।। अथ द्वादशोSध्यायः ।। 

श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ।।१।। ओम नमोजी श्रीदत्ता । अविनाशरुपा श्रीसमर्था । निर्विकार मायातीता । दुःखहर्ता जगदात्मा ।।२।। नमोSस्तु  ते गा दिगंबरा । त्रिगुणात्मका दयासागरा । चिद् धनां तूं सर्वेश्वरा । सदय उदारा महामूर्ती ।।३।। जयजयाजी महासिद्धा । विमलरूपा आनंदकंदा । चिद्विलासिया परमानंदा । भेदाभेदतीत तूं ।।४।। तूं अद्वयपणें निरंतर । तुझा न कळे कवणा पार । तूं सिद्धमुनींत  योगींद्र । जोडिती कर देवऋषी ।।५।। जय महामुनी योगिराजा । षड्गुणसंपन्न गुणलया । आनंदकंदा अभया । तुझ्यिया पाया प्रणामि।।६।। या जगदोध्दारासाठी । प्रकटसी धरोनी त्रिपुटी । शरणागता देसी भेटी । योग हातवटी दाविसी ।।७।। जयासि देसी कृपादान । तया करिसी आपणासमान । किंवा भातुकें इच्छित देऊन । हरिसी अज्ञान क्षणमात्रें ।।८।। ऐशा तुझ्या कीर्ती अपार । कीं दत्तमूर्ती उदारधीर । अनाथ दिनांचा अंगिकार । करिसी उद्धार पतितांचा ।।९।। म्हणोनया दीनदयाळा । शरण तुझिया चरणकमळा । कृपा करोनी ये वेळां । पुरवी लळा अंतरींचा ।।१०।। आबासाहेबांच्या नातवाचा । म्हणजे विनायक तेंडोलकर याचा । समारंभ होता विवाहाचा । कोकणच्या तेंडुलकर गावांत ।।११।। सावंतवाडीच्या सरकारांत । आबा होते वरच्या हुद्यांत । तेणें मंडळी येती गर्भश्रीमंत । मंगल कार्याच्या कारणानें ।।१२।। आबांचा स्वभाव होता चांगला । तेणें जमला बराच गोतावळा । मित्रमंडळींचाही आला । लोंढा स्वयंस्फूर्त प्रेमानें ।।१३।। आबांच्या घरच्या कार्यांत । आपलाही लागावा हात । तेणें गांवकरी येती धांवत । कर्तव्यबुद्धीनें आपल्या ।।१४।। त्यांत बातमी आली कानांवर । कीं श्रीमंत बापूसाहेब सरकार । घेऊनी येणार परिवार । शाहि लवाजम्यासह आपुल्या. ।।१५।। दुधांत पडावी साखर । बातमींत बातमी आली सुंदर । कीं समर्थ आहेत बरोबर । श्रीमंतांसवे येणार ते ।।१६।। तो अमित उत्साहाची स्फूर्ती । वाढतां जाती वेशीवरती । सनया चौघड्यांचे संगती । स्वागत उस्फूर्त करावया ।।१७।। समर्थांचा करिता जयजयकार । तों दिंडीत झाले रूपांतर । स्वागताचा वेगळा प्रकार । अचानक घडून आला कीं ।।१८।। हां हां म्हणता तेंडोलींत । मिरवणूक आली मंडपांत । परि गर्दी लोटली असंख्यांत । मंडप उणा पडला कीं ।।१९।। ऐसा मंडप फुललेल्या पाहून । बापूसाहेब बोलती आनंदून । आबा, तुम्ही किती भाग्यवान । समर्थ लाभले कार्यास ।। २०।। भव्य ऐशा लग्नमंडपांत । उच्चासन केलें होतें सुशोभित । मंडळी बैसली दाटीवाटीत । समर्थांसह उच्चासनी ।।२१।। गर्दी इतकी झाली होती दाट । कीं मुंगीसही नव्हती वाट । परि कोणी कुत्र्यासम ओरडत । शिरूं पाहतसे मंडपी ।।२२।। अरे, हा तो वामन्या देवळी । जन्मतांच बिचारा मुका मुळी । हाच मारेनिया किंकाळी । आंत शिरूं पाहतसे ।।२३।।त्याचे वरती ओरडून । जो-तो पाही अडवून । परि तो लोकांचे मधून । बेफाट धांवत सुटला हो ।।२४।। समर्थांचे मंचकावरती । चढून गेला आवेशांती । आणि समर्थांचें अंगावरती । आडवा जाऊन पडला हो ।।२५।। तैसे समर्थ भयंकर चिडती । वामन्यांचे श्रीमुखांत भडकविती । तेणें लोकांचे अंगावरती । ओरडत जाऊनि पडला तो ।।२६।। लोक उचलती वरचेवर । तों वामन्या करितसे उच्चार । महाराजांचा जयजयकार । स्वमुखें मोठ्यानें ।।२७।। आश्चर्यास न राही पार । जो मुका होता आयुष्यभर । तो करूं लागला जयजयकार । समर्थ करस्पर्शानें ।।२८।। सहस्त्रावधी नेत्रांचे समोर । ऐसा घडला होता चमत्कार । मुका बोलतसे जयजयकार । आनंद गगनीं मावेना ।।२९।। तूं मुक्ता साळवे देसी वाणी । आंधळ्यांस तेज नयनीं । परंतु जाई ओलांडुनी । गिरीशिखर तुझ्या कृपें ।।३०।। ऐसें समर्थांचे श्रेष्ठ पण । वामन्या केलें भाग्यवान । समर्थ नांवाचें उच्चारण । करूनी धन्य झालासे ।।३१।। प्रसंग घडला विवाहाकारण । परि वामन्यांचे दैव गेले उजळून  । तैसे आबा पाटलांचेंही जीवन । कृतार्थ केलें समर्थांनी ।।३२।। आबासाहेबांची समर्थावरती । निष्ठायुक्त होती भक्ती । कायावाचेची कर्मकृती । समर्पण करिती प्रेमानें ।।३३।। समर्थांचें केल्याविना स्मरण । चहापाणीही न करिती प्राशन । समर्थांविना जीवन । जगणे व्यर्थ वाटतसे ।।३४।। समर्थांची ही आबांवरती । निर्मळ शुद्ध होती प्रीती । लाडानें त्यांना संबोधती  । पांडू शेठ म्हणूनियां ।।३५।। जेव्हा जेव्हा येति तेंडोलींत । आबांच्या घरीं होते रहात । तेथें आबांचे परिवारांत । भक्ती प्रीती रुजली हो ।।३६।। ‘सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हे घरदार’ । ऐसा आबांचा संसार । कृपाछत्रांत होता कीं ।।३७।। आबांचे जामात श्रीगणेश । यांना चिंतेचा पडला पाश । तेणें जाती ते दणोलींत । विमनस्क मनःस्थितींत ।।३८।। एका भुसाऱ्याच्या दुकानांत । समर्थ होते नग्नावस्थेंत । लवंडले होते ते टोपलींत । पाय बाहेर काढूनियां ।। ३९।। जैसा गणेश जाई धांवत । पाय धरूनि होई शरणांगत । तैसा विकल्प जाऊनी स्थिर चित्त । क्षणांत त्याचें जाहलें ।।४०।। वेल काढोनि टोपलींतला । गणेशाचे हातीं त्यांनीं दिला । प्रसाद समजून त्या वेलीला । मुंबईस घेऊन गेला तो ।।४१।। खिशांत तो वेल ठेवून । जिथें जिथें जाई कार्याकारण । तिथें तिथें यशस्वी होऊन । जीवनीं संपूर्ण सांवरला ।।४२।। आबांची नात चंपूताई । हिने सांगितलें दृष्टांत काहीं । अनेक संकटांना ती जाई । सामोरी श्रीसमर्थ कृपें ।।४३।। पतिनिधनाचा वज्राघात । जेव्हां आला होता नशिबांत । शिरी ठेवूनियां कृपाहस्त । धीर देती ते प्रेमानें ।।४४।। तूं आपल्यामार्गें जावें निघून । चटणी-भाकर ठेविली राखून । ऐसें मुंबईकडे बोट करून । बोलते झाले तिला ते ।।४५।। पुढें परिचारिकेचे शिक्षण । पूर्ण केलें तिथें जाऊन । उर्वरित आपुलें जीवन । आनंदांत तिनें घालविले ।।४६।। तैसी गंगुबाई आजगांवकर । आबांची कन्या सुकुमार । बालपणीं वैधव्याचा । आघात झाला असतांना ।।४७।। मार्गदर्शन केलें समर्थांनीं । मोठें घर तुझ्या नावांनीं । तेंडोलींत दिलें मी ठेवोनी । तेथे उर्वरित जीवन कंठावें ।।४८।। पुढें तैसेचि आलें घडून । त्यां चौसोपी घरांत राहून । समर्थांचें करूनिया स्मरण । जीवन सानंदे घालविलें ।।४९।। आबांचा नातू रमाकांत । यानें सांगितला जन्मवृत्तान्त । जो आईनें केला विदीत । मोठा झाल्यावर त्याला ।।५०।।  रमाकांताचे अगोदर । मोठा भाऊ नांवें सुंदर । त्यास जडला विकार । ज्यांत मरण तो पावला ।।५१।। पुत्र वियोगांचे कारण । यशोदेचें उडालें मन । संसारांत न लागें म्हणून । समर्थ दर्शना जाई ती ।।५२।। तिने समर्थांचें चरण । अश्रुंनीं टाकिले भिजवून । समर्थ अंतर्ज्ञानें जाणून । सांत्वन करिते झालें कीं ।।५३।। अग ! कोंबडीला कितीतरी । पिल्लें होतात खरोखरी । तूं खंगू नको मनांतरीं । देव कल्याण करील ।।५४।। ऐसें सांगुनी समर्थांनीं  । श्रीफळ दिले ओटींतूनी । त्याच या प्रसादामधूनी । जन्म माझा झाला असे ।।५५।। म्हणोनि मी समर्थांचा । दास झालों जन्मजन्मांतरीचा । ऐसा वृत्तान्त या रमाकांताचा । सांगता झाला स्वमुखें ।।५६।। समर्थ असता दणोलींत । तडक धांवती तें पिंगूळींत । जीव आहे कीं घुटमळत । पांडू शेठाचा सांगति ते ।।५७।। जैसे जाती ते पिंगुळींत । आबा होते अंत्यावस्थेंत । अंतरी स्मरण होते करीत । समर्थांचें वाटतसे ।।५८।। तेव्हां माझ्या पुता म्हणून । हात फिरविला डोक्यांवरून । मुक्त झाला गर्भवासांतून । ऐसे बोलते झाले ते ।।५९।। आषाढ शुद्ध पंचमीला । आबा प्रिय झाले देवाला । तेव्हां समर्थ बोलले सर्वांला । पहा वैभव त्याचें हो ।।६०।। गरुड विमानांत बैसून । वैकुठांत करितो गमन । पांडूशेठ किती भाग्यवान । ऐसें म्हणूनी नाचले ते ।।६१।। यावरून येईल ध्यानांत । कीं संत धरिती ज्याचे हात । त्याला जन्माची देति साथ । संचित दुर्लक्षूनिया ।।६२।। भक्तांच्या सर्व कुटुंबावरती । त्यांची राहतसे प्रीती । त्यांची भवभय भीती । दूर करिती ते प्रेमानें ।।६३।। ऐसें देवाचें आहे वचन । कीं एका सद्भक्ताचे कारण । बेचाळीस कुळें जाती उद्धरून । सत्य सत्य त्रिवार ।।६४।। म्हणूनी वाढवा आवडी । संतसंगाची धरा गोडी । जेणें संसाराची नावडी । पार सहज होईल ।।६५।। यशोदाबाई कांदळकर । यांनी आपले मनोविचार । अहिल्याबाई वायंगणकर । यांना स्पष्ट सांगितले ।।६६।। शेजारधर्माचें पालन । वाटें करावें मनांतून । तेणें सुचविती शहाणपण । अहिल्याबाई मैत्रिणीला ।।६७।। तो काळही होता तैसाची । रूढी होती स्पृशास्पृश्यतेची  । तेणें शूद्र मानूनी हरिजनांची । निंदानालस्ती होतसे ।।६८।। वायंगणकरांचे या घरांत । जेव्हा येती साटम समर्थ । सर्व जाती गोती वा जमात । दर्शनास श्री सर्रास ।।६९।। तेणें होतसे भ्रष्टाचार । आणि नासतसें कुलाचार । ऐसें संतप्त मनोविचार । यशोदाबाई मांडती कीं ।।७०।। तेव्हां ताई संगती समजावून । कीं मानवानें केले निर्माण । जातीपातीचे भेद भिन्न । वर्णव्यवस्था समाजांत ।।७१।। परि देवाचे दरबारांत । सर्व आत्म्यांची एकच जात । सर्व भेदाभेद विरहित । प्राणिमात्र एकची असे ।।७२।।म्हणोनि चोखामेळ्याबरोबर ।  पांडुरंग जेवला एका पानावर । तैसे एकनाथांचेही बरोबर । महार जेवीत होते ना ।।७३।। जरि सर्व पटते हें मनांत । तरी जुन्या विचाराला नाहींड रुचत । समर्थांचें वागणे विपरीत । मज अंतरी वाटतसे ।।७४।। ऐसें मैत्रिणींचे झाले संभाषण । तांदळाचें करिता निवडण  । तोंचि उजाडला दुसरा दिन । समर्थ हजर जाहले ।।७५।। जैसे शिरती ते घरांत । क्षणांत जाहले कीं संतप्त । सर्वांचेंकडे पाहुनि रागांत । लाखोली शिव्यांची वाहती ।।७६।। काय भ्रष्टाचार मांडिला घरांत । कुलधर्म कैसा विसरलांत । महारांचीं पोरें घरांत । घेता वाटते मूर्खांनों ।।७७।। ऐसें ऐकतां तें वचन । कुणां न झाली त्याची जाण । परि यशोदाबाई गेल्या समजून । शर्मिंद्या झाल्या मनांतून ।।७८।। थोबाडींत घेती मारून । मनोमनीं जाती शरण । क्षमा करावी देवा म्हणून । रडूं लागल्या घरांत त्या ।।७९।। समर्थ बाहेर पडती रागांत । व तडक जाती महारवाड्यांत । तैशी मंडळी होती आनंदित । अचानक त्यांना पाहून ।।८०।। समर्थांचा जयजयकार । महारवाड्यांत झाला जोरदार । दुःख तापाचा केला संहार । शीतल स्पर्शाने आपुल्या ।।८१।। वाटे साटमांचें रूप घेऊन । एकनाथ महाराज येति भेटून । पुनश्च आपुल्या हरिजन । भक्तांना पूर्वीसारखें ।।८२।। सर्व हरिजन गेले संतोषून । तैसें समर्थ निघाले तेथून । विहिरीजवळ आले चालून । स्नानादि विधी करावया ।।८३।। परि वाटेंत राजा पालकर । उभा होता जोडोनि कर । त्याला करिती लत्ता प्रहार । गटारांत कोलमडून पडला कीं ।।८४।। परि त्यांच्या प्रहारांतून । राजाचा दमा गेला निघून । तो पुन्हां न उठला परतून । अंतापर्यंत जीवनीं ।।८५।। उमा होती विहिरीवरती  । जी पाणी भरण्यां आली होती । तों समर्थ खेकसलें तिचेवरती । पैसे खातेस म्हणूनियां ।।८६।। बाजाराच्या पैशांमधून । थोडे घेत असे ती काढून । त्यातून खाई सुपारीपान । तेंही कृत्य जाणती ।।८७।। तैसी खजिल झाली मनांत । पलायन केलें घरांत । स्नान करुनी झाले शांत । नंतर समर्थ ते दिनीं ।।८८।। दाणोलीचा एक व्यापारी । खाजांची करितसे विक्री । यात्रेत मारितसे फेरी । डोक्यावर टोपली घेऊनियां ।।८९।। पुष्कळसे कष्ट करून । खाजे वाही टोपली भरून । परी विक्री कांहीं म्हणून । चांगली त्याची होतं नसे ।।९०।। धंदा न चाले म्हणून । तो कष्टी झाला मनांतून । मनोमनीं समर्थांना प्रार्थून  । विक्रीला तो जात असे ।।९१।। परि न जाई धंदा सोडून । मठांत घेण्यां समर्थ दर्शन । बैसल्या जागीं आळवून । प्रार्थना मात्र करितसे ।।९२।। असेंच एका यात्रादिनीं । समर्थ फिरती बाजारांतूनी । त्या वाण्या जवळ येऊनी । लाथ मारती टोपलीस ।।९३।। तेव्हां खाजे सर्वत्र उडून । रस्त्यावर गेले पसरून । टोपली ही घरंगळून । दूर उडाली कोठेंतरी ।।९४।। एक लांब शिवी हासडून । समर्थक गेले निघून । तैसा वाणी हसला मनांतून । कृतार्थतेच्या भावनेनें ।।९५।। त्यानें टोपली आणली शोधून । खाजे भरले गोळा करून । त्याच यात्रेत गेले संपून । सर्व खाजे त्या वाण्याचे ।।९६।। पुढें जेव्हां ती टोपली भरून । बाजारांत जाई खाजे घेऊन । ते संपूर्ण जाती विकून । ऐसा अनुभव येतसे ।।९७।। धंदा चालला जोरदार । तेणें तो झाला दुकानदार । टोपली न वाहे शिरावर । कृपा पात्र झाला असे ।।९८।। परि समर्थचरणानें पावन । झालेली टोपली ठेवी जपून । तिचे करूनियां पूजन । धंदा आपला वाढवीतसे ।।९९।। पुढें झाला तो श्रीमंत । टोपलीचा लाभता प्रसाद । जैसा भाव तैसी साथ । समर्थ देति भक्ताला ।।१००।। ती  लाथ न मारली टोपलीस । परि पिटाळले दुर्दैवास । तेणें झाला भाग्योदय सावकाश । उर्वरित त्याच्या जीवनीं ।।१०१।। एकोणीसशें सदतीस सालांत । समर्थ येति मुंबईंत । टोपीवाल्या च्या प्रसिद्ध चाळींत । पुत्रास आपुल्या बघावयां ।।१०२।। पत्नीस दिले होते वचन । कीं समाधीपूर्वीं मी भेटेन । त्या वचनाचें करिती पालन । प्रत्यक्ष मुंबईंत जाऊन ।।१०३।। अकरा केळी व श्रीफळ । ओटींत घातलें तात्काळ । अखंड सौभाग्यवती भव । आशीर्वाद दिधला प्रेमानें ।।१०४।। वसंतास* करुनिया पुढती । मामा विनम्रपणें विचारती । या पुत्राची भविष्यगती । पुढती काय सांगावी ।।१०५।। तेव्हां गळ्यांतील हार काढून । वसंतास देति घालून । वरी जिन चा पेला उष्टावून । स्वकरें पाजिती प्रेमानें ।।१०६।। जवळ घेती आंवळून । हात पाठीवरती फिरवून । ‘ह्यो माझा पुत असा’ म्हणून । ‘ह्येका सांभाळा’ सांगती ।।१०७।। ‘संसारांत हा राहून । लोकांचें करील हा कल्याण’ । ‘माझ्यासारखा होऊन । कार्य पुढती चालवेल’ ।।१०८।। ऐसी करुनी भविष्यवाणी । समर्थ निघती तेथूनी । दाणोली माजी परतोनी । येते झाले सानंदे ।।१०९।। ऐसी समर्थांची दिव्यकहाणी । ज्यांनी पाहिली देहीं- नयनी  । ते धन्य झाले जीवनीं । भाग्यवंत खरोखर ।।११०।। परि ज्यांना न घडलें दर्शन । त्यांनी निराश न व्हावे मनांतून । समर्थांचे चरित्र गुणगान । हेंचि दर्शन जाणावें ।।१११।। संतचरित्र म्हणजें विभूतीदर्शन । ज्यांत असतें गौरवगान । संतचरित्र म्हणजें अवलोकन  । संपूर्ण दैवी जीवनाचें ।।११२।। संतचरित्र म्हणजें स्वरूपध्यान । जें देतें सुख-समाधान । संतचरित्र म्हणजें पूजन । ब्रह्मनिष्ठ अवताराचें ।।११३।। ऐसें संतचरित्राचें श्रेष्ठपण । ज्यांत देवाचे प्रकटती गुण । तेंचि आश्रवावें साधन । म्हणूनि भाऊदास मी प्रार्थितसें ।।११४।। 

इति श्री भाऊदास विरचित । श्री समर्थ सौरभ ग्रंथस्य द्वादशोSध्याय गोड हा  । श्रीदत्तात्रेयार्पणमस्तू । शुभं भवतु । श्रीरस्तू ।


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]