।। अथ त्रयोदशोSध्यायः ।। 

श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ।।१।। ॐ नमो सद्गुरु दत्तात्रेया । तुझिया स्मरणे नाश तापत्रया । तूं वंद्य सकळभुवनत्रया । गुणत्रया व्यापका ।।२।। तुझा अनुपम्य गा महिमा । वर्णूं न शकेंचि तो ब्रम्हा । होसी सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम । सुखधामा नमो तुज ।।३।। तूं अविनाश आनंदभरित । सदय आणि सदा शांत । सर्वज्ञ असोनी मायातीत । तव पदी रत सूरमुनी ।।४।। तूं महाशुद्धी योगेश्वर । निःसंग निरंजन दिगंबर । धीर गंभीर उदार । तूं दातार अनाथांचा ।।५।। तूं शरणागतांचा तारू । तूं दीन पतितांचा माहेरू । तूं कृपेचा सागरु । होसी कृपाकरू प्रेमळांचा ।।६।। तूं अपेक्षितांचा दाता । मनोरथातें पुरविता । जाणेनि चरणीं ठेविला माथा । पुरवी समर्था आळ माझी ।।७।। आजवरि मातें पाळीलें । लळे पुरवोनि सांभाळिले । तव चरणी विश्वासलें । लांचावले मन माझें ।।८।। तरी आतां कृपाबळें करून । तुझें त्वांची वदवावें गुण । मी मूढ केवळ अज्ञान । करिसी लेखन तुझा तूंचि ।।९।। एकदां दाणोलीच्या असतां मठांत । समर्थ बसले होते रडत । तों मंडळी येते कीं धांवत । चौकशी त्यांची करावय ।।१०।। तैसें ते सांगतील गहिवरून । माझा गुरुं गेला जगांतून । परि कुणा न झाली जाणं । कोण गुरु असावे ते ।।११।। हळुं हळुं पाहती विचारून । कोण कोठें होते म्हणून । परि सांगती, तें कळून । येईल तुम्हाला इतुक्यांत ।।१२।। आजवरी समर्थांनीं । आपली न सांगितली कहाणी । तेणें प्रश्न उद्भवतसें मनीं । कोण गुरु असति ते ।।१३।। बालोन्मत्त पिशाच्चवृत्तींत । नित्य असती ते वावरतं । सदैव असती विदेही स्थितित । तेणें बोलणे कुंठीतसें ।।१४।। वाटे समर्थ मूलतः चैतन्यमूर्ती । त्यांना काय जरुरी होती । गुरु करोनियां प्राप्ती । साध्य कोणती केली असे ।।१५।। परि या प्रश्नाचें उत्तर । संतचरित्रि  सापडते सत्वर । गुरुप्राप्तिच्या नंतर । पूर्ण ब्रह्मज्ञानी तो होतसे ।।१६।। जैसें पैलू पाडल्यानंतर  । हिऱ्याचें तेज वाढतें सुंदर । तैसेंच गुरुप्राप्तीनंतर । देवत्व प्रत्यक्ष लाभतसे ।।१७।। राम कृष्ण असोनी अवतारी । त्यांनीही गुरु केला संसारीं । गुरुची श्रेष्ठता खरोखरी । देवाहून अधिक वाटतसे ।।१८।। नामदेवासंगे बोलतसे पंढरीनाथ । तरी संत त्याला होते हिणवित  । गोराकुंभार मारुनी मस्तकांत । कच्चे मडके संबोधितसे ।।१९।। तेव्हां मनांत गेले हिरमुसून । पंढरीनाथाला  सांगती जाऊन । तों तेही त्याला समजावून । गुह्यज्ञान उपदेशिती  ।।२०।। अरे, माझें खरें स्वरूपज्ञान । गुरुविना न येईल कळून । तरी गुरूस जावे तूं शरण । सच्चिदानंद रूप जाणावयां ।।२१।। या सर्व गोष्टींची होतां आठवण । समर्थांना गुरू होते म्हणून । पक्की खात्री झाली मनांतून । परि नांव त्यांचे कळेचिना ।।२२।। समर्थांसारिख्या सिद्ध योग्याचा । गुरूही असावा श्रेष्ठ योग्यतेचा । एकच आधार सांपडतो तेव्हांचा । पारशाच्या विहिरीजवळी जो ।।२३।। आपल्या जीवनाच्या उषःकालांत । समर्थ असता मुंबईंत । पारशाच्या विहिरीजवळी बैसत । रात्रीं विश्रांती घ्यावया ।।२४।। तेथें अवलिया, गोसावी, संत । यांची होतसे कीं भेट । त्यांत अब्दुल रहमान महंत । पूर्व सुकृतें भेटले कीं  ।।२५।। त्यांनीच संसारमार्गातून । परावृत्त केलें त्यांचें मन । आध्यात्मिक जागृती घडवून । आणिली समर्थ जीवनीं ।।२६।। त्यांच्याच आदेशावरून । आंबोलीच्या घाटांत राहून । साधना केली परिपूर्ण । नाथ संप्रदायानुसार ।।२७।। जैसें इन्सुलिच्या डोंगरांत  । सोयरोबांना भेटले गहिनीनाथ । तैसें नाथ कृपेलाही पात्र । समर्थ झाले असावेत कीं ।।२८।। कारण बाबा अब्दुल रहमान । कोणी नाथ असावे महान । त्यांनी आपणासारिखे महान । समर्थांस केले तात्काळ ।।२९।। शिष्याचें जितुकें मोठेपण । त्याचा गुरूस वाटे अभिमान । परस्पर प्रेमाचें हे लक्षण । प्रकटपणें दिसतें कीं ।।३०।। एका बोटीचा कॅप्टन । यांचीपण आहे आठवण  । तेंही पुरेसे आहे कारण । समर्थांचे गुरू जाणावया ।।३१।। त्याला बाबा अब्दुल रहमान । यांचा परिचय होता छान । त्यांच्या बैठकींत होई रममाण  । वेळोवेळीं तो मुंबईंत ।।३२।। बाबांच्या समाधीनंतर । त्याला दृष्टान्त झाला सुंदर । दाणोलीमाजी निरंतर । वावरतों ऐसें सांगती ।। ३३।। तैसा दाणोली गांवांचा शोध । घेत घेत आला तो मठांत । तों समर्थांना पाही प्रत्यक्षांत । ओळख अंतरी पटली ।।३४।। त्यांनीच सांगितले मठांत । कीं समर्थ होते मुंबईत । अब्दुल रहमानांचे संगतीत । मज सवें तेव्हां ते ।।३५।। ऐशा एक एक आठवणी । नजरेसमोर येती दिसुनी  । तों दुसरे दिवशी आली कळुनी । समर्थ वाक्याची प्रचिती ।।३६।। बॉम्बे क्रॉनिकल पेपरांतून । लेखा आला होता लिहून । कीं डोंगरीचे अब्दुल रहमान । यांनी देह ठेविला असे ।।३७।। त्यांचें सांगितले होते श्रेष्ठ पण । की पैगंबर आला उतरून । लोकांचें करावया कल्याण । अल्लास प्यारा जाहला ।।३८।। तेव्हां खात्री झाली मनांतून । कीं हेच गुरु असावे म्हणून । तरी त्यांचें पाहूंया जीवन । आदरयुक्त प्रेमानें ।।३९।। मुंबईच्या डोंगरी विभागांत । छत्री सारंग या मोहल्यांत । या अवलियाची परमपवित्र । समाधी आज दिसतसे ।।४०।। अब्दुल रहमान या नावांवरून । जरि वाटते असावे यवन । परी त्यांच्या कुलधर्माची जाण । कुणांस माहीत नव्हती हो ।।४१।। जैसी शिर्डीच्या साईबाबांची । किंवा शेगांवीच्या महाराजांची । अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची  । जाण कुणास झाली कां ।।४२।। तैसी अब्दुल रहमान बाबांची । माहिती न मिळे कुळधर्माची । अथवा परमार्थ योग साधनेची । गुढ गुह्य राहिलें जें  ।।४३।। मुंबईच्या डोंगरी विभागांत । असेच प्रकटले अकस्मात । मुस्लीम बंधूंच्या वस्तीत । छत्रीसारंगच्या मोहल्ल्यांत ।।४४।। परि त्यांची विदेही स्थिती पाहून । कुणी भक्त बोलला आनंदुन । हे तों अब्दुल रहमान म्हणून । नांव त्यांचे ठेवीतसे ।।४५।। तेव्हां पासूनिया समाजांत । याच नांवानें झाले प्रख्यात । त्यांच्या दर्शनास येती धावतं । सर्व धर्म पंथाचे भक्तगण ।।४६।। त्यांनी मात्र स्वतःबद्दल । उच्चार न केला कुणाजवळ । तेणें त्यांची जातपात वंशवेल । कुणा न कळली कधींच ।।४७।। अंगकाठीनें होते उंचपूर्ण । रंगही होता तांबूसवर्ण । जटादाढी वाढली असुन । आरक्त चेहरा दिसतसे ।।४८।। सस्मित त्यांच्या मुखांतून । दंतपंक्ती चमकती छान । भावपूर्ण तेजस्वी नयनांमधून । भक्तजनांते अवलोकिती ।।४९।। कपडा नसे अंगावरती । तरि सुंदर दिसतसे मूर्ती । लोखंडी गोळा एके हातीं । दुसर्‍यांत काठी शोभतसे ।।५०।। ऐशा या स्वरूपांत । नित्य असती ते तंद्रीत । राहती झोपती ते नित्य । गलिच्छ जागा पाहून ।।५१।। जरि कोणी खोडी काढली । तरि शिव्यांची वाहती लाखोली । म्हणुनी न येई जवळी । सहसा कोणी बाबांच्या ।।५२।। परि कधी असतां खुशींत । कुणाचें संगती भविष्य हित । तैसे घडुनी येता प्रत्यक्षांत । जन आदरे वंदिती ।।५३।। परि वेडा फकीर म्हणून । जो तो वंदितसे लांबून । कधीं मिजास जातां उखडून । लोखंडी गोळा मारिती ते ।।५४।। परि एके दिवशीं छान । घटना आली कीं घडून । सर्व लोकांच्या मनांमधून । भीति पार पळाली कीं ।।५५।। अंधःकार गेला निघून । लख्ख प्रकाश आला उजेडून । दशदिशांत भरला कोंडून । सुगंध त्यांच्या लौकीकाचा ।।५६।। एकदा चिडले असतां भयंकर । लोखंडी गोळा मारिती डोकीवर । रक्तबंबाळ होउनी भूमिवर । एक व्यक्ती पडली कीं ।।५७।। मेला असेल तो म्हणून । पहावया आले सर्व जन । भीतियुक्त वातावरण । सर्वत्र तेव्हां जाहलें  ।। ५८।। परि ही भव्य नग्नमूर्ति । त्या व्यक्तीच्या फिरे भोवती  । गोळा फेकूनी आकाशांती  । पुन्हां पुन्हां तो झेलतसे  ।।५९।।  असंबद्ध बोलती जें वचन । त्याचें कुणा न होतसे ज्ञान । टकमक बघती बुद्धिहीन । मानव गंमत तेथली ।।६०।। ठिणगी पडली आग लागेल  । त्यांत काळोख जळून जाईल । लख्ख उजेडही पडेल । प्रकाश प्रकाश चोहिकडे ।।६१।। त्या प्रकाशाला घ्यावें पिऊन । आकाशाला गवसणी घालून । ऐसें बडबडती ते अर्थपूर्ण । त्याचे भोवतीं फिरूनियां ।।६२।। परि या वेड्या पासून । इतरां धोका होईल उत्पन्न । म्हणूनी आला सांगून । पोलिसांत कोणीतरी ।।६३।। उतुक्यांत गोरे सार्जन्ट । तेथें आले कीम गाडींत । तों बाबा होऊनिया शांत । गाडींत जाऊन बैसले ।।६४।। वेड्या डांबलें तुरुंगांत । यानें जनमानस झाले शांत । सुटकेचा सोडुनी  निश्वास । जो तो घरीं जातसे ।।६५।। डोंगरीच्या या तुरुंगांत । रात्री आठाचे टोले होते पडत । बाबा कोठडींत  होते फिरत । थाळी हातांत घेऊन ।।६६।। इतर कैद्यांचे बरोबर । त्यांनाही दिली होती भाकर  । ती घेऊनिया हातावर । कोठडींत फे-या मारिती ते ।।६७।। तोंचि पहारेकऱ्यानें वाकून । कोठडींत पाहिले डोकावून । तो दृष्टिभेट झाली म्हणून । बाबा त्याला बोलाविती ।।६८।। बायको वरती रागावून । उपाशी पोटीं तूं राहून । कामावरती आलास धांवून । योग्य नसे वेड्या हें ।।६९।। आपुल्याच प्रिय व्यक्तींवरती । राग न धरावा कधीं चित्ती । त्वरित यावें मजसंगती । जेवून घेऊं उभयतां ।।७०।। सत्य सांगितलें उकलून । तेणें  पहारेकरी गेला संतापून । आतां गप्प बैसण्याकारण । काय घेशील पुसतसे ।।७१।। म्हणति राग टाकावा देऊनि । तेचिं माझे खरें जेवण । जगाचा राग मी पिऊन । भाकर त्यांना देतसे ।।७२।। परि दुर्लक्षून त्यांचें भाषण । मूर्खपणाचें वाटे लक्षण । ऐसे मनांमध्यें तो समजून । दूर गेला निघोन ।।७३।। तो विचारांच्या असतां तंद्रीत । पाठीवर पडला हळूवार हात । जेवून घ्यावें बेटा म्हणत । घांस पुढें करिती ते ।।७४।। तैसा तो गेला घाबरून । कैसे बाहेर आले कोठडीतून । पुनश्च त्यांना धक्के मारून । कोठडींत बंद करीतसे ।।७५।। कुलुपास नीट किल्ली लावून । दहा वेळा पाही तो ओढून । मनाची पक्की खात्री करून । निर्धास्त पहारा करितसे ।।७६।। थोडा वेळ गेला निघून । तों आवाज आला जवळून । बाबा उभे थाळी घेऊन । पाठीमागून येति ते ।।७७।। तैसा पहारेकरि गेला घाबरून । भीतिनें गेला गांगरून । लटपट कांपे शरीरांतून । ओरडूं लागला मोठ्यानें ।।७८।। तैसे शिपाई आले धांवत । परि यालाच नव्हतें  बोलवत । खुणा करुनि होता सांगत  । याला बंद करावें हो ।।७९।। तैसे सर्व मिळूनी बाबांना । बंद करुनि ठेविती पुन्हां । तेव्हा शांत होऊनी सर्वांना । हकिकत तो सांगतसे ।।८०।। हा बंद असतां कोठडींत । बाहेर कैसा येतो अवचित । भूत असावे हें जिवंत । प्रचिती मज येतसे ।।८१।। जरि या गोष्टीवरती  । कोणीही विश्वास न ठेविती । तरि वरिष्ठांचें कानावरती । घालणें उचित वाटतसे ।।८२।। जैसा एक शिपाई धांवून । वरिष्ठा येई सांगून । तैसा गोरा अंमलदार धांवून । मडमेसह तेथें येतसे ।।८३।। परि या शिपायाचे मात्र । हातपाय होते लटपटत । भीत भीत सर्व हकीकत । सांगता झाला वरिष्ठांला ।।८४।। तैसी उत्सुकता आली दाटून । बघावयां जाती दोघेजण । तो मडम करितसे लवून । नमस्कार या बाबांना ।।८५।। ओ माय लॉर्ड, म्हणून । रिवाजापरी करी वंदन । तिज येशूचे घडलें दर्शन । क्षमायाचना करीतसे ।।८६।। फरगीव्ह मी, फरगीव्ह मी म्हणून । नवऱ्यास सांगे विनवून । अरे हा प्रत्यक्ष येशू असून । अपराध  याचा करूं नये ।।८७।। वरिष्ठही गेला समजून । या फकिराचें पाहुनी लक्षण । त्यांना तात्काळ दिले सोडून । आदरयुक्त प्रेमानें ।।८८।। ही हकिकत कळतां लोकांत । बाबा एकदम आले प्रकाशांत । जो तो धांवतसे दर्शनार्थ । रात्रंदिन डोंगरींत ।।८९।। एका टॅक्सीचा धक्का लागून । त्यांचा डावा पाय गेला मोडून । तेणें एकाच ठिकाणी बैसून । नित्य रहात असती ते ।।९०।। पुढें रागही गेला मावळून । तेणें भोवतीं राहे भक्तगण । उच्च-नीच, थोर सान  । ज्ञानी, विज्ञानी, तैसेची ।।९१।। ऐसेंच असता मंडळींत । सर्वांना होते ते सांगत । ‘इंसान आता है’ म्हणत । तेहमत लाव सांगती ।।९२।। परि कोण ‘इन्सान’ आहे येत । याचा न झाला अर्थबोध । लुंगी नेसविली इच्छेप्रत  । भक्त मंडळींनीं त्यांना हो ।।९३।। इतुक्यांत गाडी थांबली येऊन । सय्यद इब्राहिम उतरले गाडींतून । बाबांना देऊनि अलिंगन  । परस्पर भेटले सानंदें ।।९४।। महंमद पैगंबराच्या वंशामधले । पीर इब्राहिम होते भले  । वाळकेश्वरला होते उतरले । दर्शन घ्याया आले जे ।।९५।। तेव्हां इन्सान व्यक्तिचा अर्थ  । लोकांच्या आला ध्यानांत । अशा बाबांच्या मति कुंठित । कथा अनेक असती हो ।।९६।। त्यांनीं आपुला निर्वाण दिन । आधींच ठेविला होता सांगून । सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सोळा सन  । तसेच पुढति घडलें हो ।।९७।। ऐशा समर्थ सद्गुरूंची समाधी । डोंगरी विभागांत आहे साधी । भक्तगणांची होतसे गर्दी । उत्सवदिनी – प्रतिवर्षी ।।९८।। आजही दर्ग्याचें दर्शन । विश्वासुनि घेति जे जन । त्यांच्या कामना होती पूर्ण । प्रचिती प्रत्यक्ष येतसे ।।९९।। बाबा न गेले येथून । परि अदृश्यरुपानें राहून । कार्य चालविती ते संपूर्ण । पूर्वीसारखे आजही ।।१००।। कुणा देति ते दर्शन । कुणा दृष्टांतरूपे सांगून । कुणा समर्थांकडे पाठवून । साह्यार्थ धांवती भक्तांच्या ।।१०१।। शब्दफुलांची चादर गुंफून । त्यांचे गाईलें सुगंधित जीवन । तीच दर्ग्यावरती वाहून । प्रेमादर व्यक्त करितसें ।।१०२।। श्रद्धेचें वाहुनी अत्तर । समर्थांसहम करितों आदर । साष्टांग करितों नमस्कार  । भाऊदास हा मनोंमनीं ।।१०३।। अमलभावाचें गुलाबपाणी । दर्ग्यावर शिंपडतों आनंदानीं । भाऊदास करितों विनवणी । कृपा असावी म्हणोनिया ।।१०४।। जय जय बाबा अब्दुल रहमान । पायीं विनंती असे लहान । समर्थ सौरभाचें लेखन । पूर्ण करून घ्यावे हो ।।१०५।। पर्यायानें या सौरभांत । तुमचाही कीर्तिसुगंध भरला ओतप्रोत । सुरनदीपरि राही तो वाहत  । जीवन पावन करावया ।।१०६।। जो जो डुंबेल या प्रवाहांत । त्याला मुक्त करावें या जन्मांत । त्याचें पूर्ण करावें मनोरथ । दान पायीं मागतसें ।।१०७।। जयजय अब्दुल रहमान । तुमच्या कृपेचें ऐसें वरदान । लाभण्याची इच्छा अंतरीं धरून । भाऊदास विनम्र वंदितसे ।। १०८।। 

इती श्री भानुदास विरचित । श्री समर्थ सौरभ ग्रंथस्य त्रयोदशोSध्याय गोड हा  ।श्री दत्तात्रेयार्पणमस्तु  । शुभम भवतु । श्री रस्तु  ।


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]