॥ अथ एकादशोSर्ध्ययः ॥

 श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ जयजय श्री गंगाधरा । त्रिशूळपाणि पंचवकत्रा । अर्धनारीनटेश्वरा । श्रीशंकरांनी नीलकंठा ॥२॥ गजास्यजनका त्रिनयना । कर्पुरगौरा नागभूषण । गजास्यजनका, गौररमणा । भक्तवत्सला दयानिधे ॥३॥ तूं आदिमध्यांतरहित । अज अव्यय मायातीत । विश्वव्यापक विश्वनाथ । विश्वंभर जगद्गुरो ॥४॥ तूं नामगुणांतीत असून । स्वेच्छें मायेसी आश्रयून । नानारूप नानाभिधान । क्रीडार्थ होसी सर्वेशा ॥५॥ सत्व रज तम हे गुणत्रय । तूंची नटलासी निःसंशय । स्थिरचरात्मक भूतमय ।त्वद्रुपचिआहे बा ॥६॥ तूं ब्रम्हांड आदिकारण । विश्र्वसूत्र तव आधीन । जैसे हालविसी स्वेच्छेंकरून । तैसें संपूर्ण नाचत ॥७॥ तुझिया  इच्छेवांचूनी । कांहींच नोहे जीवांचेनी । ऐसें जाणाेनी अंतःकरणीं । तुज शरण रिघतीजे ॥८॥ तयां भक्तांसी तूं शंकर । पूर्णकाम करोनी साचार । भवाब्धीतूनी नेऊनी पार । स्वपदीं स्थिर स्थापिसी ।।९।। ऐसा तुझा अद्भुत महिमा । नकळे त्याची कवणा सीमा । म्हणोनी केवळ परब्रम्हा । शरण आलों असे पां ।।१०।। तरी दयाब्धे मज पामरा । न्यावें भवाब्धी पैलपारा । तुजवांचूनी  कोण दातारा । अनाथासी उद्धरील ।।११।। असो, समर्थांचें करितां गुणगान । दहा अध्याय झाले परिपूर्ण  । अकराव्यांत करण्यां पदार्पण । आनंद मानसीं दाट तसे ।।१२।। परमपूज्य अवधूतांनंदानीं । कथाकलश दिला जो भरोनी  । त्यांतील एक एक सुरस कथांनीं । सुधाभिषेक केला असे ।।१३।। वाटे श्रीसमर्थ शंकरावरती । एकादश्णीची झाली पूर्ती । आतां पुढील आवर्तनाची स्फूर्ती । मज द्यावी कीं दातारा ।।१४।। श्री शिवलीलामृताचे ग्रंथीं । अकराव्या अध्यायाची विशेष महती  । रुद्राध्यायाची सांगितली कीर्ति । सकालजन हिताय ।।१५।। रुद्राध्यायाचें करितां श्रवणपठण । मानव होतसे परमपावन । त्या मानवाचें घ्यावया दर्शन । स्वर्गीचे देवही इच्छिती ।।१६।। चहूं वेदांचें सार पूर्ण । तो हा रूद्राध्याय परमपावन । त्याहूनी विशेष गुह्यज्ञान । भुवनत्रयीं असेना ।।१७।। बहुत करी हा जतन । त्याहुनी अधिक थोर नाहीं साधन । हा रूद्राध्याय शिवरूप संपूर्ण । सर्वरक्षण सर्वांशीं ।।१८।। ऐसे शिवभक्त श्रीधरस्वामींनीं । ग्रंथांत ठेवलें असे लिहूनी । वाटे हा रुद्राध्याय संजीवनी । आशीर्वादरुपें प्रकटलासे ।।१९।। आजही या कलियुगांत । प्रत्यक्ष लाभे जिवंत साक्ष । परि दृढनिश्चयी ऐसा जो भक्त । तोचि लाग घेऊं शके ।।२०।। रुद्राध्याय म्हणजे शिवस्तुती । रुद्राध्याय म्हणजे शिवकिर्ती । रुद्राध्याय म्हणजे शिव आरती । सर्व मंगलकारकांची ।।२१।। रुद्राध्याय म्हणजे शिवमुर्ती । रुद्राध्याय म्हणजे शिवशक्ती । रुद्राध्याय म्हणजे अनन्य प्रीती । जीवाशिवाच्या ऐक्याची ।।२२।। ऐशा तन्मयतेने गायन । तेथे शिवाचे राही अधिष्ठान । कैलासपद येतो सोडून । सद्भक्तांजवळीं आपल्या ।।२३।। तेंचि सदाशिवाचें वचन । इहलोकीं चालविती जाण । समर्थ चरित्राचें करिता वाचन । साक्षिरुपानें प्रकटती  ।।२४।। रुद्रध्यायापरी समर्थ जीवन । दाणोलीमाजी प्रकटलें छान । प्राणिमात्रांचें करिती कल्याण । लीला अगम्य दाखवुनी ।।२५।। त्यांच्या अगम्य लीला बघुनी । मानव मती जाते भ्रमुनी । परिणामानंतर येतें ध्यानीं । सार्थ अर्थ त्यांच्या कृतीचा ।।२६।। वाटते कैलास पद सोडूनी । शिव आला असे धरणीं । कां सदाशिवाचे जटेमधूनी । गंगा प्रकटली समर्थरूपें ।।२७।। वाटे दाणोलीश्वराची ही गाथा । रुद्राध्यायापरि वाचतां गाता । जीवनीं लाभे संपूर्ण सफलता । कलियुगीं भक्तांना ।।२८।। वाटे समर्थांचे निर्मळ जीवन । रुद्राध्यायाची प्रतिमा सान । विश्वासूनि करितां पारायण । भुक्ती मुक्ती लाभतसे ।।२९।। जैसे जैसें गावें गुणगान । तैसे तैसें उचंबळतें मन । जैसें पूर्णचंद्रासी या पाहून । सागर लहरी उचंबळती ।।३०।। श्रीकृष्णाचें करितां मुखावलोकन । गोपी विसरती देहभान । तैसेची ऐकता मुरलीची धुन । विदेही स्थितित जाती त्या ।।३१।। वाटे कृष्णाचें मोहक ध्यान । हलूंच नये नयनांमधून । तेणें कृष्णमय कायावाचामन । संसार भान विसरती ।।३२।। तैसेंचि समर्थांचें दर्शन । जें एकदांच घेति मनोमन । तेही विसरती तनमनधन । गोपीसम होऊनियां ते ।।३३।। त्यांचा राग जाती विसरून । परि लोभ वाढे मनांतून । बालोन्मत्त पिशाच्चवृत्ती पाहून । पाझर प्रेमाचा फुटतसे ।।३४।। त्यांच्या एका नेत्रकटाक्षामधून । कुणा कुणास घडें दिव्य दर्शन । जन्मजन्मांतरीचा स्नेह जाण । जागृत अंतरीं होतसे ।।३५।। वाटे श्री समर्थांचें दर्शन । पुन्हां पुन्हां यावें घेऊन । प्रयोजन काढती शोधून । दाणोलीमाजी यावया ।।३६।। त्यांच्या ईश्वरी लीला पाहून । लोकांस झाली होती जाण । कीं नरदेहानें हा नारायण । मानव होऊनि आला असे ।।३७।। त्यांचें करावें षोडशपूजन  । नातरी व्यर्थ आपुलें जीवन । म्हणोनी कर्तव्याचे पालन  । उत्सवाद्वारें करिती ते  ।।३८।। बांद्याचे अनंत केसरकर । यांचें मनांत आला विचार । गुरुद्वादशीचा सुंदर । उत्सव करावा म्हणोनियां ।।३९।। वाऱ्यासम कानोकानी । बातमी गेली कीं पसरोनी । भक्त आले चारी दिशांनी । अचानक कैसे कळेना ।।४०।। भजन मंडळी आली धांवोनी । कीर्तनकारही आले प्रेमानीं । वरी अखंडनाम संकीर्तनीं । भक्तगण उभे राहिले कीं ।।४१।। सर्व ब्राह्मणवृंद मिळोनी । रुद्राभिषेक केला श्रीचरणी । षोडशोपचारें समर्था पूजोनी । आरती मंगल केली असे ।।४२।। नाना वस्त्रालंकार अर्पोनी । सद्गुरुस सजविले भक्तांनीं । मिरवणूक काढली पालखीतूनी । टाळ-मृदुंगांच्या गजरांत ।।४३।। महाप्रसाद घेतला सर्वांनीं । सहस्त्र पंक्ती उठल्या जेवोनी । नकळत घडलें सर्व म्हणोनी । आश्चर्य दाटले मनांत ।।४४।। गुरुद्वादशी गाजली म्हणून । तुकाराम सांगे विनवून । श्रीदत्तजयंतीचा येतसे दिन । आज्ञा असावी उत्सवाला ।।४५।। जैसी आज्ञा मिळाली समर्थांची । तैसी लाट उसळली उत्साहाची । पडत्या फळाच्या या आज्ञेची । बातमी पसरली सर्वत्र ।।४६।। कोणता प्रसाद करावा म्हणून । श्रीदत्तजयंतीचें कारण । समर्थांचें पायी विनवून । तुकाराम पुसतसे ।।४७।। हरभर्‍याची उसळ करून । चहासंगें द्यावी प्रसाद म्हणून । ऐसें समर्थ सांगती निक्षून । तैसेचि केलें उत्सवाला ।।४८।। औदुंबर, वाडी, गाणगापूर । इथें एकत्र झाली साकार । भक्ती गंगेला आला पूर । दाणोलीमाजी ते दिनीं ।।४९।। ऐशा निर्भेळ आनंदोत्सवांत । दत्तजयंती झाली थाटात  । कारण समर्थ होते शांत । प्रसन्नमूर्ती तें दिनीं ।।५०।। दुःखाचें ओझें घेऊन । जे जे आले दर्शनाकारण । त्यांचें ओझें शिरावरून । नकळत उतरून गेलें कीं ।।५१।। अंतरीं समाधान पावून । जो तो गेला प्रसन्न होऊन । समर्थनामाचें स्मरण । करीत घरीं गेले ते ।।५२।। ऐसी गुरुद्वादशी व दत्तजयंती । या उत्सवांची झाली परिपूर्ती । अंगांत संचारली  स्फूर्ती । शिवरात्र उत्सव करण्याची ।।५३।। तैसे विचारति कीं मंडळी । महाशिवरात्र येणार असे जवळी । हे समर्थकृपाळू चंद्रमौळी । अनुमति द्यावी उत्सवाला ।।५४।। जैसे समर्थ देती अनुमती । तैसी कार्यास लाभे पवनगती । उत्साहाची कारंजी फुटती । भक्त मंडळींच्या अंतरी ।।५५।। मठासमोरील पटांगणांत । खांब रोविले असंख्यांत । मंडप उभारिला कीं प्रशस्त । चारी बाजूनें पसरलेला ।।५६।। पताका लाविल्या सभोवार । दिवे कागदी लाविले सुंदर । रोषणाई केली अतिसुंदर । रंगीबेरंगी झुंबरांपरी ।।५७।। देवदेवतांची चित्रें छान । चित्रकारांच्या अवतरलीं कुंचल्यामधून । सुभाषितें लाविलीं रंगवून । मोठमोठ्या फलकांवरी ।।५८।। फळें फुलें येति जीं हंगामात ।  तीं सर्वत्र लाविली मंडपांत । केळीचे खांबही शोभिवंत । कलाकृतीने रोविले कीं ।।५९।। गांवोगांवींचे कीर्तनकार । भजन मंडळी देती सहकार । तैसे येती प्रवचनकार । विद्वान पंडित जाणते ।।६०।। हळूं हळूं भक्तगण । दणोलींत आला जमून । परि समर्थ जाती निघोन । दौऱ्यावरी  इच्छेपरी ।।६१।। शिरोडा, आजगांव, आरोली । ऐसी पदयात्रा सुरूं झाली । रिघ भक्तांची लागली । पाठोपाठ समर्थांच्या ।।६२।। जिथें जिथें जाई समर्थस्वारी । स्वागताची करिती तयारी । प्रति उत्सवच होई घरोघरीं । आनंदा उधाण येतसे ।।६३।। ऐसे ते फिरत फिरत । आले तळवण्याचे तळ्यांत । भारती महाराजांचें नांव घेत । स्नान केले समर्थांनीं ।।६४।। प्रदक्षिणा घातल्या मंदिरास । आलिंगन दिले समाधीस  । संतभेटीची पुरवुनी आस । निघते झाले तेथूनी ।।६५।। समर्थांच्या या दौऱ्यांत । बातमी पसरली होती सर्वत्र । मोठा उत्सव होणार दणोलींत । महाशिवरात्रीचा म्हणूनिया ।।६६।। ऐसे हि आनंदाची पर्वणी । याच देहीं बघावी नयनीं । म्हणुनी धडपडे दिनरजनी । जो तो आपुल्या परीने ।।६७।। परि संसाराच्या अडचणी । उभ्या असती ‘आ’ वासुनी । कुणास पैशाच्या चणचणी । इच्छेस आडव्या येति हो ।।६८।। कोणी पडती आजारी । कोणी असती कर्जबाजारी । कोणाची जाई रोजगारी । असंख्य कारणे अडचणींची ।।६९।। ऐसे सापडले जे प्रपंचांत । त्यांचा भाव जाणुनी मनांत । समर्थ फिरती खेडेगांवांत । दर्शन त्यांना द्यावया ।।७०।। पांडुरंग सोडूनी पंढरपूर । सावंतमाळ्याचे जाई मळ्यावर । जनीच्या बैसतसे जात्यावर । भक्त प्रेमाच्या ओढीनें ।।७१।। तैसें समर्थ जाती घरोघरीं  । जरि यात्रा आली तोंडावरी । भक्तेच्छा करिती ते पुरी । ठाईच दर्शन घेऊनिया ।।७२।। समर्थांच्या ऐशा आगमनानें । वंचितांची प्रसन्न झाली मनें । भक्तिभावानें गाती भजनें । दिंडीत सामील होवोनियां ।।७३।। जणूं चैतन्य संचारलें मालवणांत । दिंडीचा प्रवाह गेला वाढत । जन नाचती गाती दंडवत । करिती दिनरजनी अखंडपणें ।।७४।। इकडे चैतन्याची ऐसी लाट । तिकडे चिंतेची छाया दाट । दाणोलींत पाहती सर्व वाट । समर्थांची उत्सुकतेनें ।।७५।। वाटे आतां होईल फजिती । जो तो चिंतेत पडला चित्तीं । जितुकी गाजली यात्रा कीर्ती । तितुकी निष्फळ होणार कीं ।।७६।। संत मनाचे असती नृपवर । अधिकार न चाले त्यांचेवर । जरि बैसती ते उकीर्ड्यावर । तरि दीपोत्सव तेथे होतसें ।।७७।। असेल चिंतेत असतां मंडळी । समर्थ अचानक आले सकाळीं । सर्वत्र झाली पळापळी । चैतन्य जागेत लोकांत ।।७८।। स्वतः ते फिरती मंडपांत । मार्गदर्शन होते इतरांना करीत । जो तो वागे त्यांच्या आज्ञेंत । अथवा क्रोधस पात्र होतसे ।।७९।। जरि चुकले कुणाकडून । तरि रंगपात्रें मारिती फेकून । अथवा टाळ मारिती कपाळावर । शिवीगाळ सुरूं होतसे ।।८०।। पुनश्च होऊनियां शांत । थोड्यावेळाने येती खुशीत । तों कोणी येऊनियां विचारीत । नेवैद्य कोणता करावा ।।८१।। पावणे दोन डब्यांचें तुपांत । जिलेबीचा करावा बेत । ऐसें समर्थ सांगती खुशींत । तैसेंच केले तें दिनीं ।।८२।। जैसे समर्थ बोलती मुखांतून । तैसे कुणी आला डबे घेऊन । वाटें अदृश्य सिद्धी घेती झेलून । शब्द त्यांचा वरचेवरी ।।८३।। असो, उत्सवाचा उजाडला दिन । सनईचे सुस्वर येती मठांतून । भुपाळ्या ही गांती सर्व मिळून । नौबती झडू लागल्या कीं ।।८४।। वेंगुर्ल्याच्या शाळेमधून । बालवीर पथकें येति चालून । बँडवरती वाजविती ते धून । लय ताल बद्ध स्वरांनी ।।८५।। सर्विसगाडी, मोटारगाडी, बैलगाडी । सारखा, धमणी घोडागाडी । कोणी पायींच अथवा सायकलगाडी । घेऊन येती दाणोलीकडे ।।८६।। एका वेदांती पुराणिक बुवास । समर्थ सांगती वाचावयास । गीतेच्या बाराव्या अध्यायास । व्याघ्रासनीं बैसोनियां ।।८७।। खास बनविलें होते आसन । तेथें समर्थ बसले जाऊन । एक मागे राही छत्र धरून । दुजे चवऱ्या धरून बाजुस कीं ।।८८।। भगवी छाटी होती अंगात । शिरी भगवा फेटा होता मिरवीत । चंदनी खडावा होत्या पायांत । गळ्यांत सुगंधित हार कीं ।।८९।। धूप, दीप, कापूर । यांनी गंधित झाला परिसर । वाटे सदाशिवाचे मंदिर । व्यासपीठावर साकारलें ।।९०।। सायंकाळ तें रात्रीपर्यन्त । समर्थ होते आसनस्थ । नंतर लोळती ते मातींत । मंडपाबाहेर घेऊनियां ।।९१।। क्षणापूर्वी होते वैभवांत । दुसर्‍याच क्षणीं खेळति मातींत । वैभव उकीर्ड्याची किंमत । सारखीच वाटते संतांना ।।९२।। कीर्तन झाले त्यानंतर । नरदेहमहात्म्य वर्णिलें सुंदर । नामाचा चालला गजर । पहाटेंपर्यंत ते दिनीं ।।९३।। सनई चौघड्याचे सुरांत । शिवरात्र उजाडली थाटांत । नागझरीवर जाती सुभक्त । मंगलस्नान करावया ।।९४।। समर्थांना घालिती मंगलस्नान । षोडशोपचारें करिती पूजन । स्नानतीर्थघेती भरून । प्रसाद म्हणून तांब्यांत ।।९५।। पूजाअर्चा गेली संपून । समर्थ देवासास गेले निघून । दुपारनंतर आले परतोन । परि रूद्राध्याय चाले मठांत ।।९६।। दाणोलीच्या नव्या मठांत  । समर्थ भक्तांसवे गेले चालत । तेथें एकाच्या झोपले मांडीत । बाल्यवृत्ती धरोनियां ।।९७।। त्यांच्या बाललीला पाहून । जो तो सुखावत असे मनांतून । मोटारींत बैसले जाऊन । आंबोलीस चलो म्हणती ।।९७।। आंबोलीच्या या घाटांत । महादेवगडाचे मंदिरांत । समर्थ बैसले ध्यानस्थ । लोकोपाधी टाळावया ।।९९।। इकडे दाणोली गेली बहरून । बाजारपेठा गेल्या फुलून । रस्तेही गेले गच्च भरून । तऱ्हेतऱ्हेच्या दुकानांनी ।।१००।। परि  देव नाही मंदिरांत । ऐसी बातमी पसरली सर्वत्र । निराशा पसरली जनांत । खिन्न अंतरीं जाहले ।।१०१।। समर्थ फोटोस घालिती हार । गादीवर नमविती शिर । परि प्रत्यक्ष दर्शनाची हूरहूर । अंतरांतून जाईना ।।१०२।। तेव्हां आपुल्या गाड्या घेऊन । महादेवगडास जाती कांहींजण । त्यांना समर्थ देती वचन । सायंकाळीं येईन म्हणून ।।१०३।। ऐसें त्यांचे मिळता आश्वासन । उत्साह संचारला अंगामधून । सामोरे जाती घाटांतून । स्वागत उस्फूर्त करावया ।।१०४।। तोंचि समर्थ आले समोरून । तों मिरवणूक निघाली तेथून । वाजत गाजत आले घेऊन । नव्या मठांत दाणोलीच्या ।।१०५।। तेथे जनांस दिलें दर्शन । परि स्वयें होऊनियां नग्न । एका भक्ताघरी गेले निघोन । नजरा चुकवून सर्वांच्या ।।१०६।। तिथें मीठभाकर खाऊन । तैसेची गेले झोपून । म्हणे ताप आहे शरीरांतून । उठवूं नका सांगती ।।१०७।। रात्रीं वेळ झाली पालखीची । परि चिन्हे न दिसती उठण्याची । मुखें म्लान झाली प्रमुखांची । घिरट्या घालत राहती ।।१०८।। परि कोणी धाडस करून । हळूच येई विचारून । तों दोन्हीं बाहू पसरून । उभे राहते बालकापरी ।।१०९।। तैसेची उचलुनी पाठीवर । समर्थांचा करुनी जयजयकार । मठांत आणिले सत्वर । सालंकृत त्यांना करावया ।।११०।। भगवी छाटी अंगात । मोतिया रंगाचा फेटा डोक्यांत । चंदनी खडावा घातल्या पायांत । गळ्यांत हार फुलांचे  ।।१११।। ऐसें मनोहर रूप पाहून । नेत्रांचें पारणें गेले फिरून  । नंतर पालखींत त्यांना बैसवून । मिरवणूक आरंभ करिती ते ।।११२।। दोन शुभ्र अश्व सजविलेले । पालखी पुढें होते चाललेले । तैसेची सनई-चौघडेवाले । पुढे बसती पालखीच्या ।।११३।। बँडपथक होतें मागून । भजनी दिंड्या गाती भजन । पादचारी चालती घेऊन । निशान पटेश्वरांचें हातांत ।।११४।। ऐसें पालखीस मध्यें ठेवून । मागें स्त्रियांचा समूह करी भजन । मस्तकावरी दिवे घेऊन । भोई चालती मध्यें मध्यें ।।११५।। ऐसी मिरवणूक निघे थाटांत  । फटाकेही फुटती असंख्यंत । सर्वत्र फिरूनी रात्रींत । पहाटें मठांत येतसे ।।११६।। बापूसाहेब सरकारांनीं । व्याघ्रांबर दिले जें प्रेमानीं । त्यावरती समर्थांना बैसवोनी । काकड आरती केली असे ।।११७।। नंतर समर्थ घेती विश्रांती । भोजनापर्यंत होती शांती ।  रुद्राभिषेक चाले चरणांवरती । इतर परिपाठही मठांत ।।११८।। सावंतवाडीच्या कारागिरांनीं । नक्षीदार पाट बनविला चंदनी । तो सहभोजनीं दिला ठेवोनी । रांगोळी भोवती काढोनी ।।११९।। चांदीच्या समया केल्या प्रज्वलीत । अत्तराच्या तेलानें भरल्या ओतप्रोत । उदबत्त्याही लाविल्या सुगंधीत । सभोवार त्यांच्या पाटाच्या ।।१२०।। चांदीच्या मोठ्या ताटांत । मिष्टान्न वाढिलें षड्रसभरीत । समर्थांना बैसविती पंक्तींत । नमः पार्वतीपते म्हणुनियां ।।१२१।। जरि समर्थ बैसतीवर सहभोजनीं । तरी थोडेच उष्टाविलें मुखांतुनी । तैसचि उठती ते ताटावरूनी । पंक्तीत फिरते झाले कीं ।।१२२।। गुरुउच्छिष्ट भोजन । याचें असतां पूर्ण ज्ञान । सर्वजण घेती तें वाटून । प्रसाद त्यांच्या ताटांतला ।।१२३।। सहस्त्रावधी पंक्ती  उठल्या जेवून । त्या सर्व समर्थ आले फिरून । जिलबीचें न खुटले जेवण । संतृप्त भक्तगण जाहले ।।१२४।। रात्रीं भजनाला आली गंमत । चिपळ्या घेऊनियां हातांत । समर्थ आनंदानें होते नाचत । जो-तो पाही कौतुकानें ।।१२५।। ऐसा सरला हा मंगल दिन । चिरंतन स्मरणांत गेला राहून । वाटे धन्य धन्य झाले जीवन । ऐशा समाधानें माघारी फिरले ।।१२६।। ऐसें हें समर्थांचें जीवन । चिन्मय शिवाची प्रतिमा सान  । कां रूद्र आला धरणी उतरून । संसार पावन कराया ।।१२७।। कुणी आले कीर्ती ऐकून । कुणी आले दृष्टांताकारण । कुणांस घेती ते आकर्षून । कुणी दैवयोगें भेटती ।।१२८।। परि जो जो आला सावलीत । तो तो झाला भाग्यवंत । याची देहीं पाहिला भगवंत । विनासायास संसारीं ।।१२९।। ऐशा संतांचा सहवास । जन्मोजन्मीं लाभण्याची कास  । अंतरीं धरूनी प्रभुस । भाऊदास मी प्रार्थितसे ।। १३०।। 

इति श्री भाऊदास विरचित  । श्री समर्थ सौरभ ग्रंथस्य एकादशोsध्याय गोड हा । श्री सांब सदाशिवार्पणमस्तु  । शुभं भरती  । श्रीरस्तु  ।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]