विसावा – अध्याय १२
॥ श्री ॥
॥ अथ द्वादशोऽध्याय: ॥
श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रोतीं व्हावें सावधान । नयन घ्यावे पुसून । हृदय आलें भरून । तेंही जरा आवरावें ॥1॥ आहे ही जग रहाटी । आज भरती उद्यां ओहोटी । म्हणोनी न व्हावें कष्टीं । जीवनांत आपुल्या ॥2॥ जो जो येईल जन्माला । त्याचा मृत्यूही असे ठरला । जन्म मरणाचे फेर्याला । अपवाद नसे कोणीहि ॥3॥रामकष्ण होते अवतारी । परि तेही न चुकती फेरी । संत जाहले श्रेष्ठ तरी । त्यांनाही काळ सोडीना ॥4॥ अरे देह तरी काय । आत्म्याचा दुसरा पहेराव । निष्काम होता अपुला देह । प्रवशितो तो दुसर्यांत ॥5॥ संसार म्हणजे माया । जी आदि पुरुषाची किमया । जीवा शिकवी प्रेम कराया ।देहावरीच आपुल्या ॥6॥ देहावरी करितां प्रेम । देहातीत वाटे सर्व भ्रम । म्हणोनियां निष्काम । प्रेम कोणी न करूं शके ॥7॥ म्हणोनी संसारीजनांना । मृत्यूचें भय वाटे मना । परि तोचि संत मंडळीना । द्वार वाटे स्वर्गाचें ॥8॥ आत्मा आहे चिरंजीव नसे त्या – मरण वा उद्भव । धारण करी देह भाव । वेगवेगळ्या जन्मांत ॥9॥ पूर्वजन्मीचें असतां सुकृत । जीव भेटती या जन्मांत । गुरु-बंधू-जाया सुत । होउनीयां भेटती ॥10॥ परी जीव असे तोंवरी । आप्तसखे सोयरीं । गुरु कृपा मात्र बरोबरी । जन्मोजन्मीं सवें येई ॥11॥ म्हणोनि गुरु असे पाठिराखा । जन्मजन्मांतरीचा सखा । हेंचि सत्य मनीं पारखा । भक्तजन तुम्ही हो ॥12॥ आतां खिन्नता द्यावी सोडून । भाऊ न दिसती म्हणोन । ते विश्वव्यापक होऊन । राहिलेत तुम्हां सवें ॥13॥ भाऊंचे निर्वाणानंतर । जे भेटती मित्र परिवार । अथवा येती पत्रोत्तरें । भक्त मंडळींची तेधवां ॥14॥ भाऊ कोणा कैसे भेटले । कोणा स्वप्नांत कैसे दिसले । कोणाशी प्रत्यक्ष कैसे वदले । आलें सर्व कळून ॥15॥ संजू मुलगी अण्णांची ॥ धार्मिक भोळ्या मनाची । तिज न माहीत भाऊंची । देवाज्ञा जाहलेली ॥16॥ द्वीतीय दिनीं शनिवारीं । ती बैसतां देवासमोरी । जप करावया पाटावरी । भाऊ प्रकटले समोर ॥17॥ अंगात लेंगा पैरणी । तिज म्हणती उद्देशुनी । मी न गेलों तुमच्यातूनी । चिंता न करावी तुम्ही ॥18॥ तिला न झाला अर्थ-बोध । धांव घेई वडिलांप्रत । कळलें कीं शुक्रवारी रात्रींत । निरोप घेतला भाऊंनी ॥19॥ ऐसे भेटूनि प्रत्यक्षांत । भक्तशोक करिती शांत । कुणा भेटुनी स्वप्नांत । निरोप होता घेतला ॥20॥ लता होती परदेशांत । तिज भेटती स्वप्नांत । अंगावर फिरवोनी हात । आशीर्वाद देती मुलीला ॥21॥ कोणा दिसलें महानिर्वाण । देव दूताचें जाहलें जाण । परि प्रत्यक्षांत असे कोण । नंतर कळले तयांना ॥22॥ संपला म्हणुनी अवतार । कोणी वाचिती स्वप्नांत पेपर । लक्षांत येई सत्वर । अर्थ तयाचा सुभक्ता ॥23॥ भैय्यासाहेब इंदौरचे । त्यांना स्वप्न झालें साचें । तुमच्या जवळच्या आप्ताचें । निधन असे जाहलें ॥24॥ परि निर्वाणाची मिळतां तार । लक्षांत येई सत्वर । हे तो माझे श्रीगुरुवर । स्वप्नांत येऊनी सांगती ॥25॥ त्यांची अतिशय होती प्रीति । त्यांची अतिशय होती भक्ती । त्यांची दृढ होतीं नातीं । पूर्वजन्मींची कळेना ॥26॥ श्रीवेतोबा समोर दिसती । म्हणे चलावें बडोद्याप्रती । तुवां भेटावें सर्व व्यक्ती । भाऊंचिये घरांतील ॥27॥ कधीं कधीं तयांना । भाऊ प्रत्यक्ष दिसती जाणा । आणि गोष्टीं करितां नाना । मार्गदर्शन करोनी ॥28॥ कधीं वेतोबासह भाऊ येती । तयांचे शेजारी बैसती । चर्चा करिती अतिप्रीति । परि सांगती तयांना ॥29॥ तुवां जावें बडोद्यास । मार्गदर्शन करावें बालकांस । छत्र आमुचें तयास । आहे म्हणोनी सांगावें ॥30॥ ऐसा मिळतां आदेश । भैयासाहेब येती बडोद्यास । आणि बैसती देवा समक्ष । ऐशा एका शुभदिनीं ॥31॥ समाधी लाविली देवासमोर । भाऊ प्रकटती तयां समोर । वेतोबाही असती बरोबर । आदेश सांगती तयांना ॥32॥ आज पासोनी तुजवर । आम्ही प्रसन्न झालों खरोखर । तुवां सांभाळावा परिवार । माझिये घरांतील ॥33॥ माझी दिव्य आध्यात्म शक्ती । तुझी पाहोनियां भक्ती । अर्पिली मी प्रसन्नचितीं । रिक्त होऊनी मी स्वत: ॥34॥ प्रसाद लावण्याचा अधिकार । तुज दिला मी देवासमोर । तैसेच आशीर्वादाधिकार । आज पासोनी अर्पिले ॥35॥ माझें जे कार्य असे राहिलें । तें तुवां पाहिजे केले । मी तुजवर सोंपविले । सारे माझे भक्तजन ॥36॥ ऐसें तयांचे झाले संभाषण । ते परिवारांत सांगती जाण । तोची सर्वांचा आनंद क्षण । प्रतिभाऊच भेटती ॥37॥ गुरुमाऊलींचे चरण धरिती । वाटे आईच भेटे प्रत्यक्ष ती । धन्य जाहलों आज म्हणती । जीवनांत आमुच्या ॥38॥ वेंगवेगळ्या भक्तांत । गुरू येऊनी भेटतात । आणि आपुले रुप अव्यक्त । सव्यक्त करिती दर्शनें ॥ भैय्यासाहेब त्यानंतर । बडोद्यास येती वारंवार । माया करिती अपार । सहपरिवार दोघे ॥40॥ ऐसेच एकदां येती । देवा समोर बैसती । गुरुसमोर समाधि लाविती । सस्मित येती समोर ॥41॥ सीमा जवळ होती बैसली । तिज दाखवुनिया करांगुली । भाऊंचे फोटो प्रति दर्शविली । पहावें म्हणोनियां ॥42॥ तिने पाहिले फोटोंत । तो देखे स्वयंप्रकाशित । भाऊंची जीवन ज्योती । प्रकटलीसे समोर ॥43॥ पारदर्शक होती देहाकृती । आंत दिसे जीवन ज्योती । हर्षे अति रोमांच दाटती । कंप सुटला शरिरीं ॥44॥ ऐसें घडता तिज दर्शन । ती भान गेलीस हरपून । परमोच्च आनंदाचा क्षण । तिला सद्भाग्यें लाभला ॥45॥ ती असतां भाव समाधींत । वाटे भाऊ सगें बोलत । दूध घेता कां विचारीत । हुंकार देती भैय्यासाहेब ॥46॥ दूध केलें केशरमिश्रित । ओतून चांदीचे पेल्यांत । घेऊन आली धांवत । पाजावया भाऊंना ॥47॥ स्वहस्तें घेती दोन घोट । पेला देती हातांत । लावूनी तिचे ओठा लगत । प्यावें म्हणोनी सांगती ॥48॥ भाऊंची होती प्रीति । म्हणोनी तिज नित्य देती । शेष काढूनि ठेविती ।खाण्यापिण्यांतील आपुल्या ॥49॥ त्यांची ऐसी होती पद्धत । ती आतांही घडे प्रत्यक्ष । म्हणोनी हर्षें प्रेमभरित । सीमा होऊनी जाय ॥50॥ तेथोनी उठे झडकरी । तेल घाली डोक्यावरी । भैय्यासाहेबांचे शिरावरी । भाऊ म्हणोनी तेधवां ॥51॥ केश न दिसती शिरावरी । टक्कल दिसे भाऊंचिये परी । आश्चर्य वाटे खरोखरी । समाधी उतरली तयांची ॥52॥ म्हणे भाऊ होते प्रत्यक्षांत । माझ्या देहांतून बोलत । तुमच्या सवें ही बोलत । पहात होते सर्वांना ॥53॥ ऐसे वारंवार येती । भक्तांनाही नित्य भेटती । भाऊंचीही प्रतिकृती । भैय्यासाहेब आमुचे ॥54॥ जेव्हां येती भैयासाहेब । भक्तांस होई भाऊंचा भास । ऐसा हा अव्यक्ताभास । अनुभवती वारंवार ॥55॥ नाना महाराज इंदौरचे । प्रेम होते अण्णावर त्यांचें । दर्शन घ्याया नानांचे संजू गेलीसे एकदां ॥56॥ नाना बैसले पलंगावरी । संजू तयांना नमस्कार करी । वरी बघता आश्चर्य करी । भाऊ दिसले समोर ॥57॥ तिला न कळे नमस्कार । कोणा केला खरोखर । त्यावरी नाना देती उत्तर । आम्ही दोघेही एकच ॥58॥ मनीं जाहला अति संतोष । गुरु भेटले प्रत्यक्ष । नानांचे पाहिले देहात । आश्चर्य पावली मनोमनीं ॥59॥ भक्ताचा असतां शुद्ध भाव । गुरु घेई त्वरित धांव । आणि दर्शनाची हांव । पुरवितसे आवडीने ॥60॥ यावरून श्रोतेजन । तुम्हांस आलें असे कळून । की भाऊ न गेले जगांतून । अदृश्य रुपें वावरती ॥61॥ एकदां नंदाचे छातींत । बहुत होते दुखत । म्हणोनी पहुडली सोफ्यांत । आराम करावया ॥62॥ जवळ होता ट्रॅन्झिस्टर । तो ठेवुनियां पोटावर । ऐकतां ऐकता सुस्वर । निद्रा लागली तियेला ॥63॥ बाहेरील व्हरांड्यांत । मी बैसलो होतो जप करीत । तेथोनी मीही ऐकत । होतो सुस्वर गायनाचे ॥64॥ कार्यक्रम जाहला समाप्त । तरीहि ट्रँन्झिस्टर खरखरत । तो बंद कां नाहीं करीत । म्हणोनी आलो बघावया ॥65॥ सोफ्यावरी होती नीद्रिस्त । पूर्णपणें होती घोरत । मी हलकेच काढुनियां घेत । पोटावरून तिचीया ॥66॥ सहज लक्ष गेलें मुखावरी । भस्म दिसलेसे कपाळावरी । मी सहज तिज विचारी । कोणी लाविलें भस्म हे ॥67॥ अर्धवटशी होऊन जागृत । म्हणे कोणी बैसले होते खुर्चीत त्यांनीच वाटे की लाविले । ऐसें कांही भांसलें ॥68॥ उंच गोरीपान व्यक्ती । आतां जवळी बैसली होती । उठोनी गेली देवखोली प्रती । वळलीसे नुकतीच ॥69॥ पाहतां भस्म शिरावरी । आणि लाविलेसें छातीवरी । आश्चर्य वाटे खरोखरीं । दू:ख गेलें पळोनी ॥70॥ कोण होती अदृश्य व्यक्ती । जे तिज येऊनी संरक्षिती । प्रसाद लावितां कळलें की ती । गुरु माऊली होती प्रत्यक्ष ॥71॥ भक्ताचे सुख दु:खाची चिंता । गुरुच करितो रे सर्वथा । परि सर्वस्व अपुलें देतां । आलें पाहिजे तयाला ॥72॥ जो सर्वस्वाचें करील अर्पण । न मम न मम असे म्हणून । गुरु त्यांचेच जीवन । स्वकरीं चालवितीं ॥73॥ जेथें जेथें तो जाईल । गुरु सावली परी राहतील । त्याचें जीवन फुलवील । फुलापरी सुगंधानें ॥74॥ असो एकदां गुरु माऊली । देवखोलींत होती झोपली । प्रकाश पाहोनी जागी झाली । उठोनी बैसली झडकरी ॥75॥ वाटे कोणी दिवा लाविला । म्हणोनी पाहे चहुंबाजूंला । प्रकाश गोळ्यावरी न दिसला । परि खोलींत भरलासे ॥76॥पौर्णिमेच्या चंद्रापरी । प्रकाश वाटे खरोखरी । प्रसन्न शांत वाटे तरी । गौड बंगाल कळेला ॥77॥ क्षणैक सरला भास । अंधार दिसला चहुबाजूस । मग कसला दिसला प्रकाश । काय होतें कळेना ॥78॥ झोंप न येई नंतर । वाटे उठावें लवकर । प्रसाद लावावा सत्वर । विचारावें देवासी ॥79॥ प्रसादांत मिळे उत्तर । कीं ते पतिपरमेश्वर । प्रकाशमय निराकार । प्रकटलेसे तेथें ॥80॥ प्रकाशमय किरणांनी । तुज कुरवाळीत होते करांनी ।साऊली परी तयांनी । तुझी संगत न सोडिली ॥81॥ ऐशा ऐकोनियां उत्तरी । काकी हर्षती मनांतरीं । पति देव निरंतरी । लक्षीतसे तयांना ॥82॥ ऐसा हा गुरु परमेश्वर । अंगांत संचरे सत्वर । दोघांत न राही अंतर । गुरु-माऊली एकच ॥83॥ एक झांकली दूसरी प्रकटली । ऐसी स्थिति असे जाहली । कोणकोणाचीं साऊली । विरलें सारें अंतर ॥84॥ शिव आणि शक्ति । यांची जैशी जाहली युती । तैसीच श्रीगुरु माऊलीयुती । जाहली असे रे भक्ता ॥85॥ काकी जेव्हां ध्यान धरिती । तेव्हां प्रकटे श्रीगुरुमुर्ति । आणि भक्तांनांही दर्शन देती । स्वदेहांत आपुल्या ॥86॥ आतां सांगा भक्तजन । कोठें उरलें न्यूनपण । स्त्री देहांतर करुन । गुरु प्रकटलेसे तुमच्यांत ॥87॥ परि गुरु नसे व्यक्तींत । गुरु नसे फोटोंत । गुरु भावांत आहे जागृत । त्याते जाणावें भक्तानें ॥88॥ ज्ञान मार्ग आहे श्रेष्ठ । परि भक्ति मार्ग नसे कनिष्ठ । भोळ्या भावावरी संतुष्ट । देव होतो झडकरी ॥89॥ भोळा जरी असेल भाव । गुरु दिसेल सर्व ठाव । परि भक्तिचा असतां अभाव । रिक्त वाटेल सर्वस्व ॥90॥ म्हणोनियां श्रोते जन । भाऊ सांगती जे जे जाण । कर्म करावया गेले सांगोन । तें आचरावें निष्ठेनें ॥91॥ निष्ठा ढळों द्यावी न । आतां भाऊ नसती म्हणोन । लक्ष नसे त्यांचे वाटून । जपानुष्ठान सोडूं नये ॥92॥ गुरु जें करावया सांगती । त्यानेच होईल उपरती । दैवगतीची चक्रें फिरती । अभयुदयाकडे त्वरीत ॥93॥ जैसी कलेनें चंद्रगती । वाढतां वाढतां होई पुर्णाकृति । तैसे दैवाची ही मंदगती । द्रुत गतीनें चालुं लागे ॥94॥ परि मनुष्य होतो अतीअधीर । वाटे कां न होई लौकर । आणि दूषण देतां सत्वर । कार्य भाग नासतो ॥95॥ जैसें कोळीं बांधतो घर । उंचावर येई सत्वर । परि तंतू तुटतां सरसर पायापाशीं येतसे ॥96॥ तैसेच आहे भक्तजन । तुम्हीं जरी करिता विश्वासून । गुरु घेत असतां उचलोन । कुशंका तोडिते तुम्हांस ॥97॥ तुम्हीं जातां घसरुन । राग गुरुवरी धरोन । परि तंतूंचे कच्चे पण । ध्यानीं तुम्ही घेत नाही ॥98॥ ऐसा असावा भक्तीचा तंतुं । तेथे नसावा कोणता किंतु । गुरुपणाचा एकच हेतु । साध्य व्हावां म्हणोनी ॥99॥ ऐसी असतां एक दृढता । गुरु न पाहे आप-पर-ता । सांभाळी आपुल्या भक्ता । एकरुप होऊनी ॥100॥ मज कोणी न पाहे म्हणून । नका राहु विसंबून । गुरुचे चंद्र सूर्य लोचन । सतत न्याहळतीं तुम्हांला ॥101॥ आणि गुरु पवन होऊन । सतत राही विलगून । तुमचें अंतर्मन जाणून । सर्वतोपरि संतोषविती ॥102॥ ऐशा या जीवन लहरींतून । गुरु तत्व राहिलें भरुन । आहे अणुरेणूंतून । भरलेलें सर्वदा ॥103॥ माया ममतेचें आवरण । आंत जीव राहे गुदमरुन । त्यासी तेंच वाटे सुखी जीवन । भ्रम निरसन होई ना ॥104॥ परी निसर्गाची चाले क्रिया । देह विसर्जोनि बदलावया । रात्र सरोनी येई उदया । दिन जैसा फिरोनी ॥105॥ गुरु तत्व आहे सूर्यापरी । तें स्थिर आहे सृष्टीभीतरीं । जीव मात्र फिरती परोपरी । सभोंवताली तत्वाच्या ॥106॥ म्हणोनियां श्रोतेजन । गुरु आनंद रुपी जाण । भरलासे सृष्टीतून । केवळ आनंद कंद म्हणोनी ॥107॥ त्याचें घ्यावया दर्शन । केवळ त्यांच्याच कृपेवांचुन । इतरात नये श्रेष्ठपण । तुज तें दाखवाया ॥108॥
इति श्रीभाऊचरितामृत-कथनं नाम द्वादशोऽध्याय: । श्रीदेव वेतोबार्पणमस्तु । शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