।। अथ पंचदशोSध्यायः।। 

  श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ।।१।। नमो सद्गुरु दत्त विमला  । आनंद कंदा जगत्पाला । पतितपावना हृदय कोमला । परमकृपाळा उदारा  ।।२।। अबाधित तुझी कीर्ती  । वर्णिता न सरे कल्पांतीं  । कुंठित झाल्या श्रुती ।  तेथें मी किती अनुवादू ।।३।। जीवनें भरला सागर । त्याचाही घडे आवर । गणवेल मेघांचा तुषार । परि तव गुणसागर न वर्णवे  ।।४।। तुझे अबाधित गुण । किंचित गावयां इच्छी मन । हा बालकाचा हेतू देखोन । लळा पूर्ण करिशी तूं  ।।५।। येरव्ही पांहता मी मंदमती । होय बुद्धिहीन सर्व जाणती । परि ऐसियासी ग्रंथीं । देवोनी स्पुर्ती बोलवितो ।।६।। हें तव कृपेचें कारण । अनन्यासी देतो भूषण । हृदयीं बसोनी वदविसी गूण । आपुले महिमान आपणचि ।।७।। काष्ठयंत्र काय वाजवावें । सुस्वर जनीं वाखाणावे । उरगकुरंगादि लुब्धावे । हें काय घडावें त्याचेनीं ।।८।। परि वाजविणारा वेगळा । धन्य त्या वाजविणल्याची कळा । मोहक उठवोनी नादरसाला । लुब्धावी सकाळां स्वगुणें तो ।।९।। तेवींच तूं कृपासागरा । हृदयीं बैसोनि दातारा । उठाविसी शब्द उद्गारा । कथा विस्तार पावविशी  ।।१०।। सावंतवाडीच्या अनंतरावांनीं । लेकस घेतलेंबोलावुनी । तैसी गुंडूस आली घेऊनी । माहेरास ती रहावया ।।११।। कांहीं दिवसांनंतर । गुंडूस आला विषमज्वर । जो वाढत गेला भयंकर । वैद्यानेंहात टेकिले  ।।१२।। गुंडूची आई गेली घाबरून । तैसे अनंतराव झालें चिंतामग्न । लेक सुखरूप जावी परतोन । पुत्रासह सासरीं ।।१३।। जरि भलतेच आलें घडून । तरी आपुल्यास लागे दूषण । म्हणुनि कन्येस सांगती जाऊन । दाणोलीस मी येतसे ।।१४।। तैसी कन्या गेली घाबरून । गुंडूस घेई कवटाळून । चेहरा गोरामोरा होऊन । रडूं लागली मोठ्यानें ।।१५।। तेव्हां तिज धीर देऊन । अनंतराव सांगती विश्वासून । समर्थांचें असता संरक्षण । चिंता कासया करावी ।।१६।। म्हणति विनंती करावी समर्थांस । कीं संरक्षावें या पुत्रास । चरणांवर घातला मी त्यास । मायबाप आपणची ।।१७।। तैसें तिनें मनोमनीं । याचना केली आळवोनी । रात्र काढली जागोनी  । पहांटें डोळा लागला कीं ।।१८।। तैसें ती पाहतसे स्वप्नीं  । कीं नदी वाहे दुथडी भरून । गुंडू नदीमध्यें असोनी  । स्वयें काठावरती उभी असे ।।१९।। तैसें वांचवा वांचवा कोणी । गुंडूस माझ्या म्हणोनी । देवा, साटमा ये धावोनी  । ऐसें ओरडूं लागली ती ।।२०।। तो गरुड येई नभांतून ।आंत विष्णू आले दिसून । पिवळा पितांबर नेसून । नदींत उतरले भासतसे ।।२१।। तोंचि दिसले पैलतीरावर । स्वयें होते ते श्रीगुरुवर । त्यांच्या चरणस्पर्शें सरितानीर । ओसरून गेलें क्षणांत ।।२२।। तैसा गुंडू गेला धांवत । समर्थांना घातला दंडवत । समर्थ ठेविती आपुला हात । गुंडू शिरावर पाहिले ।।२३।। तैसी मनांत गेली आनंदून । गहींवर आला दाटून  । गुंडू गुंडू म्हणोन । ओरडूं लागली ती मोठ्यानें ।।२५।। बघ माझ्या अंगामधून । घाम आलासे डबडबून । तो त्वरित टाकावा पुसून । ओलाचिंब झालों असे ।।२६।। तों हात पाही ती लावून । म्हणे जैसा नदींत आला डुंबून । तैसा चिंब भिजला घाम येऊन । नुसती झाली गुंडूस ।।२७।। जरी गुंडूसवें होती बोलत । तरी चित्र समोर होतें तरळत । कीं समर्थ उभे गुंडूसहित । सस्मित काठांवरी नदीच्या ।।२८।। अनंतराव दुसरें दिवशीं । मठांत पोहोचले दर्शनासी । पिवळी छाटी तें दिवशीं । अंगात होती समर्थांचें कीं ।।२९।। गोकर्णाची फुलें पिवळी । कानावरती होती खोवली । ऐसी समर्थ मूर्ती सांवळी । बघतांना भान होती ते ।।३०।। साष्टांग करिती ते नमन । तों समर्थ बोलती उद्देशून । कीं मुलास घेतले मागून । देवाकडून सांगावें ।।३१।। देव परमकृपाळू असून । तो सर्वांचें करितो कल्याण । आतां चिंतेचें नाहीं कारण । आईस त्याच्या सांगावें ।।३२।। तैसें अनंतराव आनंदून । निघते झाले मठांतून । परि समर्थचरणीं त्यांचें मन । घुटमळत कीं राहिलें ।।३१।। घरीं पाहती ते येउनी । तों नातूच आला समोरूनी । सर्व आनंदी आनंद झाला मनीं । समर्थ कृपा कारणें ।।३४।। एके दिवशीं बातमी आली कानीं । भोजन वर्ज्य केलें समर्थांनीं । चिंता उद्भवली भक्तांचे मनीं । पाल चुकचुके मनांत ।।३५।। ऐसें काय घडलें कारण । किं समर्थ न करिती भोजन । दिवसेन् दिवस होतील क्षीण । प्रकृती स्वास्थ्य ढांसळेल  ।।३६।। परि समर्थ राहती शांत । कोणावरतीही  नव्हते चिडत । भाव भक्तांचा जाणुनी मनांत । हिंडत होते सर्वत्र तें ।।३७।। कुडाळ आणि वेंगुर्ल्याला । कणकवली आणि बांद्याला । तैसच जाती ते गोव्याला । राहावयाला भक्तगृहीं ।।३८।। परि कुणाच्याही घरांत । अन्नाला नव्हते ते शिवत । तेणें भक्त होती चिंताग्रस्त । हृदय धडधडे भीतिनें ।।३९।। तैसें प्रत्येकाच्या येई मनांत । कीं अखेरची असावी ही भेट । भावपूर्ण होती शरणागत । अश्रु ओघळत्या नयनांनीं ।।४०।। तेव्हा समर्थ सांगती सत्य । कीं मज जाणे आहे निश्चित । माझा बाप आहे बोलावित । बोट थांबली येऊन ।।४१।। जरि सत्य सांगितले समर्थांनीं । तरि विश्वास ना ठेविती कोणी । स्वयंभू चैतन्य सूर्यापरि  । मावळतील कैसें ते ।।४२।। जरि जीवनाचें अंतिम सत्य । प्रत्येकांस होते माहित । तरी समर्थांचें ऐसें अकल्पित । जाणें मान्य नव्हते हो ।।४३।। असो, ऐसे ते फिरत फिरत । मालवणांत येती कीं धावात । गजाननभाऊंच्या प्रिय घरांत । हर्षे स्वागत जाहलें ।।४४।। तात्या सुकीनें पाठीवर । समर्थांस उचलिले सत्वर । आणि घरांतील पलंगावर । उचलुनी अलगद ठेविले ।।४५।। शिशुपरी निरागस मुखावरती । जास्वंदी परि दिसे आरक्त । परम मंगल समर्थ मूर्ती । पाहतां आनंद गुणावत असे ।।४६।। समर्थ आल्याची हकीकत । वा-यासमगेली मालवणांत । तैसा जनसागर आला धांवत । समर्थ दर्शन घ्यावया ।।४७।। मुंगीच्या पावला पावलांनी । जो-तो जाई खोलीमधूनीं । नतमस्तक होई समर्थ चरणी । भक्तियुक्त प्रेमानें  ।।४८।। कोणी चरणांचे घेति चुंबन । कोणी करिती अश्रूसिंचन । कोणी घट्ट हृदयीं धरून । धूळ लाविती सर्वांगा ।।४९।। गुरू चरणांची अमोल धूळ । कायामन करिते निर्मळ । तेणें त्यांचे बालगोपाळ । चरणावर घालिती प्रेमानें ।।५०।। डॉक्टर मडये आणि बल्लव । पाय होते कीं चेपीत  । वारा होते कीं घालित । जोशी तैसेचि सिद्धाणा ।।५१।। ऐसी दुपार गेली टळून । तरी रीघ न संपे परिपूर्ण । पानें ठेविली वाढून । भक्त मंडळींचीं तेधवां  ।।५२।। परि कोणीही नव्हते जेवत । उपाशी असतां सद्गुरुनाथ । भोजन करणें न वाटे उचित  । ताईस विनंती करिती ते ।।५३।। समर्थांस  करावी विनंती । भोजन घ्यावें आम्हां संगती । तैसें ताई जाऊनि सांगती । भक्तांची भावना भाबडी ।।