॥  नवमोऽध्यायः ॥

श्रीगणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ जेथें शिवनामघोष निरंतर । तेथें कैचें जन्ममरण साचार । तिहीं कळिकाळ जिंकला समग्र । शिवशिव हरहर छंद ज्यातें ॥२॥ पाप जाळावया निश्चितीं । शिवनामी आहे जीतुकी शक्ती । तितुकें पाप त्रिजगतीं । अद्यापि कोणी नसेल केलें ॥३॥ जैसे प्राणियाचें चित्त । विषयी गुंतलें अत्यंत । तेंवीं शिवनामीं होतां रत । कैसे बंधन मग तयासी ॥४॥ धनेच्छा धरूनी चित्तीं । धनाढ्याची करिती स्तुती । तैसें शिवध्यानी प्रवर्तती । तरी जन्ममरण कैचें तया ॥५॥ राज्यभांडार कां धन । साधावया करिती यत्न । तेवीं शिवचरित्रीं जडे मन । संकट विघ्न कैचें तया ॥६॥ आतां दाभोळी गावांतरीं । आपण मारूयां फेरी । बापू कांबळे यांचें घरांतरीं । काय घडलें तें पाहूं या ॥७॥ त्यांची लक्ष्मी नांवाची सून । अचानक झाली बेचैन । आकांत करीतसे ओरडून । पिशाच्च बाधा झालीसे ॥८॥ घरांतील सर्व मंडळी । तिच्या भोंवती जमली । तिची ऐकुनियां किंकाळी । भयभीत अंतरीं जाहले ॥९॥ तिच्या नवऱ्यानें मारून । काठीनें काढिलें झोडपून ।परि न गेलें तें निघून । पिशाच्च तिच्या अंगांतलें ॥१०॥  देवदेवस्की पाहिली करून । गंडेदोरेही झाले बांधून । परि न येई कांहीं गूण । यातना अधिक भोगतसे ॥११॥ ऐसे असतां एके दिनीं । पाहुणा आला त्यांचें सदनीं । लक्ष्मीची ऐकून सर्व कहाणी । सांगता झाला उपाय तो ॥१२॥ म्हणे इतुके उपाय झाले करून । त्यांत अधिक पहावा एक करून । दाणोलीस जाऊयां घेऊन । समर्थ साटमांचे जवळी ॥१३॥ समर्थांच्या सांगितल्या गोष्टीं । तेंणे विश्वास झाला चित्तीं । परि नेण्याची आली आपत्ती । कैसें न्यावे कळेंचि ना ॥१४॥ तिज कपड्यांची न आहे शुद्ध । सदैव बडबडे ती अपशब्द । कांबळे होऊनियां हतबुद्ध । विचार करीत बैसले ॥१५॥ शेवटीं विचार केला तिघांनी । तिज न घेता जाती निघोनी । समर्थांस सांगण्या केविलवाणी । कहाणी आपुल्या सुनेची ॥१६॥ जैसें ते जाती मठांत । समर्थ बसले होते पडवीत । आणि न्हावी होता करीत । दाढी तेव्हां समर्थांची ॥१७॥कांबळे पुत्रानें केला नमस्कार । तों त्याचे वर रोखिती ते नजर । साबू पाण्याच्या वाटीवर । हात ठेवूनी उचलती ॥१८॥ ते साबूचें फेसाळ पाणी । तोंडावर फेकिलें समर्थांनी । आणि घरी जावे निघोनी । ऐसे सांगितलें तिघांना ॥१९॥ परि त्यांच्या या बोलण्यानें । निराश झाली त्यांची मनें । आलो कोणत्या उद्देशानें । विपरीत कैसे घडले हो ॥२०॥ घरीं जाण्याचा देती आदेश ।तेणें दैवालाच देती दोष । माघारीं फिरती ते निराश । अंतःकरणानें तिघेही ॥२१॥ परि घरांत जैसे शिरती । सस्मित लक्ष्मी येईन पुढती । सुशील, शांत,जैस होती । तैसी दिसली समोर ती ॥२२॥ तिनें स्वागतही केले हसूनी । वरी चहाही दिला आणुनी । कालचीच कां ही वैरिणी ।  ऐसे संभ्रमांत पडले ते ॥२३॥विचार करितां आले कळून । कीं जेव्हां पाणी मारलें फेकून । तेंच क्षणीं गेलें निघून । पिशाच्च लक्ष्मीच्या अंगांतलें ॥२४॥ घरीं जावें निघून । हें पिशाच्चास  बोलले उद्देशून । कुणां न आलें कळून । विपरीत बोल संतांचे ॥२५॥ लक्ष्मी ती पूर्ववत झाली म्हणून । आनंद वाहे ओसंडून । दाणोलीश्र्वराची कृपा पाहून । धन्य अंतरीं जाहले ॥२६॥ पाहुण्यचें मानिती आभार । वारंवार वंदिती दाणोलीश्र्वर । पूर्ववत झाला त्यांचा संसार ।आवस  सरली कायमची ॥२७॥ समर्थांचे परमभक्त । शिवराम डिंगे होते प्रख्यात । समर्थ मठांत होते रहात।  सावलीसम वावरती ॥२८॥ जेव्हां समर्थ भयंकर कोपती । शिवराम त्यांना मिठी मारिती । आणि राग त्यांचा शांत करिती । मार खाऊनि कित्येकदा ॥२९॥ जीवनाचा संपूर्ण भार । त्यांनी सोंपविला समर्थांवर । तेणें सोडुनिया संसार । शरण होऊनी राहती ते ॥३०॥परंतु त्यांच्या पूर्व जीवनांत । अक्षम घडले होते अपराध । त्याची जाणवत होती खंत उर्वरित जीवनांत नित्याची ॥३१॥ त्याचें करावया पराशमन । नित्य सेविती समर्थचरण । पापांचे करिती उच्चारण ।  क्षमा मागत मनोंमनी ॥३२॥ परी समर्थ जेव्हां संतापती । तेव्हां त्यांना ‘हजाम’ संबोधिती । फांशीची शिक्षा फर्माविती । स्वयेंच देती ती हजारदा ॥३३॥ स्वयें सावंतवाडीच्या नरेशांनीं । शिवरामाची जाणोनि कहाणी । दाणोलीत न राहावें म्हणोनी ।  हुकूम जारी केला असे॥३४॥ समर्थांचे घेऊनि दर्शन । त्वरित जावें कीं निघोन ।  हद्दपारीचे काढिलें फर्मान । तेणें खंत अंतरीं पावती ते ॥३५॥ म्हणोनि मित्र गजानन । मालवणच्या घरी येई घेऊन । परि वियोग न होई सहन । समर्थ चरणांचा अंतरीं ॥३६॥ ऐशा अपमानजन्य स्थितींत । मन रमत नव्हतें मालवणांत । वाटे हिंडावे तीर्थयात्रेंत । श्रीदत्तस्थानीं अनेक ॥३७॥ तेणें भगवी वस्त्रें परिधानोनी । नरसोबावाडीस जाती निघोनी । परी दृष्टांत होई तत्क्षणीं । निघून जावे येथून कीं ॥३८॥ म्हणोनि जाती औदुंबर । तेथेंही हाच प्रकार । नंतर जाती गाणगापूर । तेथेंही राहू न देत दत्तात्रेय ॥३९॥शेवटीं निराश होऊनि अंतरी ।  मालवणांत येति माघारी । दोश लाविती दैवावरी ।  प्रारब्ध आडवे येत असें ॥४०॥ गजाननाच्या शिरुनी कुशींत । ढसढसां रडती शिवरामपंत । कर्माचें भोगल्याविना प्रायःश्र्चित्त । मुक्ति नाहीं रे जीवाला ॥४१॥  जरि राहिलों श्रीगुरूजवळ । तरि मन नाहीं होणार निर्मळ ।  प्रायश्चित्त एकचि केवळ ।  पापा निष्कृती करील ।।४२।। म्हणोनी समर्थांनीं मजला ।  धक्का देऊन दूर लोटला ।  मग ईश्वरही मजला ।  कैसे जवळ करील रे ।।४३।। आता प्रायश्चित्तावांचून । मज मार्ग नसे अन्य कोण । याच चिंतेने होरपळून । तडफडून मरण उरलें रे  ।।४४।। जरि राहती गजाननघरीं ।  तरि न पडती घरा बाहेरीं । जननिंदेची लज्जा अंतरीं । भेडसावित असे तयांना ।।४५।। घरांतील सर्व मंडळींवरी । प्रेम करिती अपरंपारी । कामही करिती सर्वतोंपरी ।  सन्मित्र ऐशा निष्ठेनें ।।४६।। एकदां ताई बोलती हंसून ।  किती शुद्ध झालें तुमचें मन ।  तैसेंची बदललें कीं आचरण । माया करिता आमच्यावरीं।।४७।। तितकीच माया कुटुंबावर । जरी करिता कीं खरोखर । त्यांचा स्वर्ग येईल धरेवर । कठोर कैसें झालांत हो।।४८।। मज नुकतेंच झाले ज्ञात । की कुटुंब आहे देव बागेत बिचारे राहती परित्यक्ता किती वर्षा पासून हो 49 शेजारीच असता कुटूंब आहे देवबागेंत । बिचारे राहती परित्यक्तेंत । कित्येक वर्षांपासून हो ।। ४९।। शेजारींच असता कुटुंबजन । कां न  भेटण्याचे होतें मन । कां मुलांची नये आठवण । माया आटली कैसी हो ।।५०।। तेंव्हा शिवरामास  येई उचंबळून ।  म्हणे आठवण येते प्रत्येक क्षणीं । परि मुलांचा मी बाप म्हणूनी । सांगणें लज्जास्पद केलें मी ।।५१।। तेणें इच्छा असूनि मनांत । सर्व व्यर्थ झालें संसारांत । म्हणूनी भटकतों जीवनान्त । दारोदारीं असाच की ।।५२।। परि ताई बोलती विनवून । झालें गेलें जावें विसरून । तुम्हां क्षमा करतील आप्तजन । प्रेम द्यावें त्यांनाच कीं ।।५३।। गोष्ट पटली ती मनांत । तैसे जाती ते देवबागेत । पत्नि मुलांच्या संगतीत ।  दिन घालाविती आनंदे ।।५४।। परि दुसरे दिवशीं वर्तमान । कोणी आलासे घेऊन । शिवरामांनी गळफांस घेऊन । जीवन संपविले स्वहस्तें ।।५५। शिक्षा फर्मावली समर्थांनी । तीच घेतली शिवरामांनी । ऐसी स्वयेंच कुर्बानी । गुरुचरणीं अर्पियेली कीं ।।५६।। ऐशा दुर्दैवी घटनेनंतर । मालवणांत असतां श्रीगुरुवर । मध्यान्ह वेळेचा होता प्रहर । भोजनसमयीं एकदां ।।५७।। सर्व भक्तगणांसंगतं । समर्थ भोजन होते करित। घांस होते कीं भरवित । एकमेकांना सानंदे ।।५८।। तोंचि समर्थ ओरडले मधून । शिवराम हजाम – म्हणून । स्थिरावून आपुलें लोचन । एकटक शून्यांतरी ।।५९।। कोणां न येई हें कळून । काय अचानक आलें घडून । कैसे आनंदावर पडलें विरजण । जो-तो एकमेकां न्याहाळी ।।६०।। परि सर्वांस आलें कळून । कीं शिवरामाचा आत्मा येऊन । दर्शन गेला असेल घेऊन । अदृश्य रुपानें आतांच कीं ।।६१।। दुसरें दिवशीं गाडी घेऊन । समर्थ निघती मालवणांतून । येती समुद्र किनाऱ्यावरून । देवबागेच्या गांवांत ।।६२।। वाळूच्या टेकडी पलिकडे  । गाडी थांबविली रस्त्याकडे । तेथील पाहुनिया झोपडें  । ड्रायव्हरला सांगते झाले कीं  ।।६३।। जी स्त्री करीत आहेस स्नान । तेंचि शिवरामाचें घर असून । त्याच्या पत्निस निरोप सांगून । घेऊन यावें मजपुढें ।।६४।। जैसा निरोप मिळाला ओलेतीला । ती तैशीच धावली दर्शनाला । मिठी मारूनियां त्यांच्या पायाला । आक्रोश मांडीला तियेनें ।।६५।। म्हणे देवा मला तरी । कां जिवंत ठेविलें संसारीं । या बालकांचें करूं तरी । पालन-पोषण कैसें मी ।।६६।। नारळ देऊनि हातांत । काळजी करणारा आहे भगवंत । ऐसें म्हणोनि ठेवितीं हस्त । आशीर्वाद रुपें शिरावरीं ।।६७।। तूं निश्चिंत असावें हे मनांत । भले दिवस येतील संसारांत । ऐसे सांगुनी निघती त्वरित । समुद्रकिनाऱ्यावरती ते ।।६८।। समर्थ नांवाचा जयजयकार । जैसा गेला कोळ्यांचे कानांवर । तैसे धांवती ते रायकर । जाळें सोडून गाडीकडे ।।६९।। तेव्हां समर्थ सांगती ओरडून । जाळें नका देऊं सोडून । मोठी जीवंत घोळ अडकून । जाळ्यांमध्यें आली असे ।।७०।। परि रापकर मंडळी दुर्लक्षती । कारण त्यांना होती माहिती । तेथील हवामानाची स्थिती । विनोदें हंसती उगाच ते ।।७१।। वाटे समर्थ करिती गंमत । त्यांना नायक होता सांगत । घोळ न लाभे या दिवसांत । अनुभव सिद्ध सांगतों मी ।।७२।। तरिही काही रापणकरांनीं  । जाळे पाहिले ओढोनी । तो जिवंत घोळ आली दिसोनी । जयघोष करिती आनंदे ।।७३।। अकल्पितपणें मिळाली म्हणून । वरी समर्थांचें घडलें दर्शन । आनंदे नाचती कोळीजन । घोळ अर्पुनी समर्थांना ।।७४।। ललकारांच्या घोषणांमधून । गाडी निघाली किनाऱ्यावरून । मठांत आली घेऊन । समर्थांना ते दिनीं ।।७५।। ऐशाच एका प्रातःकाळीं । समर्थांजवळ बैसलीं मंडळी । टिळा लावूनियां समर्थभाळीं । पूजा विधी करोनियां ।।७६।। थोड्या उंच ऐशा गादीवर । शुभ पांढरी होती चादर । त्यांस टाकून तिजवर । समर्थ बैसले होते कीं ।।७७।। अंगांत होती भगवी छाटी । पाय पसरोनियां बैसती । भक्त जोशी पाय चेपितीं । सुखसंवाद करिती ते ।।७८।। तोंच गर्दी वाढली भक्तांची । प्रत्येकास घाई दर्शनाची । सुरुवात झाली धक्क्याबुक्क्यांची । शिस्तींत कोणी येईना ।।७९।। या अशिस्त ऐशा गर्दींत । हार घेऊनिया हातांत । एक युवक घुसला घोळक्यांत । समर्थांसमोरीं येतसे ।।८०।। तोंच त्याला धक्का लागला । तेणें समर्थांचे अंगावर पडला । तें पाहूनि कोणी ओरडला । दिसत नाहीं का रे ।।८१।। अहो, दिसत नाही म्हणून । ऐसा पडलों धडपडून । तों सर्वांस आले कळून । जन्मांधळा होता कीं ।।८२।। समर्थ त्याला नीट उठविती । स्वतःचें शेजारी बैसविती । आणि सर्वांना उद्देशून सांगती । खरा आंधळा कोण असे ।।८३।। ज्यानें पाहिला नाहीं परमेश्वर । कां ध्यान करतो निरंतर । कोण आंधळा असे खरोखर । माहिती आहे काय रे ।।८४।। ऐसे जयाचें आंधळेपण ।  त्याने देवांगावर पहावें पडून । त्याला आनंदाची होईल जाण । अनुभव घ्यावा प्रत्यक्ष हो ।।८५।। ऐसें बोलुनि युवकावरती । आपुला वरदकर ठेविती । हर्षें युवक बोले ‘मजप्रतीं  । दिसूं लागलें समर्थ हो ।।८६।। मी पाहिलें कीं समर्थांना । मी पाहिले सकल जनांना’ । ऐसें म्हणुनि श्री चरणांना । अश्रुभिषेक केला असे ।।८७।। विश्वनाथ महाराजांचें भजन । तूं मज दाखवावे गाऊन । ऐसें समर्थ बोलती उठवून । प्रेमानें त्या युवकाला ।।८८।। कैशी समर्थांस  झाली जाण । कीं मज येतें त्यांचें भजन  । आश्चर्य दातांची मनांतून । प्रेमें गाऊं लागला तो ।।८९।। भजनाचा सांगतों सार । खेळण्यापरि आहे संसार । त्याचा भगवंत आहे सूत्रधार । विसरूं नका कधींही ।।९०।। मायेच्या घोर अंधःकारांत  । लोभ मोहाच्या निद्रेंत । जीव खेळे सुखदुःखांत । अहंकाराभिमानानें ।।९१।। मीच ज्ञानी आणि धनवान ।  ऐसा होतो त्या अभिमान । मूर्खांस न राहे भान  । विसर पडे की देवाचा ।।९२।। निद्रेंत स्वप्नें पाहती । त्यांत गुंगूनी नाचती । स्वप्नें मोडतां तीं, रडती । निद्रेंत रंगती पुन्हां पुन्हां ।।९३।। परि संतकृपेनें उघडतां लोचन । भगवंताची होते जाण । निद्रेचें न उरते कारण । विश्वनाथ सांगतसे ।।९४।। ऐशा सुंदर आशयाचें भजन । त्यानें पूर्ण केलें हो गाऊन । आनंदून गेले आनंदून गेलें श्रोते । समर्थ डोलती प्रेमानें ।।९५।। समर्थांनीं प्रवचन केले छान । भक्तिचे सांगितले सोपान । नामाचे सांगितलें श्रेष्ठपण । हिंदी मराठी भाषेंत ।।९६।। ऐसा संपता तो दिन । संध्याकाळ झाली म्हणून । शाबल ड्रायव्हर आला घेऊन । नवीन गाडी सेवेशीं  ।।९७।। म्हणे गाडी आलों घेउन । तिला चरण लागावें म्हणून । रात्रीं करावे प्रीती भोजन । खानावळींत आमच्या हो ।।९८।। ऐसी करि तो विनंती । समर्थ तेथूनिया उठती  । गाडींत जाऊन बैसती । मंडळींसह निघती ते ।।९९।। वाटेत ऐसे जातां जातां  । भक्त भेटती दर्शनाकरितां  । सोनार भक्त पांडोबा  । घरीं उतरवी क्षणभरीं ।।१००।।   तैसेची बाबू नाव्ह्यानें । समर्थांस नेले हट्टानें । पूजा केली की प्रेमाने । मार्गस्थ होती पुनश्च ते ।।१०१।। मालवणच्या प्रशांत किनाऱ्यावर । ‘उत्तम’ खाणावळ होती सुंदर । रात्रीं आठाचे सुमारावर । आली मंडळी सर्व ती तिथें ।।१०२।। तेथें गप्पांच्या मैफलींत । समर्थ जेवले खाणावळींत । शाबल झाला आनंदीत । धन्य झाला सत्संगें ।।१०३।। तेथें त्या खानावळींत । समर्थ झाले कीं निद्रिस्त । बाहेर मंडळी होती तिष्ठत । वाट पाहती उठण्याची ।।१०४।। कारण त्या मंडळींचें जेवण । व्हावयाचें होतें अजून । तेणें मुक्कामीं परतण्यांकारण । चुळबुळ चाले त्यांचि हो ।।१०५।। समर्थ उठण्याचें लक्षण । कांहींच न ये दिसून । तेव्हां शाबल सांगे विनवून । जेवून घ्यावे म्हणूनियां ।।१०६।। ऐसें बोलती न बोलती । तो समर्थांस आली जागृती । गाडींत घेऊनियां बैसती । थोड्या चिडलेल्या स्थितींत ।।१०७।। तैसा शाबल बैसला गाडींत । स्टार्टर दाबला जोरांत । परि गाडीनें केला हट्ट । कांहीं केल्या चालेना ।।१०८।। शाबल गेला समजून । कीं प्रौढी मारिली होती आपण । ती पूर्ण जिरली मनांतून । नवीन गाडी असूनि बिघडली ।।१०९।। इतुक्यांत महाराज गेले उतरून । जोशींना बोलले उद्देशून । धनजी गाडी चलाव म्हणून । पाठीवर बैसले त्याच्या कीं ।।११०।। अनंतकोटी ब्रम्हांडनायक । राजाधीराज योगीराज । सच्चिदानंद सद्गुरू समर्थ । साटम महाराज की जय ।।१११।। ऐसा करोनियां जयजयकार । मिरवणूक निघाली रस्त्यावर । रात्रौं अकराचा असुनि सुमार । दिवे लागती घरोघरीं ।।११२।। दरवाजे उघडेच टाकून  । लोक धांवले दर्शनाकारण । कडेवर मूलांना उचलून । स्त्रियांही धांवती पाठीमागें ।।११३।। जैसी मंडळी घेती दर्शन । समर्थ आनंदें गाती धून । ‘गोकुळांत घेतो जन्म श्रीकृष्ण । हरघडी करिती रामाचें भजन ।।११४।। ऐसे ती नाचत गात  ।  मिरवणूक होती मार्ग आक्रमित । तोंचि लक्ष्मी  नाट्यमंदिरांत । स्थिरावली कीं अचानक ।।११५।। सौभद्र नाटकाचा प्रयोग । तेव्हां चालू होता नाट्यगृहांत । समर्थ प्रवेशितां प्रेक्षकांत  । रंग भंगला नाटकाचा ।।११६।। महाराज आलेले पाहून  । मॅनेजर आला कीं धावून । पुढें बसविले नेऊन । समर्थांसह मंडळींना ।।११७।। तोंचि शंकरराव सरनाईकांनीं  । समर्थास पाहिले स्टेजवरुनी । तैसेचि आले ते उतरोनी । लीन जाहले पदकमलीं ।।११८।। तेव्हां समर्थ बोलती उठवून । मी दिलेल्या वचनाचें पालन । केलें आहें  इथें येऊन । स्मरण तुला आहे कां ।।११९।। ऐसें बोलती न बोलती । तों प्रेक्षक गर्दी करिती । तेणें नाटक न चालें पुढती । बंद केले ते दिनीं ।।१२०।। उद्यां याच तिकिटावर । नाटक दाखवूं खरोखर । ऐसें सांगुनि मॅनेजर । बिऱ्हाडी नेती समर्थांना ।।१२१।। शंकररावांचे गायन । दुसरे दिवशीं झालें छान । समर्थ ऐकती तें बैसून । खास योजिल्या बैठकीत  ।।१२२।। तेव्हां शंकरराव सांगती । मी एका सत्पुरुषाप्रती । आग्रह केला अतिप्रीती । सौभद्र बघावें म्हणूनिया ।।१२३।। तेव्हां त्यांनी दर्शविली सम्मती । त्याची समर्थांनीं केली पूर्ती  । त्या बोलाची लाभे पावती । समर्थ दर्शनें इथेंच हो ।।१२४।। पुढें शंकररावांना नारळ देऊन  । आशीर्वाद दिला उत्तम छान । तेणें प्राप्त झाले पुत्ररत्न । कलावंत पित्यापरी ।।१२५।। अरुण सरनाईक म्हणून । रंगभूमी गाजवी जो तरुण । ख्यातनाम नट म्हणून । नांव लौकिक पावला जो ।।१२६।। जैसें तीर्थाचें करिता प्राशन । मन प्रफुल्लित होतें छान । तैसें चरित्ररूपी तिर्थांचें श्रवण । जीवन सुंदर करीतसें ।।१२७।। म्हणुनी समर्थांचे पुण्यस्मरण । तुम्हां घडविलें शब्दांमधून । भक्ति तृषेचें करण्यां शमन । भाऊ कृपेनें आज मी ।।१२८।। भक्ति तृषा व्हावी शमन । जीवनही व्हावें सर्वांग पूर्ण । म्हणोनि हा अल्प प्रयत्न । फलद्रूप व्हावा गुरुवरा ।।१२९।। इतुकेंच मागतों चरणापाशीं । पुढील कथा व्हावी सुरशी । साकार होवो पुण्यराशी । शब्द संगतीने माझिया ।। १३०।। 

इति श्री भाऊदास विरचित । श्री समर्थ सौरभ ग्रंथस्य नवमोऽध्याय गोड हा । श्री सांबसदाशिवार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]