।। अथ चतुर्दशोSध्यायः ।। 

श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ।।१।। नमो दत्त अविनाश पांडुरंगा । कृपासागरा अवधूता निःसंगा । दिगंबर मज दे संगा । ये भवभंगा करी वेगा ।। २।। जयनीलोत्पलदलवर्ण घनःश्यामा । जयमुनियोगीजन विश्रामा । वेदवंद्या पूर्णकामा । अनंतसुरवरधामा नमो तुज ।।३।। जय अनंतनामा श्रीअनंता । सकलगुणमंडित गुणातीता । विश्वपालका  अनाथनाथा । लक्ष्मिकांता प्रणम्य ।।४।। जय सदरउदरा सर्वेशा । जय कमलोद्भवताता अनंतवेषा । सुखकर वरदापरेशा । पूरवी आशा विनंती ही ।।५।। तुझीया कृपेच्या आधारें । ग्रंथ चालविला प्रेमोद् गारें । तैसा वदवी अधिकोत्तरें । सुरस रसभरें करोनियां ।।६।। श्री सीताराम वालावलकर । एकदां जाती सहपरिवार । हरी बंधू होता बरोबर । समर्थ दर्शन घ्यावया ।।७।। जैसे शिरती ते मठांत । भाव धरुनी आदरयुक्त । तों चित्र देखिलें विचित्र । अनादर जागला मनांत  ।।८।। एका स्त्रीचे मांडीवर । समर्थ झोपले दिगंबर । ती हळुंवार थोपटे शिर । अंगाई सुस्वर गाऊनी ।।९।। तेणें विकल्पें भरिले हरिअंतर । तो परम क्रोधावला समर्थांवर । तडका पडला मठाबाहेर । ओरडूं लागला मोठ्यानें ।।१०।। म्हणे ऐसे कैसे हे साधू । स्त्रियांसवें निजती जें भोंदू । नग्न सदा यांस कामबाधू  । उठाऊठीं होतसे ।।११।। घरीं आला तो परतून । सर्वांस सांगे संतापून । यांत साधूचे नाहीं लक्षण । जन आंधळे कैसे जाहले ।।१२।। स्वयें होऊनिया पूर्ण नग्न । घालावया सांगे अभ्यंगस्नान । स्त्रियाही कशा निर्लज्ज होऊन । स्नान घालिती प्रेमानें ।। १३।। तैसेचि सांगे कडेवर । घेऊनि फिरवी गांवभर । अथवा सांगे भाकर । भरवा मुखी शिशुपरी ।।१४।। ऐसे जयाचे वेडेपण । त्याला कैसें म्हणावें तरी सज्जन । कैसे दाणोलीचे अंधजन । वेड्यामागें धांवती हो ।।१५।। पुढें काही दिवसानंतर । हरिचे श्वशुर मातोंडकर । विश्रांतीच्या येती रजेवर । जावया घरीं रहावया ।।१६।। त्यांच्या पार्थिव लिंगाचे पूजन । करण्याचा असे नेमाचरण । त्यांना समर्थ-शिवाचे दर्शन । घेण्याची इच्छा जाहली ।।१७।। तिणें विनंती केली जावयाला । मज घेऊन जावे दाणोलीला । श्रीसमर्थ-शिवाचे दर्शनाला  । शक्य तितुक्या लवकरी ।।१९।। श्वशुरांच्या या विनंतीला  । हरि नकार न देऊ शकला । मातोंडकरांना घेऊनि गेला । मनाविरुद्ध स्वतःच्या ।।१९।। जैसी दाणोली आली जवळ । दोन मैलाचे अंतरांवर । तैसा भजनाचा सुस्वर । ऐकावया येतसे ।।२०।। जातां जातां वाटेंत । सहज चौकशी केली गृहांत । तो समर्थ होते आंत  । ऐकावया बसलेले ।।२१।। या गृहीच्या यजमानांनीं । उभयतांना घेतले बोलावुनी  । समर्थासमोर दिले बैसवोनी । भजननंद लुटावया ।।२२।। तैसी समर्थ उठती तेथून । कुणाची काठी आले घेऊन । ती जननेंद्रियांत घालून । फिरवूं लागले गरगर ।।२३।। ऐसी अनेक वेळां फिरवून । काठी दिली ती फेकून । ईकडे हरिचे उघडले नयन । समर्थ कृति ती पाहुन ।।२४।। आपल्या विकल्पाची झाली जाण । त्याची शरम वाटली मनांतून । योगियांचाही योगी पाहून । शरण मनोमनीं जातसे ।।२५।। म्हणे समर्थांची अगम्य लीला । कळली न मज पामराला । अज्ञानानें उपमर्द घडला । माझे हातून त्यांचा हो ।।२६।। परि समर्थ न बोलले वचन । केवळ कृतिनें दिले दाखवून । अज्ञानाची धूळ झटकून । सज्ञान  केलें हरिलागीं ।।२७।। भजनाची जाहली समाप्ति । सर्व प्रसाद घेऊनि उठती । समर्थ उठोनियां जाती । शेजारील एका गुहांत ।।२८।। एकटेच  बैसती खोलींत  । ध्यानमग्न होती आंत । तों अग्नि झाला प्रज्वलीत । एकाएकीं दिसला जो ।।२९।। सर्वजण जाती धांवून । काय घडले अग्निकारण । तों समर्थांचे घडले दर्शन । ज्वालेंत शांत बैसलेले ।।३०।। परि मातोंडकरांना मात्र । वेगळेंच दिसलें चित्र । प्रत्यक्ष पाहिले त्रिनेत्र । साक्षात समोर बैसलेले ।।३१।। पार्थिंव पुजेचें पुण्य । समोर ठाकले येऊन । जीवनीं झाले धन्यपूर्ण । साष्टांग दंडवत घातलें ।।३२।। एकदां समर्थ फिरती रस्त्यावर । पूर्ण अवस्थेंत होते दिगंबर । एक तरुणी करी नमस्कार । समोर उभी राहोनियां ।।३३।। तों समर्थ बोलती सत्वर । तुज पाहोनि मजसमोर । लोक शंका घेतील घोर । कलंक बट्टा लावतील ।।३४।। परि ती बोले विनवून । मज न दिसता तुम्ही नग्न । बाळकृष्णापरि तुमचे ध्यान । गोपीसम मी वेडावलें ।।३५।। तुमचे करितां मुखावलोकन । सर्व विकार जातात पळून । निर्मळ होतसें अंतःकरण । हृदयीं प्रेम पाझरतें ।।३६।। तेव्हां समर्थ होऊनी प्रसन्न । तिज विचारते झाले कारण । म्हणे आत्मज व्हावा म्हणून । पायीं दान मागतसे ।।३७।। तोंड उघडावें म्हणून । तिज आज्ञापित झाले तत्क्षण । तों लघुशंका केली मुखांतून । प्राशन करिती झाली ती ।।३८।। जैसी श्रद्धेनें केली प्राशन । प्रसाद सद्गुरुचा समजून । तैसे प्राप्त झालें पुत्ररत्न । वर्षानंतर तिजला हो ।।३९।। दाणोलीस आली ती घेऊन । प्रसादरूपी तें वंशरत्न  । समर्थांचे आशीर्वाद घेऊन । सानंदें गृहीं जातसे ।।४०।। जैसे प्रसन्नतेनें देति दान  । तैसें काढूनही घेती वरदान । ऐसें त्यांचें लहरी लक्षण । कुणाल न आकडे कधींच ।।४१।। एक गाडेकर नारायण । द्विज होता जणू मदन । त्याची गणिका पिंगला जाण । अखंड रते जिच्या घरीं ।।४२।। मात्यापित्यांस त्यजून । तो नित्य रमे रात्रंदिन । या गणिकेच्या प्रेमाकारण । जन मानस लाज त्यजूनी ।।४३।। त्याचि गणिका जाहली प्रसूत  । पुत्ररत्न झालें प्राप्त । परि कळेना कैसें अकस्मांत । निधन त्याचे जाहलें हो ।।४४।। तेव्हां ती समर्थ दर्शनास । आशेंने आली दाणोलीस । तैसे तिचें धरोनियां हातांस । समर्थ फिरविती इतस्ततः ।।४५।।  तिज फिरविती पावसांमधून । तैसेची वाहत्या पाण्यांमधून । कधीं कधीं  गटारांमधून । ओढत ओढत नेति ते ।।४६।। गटाराचें पाणी ओंजळभरून । तिच्या टाकिती ते शिरावरून । नारायणास सांगती निक्षून  । उदगीर अवधूत येतसे ।।४७।। तैसी ती गेली संतोषून  । नारायणही गेला आनंदून । पुढें त्या दोघांना तेथून । मठांत घेऊन जाती ते ।।४८।। तों समर्थांच्या पाठीवरती । एक तार्‍या सम दिसे आकृति । क्षणांत होऊनी बालमूर्ति  । तिच्या उदरीं अदृश्य झाली ।।४९।। पुढे कांहीं मासाअंती । गणिका झाली गर्भवती । नवमास पूर्ण होण्याअंती । समर्थ दृष्टांत देति त्यां ।।५०।। श्रावण शुद्ध प्रतिपदेला । पुत्रप्राप्ती होईल तुम्हांला । स्मरणांत ठेवा या तिथीला  । दृष्टांति ऐसें सांगती ।।५१।। पुढे तैसेच आलें घडून । गणिका प्रसवली पुत्ररत्न । द्वादशदिनी नामकरण । थाटामाटांत केलें हो ।।५२।। पुढें दहा महिन्यानंतर । दृष्टांत देती श्रीगुरुवर । अकराव्या महिन्याची निरंतर । एकादशी लक्षांत ठेव तूं ।।५३।। परि दोघांच्या न राहे ती लक्षांत । जरि समर्थांनी केले जागृत । त्यांचा पुत्र गेला आकस्मात । बेसावध राहिल्यामुळें ते ।।५६।। जैसें सद्गुरु देती प्रसाद दान । तैसें काढूनही घेती वरदान । दुर्लक्षिता त्यांचें वचन  । कोपांस पात्र होती ती ।।५५।। परंतु या नारायणावरती । समर्थ कैसें कृपा करिती । त्याची भास्करपंतावरती । दृढ भक्ती पाहुनियां ।।५६।। वेंगुर्ल्याचे संत भास्करपंत । यांचा नारायण होता परमभक्त । सेवा करीतसे तो दिनरात्र । घरदार सर्व त्यजूनी ।।५७।। पंतास घालीतसे तो स्नान । स्वहस्तें भरवितसे जेवण । त्यांची विष्ठामूत्र ही काढून । बालकापरि रक्षितसे ।।५८।। जैसी नाथांनी देह झिजवून । जनार्दनांची सेवा केली जाणून । तैसी नारायणानें कायावाचामनें । पंत सेवा केली असे ।।५९।। त्या सेवेची ठेवूनी जाण  । समर्थ कृपा करिती पूर्ण । नारायण गेला उद्धरून गणिकेसह आपुल्या  ।।६०।। कुडाळच्या एका भक्तानें । पादुका बनविल्या प्रेमानें । अर्पण केल्या त्या भक्तिनें । काष्ठ चांदिच्या होत्या त्या ।।६१।। स्वयें त्या चरणीं लावून । काष्ठ पादुका दिल्या काढून । चांदीच्या मात्र सांगून । सोमा देऊसकरास दिधल्या ।।६२।। वरी सांगितलें निक्षून । कुणां न दाखवाव्या म्हणून  । तैसें त्याने बंद करून । पेटी माजी ठेविल्या हो ।।६३।। कांहीं मास गेले उलटून । तों पाहुणा आला लांबून  । सोमा सहज गेला बोलून । चांदीच्या त्या पादुकांविषयीं ।।६४।। तों कुतूहल जागलें पाहुण्यास  । त्यानें गळ घातली सोमास । विनंती केली दाखविण्यांस । हट्ट धरिला प्रेमानें ।।६५।। सोमा गेला हुरळून । विसरून गेला समर्थवचन । पेटी दाखविली उघडून । तो आश्चर्यें स्तिमित जाहला ।।६६।। पादुका नव्हत्या पेटींत । मनीं पश्चाताप झाला बहुत । जाणुनि घडला अपराध । आतां क्षमा कैसी मागावी ।।६७।। दिलेलें गेलें निघुन  । समर्थांचे भंगतां वचन । तैसेंच आले घडून । दुर्दैवांत त्याच्या होतें जें ।।६८।। प्रवासाच्या मोटारगाडींत । समर्थ होते भक्तांसमवेत । डोंगरावरूनि होती जात । गाडी तयांची तेधवा  ।।६९।। जयजयकार चाले गाडींत । कुणी भजनेंही होते गात । गाडी चालली होती झोकांत  । मस्तीत धुंदींत आपुल्या ती ।।७०।।  तो अचानक ती कैशी । दरींत जाऊनिया पडली । सर्वांची भंबेरी उडाली । इतस्ततः मंडळी पडली हो ।।७१।। जो तो पाहे सावरून । सुरक्षित असल्याची झाली जाण  । शरीरेंही पाहतो तपासून । तों कृपेची जाणं होतसे ।।७२।। परि समर्थ कोठे म्हणून । सर्वत्र पाहती ते शोधून । धस्स झाले मनांतून । समर्थ कोठें दिसती ना।।७३।। मोठ-मोठ्यानें ओरडून । दरींत केले आक्रंदन । हळूंहळूं सर्व चढून । रस्त्यावर येति डोंगराच्या ।।७४।। तोंचि समोरून येतानां  । प्रवास गाडी दिसली त्यांना । हात दाखवूनि केलेल खुणा । थांबावयास तिला ते ।।७५।। तों आश्चर्य देखिलें नयनीं  । समर्थ आले तींत बैसोनी । कैसें गुप्त झाले येथेही  । तर्क-वितर्क करिती ते  ।।७६।। ऐशा समर्थांच्या अतर्क्य लीला । सांगता ऊर भरूनि आला । मनीं भक्तिभाव उचंबळला । नकळत अश्रू ओघळती ।।७७।। श्रीसमर्थांचे समकालीन । दुजे संत श्रेष्ठ होते महान । श्रीशंकर महाराज म्हणून । दिगंत कीर्ती गाजतसे  ।।७८।। दोघेही होते समसमान । एक थोरला दुसरा बंधू लहान । इच्छा झाली मनांतून । उभयतांना भेटण्याची ।।७९।। शंकर महाराज नगरमधून । साटममहाराज  दाणोलीहून । सवें घेऊनिया भक्तगण । मोटारींतून निघती ते ।।८०।। शंकरमहाराजांचे बरोबर । होते श्री गणेश अभ्यंकर । तैसे श्रीसमर्थांचे बरोबर । वायंगणकर होते गाडींत ।।८१।। दोघेही निघाले विरुद्ध बाजूंनी । घाटांत थांबून ते येऊनी  । दोघांचेमध्यें डोंगर असूनी  । पूर्व-पश्चिमेस थांबले ते ।।८२।। शंकरा मी आलों म्हणून । एक दगड उचलला छान । तो समर्थांनी दिला भिरकावून । पूर्वेकडील बंधुकडे ।।८३।। दगड ओलांडूनिया डोंगर । शंकर महाराजांचे पडला गाडीवर  । मनांत घाबरता अभ्यंकर । काय घडले म्हणूनियां ।।८४।। तैसेचि श्रीशंकरमहाराजांनीं  । साटमा आलों रे म्हणूनी  । दगड दिला जो भिरकावोनी । समर्थ गाडीवर पडला जो ।।८५।। वायंगणकर घाबरती मनांत । तों समर्थ सांगती हंसत । माझ्या शंकरबंधूची झाली भेट । कुशला क्षेम जाणिलें ।।८६।। कोणी न पाहिलें कोणास । दगड फेकिले विरुद्ध दिशेस । कैसे भेटले ते परस्परांस । सर्वच कांहीं अतर्क्य हो ।।८७।। वेंगुर्ल्यांचे सुंदर शहरांत । राही अळयेकर अनंत । त्याची पत्नी राधा भाग्यवंत । समर्थकृपा लाभली जी ।।८८।। जैसे अनंत राधा झाले विवाहित । कांही महिन्यांच्याच अवधींत । पोटशूळानें झाली ती व्यथित । राधा पत्नी अनंताची ।।८९।। सर्व डॉक्टर वैद्य झाले करून । परि सफल न झालेले यत्न । अनंत झाला चिंतामग्न । उपाय कांहीं सुचचि ना  ।।९०।। गांवोगांवींचे म्हणून । त्याने वैद्य पाहिले शोधून । त्यांत एकानें दिलें आश्वासन । गुन येईल सांगितले ।।९१।। परि मानवरक्तांमधून । ते औषध घेतां येईल गूण  । निश्चित वांचेल हिचा प्राण  । परि एक चिंता राहील ।। ९२।। हें औषध करितां प्राशन । हिचा गर्भाशय जाईल जळून । तेणें पुत्रप्राप्तिची संपूर्ण । आशा संपुष्टांत येईल ।।९३।। परि पत्नीचा करितां विचारा । औषधाचा केला उपचार । तों संपूर्ण बरा झाला विकार  । राधा सशक्त जाहली  ।।९४।। परि वंशवृद्धिचें कारण । चिंतेनें घेतले त्यांचें मन । तों समर्थांचे झालें स्मरण । उभयतांना तें वेळीं ।।९५।। समर्थांचें घेतलें दर्शन । सेवा केली मनांपासून । तों समर्थ झाले प्रसन्न । ‘पुत्रवती भव’ बोलले ।।९६।। जो गर्भाशय गेला जळून । तो उदरी झाला उत्पन्न । राधा आई झाली एकूण । बारा मुलांची नंतर ।।९७।। त्यांचे कनिष्ठ पुत्रावरती । समर्थ पूर्ण कृपा करिती । संत केशव नामें कीर्ती । वेंगुर्ल्यांत गाजतसे ।।९८।। समुद्राच्या भव्य किनाऱ्यावर । त्यांची समाधी बांधिली सुंदर । स्वयें श्रीसमर्थ गुरुवर्य । हजर होते तें दिनीं  ।।९९।। जी पुत्रप्राप्तीची आशा सोडून । कंठीत होती कष्टी जीवन । तिज अनेक संतती देऊन । कृतार्थ केलें समर्थांनीं ।।१००।। वरी पुत्र दिला ऐसा गुंडा । ज्यानें परमार्थाचा फडकविला झेंडा । सद्गुरुचा झाला बंदा  । लाडका जाहला समर्थांना ।।१०१।। ऐसें सुधेपरी समर्थ चरित्र । ऐकावें गावें परमपवित्र । तरीच होईल एकाग्रचित्त । श्रीगुरुचरणी दृढ हो ।।१०२।। श्रीगुरुकथेविण आन । दुसरें न करावें वाचन श्रवण । सदासर्वदा श्रीगुरुचरण । चिंतीत जावे मानसीं ।।१०३।। कोणतेंही पूजिता दैवत । मनीं ध्यावे सद्गुरूनाथ । सर्वांतरीच्या अंतरंगांत । बैसलेले कैसे दिसती ते ।।१०४।। गुरुरायाचें श्रवणकीर्तन । सदा घडावेत नामस्मरण । तैसेचि नित्य पाद्यपूजन । प्रेमपूर्वक करावें ।।१०५।। गुरुचरणांचे अर्चन  । गुरुचरणांचे नित्यध्यान । गुरुचरणांचे दास होऊन । जीवनीं कृतार्थ व्हावें ।।१०६।। काया वाचा आणि मनें । ह्यानें घडेल जें धर्माचरण । तें तें करावें कृष्णार्पण । नवविधा भक्ती पूर्ण जी ।।१०७।। ऐसे भक्ती घडावी सद्गुरूंची । ऐसी भक्ती घडावी श्रीदत्ताची । अनन्यभावें  शरणागताची । अंतरीं जाण ठसावी ।।१०८।। अष्टभाव येतील उचंबळून । सर्वत्र सद्गुरु बघतील नयन । सच्चिदानंद हृदयीं भरून । आनंदकंद लाभेल ।।१०९।। म्हणुनी भाऊदास करितों वंदन । देवा ऐसें द्यावें वरदान । सद्गुरु माझा प्राण । विसावा व्हावा जीवनीं ।। ११०।। 

इती श्री भानुदास विरचित  । श्री समर्थ सौरभ ग्रंथस्य चतु्र्दशोSध्याय गोड हा  । श्री दत्तात्रेयार्पणमस्तु  । शुभम भवतु । श्री रस्तु  ।


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]