विसावा – अध्याय ५

 

॥ श्री ॥
॥ अथ पंचमोऽध्याय: ॥

श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: । श्रोते व्हावें सावधान । पुढील कथेचें करितों कथन । सुभक्तानुभव सांगून । तुम्हाला मी रंजवितो ॥1॥ नसे ही केवळ रंजनकथा । गुरुवर्यांची असे अनुभव गाथा । तुम्हास ती सांगत असतां । आनंद होतो मानसीं ॥2॥ भाऊकाकांच्या आठवणी । सांगतो मी क्षणोक्षणीं । आनंदोर्मी उचंबळोनी । येतात माझिया हृदयीं ॥3॥ हाचि माझाहि अनुभव । त्याचा तुम्ही घ्यावा अनुभव । कथेंतील बघावा भाव । पुन: प्रत्ययानंद लाभेल ॥4॥ अष्टभाव येतील दाटून । पाणावतील तुमचे लोचन । हृदय जाईल हेलावून । गुरुदर्शना पात्र व्हाल ॥5॥ मागील अध्यायीं कथिलें । वास्तव्य माझें मुंबईमधलें । संपावें म्हणून प्रयत्न केले । बडोद्यासी यावया ॥6॥ माझे वृद्ध मातापिता । बडोद्यास रहात असतां । आईची प्रकृति स्वास्थ्यता । रहात नसे चांगली ॥7॥ आईची सेवा करावया । यावें बडोद्यासी रहावया । म्हणोनि बदली करावया । प्रयत्न मी ही करीतसे ॥8॥ परी मला न कळे कांहीं । बदली योग्य आहे अथवा नाहीं भविष्याचा मार्ग कांहीं । आकलन होई ना ॥9॥ ऐशा संभ्रमांत असतां । विचार केला तत्त्वत: । विचारावें श्रीगुरुदत्ता । पत्र त्यांना लिहोनिया ॥10॥ म्हणोनि लिहिलें पत्रांत । योगीराजा श्रीदत्ताप्रत । विनम्र होऊनी चरणांत । मार्गदर्शन करावया ॥11॥ हे श्रीदत्तात्रेया गुरुवर्या । आईची सेवा करावया । मी इच्छितसे जावया । बडोद्यासी झडकरी ॥12॥ मला न कळे योग्यायोग्यता । बदली करोनी घ्यावी आतां । भावी माझें संभ्रमांत असतां । काय करावें मी सांगा ॥13॥ जावे अथवा न जावें । योग्य मार्गदर्शन करावें । गुरुआज्ञेनें वागावें । ऐसी इच्छा मनांतरी ॥14॥ निजण्यापूर्वीं उशाशीं । पत्र ठेविलें गुरुपाशी । रात्रीचे समयासी । मनोमनीं प्रार्थून तयांना ॥15॥ मध्यरात्रीचे समयाला । जाग अचानक आली मला । दिवा सहज लाविला । तोच आश्चर्य देखिलें ॥16॥ न जावें या बाजूला भस्माक्षरांचा शब्द दिसला । श्रीगुरुंनी लिहिला । जरा थांब म्हणोनी ॥17॥पाहोनियां भस्माक्षर । पत्नीस उठवी सत्वर । म्हणे श्रीगुरुचा अभयकर । आपणावरी असे कीं ॥18॥ करोनी जयजयकार । सर्वांना दाखवी भस्माक्षर ।पाहोनी हा चमत्कार । मंडळी आश्चर्य करिती ॥19॥ यावरी गेला एक मास । योग्य येतां समयास । तेंच पत्र ठेविलें उशास । रात्रीचे समयासी ॥20॥ श्री दत्त आणि एकवीरेस । प्रार्थिलें देण्या उत्तरास । कल्याणप्रद मार्गास । दाखवावें म्हणोनियां ॥21॥ पहांटे उठतां नजर । सहज गेली पत्रावर । तोंच कुंकुमाक्षरें सुंदर । जा ऐशीं दिसलीं लिहलेलीं ॥22॥ जावे या बाजूला असें । कुंकुमाक्षर जा दिसलें । एकवीरेनें लिहिलें । हर्ष झाला पाहोनियां ॥23॥ कौल देवाचा मिळतां । बदली ही झाली त्वरित । बडोद्यास नोकरिकरितां । मातपित्यांचे समीप ॥24॥ मातपित्यांची करितां सेवा । मज लाभे अमोल ठेवा । भाऊ सारखा गुरु मिळावा । सार्थक होई जन्माचें ॥25॥ सहवास अधिक लाभला । सुखगोष्टी करावयाला । अध्यात्माच्या प्रगतीला । मार्ग मिळाला सहज ॥26॥ शहाडे नांवाचे इंजिनीअर । आले गिरणींत कामावर । येती भाऊंकडे वारंवार । गप्पागोष्टी करावया ॥27॥माडीवर सहज एकदां । भाऊ झोंपले असतां । कुशींत घेऊन लतेस । सुकन्येला चिमुकल्या ॥28॥ लतेवरी ठेवूनि हात । असतां गाढ निद्रेंत । शहाडे माडीवर जात । आश्चर्य देखिलें तयांनी ॥29॥ लतेशेजारील व्यक्ती । भव्य दिव्य दिसती । चमके किरीट शिरावरती । पाहुनी स्तब्ध झाले ते ॥30॥ लतेवरी होता हात । त्यांवरी सुवर्ण कंकण चमकत । आश्चर्यानें डोळे चोळित । भाऊंस पाहती तेधवां ॥31॥ नमस्कारोनी परतले । कार्य त्यांचे पार पडलें । सायंकाळी घरीं आले । गोष्ट सांगती भाऊंना ॥32॥ शहाडे म्हणती भाऊंना । वेतोबानें दिधलें दर्शना । परी मनांतील कामना । पूर्ण करावी गुरुवर्या ॥33॥ माझी पत्नी नास्तिक । तशीच बहुत चिकित्सक । सहजासहजीं आस्तिक । होत नाहीं कधीहीं ॥34॥ भाऊ म्हणती कधीं तरी । घेऊन यावें माझे घरीं । योगायोग असेल तरी । वृत्ती त्यांची बदलेल ॥35॥ ऐसें कांहीं महिनें गेले । शहाडे सपत्नीक आले । भाऊंचे घरी उतरले । रहावया एकदां ॥36॥ झाली ओळख पाळख । भाऊ बसती सन्मुख । पाहतां भाऊंचें श्रीमुख । श्रीमती उठती झडकरी ॥37॥ करोनियां नमस्कार । म्हणे देवासि पाहिलें खरोखर । हेचि गृहस्थ परमेश्वर । मानवरुपी आहेत ॥38॥ भाऊकाकांचे ठिकाणीं । दर्शन देतो चक्रपाणी । नि:संशय होऊन मनीं । पाय धरती भाऊंचे ॥39॥ दृढ विश्वास बसला । जयजयकार भाऊंचा केला । सपत्नीक धरती चरणाला । गुरु आपुला म्हणोनी ॥40॥ एकदां आरवलीस जातानां । भेटती गुरुनाथशेठ भाऊंना । म्हणती कस्टमनें आम्हाला । दंड केला असे जबरीने ॥41॥ एक लाख तीस हजार । दंड ऐकून झाले बेंजार । मन विचलित झालें पार । मति कुंठित जाहली ॥42॥ वर्तमानपत्रांतून । नांवही आलें झळकून । दंडाची रक्कम पाहून । हैराण होती गुरुनाथ ॥43॥ सवें होते शांताराम रेगे । म्हणती गुरुनाथाकडे बघावें । ह्याला तुम्हीच सांभाळावें । मार्ग ह्यांतून काढावा ॥44॥ भाऊ म्हणती चलावें । मजसवें आरवलीस यावें । शरण वेतोबाला जावें । प्रसाद लावूं विनवूनी ॥45॥ असे कांही महिने गेले । भाऊ मुंबईस असतां गेले । तेथें गुरुनाथशेठ भेटले । अचानक रस्त्यांत ॥46॥ भाऊ बोलती भूक लागली । भजीं खाण्याची इच्छा झाली । ऐसी त्यांची मस्करी केली । तरी जाती हॉटेलांत ॥47॥ भजीं खाऊनी पोटभर । भाऊ देती ढेंकर । म्हणे संतुष्ट जाहलों तुजवर । दंडातून सोडवितो ॥48॥ ऐसे कांही दिवस गेले भाऊ बडोद्यासी आले । देवखोलींत झोंपले । स्वप्न पडलेंपहांटेला ॥49॥ दोन गोर्‍या सुंदर व्यक्ती । भाऊंचें समीप येती । जागे होऊन बघती । दोन योगिराजांना ॥50॥ आम्ही-भूमिया-पूर्वस । आलों तुज बघावयास । काय अजुनी झोंपलास । उठी आता झडकरी ॥51॥ असें म्हणोनि उठती । देव्हार्‍याकडे वळती । श्रीवेतोबाचे फोटो मधीं । अंतर्धान ते पावती ॥52॥ तोंच सकाळी येती । गुरुनाथ समोर दिसती । कैसा आलास म्हणती । भाऊ पुसती तयाला ॥53॥ मज जाहला दृष्टांत । कीं चलावें बडोद्यात । आदेशानुसार धांवत । आलों असें भेटावया ॥54॥ भाऊ गुरुनाथांना सांगती । आज भुमिया-पूर्वस असती । देवखोलींत रहाती । त्यांना वंदन करावें ॥55॥ गुरुनाथ जाई देवखोलींत । भाऊ बाहेरीच बैसत । आंतून कोणी बोलत । संबोधून भाऊंना ॥56॥ अरे, त्याला सांगावें । की अपिलांत न जावें । मजवरी विश्वासावें । सोड़वीन निश्चित ॥57॥ कलेक्टरापाशीं गेली केस । तो तपासीं कारणास । बोटींतील गैरव्यवहारास । कारण नसे गुरुनाथ ॥58॥ मालक जो बोटीचा । खरा दोष होता त्याचा । गुरुनाथ मात्र फुकाचा । दंडविला गेला कीं हो ।59॥ तरी याला द्यावें सोडून । मालकासि योग्य दंड देवून । ऐसें फर्मान काढून । निकाल दिधला झडकरी ॥60॥ भाऊ सहज पत्र लिहिती । गुरुनाथाला आणण्या सांगती । सफरचंद नी मोसंबी । उत्तम निकाल लागल्यास ॥61॥ ज्या दिवशीं पत्र मिळालें । त्यांच दिवशी निकाल कळले । गुरुनाथशेठ सुटले । दंडातून एकदांचे । ॥62॥ जाहला बहुत आनंद । घेती मोसंबी नि सफरचंद । भाऊंना कथिती स्वानंद । बडोद्यासी येऊनिया ॥63॥ तुम्ही वाचविले माझे प्राणा । म्हणोनि घाली लोटांगणा । शरण शरण या नारायणा । नवजीवन दिधलें मज ॥64॥ या दंडाचें कारणें । कलंकीत झालें जिणें । देणार होतों प्राण । घडतें जरी विपरीत ॥65॥ मोठा कलंक घालविला । आतां डाग छोटा राहिला । तो ही काढून बालकाला । रक्षावें गा श्रीहरी ॥66॥ जरी रक्षाल पामरास । होईन तुमचा दास । द्यावें प्रेम अभाग्यास । जन्मोजन्मीं ऋणी मी ॥67॥ लादोनियां ‘आयकर’ । गुरुनाथाचे शिरावर । म्हणती भरावा तो लौकर । अथवा शिक्षा पात्र व्हाल ॥68॥ भाऊंनी समाधी लावली । स्वारी वेतोबाची आली । ‘भूमियानें केस करी घेतली’ । ऐसे सांगती तयांना ॥69॥ ‘नको जाऊं घाबरुन । तुला दिधलें सोडून । तरी राही रे विश्वासून । आतां ही पहिल्या परी’ ॥70॥ मुल्ला आणि मुल्ला वकीलांनी । केस हातांत घेऊनी । अपील कमिशनला दाखवुनी चर्चा बहुत केलीसे ॥71॥ कमिशनचें झालें समाधान । अधिकार्‍याकडे परतून । केस दिली पाठवून । विचारार्थ पुनरपी ॥72॥ मेसर्स मुल्लांचे नांव घेऊन । एक वकील गेला येऊन । म्हणे केस मी चालवून । नुकताच आलों कमिशनपुढें ॥73॥ यांतील चुका बहुत । अधिकार्‍यांनी घ्याव्या लक्षांत । केस करीतों सुप्रत । तपासण्या कारणे ॥74॥ मी पुनरपी येईन । तोंवरी ठेवी तपासून । गुरुनाथाचा वकील म्हणून । सांगतसे मी तुम्हांला ॥75॥ पुढ़ें आयकर अधिकार्‍यांनी । केस पाहिली तपासूनी । अपीलांत दिली सोडूनी । कार्य येथेंच संपलें ॥76॥ गुरुनाथ मनीं संतोषले । म्हणती अघटित कैसें घडलें । मी वकील न नेंमले । कार्य कैसे चाललें ॥77॥ मेसर्स मुल्ला आणि मुल्ला । यांचा वकील न घेतला । मग कोण हा अल्ला । मज-साठी आला धांवून ॥78॥ मज यांतून सोडविलें । कलंकासहि धुतले । कृतार्थ मजला केलें । गुरुवर्या शरण मीं ॥79॥ तपास केला बहुत । तेव्हां कळलें निश्चित । श्रीवेतोबा वकील रूपांत । गेला असे कोर्टांत ॥80॥ वकिलाचें रूप घेऊन । आला केस चालवून । भक्ताला दिलें सोडून । आरवलीच्या देवानें ॥81॥ दामाजी पंताकरितां । विठू महार झाला होता । मोहरा झाला देता । बादशहासी असंख्यात ॥82॥ तैसा भाऊकाकांचे करितां । देव वकील रूप धरिता । आणि भाऊंचीही योग्यता । वाढवी तो अधिक ॥83॥ भाऊ गहिंवरुनी जाती । देवा चरणी लागती । आनंद, उर्मी दाटती । झर झर त्या लोचनीं ॥84॥ पाहुनियां भक्ताची भक्ती । देव नाना लीला करिती । जैसी जैसी वाढेल प्रीति । देव सन्मुख राहतो ॥85॥ गुरुनाथ येती भाऊंकडे । म्हणे देवा जे घातले सांकडें । त्यांतून सुटतां आणिले पेढे । देवापायीं ठेवावया ॥86॥ ऐसें म्हणूनि धरीले चरण । अश्रूंनी पाय धुवून । घातलें पूर्ण लोटांगण । भाऊकाकांचे पायांशीं ॥87॥ म्हणे तुमच्या करितां । देव झाला रक्षणकर्ता । अपराधाची क्षमा करिता । झालासे मज साठीं ॥88॥ माझें नव्हतें कांहीं पुण्य । म्हणोनि धरिले तुमचे चरण । आतां तारावें माझें जीवन । गुरुवर्या भाऊकाका ॥89॥ तेंव्हापासून गुरुनाथ । भाऊंचे झाले सद्भक्त । सर्वस्वीं जीवन सुप्रत । करितें झालें पायीं ॥90॥ काय सांगूं गुरुनाथांची भक्ति । प्रत्यक्ष पाहिली आरवली प्रांतीं । भाऊकाकांचे पाय दाबती । रात्रंदिन अतिप्रेमें ॥91॥ रात्री उशीरा पर्यंत । त्यांचे सेवेंत राहती जागत । जणूं सावलीसम । भाऊसंगे वावरती ॥92॥ घाम निघे शरिरांतुन । तो स्वमुखें घेती चाटून । म्हणे करीतों अमृतप्राशन । ऐसी गोडी तयाला ॥93॥ भाऊ जें जें सांगती । सहर्षे ते काम करिती । श्रीवेतोबाचे मंदिराप्रती । कधीं न जाती दर्शना ॥94॥ म्हणे भाऊकाकांचे संगत । सर्व देव राहती तिष्ठत । तेथेंच माझे सर्व हेत । पूर्ण होतात निश्चित ॥95॥ भाऊ माझे गुरुदेव । माझा तैसाची दृढ भाव । दाटताती अष्टभाव । भाऊ जवळी असतां ॥96॥ भाऊ असतां जवळी न करावी पळापळी । सर्व सुखांची सावली । भाऊराजा हा माझा ॥97॥ ऐसी ऐकून त्यांची वाणी । मी धन्य झालों मनोमनीं । मज सांगती आनंदोनी । गुरुनाथ शेठजी ॥98॥ भक्त हा ऐसा असावा । ज्याचा गुरु हाच विसावा । भरंवसा ठेवावा पूर्ण । नित्य गुरु वाक्यावरी ॥99॥ भाऊंचा सुभक्त पाहून । मी गेलो आनंदून । वरी त्याची भक्ति पाहून । थक्क झालों मनोमनीं ॥100॥ भक्ति कैसी करावी । गुरुनाथाचें हृदयीं बघावी । चराचरी भाऊंना पाही । भक्तश्रेष्ठ होउनी ॥101॥ श्रीवेतोबाच्या मूर्तीत । भाऊ तेथेंच दिसत । ऐसा हा विभक्त । गुरुनाथ झाला असे ॥102॥ भक्तराज भाऊकाका । तुम्हां मारितसें हांका । मजवरी करुणा भाका । पूर्णपणें तुमची हो ॥103॥ माझा सुप्त भाव समजून । सर्व घ्यावें गोड मानून । कारण माझे हातून सेवा न घडे चांगली ॥104॥ करावया सेवा चांगली । बुद्धि तरी पाहिजे सुचली । ती विवेकें ठेवा चांगली । गुरुराजा दयाळा ॥105॥ विवेकें करून विचार । माझा घडावा कर्माचार । वरी तुमचा कराधार । असों द्यावा मजवरी ॥106॥ तुमचा घेतल्याविना आधार । नाहीं चालणार संसार । तो ही सुखें करावा पार । गुरुराज माउली ॥107॥ जयजय गुरुराज माउली । भक्तवरदा सुखसावली । चिन्मय सुखें लाभली । सुभक्तां तुमचे पायीं ॥108॥

इति श्रीभाऊचरित्रामृत – कथनं नाम पंचमोऽध्याय: । श्रीदेव वेतोबार्पणमस्तु । शुभं भवतु । ॥श्रीरस्तु॥

<< विसावा – अध्याय ४        विसावा – अध्याय ६ >>

Click to rate this post!
[Total: 2 Average: 3]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *