विसावा – अध्याय ४

 

॥ श्री ॥
॥ अथ चतुर्थोेऽध्याय: ॥

श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: । श्रीगुरुचरणीं ठेवुनी माथां । कथितों पुढील कथा । तुमचें मनीचे मनोरथा । पूर्ण करावया ॥1॥ जैसी जैसी वाढेल कथा । तुम्हा वाटेल सार्थकता । मनाची होईल तृप्तता । श्रवणा कारणे ॥2॥ कलेकलेनें वाढतां । चंद्रबिंबाची सुंदरता । मनाची खुले प्रसन्नता । पौर्णिमेपर्यंत ॥3॥ निवृत्तीनंतर मातापिता । बडोद्यांत रहात असतां । मी येत असे भेटीकरितां । मुंबईहुन वेळोवेळीं ॥4॥ जेव्हां जेव्हां येई बडोद्यांत । भाऊंचे भेटीस जात । कधीं न चुकतां नियमित । सहवासातें साधितसे ॥5॥ कां तें नकळे मजला । ओढ लागे जीवाला । सायंकाळाचे समयाला । पाय वळती भाऊंचे घरी ॥6॥ भाऊ येती कामावरून । मज बघतां आनंदून । यावें यावें मधू म्हणून । स्वागत माझें करिती ॥7॥ फराळादि चहापान । घेतां दोघे मिळून । गोष्टी स्वानुभवाच्य रंगून । भाऊ सांगती मजलागीं ॥8॥ पाय पसरुनी खुर्चीत । बसती भाऊ आरामांत । माळ फिरविती हातांत । सुख संवाद करीत ॥9॥ मी करीतसे प्रश्न । त्याचें करिती स्पष्टीकरण । शंका-कुशंका जाणून । समाधान माझें करिती ॥10॥ बोलतां बोलतां हात । जाई थांबून क्षणांत । नजर मजवरी रोखीत । पाहती क्षणभरी ॥11॥ अंतर्यामीं होऊन लीन । माथा पायीं ठेवून । देतां, घेती मज ओढून । घट्ट हृदयीं धरिती ॥12॥ म्हणती वेतोबा येऊन । गेला समाधीत सांगून । तुजवरी तो प्रसन्न असून । दिले आशीर्वाद तुला ते ॥13॥ भाऊंची सुकन्या वासंती । बालपणीं आजारी होती ।औषधोपचार बहु करिती । परी आराम मुळीं पडेना ॥14॥ डॉक्टर बहुत झाले । सर्वांनी हात टेकले । दैव एकटेच उरलें । अखेरचा आधार ॥15॥ भाऊ म्हणती वेतोबाला । सांभाळावें वासंतीला । भार तुजवरी घातला । पूर्ण विश्वास ठेवुनी ॥16॥ तिच्या सुखाची सर्व चिंता । तुज वाहिली भगवंता । तिज द्यावी आरोग्यता । दु:ख-तापातें हरोनी ॥17॥ ऐसे बहुत दिवस गेले । दुखणें अधिक वाढूं लागले । मन चिंतेनें घेरलें । आशा भंगली म्हणोनी ॥18॥ परी एके दिवशी वासंतीला । स्वप्न पडलें पहांटेला । खिडकी उघडोनी आला । श्रीवेतोबा घोड्यावरी ॥19॥ शिरीं फेटा बांधोनी ।शुभ्र अश्वावरी बैसोनी । काळी मूर्ति हांसोनी । म्हणें बघावया आलों तुज ॥20॥ आतां न करावी चिंता । तुज दिली आरोग्यता । सर्व हरोनी मी व्यथा । अभय तुजला देतसें ॥21॥ हर्षे उठोनी पलंगात । साद आंईलां घालत । देई गा नारळ हातांत । समोरी वेतोबा आलासे ॥22॥ हांक ऐकतां धांवत । काकी येती तिजसंगत । म्हणें काय झालें तुजप्रत । सांग बाळे म्हणोनी ॥23॥ म्हणे पाहिलें वेतोबाला । दिलें दर्शन मजला । हर्ष काकींना जाहला । भरले डोळे अश्रूंनीं ॥24॥ हळुहळू आरोग्यता । मिळे वासंतीला आतां । अधिकाधिक सशक्तता । वाटूं लागली तिजला ॥25॥कांही महिनें बरे गेले । दुखणें अचानक वाढलें । शरीर दुर्गंधित झालें । अती गंभीरपणें ॥26॥ डॉक्टर म्हणती ऑपरेशन । केल्या येईल गुण । परी खात्री कांही म्हणून । आम्ही देत नाही ॥27॥ मन चिंतेनें घेरलें । काय अचानक झालें । काय आमुचें चुकलें । देवा तुज ठायीं ॥28॥ तोंच अचानक भाऊला । देव स्वप्नांत बोलला । यावें माझे दर्शनाला । आरवलीला त्वरित ॥29॥ परी वासंतीची अवस्था । पुढे स्पष्टपणें दिसतां । मनाची सचिंतावस्था । भाऊकाकांची जाहली ॥30॥ मनीं निश्चय करिती । जाण्य आरवली प्रती । बाकी सर्व विनविती न जावें म्हणोनियां ॥31॥ आपण जातां येथून । आलें भलतेंच घडून । आप्तजन देती दूषण । तुम्हां लागीं सर्वथा ॥32॥ अढळ विश्वास ठेवून । भाऊ निघती बडोद्याहून । उभे वेतोबापुढें राहून । नम्रभावें विनविती ॥33॥ देवा ! तुझी आज्ञा म्हणून । धावलों मी बडोद्याहून । तैसेंच कन्येला ठेवून । झालों हजर तुजपुढें ॥34॥ माझ्या अंतरींची चिंता । तुजपायीं वाहिली सर्वथा । हे भक्तकल्पद्रुमा आतां । सांभाळी गा मजलागी ॥35॥ श्रीवेतोबा-भूमिया-पूर्वस । सातेंरीं नी सिद्धेश्वरास । घेऊन बापू केणींचे दर्शनास । परतोनी येती झडकरी ॥36॥ येतां बडोद्यास म्हणती । काय वासंतीची स्थिति । परी बघोनी सर्व सुस्थिति । आश्चर्य करिती मनोमनी ॥37॥ इकडे वासंतीचे पायाला । छिद्र पडोनी पू वाहिला । डॉक्टर येती बघण्याला । आश्चर्य कैसें घडलें हें ॥38॥ कारण ऑपरेशन करोनी । पायी छिद्रातें पाडोनी । पूवादि घाण काढोनी स्वच्छ करावयाचें होतें ॥39॥ नेमके त्याच ठिकाणीं । ईश्वरेच्छेनें छिद्र पडोनी । सर्व दुर्गंधी वाहोनी । बाहेर पडूं लागली ॥40॥ डॉक्टर हर्षित जाहले । पुढील सर्व उपचार केले । हळु हळु आरोग्य लाभलें । भाग्यवती वासंतीला ॥41॥ कधीं कधीं जागृतींत । वाटे पाउलें वाजत । बाजूचे देव खोलींत । असे चालत कोणीतरी ॥42॥ ऐसा भास वेळो वेळां । होत असे वासंतीला । जागें करूनी सेविकेला । सांगत असे बघण्यास ॥43॥ सेविका उठोनी बघे । परी कोणी ही न दिसे । तरी वाजती पाउलें । भास ऐसा होई तिला ॥44॥ ऐसे नित्याचें घडत । वासंती असे ऐकत । भाऊकाकांना कथित । असे एकदां ती ॥45॥ श्रीवेतोबाला प्रसाद लाविती । म्हणे तो तर श्रीगणपती । रोज येऊनिया प्रभाती । फिरतसे खोलींत ॥46॥ जेथें असतो श्रीगणपती । विघ्नें तेथोनिया पळती । सुख शांति नी समृद्धि । प्रकृतिस्वास्थ्य लाभतें ॥47॥ वासंतीची प्रकृती सुधारली । ती हिंडू फिरुं लागली । गायनीं सुकाळा लाभली । श्रीगुरुकृपा-प्रसादें ॥48॥ मील मधिल खात्यांत । एकदां अवलिया व्यक्ति येत । झाली ओळख परस्परांत । म्हणे येईन तुजकडे ॥49॥ भाऊ घरीं घेऊनिया येती । देवखोलींत बैसविती । भजनादि करुन आरती । बैसे ध्यानस्थ देवापुढें ॥50॥ होऊनिया सावध चित्तीं । म्हणे आलासे गणपती । तुजलागीं निरोप देती । पुजावें मज प्रतिवर्षी ॥51॥ ऐसें म्हणोनि उठती । तोंच बिछान्यावर दिसती । कुंकुमपदें उमटलेली । सभोवार अवलियाच्या ॥52॥ म्हणे बघ आलासे गणपती । देव खोलींत फिरती । पुन्हां पुन्हां तेंच सांगती । पुजावें मज प्रतिवर्षी ॥53॥ वरी भाऊकाका बोलती । माझी श्रीवेतोबावर भक्ति जरी ते प्रसाद देती । तरींच तुजला पूजीन ॥54॥ अवलिया बोले खरोखरी । प्रसाद लावा मज समोरी । येईल प्रचिती खरोखरी । येथेंच तुजपुढें ॥55॥ पुन्हा बैसती आसनावरी । प्रसाद लाविती देवावरी । टॉप चा देतो खरोखरी । श्री गजानना कारणें ॥56॥ म्हणे खोलीत जे फिरती । कुंकुमपदकमलें दिसती । ते श्री गणपतीच असती । फिरती खोलीत जाण तूं ॥57॥ त्यांचेच श्री ईच्छेपरी । पुजावें प्रतिवर्षी घरीं । अशी माझी ही आज्ञा खरी ।तुज लागीं असेचि ॥58॥ भाऊ म्हणती अवलियाला । तुझेच परी देव बोलला । निश्चित पुजीन गजाननाला । प्रतिवर्षी माझे घरीं ॥59॥ आरवलीचे थोरल्या घरीं । श्री गणेशपूजन होई तरी । भाऊ आपल्याही घरीं । श्री गणेशपूजन करिती ॥60॥ ऐसा हा देव गजानन । भाऊंवरी असता प्रसन्न । श्रीवेतोबा सांगे येऊन । भाऊकाकांसी एकदां ॥61॥ श्रीफल समोर ठेवून । अथर्वशीर्षातें म्हणून । सहस्त्रावर्तनें करून । प्रार्थावें श्री गजानन ॥62॥ ऐसा गुरुमंत्र देऊन । श्रीवेतोबा मुखातून । शिष्या केले धन्य पूर्ण । भाऊकाकांसी खरोखरी ॥63॥ प्रारंभ करिती आवर्तनाला । काहीं काळ बरा गेला । पुढें पुढें मात्र देहाला । त्रास होऊ लागला ॥64॥ भाऊ करिती निश्चयाला । कष्ट जरी पडले देहाला । तरी न सोडी आवर्तनाला । पूर्ण करावया मी ही ॥65॥ थंडी तांप येंई भरून । शरीर कांपे थरथरुन । बसण्याचेही नुरले त्राण । शरिरामध्यें त्यांचिया ॥66॥ काय करावें आतां । कार्य अर्धेच असतां । शरिराची दुर्बलता । अधिकाधिक वाढली ॥67॥ मुदतीचा ताप लागला । औषधोपचार ही केला । तरी ही तो न हटला । शरीरांतून भाऊंच्या ॥68॥ ताप असतां देहांत । भाऊ तरी ही स्नान करीत । बसून अंथरुणांत । आवर्तनें करित ॥69॥ ऐसे देहातें कष्टवून । आवर्तनें करिती पूर्ण । श्रीवेतोबाची आज्ञा म्हणून । परवा न करिती देहाची ॥70॥ सहस्त्रावर्तनें झाली पूर्ण । ताप गेला शरिरांतून । देहातें शुद्ध करुन । अंतरबाह्य भाऊंच्या ॥71॥ तेव्हापासून कधींही । ताप आलाच नाही । भाऊंच्या या शुद्ध देहीं । अंतापर्यंत जीवनीं ॥72॥ ऐसी दृढ श्रद्धा अंतरीं । तरि ही परीक्षा पाहे खरोखरी । असतां संपाची तयारी । मील मध्यें एकदां ॥73॥ दृष्टांत घडला भाऊंला । कीं चलावें आरवलीला । उदईक माझे दर्शनाला । निघावें तूं झडकरी ॥74॥ प्रश्न रजेचा पडला । मालक होते गांवाला । मीलचा हा मामला । गरमागरम होता कीं ॥75॥ ऐसी असतां परिस्थिति । कैसी रजेची करावी विनंती । त्यांतून मालक नसती । प्रश्न पुढतीं येतसे ॥76॥ म्हणोनि करिती विचार । उभें राहुनी देवासमोर । विनंती देवाला करणार । तोंच आवाज ऐकूं येई ॥77॥ अरे तुला पाहिजे कोण । मी अथवा मालक जाण । विवेकें विचार करून । वागावें बा तैसें ॥78॥ क्षणैक विचार करून । भाऊ बोलती आनंदून । मज हवेत तुझेच चरण । अखंडित जीवनीं ॥79॥ तुझी कृपा असतां मजवरी । कैसी मजला चिंतातरी ।नोकरी अथवा भाकरी । तूंच दाता असतां ॥80॥ ऐसा करुनी विचार । जाती आरवीलीस सत्वर । उभे राहून देवासमोर । धूळ भेट घेतलीं ॥81॥ राहोनियां आरवलीस । आळविती भूमिया-पूर्वस । आणि सातेरी-सिद्धेश्वरास । अभिषेकादि करिती ॥82॥ राहोनियां दिवस दोन । आतां निरोप घ्यावा म्हणून । वेतोबापुढें उभें राहून । प्रार्थिती मनोमनीं ॥83॥ देवा! येतो बरें म्हणून । घेती रुप नयनीं साठवून । नीर वाहे लोचनांतून । भाऊकाकांचे तेधवां ॥84॥ कंठ आला दाटूनी । माउली बघे समोरुनीं । कोण भक्त कोण जननी । तन्मय होती दोघेही ॥85॥ अशी तन्मय स्थिति । सोडूनी येतां भानावरती । भाऊ देवास म्हणती । पुन्हा केंव्हा भेटशील ? ॥86॥ तोंच बोले भक्ताप्रती । मी येतों तुज सांगातीं । मूर्तींतून निघे दिव्य ज्योती । भक्ता मुखी प्रवेशली ॥87॥ भाऊ वळती भूमिया प्रती । डोळे भरून बघती । देवा द्यावें निरोपा प्रती । जातसें परतोनी ॥88॥ तोंच बोले देव भूमिया । मी ही येतों याच समया । तुज संगें निघावया । तयार झालो कीं ॥89॥ ज्योति निघे मूर्तींतून । प्रवेशली मुखांमधून । भाऊंचे हृदयीं राहून । स्थिरावली पूर्णपणें ॥90॥ तोंच पूर्वसाचे मूर्तीतून । आवाज येई हांसून । अरे मी ही निघतों येथून । तुज संगे यावया ॥91॥ ज्योति निघे मूर्तीतून । प्रवेशली मुखांमधुन । हृदयीं तिघे स्थिरावून । निरंतर राहिले ॥92॥ भाऊंचे हृदय मंदिरीं । तिघेही वसती निरंतरी । अंतीम भक्तीची पायरी । भाऊकाकांना लाभली ॥93॥ येऊनियां बडोद्यात । चौकशी करिती गिरणीप्रत । तों कळले सारेंही शांत । वातावरण इकडील ॥94॥ संप न झाला म्हणून । मालक गेले आनंदून । भाऊंची व्यवस्था पाहून । खूष होती त्यांचेवरी ॥95॥ पगार देती वाढवून । म्हणें तुजमुळेंच घडलें जाण। भाऊ देवासी वंदून । कौतुक करिती मनोमनीं ॥96॥ संत बोडानाथाचे भक्तीला । द्वारकेचा श्रीकृष्ण भुलला । जैसा भक्तासवें आला । गुजराथमध्ये डाकोरला ॥97॥ मूळ कर्नाटकीचा पांडुरंग । पुंडलीकाचा न सोडी संग । पंढरपुरी आला नि:संग । भक्तासवें रहावया ॥98॥ तैसा हा कोकणपट्टीचा देव । पाहोनी भक्ताचा प्रेमभाव । भाऊसवें घेई धांव । बडोद्यास रहावया ॥99॥ ऐसी ही भाऊंची भक्ति । देव देहांत वसती । भेदभाव विसरती । कोण देव कोण भक्त ॥100॥ सोऽहं सोऽहं म्हणती । ब्रम्हानंदें डुलती । चराचरीं दिसती । आपुलींच रुपें तयांना ॥101॥ संतश्रेष्ठ श्रीगुरु भाऊ । जीवन त्यांचे पायीं वाहूं । आपले आपण न राहू । ऐसी ईच्छा मनांतरीं ॥102॥ तरी कृपा करावी मधु वरी । सेवा घ्यावी जन्मजन्मांतरी । न्यूनपणाची क्षमा करी । अपराध कांही घडलिया ॥103॥ या संसाराच्या चक्रांत । येती अडचणी असंख्यात । आधिव्याधि ही त्यांत । त्रास देती बहुत कीं ॥104॥ तुमचे नांवावाचुनी कांहीं । क्रियाकर्म जाणत नाहीं । गुरूवांचुनि अन्य नाही । भाव ऐसा दृढ राहो ॥105॥ तरी करावी कृपा । हे मधुकराचे माय-बापा । संसारीच्या सर्व तापा । पार करावें झडकरी ॥106॥ भाऊ, भाऊ आणि भाऊ । अभयचरणीं नित्य राहूं । जें जें होईल तें तें पाहूं । तुमचेच नयनीं ॥107॥ भाऊ म्हणती गहीवरून । तुझे ठायीं माझे प्राण । तुज अंतर न देईन । सत्य सत्य त्रिवाचा ॥108॥

इति श्रीभाऊचरित्रामृत – कथनं नाम चतुर्थोऽध्याय: । श्रीदेव वेतोबार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।

<< विसावा – अध्याय ३        विसावा – अध्याय ५ >>

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *