विसावा – अध्याय ६

 

॥ श्री ॥
॥ अथ षष्ठमोऽध्याय: ॥

श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ ऐकोनि भाऊंची कथा । श्रोते पावती प्रसन्ता । पुढे ऐकण्याची अधीरता । वाढतसे अधिक ॥1॥ कळी हळू हळू उमलतें । फुलुनी सुगंध पसरवितें । सुगंधानें बहरविते । परिसर सर्व ही ॥2॥ तैसी ही रम्य कथा । एकेक ओवीनें फुलतां । प्रीतिगंधे बहरुन येतां । सुभक्त हृदय हेलावती ॥3॥ एकदा ऐन दिवाळींत । भाऊकाका येती मुंबईत । म्हणे चलावें मजसोबत । आळंदीचे दर्शना ॥4॥ जाऊनी पुण्यापर्यंत । घेऊनी श्री रेगे संगत । तिघे पोहोचलों आळंदीत । ज्ञानेश्वरांचे दर्शना ॥5॥ ठेवितां पाय आळंदीतं । मनें प्रफुल्लीत होत शिरीं लाविलें धुळीस । जयजयकार करोनी ॥6॥ पाहोनी परिसर सुंदर । वरी उत्तम समाधी मंदिर । जीवन माउलींचे साकार । दृष्टी समोर जाहलें ॥7॥ दिवाळीचा होता शुभदिन केलें इन्द्रायणींत स्नान । घेण्यज्ञ ज्ञानेश्वराचें दर्शन । समाधी जवळ पातलों ॥8॥ भाऊ समाधी जवळ बैसती । स्वयें ध्यानमग्न होती । हळू हळू मस्तक लवविती । समाधी वरी माउलीच्या ॥9॥ योगीराज बैसले समोर । शिरी ठेविती कृपाकर । फिरविला मायेचा कर । भाऊंचे पाठीवरी ॥10॥ परस्परें भेटून समाधींत । केल्या गुजगोष्टी सुखांत । ज्योतिनें ज्योत प्रकाशित । केल्या परी जाहलें ॥11॥ भाऊंवरी होती प्रीती । म्हणून ज्ञानेराय भेटती । भाऊ स्वमुखें सांगती । अनुभव तो तयांचा ॥12॥ घेतलें ज्ञानेशाचें दर्शन । वरी कल्पवृक्षातें पाहून । स्मृती मधुमधुर घेऊन । आम्हीं पातलो स्वगृही ॥13॥ पुष्कळ वेळा भाऊंना । होई जावया आज्ञा । कीं डाकोरनाथाचे दर्शना । जावे तुम्ही पंचमीला ॥14॥ पौर्णिमा ते पंचमीपर्यंत । राहे श्रीकृष्ण डाकोरांत । भाऊ वारंवार जात । दर्शनालागी पंचमीला ॥15॥ घेतां श्रीकृष्णाचे दर्शन । भाऊ जाती आनंदून । स्वयें श्रीपुरुषोत्तम नारायण । दर्शन देई भाऊंना ॥16॥ गर्दी असतां ही बहुत । श्री रणछोडराय भेटत । सवें खेटून उभे राहात । दर्शन घेण्या भाऊंचें ॥17॥ धक्के देऊनी जवळी येत । म्हणे काय मज बघशी मूर्तींत । मी उभा जवळी तुजसंगत । लक्ष तुझे कोठें असे ॥18॥ भाऊ बघती शेजारीं । उभे स्वयें श्रीकृष्ण मुरारी । परी मार्ग काढूनी फरारी । होती त्वरित गर्दींत ॥19॥ ऐसा कित्येक वेळा । भाऊंना दर्शन-लाभ झाला । तेणें काळ झेपावला । अध्यात्म उन्नतीचा ॥20॥ एकदां भाऊ म्हणती मजला । चलावें डाकोरला । श्रीकृष्णाचे दर्शनाला । विजय हंडे सवेंही ॥21॥ आम्ही तिघे निघालों । डाकोरचे मंदिरांत आलों । दर्शन घेऊन पातलों । गोमतीचे कांठावर ॥22॥ जेथें श्रीहरी तोलला । तो तोलकांटा पाहिला । तेथें बोडानाथाचे भक्तिला । भुललासे श्रीहरी ॥23॥ गोमतीचे कांठावरती । लय लावूनी शून्यावरती । भाऊ तटस्थ उभे राहती । लक्ष आकाशीं ठेवूनी ॥24॥ मुख सतेज जाहलें । हास्य मुखावर उमटलें । प्रसन्नपणें वदले । यावें मजजवळी । ॥25॥ दोघांना जवळ घेऊनी । मिठींत घेती आवळोनी । म्हणती तुम्हीं सुभक्त दोन्ही । लाडके माझे आहांत ॥26॥ अंगावरी फिरवून हात । म्हणती मी नित्य तुम्हासंगत । तुमचे सर्व ही सफल । होतील हेतू निश्चित ॥27॥ भाऊकाकांचे पायावरुन । पाणी जातसे वाहुन । तेंच चरणतीर्थ म्हणून । प्राशिलें आम्ही दोघांनी ॥28॥ श्रीगुरुचरण-तीर्थ । जणूं प्राशिलें अमृत । अंतर्यामी झालों कृतार्थ । विजय आणि मी स्वत: ॥29॥ ऐशा अनेक आठवणीं । किती सांगों म्हणोनी । हृदय येतें उचंबळोनी भावभक्तीनें माझें हो ॥30॥ अशीच एकदां गुरुमाउली । भगिनीस घेऊन निघाली । डाकोरचे दर्शना चालली । विजयाचें गाडींतून ॥31॥ गप्पागोष्टी येती रंगांत । सृष्टीसौंदर्य पहात पहात । विजय येऊनी खुशींत । गाडी चालवी झोकांत ॥32॥ येतां आनंद चे मार्गांत । गाडीं चालली वेगांत । परि समोरून गाडी दिसत । वेडीवाकडी येतांना ॥33॥ समोरून येई मालगाडी । कां न कळे धांवे वांकडी । दृष्य तें पाहून बोबडी । वळली सर्व स्त्रियांची ॥34॥ अरे, पहावें समोरुनी । गाडी येतसे अंगावरुनी । क्षणैक ब्रेक मारुनी । गाडी तेथेंच थांबविली ॥35॥ स्पष्ट होते समोर । गाडी धडक मारणार । जीव आणुनी डोळ्यांवर । श्वास कोंडूनी बैसले ॥36॥ चाकावर ठेवुनी हात । विजय बैसला पहात । स्वस्थचित्तानें गंमत । गुरुस्मरण करीत ॥37॥ गाडी समोरुनी आली । अंगावरूनी आडवी गेली । रस्त्याच्य कडेस स्थिरावली । नि:श्वास सोडीला सार्‍यांनीं ॥38॥ सुटलों म्हणून एकदां । अनुभविती सारे परमानंदा । जाती शरण मुकुंदा । भक्ति भावें सर्व ही ॥39॥ तेच क्षणीं घरीं सांगती । भाऊ सुनेस बोलती । अगे! आज गडबड दिसती । मार्गावर कांहींशी ॥40॥ सुनेस न कळला अर्थ । मार्गावरील अनर्थ । अंतर्ज्ञांनें जाणती समर्थ । भक्तरक्षणा धांवती ॥41॥ सायंकाळी मंडळी घरीं येत । शरण वेतोबाला जात । म्हणती तूंच ठेविलें सुरक्षित । भक्तवेड्या परमेश्वरा ॥42॥ अकस्माताचा सर्व प्रसंग । वर्णिला सांगोपांग । कळे भाऊ हाचि श्रीरंग । पाठीराखा होता कीं ॥43॥ श्रींगुरु भाऊसारखा । माय-बाप-बंधू-सखा । असतां तुज पाठीराखा । भाग्य काय वर्णावें मी ॥44॥ माझ्या श्वशूरांची बडोद्यांत । हर्निया व प्रोस्ट्रेटची संयुक्त । शस्त्रक्रिया केली निश्चित । पाठोपाठ करावया ॥45॥ जाहला दिन निश्चित । मुलें, सुना, मुली, जांवई सहित । सर्व माझे घरीं येत । शस्त्रक्रिया लक्षाया ॥46॥ श्वशूरांचे शरीर स्वास्थ । दुर्बल होतें वयाप्रत । वरी हृदयविकरही उद्भवत । कधीं कधीं तयांना ॥47॥ पाहुनियां ऐसी दुर्बलावस्था । शस्त्रक्रियेची वाटे कठिणता । परी दुखण्याची पाहून तीव्रता । अन्य मार्ग नव्हताचि ॥48॥ काकांच्या घेतलें मनानें । ही शस्त्रक्रिया जाईल घेऊन । आपल्याला या जगातून । म्हणून सर्वांना बघावें ॥49॥ आप्त इष्ट सर्व मंडळी । भेटावया एकत्र जमली । वाटे मंगलकार्याकरिता आली । माझे घरी तेधवां ॥50॥ प्रोस्टेटची झाली शस्त्रक्रिया । सर्व जमले पहावया । डॉक्टर म्हणती लाभे आशा । पहिल्या शस्त्रक्रियेंत ॥51॥ पाहोनी शस्त्रक्रियेच्या सुयशा । काकांना वाटे आशा । हर्निआची बहुत निराशा । होणार नाहीं म्हणोनी ॥52॥ पहिल्या शस्त्रक्रियेनंतर । दुसरींही करावी लौकर । ऐसें सांगुनी डॉक्टर । दिन निश्चित सांगतीं ॥53॥ त्याच रात्रीं काकांनी पाहिलें । श्रीखंडोबा स्वप्नांत आले । कुलदैवत स्वये बोललें । अरे! माझ्या बालका ॥54॥ एका शस्त्रक्रियेतून । दिलें तुजला जीवनदान । परीं दुसरीं वाटे कठिण । मी आहे असहाय यावेळी ॥55॥ जरी तुज हवें जीवनदान । जावें कैलासनाथा शरण । तोच एकटा संरक्षण । देईल आतां तुजला रे ॥56॥ माझी शक्ति इथे खुंटली । म्हणून तुज मति सुचविली । जाई शरण शिव शंकरा । भक्तवरदा कल्पद्रुमा ॥57॥ दुसरे दिनीं काका सांगती । बोलवा नंदा ला मज संगतीं । मज बघाया कां न येई ती । यावें त्वरित सांगावें ॥58॥ सायंकाळचे शांत समयाला । नंदा जाई बघावयाला । काका सांगती तिजला । स्वप्नांतील आदेश ॥59॥ जें श्रीखंडोबा बोलला । तें सागंती मुलीला । म्हणे ऐशा समयाला । योग्य तें तूं करावें ॥60॥ माझें तन-मन दुर्बल । शस्त्रक्रियेनें झालें हतबल ।कर्तव्यबुद्धीची पडे भूल । गोंधळलेल्या मनासी ॥61॥ माझें मन करूनि हलकें । मोकळा मी झालों, लाडके । तुज योग्य जें, बालकें । करी गे मजसाठीं ॥62॥ पाहोनि डोळ्यांतील पाणी । गेली नंदा घाबरोनी । परि धीर तयांना देउनी । सांगे मज हकीकत ॥63॥ बहुत केला विचार । गुरु दिसले समोर । वाटे सांगावा सर्व प्रकार । भाऊकाकांना झडकरी ॥64॥ निघण्याचा करितां विचार । दादा येती समोर । म्हणे मी ही येतो बरोबर ।तुम्हां सवें दोघांच्या ॥65॥ भाऊकाकांचे घरीं । तिघे जातां बरोबरी । प्रसन्नचित्तें करिती । स्वागत आमुचे भाऊकाका ॥66॥ यावें! यावें! म्हणून ।आम्हां घेतलें बसवून । कैसे जाहलें ऑपरेशन । प्रश्न पुशिला तयांनीं ॥67॥ पहिली शस्त्रक्रिया झाली । ती पूर्ण यशस्वी झाली । दुसरीची चिंता उद्भवली । ऐसें नंदा बोलली ॥68॥ काकांना जे पडलें स्वप्न । तें केलें तिनें कथन । यावरी प्रसाद घेउन । मार्ग दाखवा गुरुवरा ॥69॥ आम्हीं न, जाणूं सदाशिव । गुरुवरी आमचा भाव । गुरु हाचि ब्रह्मा विष्णू शिव । मजलागीं तुम्हीं हो ॥70॥ भाऊ होते खुर्चीवरी । आम्ही बसलों समोरी । मज म्हणती तूं शंकरावरी । अभिषेक आज करावा ॥71॥ खंडोबाची घेऊन सुपारी । तिज मानून शंकरापरी । शिवकवचाचा अभिषेक करी । तीर्थ द्यावें श्वशुरांना ॥72॥ काळजी मुळी न करी । असे म्हणूनी दादावरी । जो बैसला मजशेजारीं । नजर रोखिली तयांनी ॥73॥ काकांचे ज्येष्ठ पुत्रावरी । नजर रोखितां खरोखरी । शरीरांत भरे कंपरी । खुर्चीवरी तेधवां ॥74॥ दादा कांपे थरथर । म्हणे मी न पाहें क्षणभर । जरी वाटे अतिसुंदर । तेज न साहूं शके हें ॥75॥ शांत नी अतिसुंदर । वाटे प्रसन्न खरोखर । दिव्य अवर्णनीय प्रभाकर । तेज कधीं न पाहिलें ॥76॥ आवरा ! आवरा ! आपुलें तेज । मीं न पाहूं शके प्रकाश । किती भव्य दिव्य आभास । पाहून धन्य जाहलों ॥77॥ ऐसें म्हणुनी खुर्चीवरी । वेडे वांकडे हात करी । आम्ही पाहिलें मुखावरी । आनंदाश्रू ओघळती ॥78॥ अश्रूं ओघळत्या नयनी । दादा उठला खुर्चीवरूनी । भाऊंना मिठी मारूनी । रडूं लागला तेधवां ॥79॥ अंगावरी फिरवुनी हात । म्हणे बाळा तुज काय होत । मी पाहिला कोटींसूर्य प्रकाश । तुमचे मुखावरी आतां ॥80॥ ऐसें म्हणूनी दादा पहात । भाऊकाकांचे मुखाप्रत । तोंच पुन्हां मुख प्रकाशित । जाहलें की भाऊंचे ॥81॥ आवरा ! आवरा ! गुरुवरा । मज धन्य केलें पामरा । परी ह्या दिव्य प्रकाशा । पाहूं न शके मी ॥82॥ क्षणैक तेज आवरलें । भाऊ तेथें दिसूं लागले । अश्रूंनीं त्यांचे पाय धुतले । घट्ट मिठी मारोनी ॥83॥ आम्ही दोघे गेलो घाबरुनी । दादाला काय झालें म्हणोनीं । शांत होण्या दिलें पाणी । नंदानें आणुनी ॥84॥ अंगावरी फिरवूनी हात । भाऊकाका बोलती हांसत । अरे! प्रत्यक्ष कैलासनाथ । प्रकट जाहला येथें ॥85॥ शिवप्रकाश तुज दिसला । दर्शन देऊनी शिव गेला । दिलें अभय तव पित्याला । आतां न करावी काळजी ॥86॥ ऐकोनी त्यांची शुभवाणी । दादा जाई आनंदोनी । म्हणे मज धन्य जीवनीं । गुरुवरा केलेंत ॥87॥ मी आहे सुशिक्षित । तैसाची परी चिकित्सक । भक्तीनें भोळ्या आस्तिक । झालों नाहीं कधींही ॥88॥ परी मज जें घडलें दर्शन । तें जीवनीं न विसरेन । तुमच्या चरणा न सोडीन । पामरा पावन केलेतं ॥89॥ रात्रीं घरीं येऊन । शिवाभिषेक केला सुपारीवरून । तीर्थ काकांना देऊन । सांगितला वृत्तांत ॥90॥ शस्त्रक्रिया उत्तम झाली । श्रीगुरुंनी लाज राखिली । प्रकटोनी चंद्रमौळी । भाऊकाकांत माझिया ॥91॥ पुढें त्यांची प्रकृती सुधारली । मला ही धन्यता वाटली । जांवयाचीं बूज राखिली । श्रीगुरुवरांनीं माझी ॥92॥ भारतीचे लग्नकार्यांत । घेऊनी मंगल अक्षत । आम्हीं गेलो मंदींरात । श्री विघ्नहर्त्या गजाननाचे ॥93॥ तें असे दांड्याबाजारांत । सर्व मंदिरांचे परिसरांत । एका भव्य मंदिरांत । गजाननाची मूर्ति आहे ॥94॥संगमरवरी भव्य मूर्ति । सजीव वाटे गणपती । पाहुनी आनंद चित्तीं । भक्तांच्या होत असे ॥95॥ अक्षता घेऊनीं करीं । उभा राहे मुर्तिसमोरी । मंगल कार्या सिद्ध करी । ऐशी विनंती मी केली ॥96॥ काका, काकी सर्व मंडळी । उभी राहती भोवताली । पत्नी मज बोलली । श्रीगणेशाष्टक म्हणावें ॥97॥ श्रीगणेशाष्टक सर्वांनी म्हटलें । विनम्र भावें मस्तक टेकलें । पत्नीचे स्थिर लोचन खिळले । एक मात्र मुर्तीवरी ॥98॥ श्रीगणेशाचे मुखावरी ।श्रीगुरुमुख दिसे खरोखरी । सर्व देह मात्र संगमरवरी । प्रत्यक्ष दिसे समोर ॥99॥ श्रीगुरु मुख कमला पाहुनी । नंदा गेली हर्षुनी । भाऊंस नी गणेशास । एका मूर्तींत पाहिलें ॥100॥ आमंत्रणाची पावती । वाटे देई श्रीगणपती । मंगलकार्या निश्चित येती । ऐसी खात्री जाहली ॥101॥ भाऊंना सांगितली गंमत । की तुम्हां पाहिलें गणपतींत । भाऊ प्रसन्नपणें हांसत । राहिले कीं तेधवां ॥102॥ ऐसा भाऊ सारखा गुरु । जो ब्रह्मा, विष्णू महेश्वरु । भवार्णवतारक-तारु । गुरु केवळ कल्पतरु ॥103॥ जो चराचरीं भरला । आंतर्बाह्य भरुन राहिला । त्या निर्गुणासीं बघण्याला । दृष्टी पाहिजे वेगळी ॥104॥ परी या संसार चक्रांत । ऐशी दृष्टी न लाभत । म्हणुनी मी सुभक्त । नांव तुमचे आळवी ॥105॥ गुरु नामाची थोरवी । किती म्हणुनी वर्णावी । अनुभवानेंच चाखावी गोडी त्याची सुभक्त हो ॥106॥ शुद्ध मनानें निष्काम । घ्यावें श्रीगुरुचें नाम । दिनीं, रजनीं, करितां काम । कळि काळाचें भय नाही ॥107॥ आपणन करावी चिंता । सर्व ठेवावें गुरुमाथा । योगक्षेम सुखशांतता । गुरु निश्चित देईल ॥108॥

इति श्रीभाऊचरित्रामृत – कथनं नाम षष्ठमोऽध्याय: । श्रीदेव वेतोबार्पणमस्तु । शुभं भवतु ॥श्रीरस्तु॥

<< विसावा – अध्याय ५        विसावा – अध्याय ७ >>

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *