विसावा – अध्याय १०

 

॥ श्री ॥
॥ अथ दशमोऽध्याय: ॥

श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: । भेटीलागी जीवा ।लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस । वाट तुझी । पौर्णिमेचा चंद्रमा । चकोरा जीवन । तैसें माझे मन । वाट पाहे । दिवाळीच्या मुळा । लेकी आंसावली । पाहतसे वाटुली । पंढरीची । भूकेलिया बाळ । अति शोक करी । वाट पाहे परि । माऊलीची । तुका म्हणे मज । लागलीसे भूक ।धांवूनि श्रीमूख । दावी देवा । संत श्रेष्ठ तुकारामांनीं । कथिली जी अभंगवाणी । कैसा भक्त अंत:करणीं । तळमळतो दर्शन घ्याया ॥1॥ आहे वरील अभंगांत । ओढ भक्ताचे अंतरात । म्हणोनी करितों आकांत भेटीसाठीं ॥2॥ भेट घ्यावी म्हणूनी । जीव लोचनीं आणुनी । वाट पाहे जीवनीं ।चकोरापरी ॥3॥ जैसी ओढ लागे नामदेवांना । की नयनी पहावा पंढरीचा राणा । श्री गिरीधराचे दर्शना विना । मीरा जैसी होत ॥4॥ ओढ जीवाला लागली । जाऊनियां आरवली । भेटावें माऊली । वेतोबाशीं ॥5॥ ओढ जीवाला लागली । जाऊनियां आरवली । भेटावें भूमिया । पूर्वजासी ॥6॥ ओढ जीवाला लागली । जाऊनियां आरवली । भेटावें माऊली । सातेरीशी ॥7॥ बोलावी सिद्धेश्वर । येई रे मज समोर तुज बघाया अधीर । त्रीनेत्र झाले माझे ॥8॥ ऐसी तळमख लागतां । भाऊंची वाढे अधीरता । नयनीं बघावी आतां । जन्म भूमिचीं दैवतें ॥9॥ बेत करुनी निश्चित । भाऊ मजला सांगत । यावें आम्हा संगत । आरवलीला दोघांनी ॥10॥ महाराष्ट्राचे दक्षिण भागांत । विशाल समुद्रा लगत । वसे कोकण पट्टींत । गांव आरवली ॥11॥ गांव आहे सुंदर ।निसर्ग रम्य खरोखर । श्रीवेतोबा राजराजेश्वर । वसतसे तेथें ॥12॥ भाऊंचे जन्मस्थान । पहावें नयन-भरुन । ओढ अंतरांत जाण । माझ्या ही तीव्र होती ॥13॥ म्हणुनी मिळतां अनुमति । मी दर्शविली सम्मति । जाण्या आरवली प्रती । आनंदानें तेधवां ॥14॥ कोल्हापुरांत जाऊनी । मार्गे सावंतवाडी वरुनी । फोंडा घाट ओलांडुनी । गेलों शिरोड्यात ॥15॥ शिरोड्याचे शेजारी । वसे आरवली खरी । आणि भाऊंचीये घरीं । जात असूं आम्हीं ॥16॥ मंडळी सहित अगोदर । भाऊ जाती पूर्वोत्तर । म्हणोनि येती समोर । स्वागत आमुचें कराया ॥17॥ पाहोनिया त्यांचें घर । आनंद वाटे खरोखर । केळी, नारळी सभोंवार । विहीर-प्रांगण मोठें ॥18॥ होत्या कामधेनु तीन । वाटे गोकुळीची प्रतिमा सान । खेड्याचें वाटे आकर्षण । वेगळेंच काही कळेना ॥19॥ दुसरे दिनीं प्रात:काळी । करोनियां सर्व आंघोळी । आम्ही निघालो राऊळी । भाऊ संगे झडकरी ॥20॥ उभे राहीलो रस्त्यावरी । तेथून दिसे मूर्ति समोरी । इतकी ऊंच आहे खरी । काळी मूर्ति देवाची ॥21॥ करोनियां नमस्कार । सहज फेकिली नजर । निसर्ग रम्य खरोखर । अति सुंदर दिसला ॥22॥ झाडें उंच उंच नारळाची । बाग पसरली सुंदर केळीची । काजू आणि फणसाची ।लागवड होती केली ॥23॥ गोडी जयाची अमृतापरी । ते हापूस नी पायरी । कोकणची वाढवी थोरवी । दुनियेंत सार्‍या ॥24॥ निसर्ग रम्य सान्निध्यांत । विशाल ऐशा परिसरांत । सुंदरशा शिल्पाकृतींत । भव्य मंदिर हें वसलें ॥25॥ भव्य होतें प्रवेशद्वार । वरी बैसती वाजंत्रीकार । सांज सकाळीं सुंदर । सूर लाविती सनईचे ॥26॥ प्रवेश करोनियां आत । चढोनियां सभामंडपांत । प्रवेश केला मंदिरांत । उभे राहिलों मूर्तिपुढें ॥27॥श्रीवेतोबा उभे गाभार्‍यांत । नऊ फूट होते उंचीत । वाटे कीं भव्य दैवत । उभें आहे समोरी ॥28॥ दिसे ऊंच भव्य मूर्ति। काळी कुळकुळीत दिव्य कांती । भव्य मोठे नयन दिसती । शुभ्र पांढर्‍या मिशींत ॥29॥ किरीट शोभे शिरावरती । मकर कुंडले सुंदर दिसती । अमृतपात्र डाव्या हातीं ।उजव्यांत धरिला खडग ॥30॥ शुभ्र तलम धोतरांत । उघडें होतें शरिरांत । पर्णें शरिरीं होतीं दिसत । प्रसाद घ्यावा लाविलीं ॥31॥ ऐसी पाहूनिया मूर्ति । प्रसन्नता वाटे चित्तीं । उत्स्फूर्त सुचे आरती । वेतोबाची तेधवां ॥32॥ संपता संपता आरती । पत्निची खिळली दृष्टि । वेतोबाचे मूर्ति वरती । क्षणैक येई भानावर ॥33॥ म्हणे तेथें न मज दिसती । श्रीवेतोबाची उंच मूर्ति । परि भाऊ समोर दिसती । श्रीवेतोबा सारिखे प्रत्यक्ष ॥34॥ ऐसें घडतां दर्शन । आम्ही गेलो आनंदून । भाऊ मात्र हसून । म्हणती चला पुढें जाऊ ॥35॥ वेतोबाचे वाम बाजूस । दोन मूर्ति होत्या खास । एक भूमिया दुजा पुर्वस । दाखविते झाले ते ॥36॥ साडेतीन घटकांत । देवपणा तें सिद्ध करीत । ऐसे हे योगी मूर्तिमंत । नाथपंथी बसलेले ॥37॥ बघावें या खिडकीत । चपलांचे मोठे जोड दिसत । नित्य वेतोबाचे पायांत । घालण्यास अर्पियेले ॥38॥ पूर्वीं ऐशी होती महती । की प्रतिदिनीं चपला बनविती । वेतोबा दुनियेंत फिरती । झीजून जाती त्वरीत ॥39॥ परि आतां कलियुगांत । लोप पावलेसं सत्व । म्हणोनी चपला दिसत । जमलेल्या येथे ॥40॥ पाहोनियां भव्य परिसर । मना वाटे आल्हाद खरोखर । तेथोनियां नंतर । सिद्धेश्वराशीं पातलो ॥41॥ सिद्धेश्वराचें घेता दर्शन । भाऊंचे हृदय येई भरून । मज सांगती कीं बालपण । येथेच गेलें सगळें ॥42॥ आम्ही असूं येथें खेळत । कधीं साधु-संत ही भेटत । आंबे तोडूनियां खात । झाडावरीच येथे ॥43॥ मंदीर झालें जीर्ण । सभामंडपही गेला तुटून । वाटे करावें कोणी पूर्ण । जीर्णोद्धार मंदिराचा ॥44॥ ऐशा एकेक आठवणी । सांगत असतां रस्त्यामधूनी । सातेरीच्या दर्शना । मंदिरा पोहोचलो ॥45॥ जरी छोटासा आहे परिसर । परि मंदिर आहे सुंदर ।शिल्प वाटे ऐटदार । नक्षीदार नेटकें ॥46॥ घेऊनी सातेरीचें दर्शन । खणा-नारळानें ओटी भरून । घेतला आशीर्वाद मागून । सर्वानीच तिजपाशी ॥47॥ सातेरीचा होता पुजारी । त्यांचे अंगात रे संचरी । मायेचा पूर्वस खरोखरी । आलासे धावून ॥48॥ हर्ष पावला मनोमनीं । भाऊंना घेई आवळोनी । म्हणें भेटला किती वर्षांनी । हर्ष जाहला बहुत ॥49॥ माझा घेऊनिया हात । बोले भाऊंचे करीं देत । कीं धरावी दृढ याची सोबत । कल्याण होईल तुमचे ॥50॥ ऐसे लाभतां आशीर्वाद । आम्ही आलो घराप्रत । भाऊंचे थोरल्या बंधुसहित । गप्पा गोष्टी करावया ॥51॥ काकांना मी होतो सांगत । कीं भाऊ मजला गुरुप्रत । अनुभव होतो कथीत । वेगवेगळे तयांना ॥52॥ ऐकोनियां माझे संभाषण । काका जाती गहींवरून । मज मिठी मारती कडकडून । रडूं लागले तेधवां ॥53॥ अरे ! तूं मज काय सांगशी । माझे वय जाहले ऐशीं । तरी मी न ओळखिले भाऊशीं । जीवन गेलें वायां ॥54॥ तरी मजवरी कृपा करून । भाऊंशी करावी विनंती जाण । मज पामरा करी रे पावन । कृपा आशीर्वांद द्यावा ॥55॥ आमुचें ऐकोनी संभाषण । भाऊ काकांना सांगून । काकी येती घेऊन माडींवरीं तयांना ॥56॥ भाऊंनीं धरिली समाधी जाण । वेतोबा प्रत्यक्ष देई दर्शन ।काकांचे शिरीं कर ठेवून । सार्थक केलें जन्माचें ॥57॥ प्रत्यक्ष घडता दर्शन । काका जाती अति हर्षून । अश्रुंनीं भरुनी लोचन । पाय धरिती भाऊंचे ॥58॥ मी जन्मानें केवळ बलराम । तूं प्रत्यक्ष जन्मला पुरुषोत्तम । संसारीं एकत्र राहोनियां भ्रम । निरसन न झाले ॥59॥ काका असतां हृदयविकारी । हर्ष न झाला सहन शिरीं । आनंदाच्या प्रखर लहरीं । साहूं न शकती मनीं ॥60॥ आणि काका पडले आजारी । परि पहाटेच्या प्रहरीं । यमदूत येती समोरी । भाऊंचीये स्वप्नांत ॥61॥ पेकाटात मारिती लाथ । यमदूत जाती परत । म्हणे आतां असावें निर्धास्त । काकांसी भय नाहीं ॥62॥ तेच दिनीं आम्हाला । गुरुनाथशेठ भेटला । भरता राम भेटला । ऐसे आलिंगन दिले ॥63॥ रामां भेटे हनुमान । कीं कृष्णाशीं सुदामा जाण ।रामदासाठीं भेटे कल्याण । ऐसें पाहिले नयनीं ॥64॥ त्यांचे अपार होते प्रेम । भाऊ करितां विश्राम । अंगाचा चाटती घाम । पाय चेपती रात्रंदिन ॥65॥ आम्हांला नेऊनियां सदनीं । बहुत पाजीति नारळ पाणी । झालासे कृतार्थ जीवनीं । पदस्पर्शांनें भाऊंच्या ॥66॥ दुसरें दिनीं आम्ही निघालों । बापू केणींचे दर्शना आलो । सभामंडपांत बैसलों। केणी चरित्र वाचावया ॥67॥ वाचतां वाचतां केणीचरित । विचार येती मनांत । कीं पूर्वोत्तर जन्मांत । भाऊ होते की बापू ॥68॥ मग पूर्वोत्तर जन्मांतली । समाधी असतां पाहिली । काय प्रतिक्रिया जाहली । असेल त्यांच्या मनाची ॥69॥ मी भाऊंचेकडे पाहिले । ते ध्यानस्थ होते बैसले । पुढें चरित्र सर्व वाचिले । नमस्कारोनी सर्वांनीं ॥70॥ छोट्या कौलारु घरांत । समाधी होती खोलींत ।औदुंबराचे वृक्षा लगत । छोटीशीच बांधली ॥71॥ तेथोनी गेलों शिरोंड्यात । एकेक आठवणी होते सांगत । कैसीं नाटकें नी तमाशे बघत । बालपणी आम्ही येथे ॥72॥ हळुहळु चालत बोलत । आलों वेतोबाचे मंदिराप्रत । केळ्याचे घड वाहिले बहुत । शर्करा ठेवूनी समोरी ॥73॥ भाऊ स्वत: सांगणें करिती । कृपा असू दे बालकांवरती । करी रे तयांची ईच्छापूर्ति । हेंचि मागणे पायाशीं ॥74॥ ऐसे राहून दिवस तीन । गोड निरोप सर्वांचा घेऊन । निघालों आरवलीं सोडून । कोल्हापुरांत पातलों ॥75॥ भाऊ राहती कोल्हापुरांत । एक दिवस विश्रांती घेत । आम्हीं गेलो मंदिरात । जगदंबेच्या दर्शना ॥76॥ कोल्हापुरची अंबा जननी । डोळे भरून पाहतां नयनीं । संतोष वाटला बहुत मनीं । दर्शन घंडतां आईचे ॥77॥ द्वितीय दिनीं निघोन । नरसोबाचे वाडीस जाऊन । घेतलें श्रीदत्ताचें दर्शन । संतोष जाहला मनीं ॥78॥ आम्हीं निघालो अगोदर । भाऊ निघती तदनंतर । परि यात्रा केली बरेबर । सफल जाहली नि:संशय ॥79॥ एकदां ज्योतीचे कारखान्यांत । संप चालला दिन बहूत । माझे बंधु असतां ज्योतित । सचिंत जाहले संपानें ॥80॥ मालक-कामगारात असतां वाद । उभय पक्षी करिती संवाद । परि न जमतां सुसंवाद । तटस्थ राहती उभय पक्ष ॥81॥ ऐसे सचिंत असतां मनीं । रमेश जाती भाऊंचें सदनी । चिंता सांगती गुरुचरणीं ।काय करावें म्हणोनी ॥82॥ अधिकारी जातां कामावर । कामगार देती बहुत मार । आणि राहता गैरहाजर । दूषण देती मालक ॥83॥ अडकित्यांत जैसी सुपारी । तैसी होय परिस्थिती खरी । ऐसें असतां कामावरी । जावें तरी कैसे ॥84॥ ऐसें चालता संवाद भाषण । भाऊ म्हणती देई रे चोळून । तेल माझे डोक्यावरून । आज तूं स्वहस्तें ॥85॥ तेल देतां डोक्यास चोळून । भाऊ जाती अति संतोषून । तोच दादासाहेब येऊन । बातमी देती आनंदाची ॥86॥ ज्योतिचा संप असे मिटला । उद्यां हजर व्हावे कामाला । आनंद झाला रमेशला । नतमस्तक होई झणीं ॥87॥ परि रमेश सांगू लागला । कीं मी चंपी करितां डोक्याला । चटके बसती हाताला । विजेचे प्रवाहा परी ॥88॥ भाऊ म्हणती रमेशला । तूं तेल चोळिले डोक्याला । परि ते पावलें वेतोबाला । शिर होते तें तयाचें ॥89॥ तेव्हां मी नव्हतों माझ्यांत । श्रीवेतोबा होता शरीरांत । संतोष पावला चित्तांत । प्रसादानें सिद्ध केलें ॥90॥ ऐसी चिंता करितां दूर । रमेश करितो नमस्कार । केले बहुत उपकार । बालकारी आपुल्या ॥91॥ परी समस्त भक्तांवर । करिती अनंत उपकार । भाऊ देती मंत्राक्षर । गुरुपौर्णिमेच्या दिनीं ॥92॥ एका गुरुपौर्णिमेच्या दिनीं । समस्त भक्तांनी मिळूनी । आरति केली गुरुंचे सदनीं । पूजा विधि करोनियां ॥93॥ पूजा स्वीकारुनी समस्त । भाऊ बैसती ध्यानस्थ । प्रत्येका वरी नजर रोखित । आशीर्वाद देती उपस्थितांना ॥94॥ आणि सर्वानाही सांगती । की तुम्ही बोला मज संगती । गुरुॐ चा उच्चार करिती । सकलही करिती तैसे ॥95॥ त्रिवार ऐसें उच्चारुन । म्हणे तुम्हा दिधलें मंत्र-धन । नित्य मंत्रातें जपोन सुखी असावे सर्वांनी ॥96॥गुरुॐ चे मंत्रात । मी नित्य असे वसत । माझी शक्ति असे शब्दांत । म्हणोनी जपावा सदैव ॥97॥ मंत्रात आहे चित् शक्ति । परि पाहिजे शुद्ध शक्ति । तरीच होईल कामनापूर्ति । प्रीतिनें मंत्र जपावा ॥98॥ मंत्र आहे कृपा-धन । तें वाढवावे सव्याज करून । परोपकारा करिता जाण । वापरावे तुम्ही सर्वांनी ॥99॥ मंत्र प्रत्यक्ष गुरुमूर्ति । मंत्रांत आहे गुरु शक्ति । मंत्र देईल स्फूर्ति । आध्यात्म प्रगतीची ॥100॥ संसाराची कामना-पूर्ति । करोनी साधाल आध्यात्म प्रगति । येईल दिव्यत्वाची प्रचीति । गुरु सानिध्य मिळेल ॥101॥ जपतां रात्रंदिन जाण । श्वासोश्वासांत उच्चारुन । गुरु राहिल तुला बिलगून । वेगळा न राहूं शकें ॥102॥ गुरुची प्रतिमा समोर ठेवून । जपासह करावें ध्यान । स्वयंप्रकाश येईल दिसोन । गुरु बैसता हृदयी ॥103॥ हृदयीं घडतां गुरुचें दर्शन । जप सिद्ध झाला ऐसे जाण । गुरु बोलती अंतरात्म्यांतून । तुज सवे तेधवां ॥104॥ जो सांधेल गुरु-भक्ताचा दुवा । तोच खरा मंत्र जाणावा । विश्वास ठेवूनि जपावा । श्रीगुरुवरी सदैव ॥105॥ म्हणोनियां श्रोते जन । मी तुम्हांस कथिले जाण ।गुरुंचीं आज्ञा म्हणोन । मंत्र जपावा गुरुॐ ॥106॥ जे गुरुॐ जपती । त्यांचे पुढे प्रगटेल मुर्ति । सस्मित हास्य करिती । प्रसन्नतेनें कृपा मुर्ति ॥107॥ केवळ गुरु-कृपे वांचून । कांहीं नसे श्रेष्ठ अन्य । हीच गुरुकिल्ली जाणून । कल्याण साधावे सर्वांनी ॥108॥

इति श्रीभाऊचरित्रामृत-कथनं नाम दशमोऽध्याय:। श्रीदेव वेतोबार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।

<< विसावा – अध्याय ९        विसावा – अध्याय ११ >>

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *