विसावा – अध्याय ११

 

॥श्री॥
॥ अथ एकादशोऽध्याय: ॥

श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभे नम: । श्रोते आदरे मज बोलती । आरवलीं यात्रा घडविली चित्तीं । वरी मंत्राची कथि महती । धन्य केलें आम्हांला ॥1॥ गुरु मंत्रातें सांगुन । आम्हांस केलें पावन । वाटे करविलें अमृत पान । संजीवनी दिधली ॥2॥ गुरुचरित्र संजीवन । तूं दाखविलेस उकलून । दीव्यत्वाचें घडलें दर्शन । संभ्रम जाई विलयास ॥3॥ तरी आतां कथिरे कांहीं । आम्ही अधिक होऊं उतराई । सर्व इंद्रियांस झाली घाई । कथी रे कथी लवलाहीं ॥4॥ मी तुमचे अडकलो प्रेमांत । सांगतों सांगतों व्हावें शांत । गुरुचें प्रेम असे, उदात्त । शीत शांत नी प्रशांत ॥5॥ उमललेल्या फुलासंगत । भ्रमर येती सुगंध शोधित । तैसें हे असती साधु-संत । सुगंधित फुलां परी ॥6॥ येती भवभय भ्रमर । भाऊंचे कडे वारंवार । जीवन कराया मधुर । मधु-मक्षिका बनोनी ॥7॥ कोणी येती पुत्र कांक्षांनीं । कोणी पुत्र मरती म्हणोनी । कोणी लग्न व्हावें म्हणोनी । कोणी परिक्षा कारणें ॥8॥ कोणीसंसारिक अडचणींनीं । कोणी शारिरिक दु:खांनीं । करावया परमार्थसाधनी । भ्रमर येती गुंजत ॥9॥ ऐशा नानाविध दुखांनी । लोक सांगती कर्मकहाणी । भाऊ मात्र शांत मनीं । ऐकून घेती सर्व तें ॥10॥ प्रसाद देवाला लावुनी । मार्ग काढती शोधुनी कर्म घेती करोनी । इच्छा करिती पूर्ण ॥11॥ अभिमान वाटतो सांगण्याला । कीं कोणीं येथोनि न गेला । जो रिक्त हस्ते परतला । गुरु पासोनी माझिया ॥12॥ जे श्रद्धेनें येती भाऊपाशीं । ते बनुनियां मधमाशीं । चिटकोनी राहती चरणाशीं । जीवन मधुर कराया ॥13॥ तुमच्या कुलदेवताची सेवा । भाऊ सांगती करावया । तेंचि समर्थ तारावया । भक्त जन तुम्हालां ॥14॥ कुलदैवत असतां प्रसन्न चित्तीं । आराध्य करतील सन्मान । भक्ति मार्ग सुलभ करून । मोक्षाप्रत नेईल ॥15॥ जैसे धन्वन्तरी नाडी बघती । तैसें भाऊ कुलदैवत शोधिती । भक्ता करिती प्रसन्न चित्तीं । मार्ग सुलभ सांगोनी ॥16॥ अमुची नवलाई कुलस्वामिनी । गुप्त होती स्वकुलांमधुनी । पूजा न घेतली स्विकारुनी । तीन पिढ्या पर्यंत ॥17॥ परि गुरु असतां प्रसन्न । दैवतें येती धांवून । साह्यार्थ कर जोडुन । उभीं राहती भक्तां पुढें ॥18॥तैसीच नवलाई जननी । भाऊंना सांगे दर्शन देउनी । मी स्वकुलां प्रवेशुनी । कल्याण करीन मुलांचें ॥19॥ आमुची पुजा स्विकरुनी । प्रसन्न झाली कुलस्वामीनी । जय नवलाई भद्र कारणी । शरण शरण तव पायीं ॥20॥ आतां जाहलीस प्रसन्न । तरी घ्यावें मज करवीं लिहून । श्रीगुरुचें चरित गुणगान । पूर्ण करोनियां ॥21॥ भैय्यासाहेब दिवाणजींचें । कुलदैवत होते शंकरांचे । पिंडी देती पूर्वज तयांचे । पुजावयासी नित्य ॥22॥ पूजा न होई बरोबर । कुलदैवताचा करिती अव्हेर । आजारीं पडती सहोदर । वारंवार सगळे ॥23॥ प्रश्न पुसतां भाऊंना । म्हणे उपाशीं ठेविता कैलास राणा । दहिभाताचे नैवेद्याविना । सुख कैसे इच्छिता ॥24॥ प्रकाश पडला डोक्यांत । कीं बंधूला नित्य असे दिसत । दहि-भाताचे ताट फिरत । पिंडी भोंवती स्वप्नांत ॥25॥ उकल होतां प्रश्नाचा । अभिषेक करिती रुद्राचा । नैवेद्य दाखविती दही-भाताचा । भोळा सांब प्रसन्न होई ॥26॥ यावरुन श्रोतृगण । कुलदैवत श्रेष्ठ जाण । तुम्हीं त्यांस अव्हेरुन । भवसुख न साधाल ॥27॥ म्हणोनी भाऊ सांगतीं । नित्य वाचावी सप्तशती । कुलदैवत होई प्रसन्न चित्तीं । संसार सुख लाभेल ॥28॥ कोणा शिवकवच सांगती । कोणा अथर्वशीर्ष सांगती । पाहोनी भाविकाची भक्ति । मंत्र सांगती तयांना ॥29॥ ऐशा वेगवेगळ्या मार्गांनी । भक्तांची करांगुली धरुनी । भक्ति मार्ग दाखवोनी । इच्छित स्थळीं नेती ॥30॥ परि आतां सांगू लागले । शरिर माझें असे थकलें । पैलतिरीं नेत्र लागले । चाल वाटेसे खुंटली ॥31॥ मधुमेह होता शरिरीं । वरी रक्तदाब जोर करी । ते पहुडती पलंगावरी । आजारी असतांना ॥32॥ परि जेव्हां जेव्हां पडती आजारी । शिवलिंग दिसे पोटावरी । आरोग्य लाभतें शरिरी । हिंडूं फिरुं लागतीं ॥33॥ पडल्या पडल्या पलंगावर । दर्शन देती हरिहर । श्रीवेतोबा राजेश्वर । नित्य भेटतसे तयांना ॥34॥ कधीं दत्तात्रय दिसती । चुंबन घ्याया जवळ येती । परि अवचित येई जागृती । हळहळती मनांत ॥35॥ भूमिया-पूर्वस-सातेरी । मंगेशी नी शांता दुर्गेश्वरी । एकवीरा येई समोरी । दर्शन द्याया भाऊंना ॥36॥ ठायीच बैसोनी करा एकचित्त । आवडी भगवंत, आळवावा । नलगे सायास, जावें वनंतरा । सुखे येतो घरा नारायण ॥37॥ ऐसी तुकारामांनी । कथिली जी अभंगवाणी । घडे भाऊंचे जीवनी । तैसेच कांहीं ॥38॥ आम्ही जात असूं फिरावयाला । भाऊ आळविती श्लोकाला । वाटे कीं पैलतीराला । पाऊलें कां वळती ॥39॥ सदासर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणीं देह माझा पडावा । उपेक्षू नको गुणवांता अनंता । रघुनायका मागणें हेंचि आता ॥40॥ असे ते असतां बोलत । मी तयांना मधेच अडवित । परि म्हणती आतां सोबत । थोडीच आहे माझी ॥41॥ ते सत्य जरीं वदती । तरी नेत्राला येई भरती । आणि वाटूं लागे भीति । अंतर्मनांत माझिया ॥42॥ कधीं कधीं सांगती । पहांटेच्या समयीं येती । कोणी अज्ञात व्यक्ती । पूजा करिती माझी ॥43॥ कधीं कोणी स्त्री येऊन । दाबीत असे माझे चरण । कोणी उदबत्ती ओवाळून । मस्तक ठेविती चरणांवरी ॥44॥ असा मी आहें कोण । कीं या व्यक्ति पहांटे येऊन । पूजा करिती माझी जाण । काय आश्चर्य कळेना ॥45॥ आम्हांला कळलें नाहीं । ही अतर्क्य लीला कांहीं । ईहलेकींची कार्यवाही । वाटे परि संपली ॥46॥ म्हणोनियां बोलाविती । या स्वर्गलोकींची विभूती । स्वर्गांत त्यांची वाट बघती । पूजनासाठीं ॥47॥ होते जे तयांचे सुभक्त । त्यांचे घरी जाऊनी राहत । आवडीनें पुसती मनोरथ । शुभेच्छा दर्शवुनी ॥48॥ नातवाचा असतां वाढदिवस । आम्ही गेलो भेटावयास । परि बेचैन वांटे जीवास । तेच दिनीं तयांना ॥49॥ म्हणें बरें केलें तुम्ही आलांत । तुमचीच वाट होतो पहांत ।मी पाय असतां चेपीत । उद्देशून बोलले नंदाला ॥50॥ मी सर्व कांहीं तुला दिले । तुझें कल्याण होईल चांगलें । परि तुमचे पहावया भलें । मी मात्र नसेन ॥51॥ असें म्हणोनी दुधाचा पेला । नंदाला स्वकरांनीं दिधला । शरिरीं पूर्ण संचारला । आशीर्वाद तयांचा ॥52॥ मज म्हणती तुज निश्चित । मी भेटेन रे अवचित मज करितां खोलींत । जागा ठेव चांगली ॥53॥ आम्हां न कळला अर्थ । पुढें वाढिला कोणता अनर्थ । आम्ही केवळ स्वार्थ । पाहत होतों सदैव ॥54॥ तेचि शुक्रवारीं पौर्णीमा दिनीं । जेवीत असतां सदनीं । हृदय विकारांचे झटक्यांनीं । जीवन ज्योत मालविली ॥55॥ श्रीवेतोबाचे स्वरुपांत । ज्योति जाऊनियां मिळत । घरांत झाल एक आकांत । भाऊ आमुचे गेले कीं ॥56॥ आतां न ते बोलणार । आतां न ते पाहणार । आतां न ते दिसणार । छत्र नेलें हिरावुनी ॥57॥ अश्रूभरल्या नयनीं । आम्हीं होतों बैसोनी । सुभक्त-कुटुंबीय मिळोनी ।सभोंवतालीं तयांचे ॥58॥ आण्णा, भाऊंचे सुभक्त । भाषण देती स्मशानांत । कीं भाऊ सारिखे संत । दुर्मिळ असती संसारीं ॥59॥ जैसे एकनाथ वागले । भाऊ तेंचि जीवन जगले । जनार्दन स्वामि जाहले । दुसरेच कीं जीवनी ॥60॥ राग द्व्रेष प्रकोप । कधीं न येई त्यांचे समीप । प्रेम करिती निष्पाप । सर्वांवरी आपण ॥61॥ मधुर मधुर बोलुनी । कोणासही घेती आकर्षुनी । ऐशा या संतचरणीं । नमन असो आमुचें ॥62॥ ऐशी श्रद्धांजली वाहत । तोंच आश्चर्ये आम्ही पहात । चिंतेतुनी बाहेर हात । येई आशीर्वाद द्याया ॥63॥ आम्ही जातो आमुचे गांवा । आमुचा राम राम घ्यावा । आता असो द्यावी कृपा । एसें कांही सुचवीत ॥64॥ अथवा जे न भेटती कोणी । शेवटच्या याही क्षणीं । त्यांना आशीर्वाद देऊनी । मन:शांती दिधली ॥65॥ ऐसे तयांचे थोरपण । मी तुम्हां काय सांगू म्हणून । ईहलाकींची चिंता जाण । परलोकींही करिती ॥66॥ माझे द्वितीय पुत्रासी कथिलें । की तू विज्ञान पाहिजे घेतले । तेथेंच तुझे होईल भलें । अन्यमार्गीं जाऊ नको ॥67॥ परि आजाराचें घडलें कारण । फी ची तारीख गेलीं निघोन । आणि वाणिज्याकडे विनाकारण । जावें लागलें तयाला ॥68॥ ऐसें घरी असतां घडत । भाऊ येऊनि स्वप्नांत । चिमुकल्या नातवासी सांगत । तुज भेटेन समक्ष ॥69॥ बसावें बैठकीचे खोलींत । कोणा न घ्यावे संगत । तेथें मी तुज दिसत । दारें असावी बंद ॥70॥ मात-पित्यांची सम्मती घेऊनी । बसे खोलींत येउनी । दिव्य ज्योती फोटोतुनी । निघालीसे भाऊंच्या ॥71॥ ज्योती स्थिरावे सोफ्यावरी । भाऊ बनती देहधारी । नातवास आपुल्या विचारी । काय गडबड रविची ॥72॥ मी सांगितले होते तयाला । विज्ञानाकडे जावयाला । मग वाणिज्याचे बाजूला । काय म्हणूनी गेला तो ॥73॥ यतिन बोले आजोबाला वाटे फी भरण्यास उशीर झाला । परि म्हणती सांग तयाला । विज्ञानाकडेच जावें ॥74॥ ऐसी गुरुची आज्ञा मिळतां । आम्ही प्रयत्न केला तत्परता । विज्ञानाकडे जागा मिळतां । शांति लाभली आम्हाला ॥75॥ ऐसी इहलोकीची चिंता । भाऊ करिती परलोकीं असतां । आणि स्वप्नांत भेटुनी भक्तां । निरोप घेती तयांचा ॥76॥ त्यांचे जे भक्त भेटती । तन्नेत्रीं दु:खाश्रु धारा वाहती । एवढेच वर्णन आहे पुरती । उणीव त्यांची सांगण्या ॥77॥ त्यांची भासतसे उणीव । कासावीस होई जीव । कां रे! तुज न येई कींव । आपुल्या भक्ताची ॥78॥ माया केलीस अपार । विदेही झालास सत्वर । आतां पाहूं वारंवार । सांग कोठें तुजला ॥79॥ ऐसी ओढ लागतां अनावर । विचार येई सुंदर । कीं गुरुपादुका सत्वर । घेऊन याव्या घरी ॥80॥ भाऊ ज्या नित्य वापरती । त्या चपला घेउनी हातीं । हृदयीं धरिल्या अतिप्रीति । गुरुपादुका म्हणोनी ॥81॥ गुरुचरणाची होती माती । तीच वाटे मज भागीरथी । ललाटीं लाविली अतिप्रीति । सुधन्य म्हणोनी ॥82॥ पादुका आणल्या घरांत । पत्नीचे मी देतां हातांत । आणि काय आश्चर्य पाहत । भाऊ उभे समोरी ॥83॥ सस्मित होते समोरी । नऊ फूट उंच देहधारी । नमस्कार करीतो वारंवारी शिरी पादुका धरोनी ॥84॥ मन जाहलेसे शांत । भाऊ न गेले प्रत्यक्षांत । जरी न ते नित्य दिसत । जवळ आहेत सदैव ॥85॥ प्रथम होते स्वदेहांत । आता राहती विदेहांत । भक्ता सभोवतीच असत । अदृश्य रुपानें ॥86॥ स्वप्नांत सांगती येऊनी । मी न गेलो तुमच्यांतूनी । जो ध्याईल मज नित्य मनीं । सन्मुख येईन तयाचे ॥87॥ जे आवडीनें गाती गीत । तयाची न सोडी संगत । नित्य भक्तां सवे राहत ।चिंता न करावी कोणी ॥88॥ ऐशा तयांच्या आठवणीं । भक्त नेती वस्तु म्हणोनी । कोणी काठी, चपला, पैरणी । नेती आपुले घरांत ॥89॥ कोणी ठेविती पुजेमधुनी । सतत सन्मुख कोणी । नित्य भाऊंच्या आठवणी । उजळीत असती भक्त ॥90॥ यावें यावें श्रोतेजन । मी दाखवितो पादुका जाण । पहाव्या तुम्ही नयन भरून । गुरुपादुका परब्रह्म ॥91॥ परब्रह्माचें घ्यावे दर्शन । जीवन करावें पावन । गुरुचरणाचें ध्यान । निरंतर करावें तुम्ही ॥92॥ ऐसें मीं तयां सांगून । पादुका दाखविल्या उघडून । श्रोते तया वंदून । त्या शिरोधार्य करिती ॥93॥ आतां बोलावे मज संगत ।जयजयकार भाऊंचा गर्जत । तुमची न सोडूं आतां संगत । ऐसा आशीर्वाद द्यावा ॥94॥ भाऊ भाऊ आणि भाऊ । तुमचे चरणापाशीं राहूं । जीवन सर्वस्व तुम्हां वाहूं । अन्य कांहीं नको बालका ॥95॥ माझें पुष्पापरी तुम्हीं जीवन । घडविलें करुणाजल शिंपून । आतां तें सुगंध भरुन । जगी डोलतें अभिमानें ॥96॥ भक्तिचा नसावा गर्व जाण । परि गुरुचा असावा अभिमान । परि कोणाचें न लेखावें कमीपण । गुरु तत्व एक असे ॥97॥ जेथें दिसेल गुरुतत्व । तेथें स्विकारावे न्रमत्व । गुरु हाची सर्वत्र । भरला असे म्हणोनी ॥98॥ नाना देह रुपें धरोनी । गुरु येतात दिसोनी । आणि कोणी निसर्गांतूनी । प्रगटती समोर ॥99॥ गुरु न केवळ देह धारी । तो निसर्गांतूनी अवतरी । विशाल रुप धारण करी । संकुचित होऊ नको ॥100॥ आतां ठेवा विशाल दृष्टि । जेथें जेथें दिसेल सृष्टि । श्रीगुरुची दिव्य दृष्टी । येईल दिसोनी ॥101॥ चराचरांत असे भरला । अंबर भरोनी उरला । तरीही शेष असे राहिला । काय सांगू भव्यपण ॥102॥ वेद चारी मुके होती । श्रीगुरुची गाण्या महती । मग मी पामर अल्पमति । काय तुजला सांगू शके ॥103॥ दिव्य प्रभेचें घ्याया दर्शन । ज्योतीरुप जो होईल जाण । तोच त्यांचे जवळ जाऊन । दर्शन मात्र घेऊं शके ॥104॥अन्यथा तुम्ही भक्तजन । दुरुन घ्यावें नित्य दर्शन । सुखी ठेवावें आम्हा म्हणून । नमस्कारावें पदोपदीं ॥105॥ गुरु प्रत्यक्ष असे शिवापरी । सांबभोळा खरोखरी । भावभक्तीनें जो नमस्कारी । प्रसन्न होई तयाला ॥106॥ तरी यावें श्रोतेजन । शिरीं धरोनी पादुका जाण । अनन्य जावें तुम्ही शरण । लीन व्हावें गुरुपदीं ॥107॥ तुमच्या सर्व मन:कामना । फलद्रुप होतील जाणा । मनीं ठेवा शुद्ध भावना । वारंवार वंदोनी ॥108॥

भवतारक या तुझ्या पादुका, ठेविन मी माथां, करावी कृपा गुरुनाथा ॥
इति श्रीभाऊचरितामृत-कथनं नाम एकादशोऽध्याय: । श्रीदेव वेतोबार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।

<< विसावा – अध्याय १०        विसावा – अध्याय १२ >>

Click to rate this post!
[Total: 1 Average: 2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *