।। अथ दशमोSध्याय:।। 

श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ ब्रह्मस्वाएवढे विशेष । मारक नाही कदा विष । सत्समागम रात्रंदिवस । तुच्छ सुधारस त्यापुढे ।।२।। प्रतापें न व्‍हावे संतप्त । परसौखें हर्षभरित । सद्वार्ता ऐकतां सुख अत्यंत । तोचि भक्त शिवाचा।।३।। पाषाण नाम रत्न व्यर्थ । चार रत्नें आहेत पृथ्वींत। अन्न -उदक -सुभाषित । औदार्य रत्न चौथे पैं।।४।। वर्म कोणाचे न बोलावें । संतभक्तांचे आशीर्वाद घ्यावे । भाग्य अंमळ येतां स्वभावें । स्वधर्म ध्रुव ढळावा ।।५।। गुरु आणि सदाशिव । यांसी न करावा भेदभाव । भाग्य विद्या गर्व सर्व । सोडूनि द्यावा जाण पां ।।६।। नराची शोभा स्वरूप पूर्ण । स्वरूपाचें सद्गुण आभरण । गुणांचे अलंकार ज्ञान । ज्ञानाचें भूषण क्षमा शांती ।।७।। कुल, शील विद्याधन । राज्य तप रूप यौवन । या अष्टमदें करून । मन भुलों न द्यावें ।।८।। ऐसें नाना परी शिवयोगी । बोधिता झाला भद्रायुलागी । ही नीती ऐकतां जगीं । सांकडे न पडेल सर्वथा ।।९।।गजाननाची पत्नी अहिल्याबाई । बाळंतपणानंतर आजारी राही । औषध उपचार केले तरी कांहीं । आरोग्य तिला लाभेना ॥१०॥ बरेच महिने होती निजून । तेणें अत्यंत झाली ती क्षिण । तिज बघण्यास येती माहेराहून । काका एकदां अचानक ॥११॥ पूतणीची पाहूनि गंभीर स्थिती । जावयावर ते संतापती । अनावर कोपानें ते बोलती । खरड काढती चांगलीच ॥१२॥ काय देव देव म्हणून । कैसे राहिलांत तुम्ही बैसून । उगाच संतांचें मागें लागून । दुर्लक्ष करिता पत्नीकडे ॥१३॥ चांगल्या डॉक्टरला दाखवून  । तिज घ्यावें की तपासून । अथवा मी जातों तिज । घेऊन माहेरीं आज ऐसाची ।।१४।। त्यांचे ऐसें बोलणे ऐकून । अहिल्याबाई घेती बोलावून । शांतपणें त्यांना समजावून । सांत्वन करिती काकांचें ।।१५।। काका मज उपचार केले बहुत । डॉक्टरही झाले प्रख्यात । परी अपयश आले प्रयत्नांत । गुण न येई औषधाला ।।१६।। दोष न द्यावा जावयाला । दोष न द्यावा देवाला । भोग येती जे नशिबाला । भोगणें प्राप्त आहे कीं ।।१७।। ऐसें तिचें बोलणे ऐकून । काका शांत होती मनोंमन । तिच्या इच्छेचें करिती पालन । निघून जाती स्वगृहीं ।।१८।। ऐसें ते जाती बोलून । तों व्यास पूजेचा येई दिन । म्हणोनि भक्त गजानन । दाणोलीस जाती निघोनियां ।।१९।। समर्थ होते खुशींत । समर्थ होते अति शांत । समर्थ होते बोलत । अत्यंत प्रेमानें ते दिनीं ।।२०।। गुलाबी रंगाची छाटी । अंगात होती घातली । सोनचाफ्याची फुलें खोवली । दोन्हीं कानावर आपुल्या ।।२१।। पारिजातकाचा हार । गळ्यांत घातला सुंदर । प्रसन्न आणि मनोहर । वातावरण होतें ते दिनीं ।।२२।। तेव्हां गजाननाचे कानांत । मित्र जोशी होते सांगत । वहिनीच्या आजाराबाबत । समर्थ चरणीं प्रार्थावें ।।२३।। परि गजानन त्यांना उपदेशिती । कीं समर्थ आहेत सर्वज्ञमूर्ती । तेव्हां पत्नीसाठी विनंती । करणार मुळींच नाहीं मी ।।२४।। जेव्हां त्यांच्या इच्छेस येईल । आणि कर्मभोग ही संपतील । तेव्हांच ते देतील । क्षणांत आरोग्य तिजला ।।२५।। गजाननाचा निश्चय पाहून । जोशींना न राहावे मनांतून । ते समर्थांस बोलती विनवून । अहिल्याबाई विषयीं कीं ।।२६।। आज कित्येक महिन्यांपासून । अहिल्याबाई आजारी असून । त्यांनी न सोडिलें अंथरुण । डॉक्टरी उपाय संपले कीं ।।२७।। तेव्हां समर्थ बोलती हंसून । अरे, तिचा ताप घेतला काढून । चला तांबळावरती जाऊन । पाहून घेऊं तिजला ।।२८।। गुरुपौर्णिमा झाल्यावरती । समर्थांसवें  मालवणांत येती । बियरचा ग्लास घेऊनी हातीं । कृपावंत शिरती घरांत ।।२९।। जैसे उभे राहाती ते दारांत । अहिल्याबाई झाल्या जागृत । सामोर्‍या येति धडपडत । थरथर कांपत कशातरी ।।३०।। तोंचि बियर घेऊनि हातांत । थोडी प्राशिती स्वमुखांत । उरलेली देती ते हातांत । अहिल्याबाईंच्या स्वकरीं ।।३१।। म्हणती त्वरित टाकावे पिऊन । तुझा आजार गेला पळून । तैसे आज्ञेचे करिती पालन । गटागटा पिऊन टाकिती कीं ।।३२।। त्यांच दिवसापासून । त्यांना आरोग्य लाभलें छान । सुदृढ प्रकृतीनें होऊन । खणखणीत राहती सदैव त्या ।।३३।। अनन्य शरणागत चरणांशी । सर्वस्वार्पण करणाऱ्या भक्तांसी । समर्थ सद्गुरु सर्वसाक्षी । सांभाळिती कीं प्रेमानें ।।३४।। असो त्यानंतर निघाली । समर्थांची स्वारी सायंकाळीं । सिंधुदुर्ग किल्ल्यावरी । मंडळींसवे जावयां ।।३५।। तैसे महादेव जोशी यांनीं  । पडावाची व्यवस्था करोनीं । स्वयें गाडीत आले घेऊनी । धक्क्याजवळी समर्थांना ।।३६।। परि पडावांत बैसण्याची । इच्छा नव्हती कीं समर्थांची । पद्म गडावरूनि जाण्याची । इच्छा बोलून दाखविती ते ।।३७।। तेव्हां स्वानुभवी मंडळी सांगती । खडक मालिका मार्गावरती । सर्वत्र पसरल्या असती । योग्य मार्ग न जावयां तेथे ।।३८।। उलाडी नसलेल्या होडींत । बैसोनि जावे लागते नीट । तेणें धोका असतो मार्गांत । होड्या उलटण्याचा समुद्रांत ।।३९। परि ते मुळीच  न ऐकती । तेणें गाडी फिरविली पद्मगडावरती । जैसे येती ते किनार्‍यावरती । समर्थ शिरले पाण्यांत ।।४०।। जैसे समर्थ शिरती पाण्यांत । गाबीत मंडळी आली धावत । समर्थांचा जयजयकार करीत । आनंदे नाचती किनाऱ्यावरी ।।४१।। सागर शुद्ध झाला म्हणून । सागराचा आजार गेला म्हणून । सागर पावन झाला म्हणून । समर्थ चरणांनीं, बोलती ।।४२।। ऐसे ते हर्ष भेरे गाती । गातां गातां पाण्यांत शिरती । समर्थांना पाठीवर उचलती । किनाऱ्यावर आणिती प्रेमाने ।।४३।। त्यांना पडावांत बसवून  । प्रेमाने पूजिती गाबीत जन । अनंत उपकाराची जाण । दिसून आली मनांतरी ।।४४।। चौकशीअंति आलें कळून । आज शंभर वर्षांपासून । मासे न खाती मालवणांत जन । किडे निघती म्हणूनियां ।।४५।। जरि जिवंत मासे पकडती । तरी किडे त्यांतही निघती । वाटे सागराची बिघडे प्रकृती । एक शतकापासुनिया ।।४६।। नवससायास झाले करून । देवांनाही पाहिलें विनवुन ।पिढ्यान् पिढ्या थकल्या आळवून । तरी न घडले काही ।।४७।। आज समर्थांनीं करितां स्नान । स्वयें समुद्र झाला पावन । वाटे मुक्त झाला कीं शापांतून । चरण स्पर्शानें समर्थांच्या ।।४८।। जैसें श्रीरामाच्या पदस्पर्शाने । अहिल्या उध्दरली तत्क्षणें । तैसे श्रीसमर्थ पदस्पर्शानें । पद्मगडाचा समुद्र उद्धरिला ।।४९।। त्याच दिवसापासून कोळी जन । जाळी टीकिती समुद्रांतून । मासे खाती निश्चिंत होऊन । बाजारांत विकती तसेचि ।।५०।। तेव्हां हट्ट धरिला जो समर्थांनीं । तेथें जाण्याचा आडमार्गानी । त्याचा अर्थ आला ध्यानीं । बरोबरीच्या मंडळींना ।।५१।। ऐसें हें पद्मगडाचें पुराण । सांगतां गेलों आनंदून । त्यांची अतर्क्य लीला पाहून । स्तिमित झालों अंतरीं ।।५२।। विस्मययुक्त संतांचीं बोलणीं । अकल्पित त्यांची करणी । वैचित्र्ययुक्त त्यांची राहणी । संभ्रमती ज्ञानीजन ।।५३।। त्यांच्या अल्पशाही कृतीत । नित्य दिसतसे परमार्थ । त्यांच्या मितभाषेचाही अर्थ । वेदसार सांगतसें ।।५४।। संत हेचि मूर्तिमंत । जिवंत ज्ञानेश्वरी वा भागवत । सदैव राहती ते कार्यरत । परोपकारा कारणें ।।५५।। असो, समर्थ असतां दणोलींत । उडाणटप्पू येति दर्शनार्थ । मनांत घेऊनी दृढ स्वार्थ । फजिती त्यांची करावया ।।५६।। वाटे समर्थ करिती जादूटोणा । तेणें फसती भोळे जन नाना । संतत्वाचा करिती बहाणा । जनांस मूर्ख समजूनी ।।५७।। ऐसू ती उडाणटप्पू मंडळी । समर्थांभोंवती जमली । परि समर्थ वाहती लाखोली । शिव्यांची सर्व मंडळींना ।।५८।। परि ते दिनी समर्थांचा । पारा चढला होता संतापाचा । वाटे संचार झाला कीं रुद्राचा । थैमान मांडिती गावांत ।।५९।। त्यांच्या वाऱ्यालाही फिरकण्याचें । धाडस नव्हतें होत कुणाचें । वातावरण होते कीं भीतिचे । न्याहाळिती जन मूकपणें ।।६०।। तोंची ज्वलंत दृष्टिक्षेपांनीं । स्वयें उत्पन्न केला अग्नि । तेणें झोपडीस आग लागोनी । जळूं लागली समक्ष ती ।।६१।। स्वयें शिरती ते झोपडींत । जळकी लाकडें ओढून काढीत । बघ्यांच्यावरती होते ते फेरीत । शिव्या देऊनी भयंकर ।।६२।। कधीं ज्वालेंत बैसती आपण । अधांतरी घालून पद्मासन । लिलया वावरती अग्निंतून । अचंबा करती बघणारे ।।६३।। तेव्हां एक शंकेखोर तरुण । मनांत गेला समजून । कीं हे काम साधारण । मनुष्यमात्राचें न वाटतें ।।६४।। आगींत बैसोनी शांत फिरणें । भाजल्याची न दिसतीं कांहीं व्रणे। हीं तों श्रेष्ठपणाची लक्षणें । आत्मनिष्ठ दाखवूं शके  ।।६५।। “नैनं छिन्दन्ति शस्त्रणि”। ऐसें दाखवी हा ब्रह्मज्ञानी । “नैनं दहति पावकः” हें दिसोनी । प्रत्यक्ष समोर आले कीं ।।६६।। ऐसी जाण होता अंतरांतुनी । तो शरण गेला मनोंमनीं । झोपडीसमोर जाऊनि । साष्टांग नमन घातलें ।।६७।। तैसें जळते फळकूट घेऊन । त्याचे समोर देती टाकून । त्यांवरी बैसण्यां ओरडून । सांगती झोपडी मधून ते ।।६८।। निःसंशय होऊनी अंतरीं । तो तरुण बैसला फळीवरी । कोठें न भाजता बाह्यांतरी । शांतचित्ती होता कीं ।।६९।। तैसे बाहेर येति झोपडींतून । एक निखारा उचलला अग्निंतून । तो धोतरांत बांधण्यां सांगून । घरीं जाण्यांस आज्ञापिलें ।।७०।। घरीं गेला तो तरुण । धोतराची गांठ पाहिली सोडून । तों शिवलींग निघालें आंतून । निखाऱ्याऐवजीं होतें कीं ।।७१।। त्याच क्षणापासोनि तो तरुण । समर्थभक्त झाला अनन्य । जीवनीं झाला धन्यपूर्ण । शिवसमर्था सेवोनी ।।७२।। संतांची कैसी असते गंमत । सहज येतां कोणी दृष्टिक्षेपांत । दूर्दैव फिरविती ते भाग्यांत । पूर्व सुकृता असो-नसो ।।७३।। वरवरूनि जरि संतापती । तरी हृदयांत असे परमशांति । चराचरांवर करिती प्रीति  । स्वयें हलाहल प्राशुनि ।।७४।। कोकणच्या वालावली गांवांत । नारायणराव वर्दे होते रहात । परि नोकरी करिती ते मुंबईंत । परिवार राही गांवांत ॥७५॥ ऐसे ते असता मुंबईंत । तार अचानक मिळे हातांत । त्वरित यावें कीं गांवांत । पुत्र आजारी पडलासे ॥७६॥ ऐसी कटू बातमी ऐकून । त्यांचे हातपाय गेले गळून । पुत्र आजाराचें कारण । अचानक कैसें घडलें हो ॥७७॥ एका कन्येनंतर त्यांना । पुत्र प्रभाकर होता लहाना । तेंणें  स्वप्नें रंगविती  नाना । मनोराज्यांत आपुल्या ते ॥७८॥ परि स्वप्न जावें भंगून । आजाराचें व्हावे निराकरण । म्हणुनी निघती मुंबईहून । खाजगी गाडीमधून ते ॥७९॥ रात्रि चा करुनियां प्रवास । सकाळीं थांबती ते विश्रांतीस । जवळ पाहुनी दुकानास । चहा पिण्यां उतरती ते ॥८०॥ चहा पिण्याकरितां म्हणून । दुकानांत जाई नारायण । तों एक फकीर येई दिसून । येरझारा घालताना तिथेंच ॥८१॥ तो हिंदीत होता बडबडत । ‘चिंता नही करना’सांगत । ‘जिसका था वो ले गया’ – ऐसे म्हणत । नारायणाजवळी येतसे ॥८२॥ तो जें काही होता खात । तें नारायणाच्या घाली मुखांत । स्वयें आशीर्वाद होता देत । प्रसन्न मुद्रेनें आपुल्या ॥८३॥ कुच साल के बाद दो खंदेपर । दो बच्चे देगा परमेश्र्वर । ऐसे बोलुनी आशीर्वादपर । निघूनियां गेला तो ॥८४॥ नारायण विचारी दुकानांत । कोण होते हे गृहस्थ । साक्षात दाणोलीचे भगवंत । साटम महाराज सांगति ते ॥८५॥ दुःखांतही सुखावले ते मनीं । ऐकून समर्थांची अमृतवाणी । भविष्य सांगितले समोरुनी ।अकल्पितपणे येऊनी ॥८६॥ परि दुसर्‍याच क्षणीं गेले उमजून । कीं पुत्र गेला असे सोडून । नातरी कशास केलें असतें सांत्वन । दर्शन इथें देऊनी ॥८७॥ तैसें लगबग निघती तेथून ।वालावलीत येति धावून । परी घरांत दिसलें वातावरण । थंडावलेलें तयांना ॥८८॥ जैसे नारायण घरांत शिरती । पत्नी, कन्या आक्रोश मांडिती ।परी नारायण सांगुनी दैवगती । सांत्वन त्यांचे करीतसे ॥८९॥ म्हणे येतां येंता वाटेंत । मज भेटले एक अवधूत । त्यांनीच दिला संकेत । घडलेल्या या प्रसंगाचा ॥९०॥ भविष्यही सांगितले त्यांनी । मी निराश न व्हावे म्हणूनी । पुत्र खेळतील रे दोन्ही । खांद्यांवरी तुझ्या रे ॥९१॥ तेव्हा सर्व विचारती कोण । कैसी व्यक्ती होती म्हणून । तैसे नारायण करिती वर्णन । हुबेहुब त्या फकिराचें ॥९२॥ तों सर्वांनाच आलें कळून । कीं हे तो साटममहाराज म्हणून । त्यांच्या वचनाची होतां जाण । दुःख थोडे निवळले हो ॥९३॥ होणारें गेलें होऊन । वर्तले तैसें आले घडून । नारायणास लाभली रत्ने । दोन पुत्रांची पुढती हो ॥९४॥ पुढें नारायणाचे खांद्यावर । पुत्र खेळती अविनाश-किशोर । अविनाशास घालती पायावर । मुंबईत समर्थ असतांना ॥९५॥ पहा संतांचें कैसें जिणें । केवळ परोपकारार्थ फिरणें ।  आनंदाचेंच देणे-घेणे । जीवन फुलविणें दुःखितांचे ॥९६॥ श्रीगुरुचरित्राचें वाचन । आप्पा सावंतांनी केले पूर्ण । मनोमनीं शरण जाऊन । विनंती केली श्रीदत्ताला ॥९७॥ ‘नृसिंहवाडीस जाऊन । निष्ठेनें केलें चरित्र पारायण । त्यावरी आपण प्रसन्न होऊन । दृष्टांत दिधला मजलागी ॥९८॥ दोन-चार वर्षांत केव्हांतरी । तुज दर्शन देईन साक्षात्कारी । चिंता न करावी अंतरी । ऐसे मजला सांगितलें ॥९९॥ तेव्हापासून आजपर्यंत । जीव आणुनियां डोळ्यांत । पहात बैसलों मी वाट । परि निराशा नित्य होतसे ॥१००॥ विश्वास ठेऊनी शब्दावरी । दिन काढिलें मी कैसे तरी । आतां निश्चय केलासें अंतरी । दृढ ऐसा मी मनांत ॥१०१॥ जोंवरी न घडेल दर्शन । तोंवरी ऐसाच राहीन बैसून । माझें जीवन वा मरण । सर्वस्वी तुम्हां सोपविले’ ॥१०२॥ ऐसे विनवुनिया मनांत । नामस्मरण राहिले ते करित । स्वस्थ बैसती बंद खोलींत । वाट पहात दर्शनाची ॥१०३॥ तेंच दिनीं समर्थांची । पालखी निघाली मिरवणूकीची । गर्जना चाले जयजयकाराची । घरासमोर थडकली ॥१०४॥ लोकांचा ऐकुनियां गोंगाट । आप्पांचें लक्ष न लागें नीट । तैसेच उठती ते त्वरित । दार उघडोनियां बघती ॥१०५॥ जैसे बघती ते घरांतून । समर्थ उतरले पालखीतून । स्वयें होऊनिया नग्न । दिगंबर मूर्ती चालतसे ॥१०६॥ आप्पा बघती सर्व घरांतून । तों नजर नजरेला गेली भिडून ।  मनांत पटून गेली खूण । तरिही शंका डोकावली ॥१०७॥ जरि प्रत्यक्ष असतील गुरुवर । तरि तीन लाख देतील खरोखर । ऐसें मनांत म्हणुनी रस्त्यावर । समर्थांसमोरी थांबले ॥१०८॥ तैसे समर्थ बोलती हिंदीतून । तीन लाख रुपये मी देईन । परि पाठीवर घ्यावे उचलून । म्हणून हात पसरती ॥१०९॥ तैसे मस्तक ठेवूनि चरणांवरी । त्यांना उचलती ते पाठीवरी । पुनश्च निघाली समर्थस्वारी रस्त्यांमधून गांवाच्या ॥११०॥ ऐसे दोन फर्लांग गेले चालून । तों समर्थ उतरती पाठीवरून । थप्पड मारती डोक्यावरून । अप्पांच्या ते प्रेमानें ॥१११॥ परि या  थप्पडेमधून । आप्पांना झालें पूर्ण ज्ञान । मनांतला संशय निवळून । दृष्टांत साक्ष पटली कीं ॥११२॥ पुढें सदानंद सरस्वती म्हणून । संत जाहले ते महान । परमहंस स्थिती पावून । कृतार्थ जाहले जीवनी ॥११३॥ जैसे संतांचे स्पर्शें करून । कृतार्थ होतें मानवी जीवन । तैसें संतचरित्राचें वाचन । जीवन पावन करितसें ॥११४॥ सत्संगाचें  सर्व गुण । संतचरित्रांत बैसती लपून । तेणें प्रतिदिनी करावे वाचन । भाऊदास प्रार्थितसे ॥११५॥

इति श्री भाऊदास विरचित । श्री समर्थ सौरभ ग्रंथस्य दशमोऽध्याय गोड हा । श्री सांबसदाशिवार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]