही कथिलें देवाला । कीं दर्शन द्यावें मजला । दया करावी एवढी ॥71॥ म्हणोनि धरिलें ध्यान । तो प्रकाश आला दिसून । खुर्ची प्रथम प्रकटोन । दिसलें पदकमल ॥72॥ जैसे चरण स्पष्ट दिसती । मनांत उद्भवली भीति । घाबरोनी माझी मति । शुद्ध हरपोनी बैसली ॥73॥ सर्वजण हसूं लागले । जरी चरण तुज होते दिसले । तरी ते कां न स्पर्शिले । घाबरलास कशाला ॥74॥ बालकाचें पाहुनि शुद्ध मन । गुरु झाले होते प्रसन्न । ऐसें शंकरापरी भोळेपण । गुरुचें असतें जाण ॥75॥ भाऊ असतां मी विचारीत । कीं मज का न दर्शन होत । त्यावरी ते हसुनि सांगत । कीं मी प्रार्थीन तुजसाठीं ॥76॥ मी जेव्हा जाईन देवाघरीं । तुजसाठी करीन कांहीतरी । तू मनांत चिंता न करी । दर्शन होईल निश्चित ॥77॥ वरी वर्षे झाली बहुत । मीं शब्द ठेविला चित्तांत । आज न उद्यां निश्चित । दर्शन होईल म्हणुनी ॥78॥ तीव्रता वाढे अनावर । दर्शनाची ओढ लागे प्रखर । आतां मात्र गुरुवर । साहूं न शके मी ॥79॥ बहुत असे दिन झाले । आपुले चरण न देखिले । काय तुम्हाही न वाटले पहावें आपुल्या भक्ताला ॥80॥ कोठें इतकें गुंतला । की कोणासवें रमला । मज दिलेल्या वचनाला । भुललात काय तुम्ही ॥81॥ स्वर्ग म्हणजे नंदनवन । तेथें जाहलात रममाण । मग भूवरील भक्तगण । पाड काया तयांचा ॥82॥ वेंगवेगळे संतजन । तुम्हां भेटतात येऊन । त्यांचे संगें थांबून । गोष्टी करिता कीं सुखाच्या ॥83॥ काय बापू केणी भेटले । काय रंगअवधूत भेटले । भूमिया पूर्वस भेटले । काय कथिलें तयांनीं ॥84॥ वाटे तुम्ही येऊनी । सर्व सांगावे स्वप्नांतुनी जैसे आपण फिरुनी।गोष्टी करीत होतें ॥85॥ तुमच्या गोष्टींची अजून । येते बहुत आठवण । परि आतां वाटे एकटेपण । फिरावया जातांना ॥86॥ पति-पत्नी असतो परी । तुमची उणीव भासते तरी । आणि बैसतों पारावरी । तुमचिये स्मरणार्थ ॥87॥ ऐसे विचार येती मनांत । तो सुदिन असे येत । श्रीगुरु येतीं धांवत । बघावया मजला ॥88॥ एके दिवशीं सकाळीं । मी करोनियां आंघोळी । उभा राहिलों देवाजवळी । नमस्कार करावया ॥89॥ नमस्कार होतों करित । तोंच लक्ष गेले खिडकींत । सूर्य होता उगवत । क्षीतिजावर दिसलें मला ॥90॥ हळु हळु येई वर । रंग लाल गोलाकार । प्रकाश पडला मजवर । खोलीही प्रकाशिली ॥91॥ उगवत होता प्रभाकर । दिसला अतिसुंदर । तेज होते अति प्रखर । सूर्याहून आगळे ॥92॥ क्षणीं भान गेलें हरपून । परि वाटे कीं दिन । वर आला असून । सूर्य उगवे कैसा ॥93॥ धांव घेतली खिडकीशीं। वरी पाहिले सूर्याशीं । एक समोर दुसरा आकाशीं । आश्चर्य पावलों मनीं ॥94॥ नंतर आले कळून । कीं ते विश्वरुप दर्शन । गुरु मज देती आनंदून । वचन पाळिलें तयांनी ॥95॥ त्वं सूर्य: त्वं चंद्रमा: । ऐसा जयाचा महिमा । त्या भक्त कल्पद्रुमा । पाहिलें असे नयनीं ॥96॥ गुरु ऐसा करुणाकर । घन वर्षे जैसें नीर । तृप्त करितो धरणीतल । श्रावणमासीं प्रेमानें ॥97॥ माझी इच्छा केली पूर्ण । म्हणोनी आनंदे भरोन । मयूरापरी मत्त मन । नाचो लागे प्रेमानें ॥98॥ मी मनीं रंगलों बहूत । सूर्यापरि पाहिला भगवंत । निर्गुण निराकाराचे रुपांत । गुरु पाहिला असे मी ॥99॥ उदयाचलींचा भास्कर । मी जेव्हां बघतो धरेवर । गुरुच आहे समोर । म्हणून वंदितो नित्य ॥100॥ परिआतां श्रोतेजन । गुरु कैसा असतो जाण । तुम्हासीं केले वर्णन । निर्गुण सगूण दोन्ही ॥101॥ तुम्हां जें आवडेल ध्यान । त्याचेच करावे चिंतन । गुरु तैसा येईल दिसोन । तुमचेच इच्छेपरी ॥102॥ जरी सगुण रुप आवडेल । तैसाच तो सेर्ध कौल । जैसा भाव तैसा पावेल । भक्तजन तुम्हाला ॥103॥ तरी भाव असावा निष्पाप । मनांत नसावा संताप । तुमचे धुवूनियां पापा । गुरु निष्कलंक करील ॥104॥ परिसर्व धर्म त्यजूनि । जो शरण जाईल चरणीं । गुरु तयास उद्धरोनी । मोक्षाप्रत नेईल ॥105॥ तरी शरण जावें गुरुला । गुरु न दे अंतर तुम्पाला । तुमच्याच करितां थांबला । सत्य सांगतो तुम्हाला ॥106॥ गुरु पाहतसे वाट । भक्ताची घेण्या भेट । परि तुमचीच आहे खोट । प्रेमाच्या भरतीची ॥107॥ प्रेमाचें येईल भरतें । गुरु उचलील स्वहस्तें । याहून मी कांहीं परते । अन्य न सांगू शके ॥108॥

इति श्रीभाऊचरित्रामृत कथनं नाम त्रयोदशोऽध्याय:। श्रीदेव वेतोवार्पणमस्तु । शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

<< विसावा – अध्याय १२        विसावा – अध्याय १४ >>

Click to rate this post!
[Total: 1 Average: 2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *