Shri Madhukar Sule

श्री मधुकरांनी आयुष्यभर वेचलेल्या साहित्य मधुने भरलेला हा अक्षय पात्र वेबरूपी मधुकलश, त्यांच्या ११ मार्च २०१८, ह्या दिवशी असलेल्या ९१व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकल जनतेला उपलब्ध करून देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारतातील गुजरात राज्य, बडोदे शहरातील, कविवर्य आणि लेखक, साहित्यप्राज्ञ श्री मधुकर गजानन सुळे ह्यांच्या आध्यात्मिक साहित्याचा, आज भारतात आणि भारताबाहेर अनेक भक्तजन आस्वाद घेत आहेत, लाभ घेत आहेत. त्यांनी लिहिलेली ओवीबद्ध संत चरित्रे , संत शती, संत बावन्या, श्री गुरुचरित्रावर आधारित गीत दत्तात्रेय ,अनेक देवांच्या आरत्या असे सर्वच साहित्य अतिशय भक्तप्रिय आहे . भक्तजन आपापल्या आवडीनुसार भावभक्तीने त्यांच्या आध्यात्मिक साहित्याची वैयक्तिक अथवा सामूहिक पारायणे करीत आहेत आणि अलौकिक अनुभव घेत आहेत. त्यांचे इतरही साहित्य बालगीते , शौर्यगीते , नाट्यगीते, स्फुटगीते, संगीतिका ह्यांचे अनेक ठिकाणी मनोरंजनपर कार्यक्रम झाले आहेत. महाकवी कालिदासाच्या शाकुंतलवर आधारित “गीत शाकुंतल” हा छायानाट्य (shadowplay) सह केलेला संगीतिकेचा कार्यक्रम, त्यांच्या अतिशय सुंदर आणि लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. त्याचा आस्वाद अमेरिकेतील रसिकांनीही घेतला आहे. बालगीतातून दिलेली सहज सुलभ शिकवण ,गीत शाकुंतल मधील तारुण्यातील नैसर्गिक प्रीती भावनेचे वर्णन, आध्यात्मिक लेखनामधून सोपे करून सांगितलेले अध्यात्म आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात भक्तांना सहजसाध्य करता येण्यासारखी देवाची मानसपूजा , अश्या विविधतेने त्यांचे साहित्य नटलेले आहे. ओघवती सोपी भाषा हे त्यांच्या वर्णन शैलीचे वैशिष्ट आहे. वाचलेले वर्णन वाचकांच्या भावविश्वात उभं करण्याची त्यात ताकद आहे. म्हणूनच रसिकांनी , भक्तांनी ह्या मधुकलशातील साहित्य मधुचा जरूर आस्वाद घ्यावा.

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू विद्योत्तेजक मंडळी, बडोदे कडुन जीवन गौरव पुरस्कार २१/०१/२०१८ ला घेताना.