५४।। तैसें समर्थ ऊठती बिछान्यांतून । त्यांना सर्व घालिती दुग्धस्नान । भगवी छाटी नेसविली छान । नंतर बैसति पाटावरी  ।।५५।। वर्ज करोनियां भोजन । बरेच दिवस गेले लोटून ।  परि भक्तांना केलें प्रसन्न । भाव भोळ्या या देवानें ।।५६।। स्वयें आपल्या या हातांनीं । ताई भरवीत होत्या प्रेमानीं । निरागस बालकापरी हंसोनी । समर्थ जेवीत होते कीं  ।।५७।। कर्ता करवित्या या प्रभूस । बालक होण्याची असते हौस । भक्तांनीं भरवावा घांस । माऊली होऊनियां त्याची ।।५८।। मृदू मधुर बोलोनी । ताई भरवीत होत्या हंसोनी । तृप्तीची ढेकर देऊनी । खुषीत जेवत होते ते ।।५९।। समर्थ जेवतांना पाहून । बाहेर प्रसन्न झाले भक्तजन । त्यांच्या आशेला पालवी फुटून । सुख समाधान पावले ।।६०।। इतकी भूक असतां पोटांत । कशास करिता बाबा हट्ट । अन्न वर्जोनिया अंत । जवळी कां आणिता हो ।।६१।। ताईच्या या प्रश्नास । उत्तर देती ते सावकाश । मज बोलावितसे बापुस  । बोट येऊन थांबली गे ।।६२।। या प्रश्नास नव्हतें उत्तर । जेथें सर्वज्ञ होती निरूत्तर  । तेथें हृदयावर ठेवुनि पत्थर  । मूकपणें पहावें कीं ।।६३।। समर्थ उठले जेवून । तों पुनश्च गेले ते झोपून । परि दर्शन घेती भक्तजन । खिडकीमधून खोलीच्या ।।६४।। कोणी या समर्थ सदनांस  । प्रदक्षिणा घालिती सावकाश । ऐशा क्रमानें दुसरा दिवस । सहज कैसा उजाडला हो ।।६५।। परि समर्थ उठण्याचें लक्षण । मुळीच न दिसें म्हणून । दाणोलीकर झाले खिन्न । घ्यावयास घ्यावयास आले तेथें जे ।।६६।। तैसें  गजानन भाऊ उठविती  । चहा पाजोनिया  बैसवीती । दाणोलीकरांची सांगती विनंती । परि नकार देतील जावयां ।।६७।। इथें राहण्याची इच्छा जाणून । तात्या सुकी बोले विनवून । बाबा थोडे येऊं फिरून । तैसें हात उंचावती शिशुपरी ।।६८।। तैसेच त्यांना उचलून । गाडींत बैसविती नेऊन । दाणोलीकर बैसती येऊन । गाडींत गर्दी करोनियां ।।६९।। जयजयकाराच्या या गजरांत  । गाडी आली सावंतवाडींत । तेथें गोविंद पोकळेंच्या घरांत । दोन महिने राहिले ते ।।७०।। एके दिवशीं मध्यरात्रीला । अपरिचित ऐसा आवाज आला । संवाद होता कीं चालला । अज्ञात ऐशा व्यक्तिंशी ।।७१।। समर्थांच्या या खोलींत । रात्रीचे कोण आहे बोलत  । तें डोकावून होते पहात  । पोकळे हळूंच दाराशीं  ।।७२।। परि कोणी न येई दिसून  । समर्थ घेऊनि पांघरून । गाढ झोपलेले आले दिसून । आश्चर्य अंतरी वाटलें  ।।७३।। भास झाला असेल म्हणून । आपुल्या गादीवर पडले जाऊन । तों पुनश्र्च सुरू झालें संभाषण । समर्थांचे त्यांच्याशी ।।७४।। अस्खलीत हिंदी भाषेमधून । विनोदें बोलती कीं हंसून । तैसे पोकळे पुनश्र्च उठून । पहावया जाती खोलींत ।।७५।। परि तैसेचि आलें दिसून । तैसें ते मनांत गेले समजून । समर्थांचे हें अतर्क्य वर्तन । मज ना उमजेल अज्ञानीला  ।।७६।। तुझी अगाध करणी म्हणून । वंदन करून गेले झोपून । दुसरें दिवशी सर्व मिळून । दाणोलीस नेती समर्थांना ।।७७।। समर्थ दाणोलीस आल्यानंतर । शिवरात्री आणि तोंडावर । तेणें उत्साहाचा झाला संचार । भक्त मंडळींच्या अंगांत ।।७८।। शिवरात्री झाली थाटांत । असंख्य भक्तजनांच्या साक्षींत । परि समर्थ असतां अशक्त । पडून राहती पलंगावरी ।।७९।। तेणें कोणाचें न होई समाधान । दर्शनें होई विषण्णमन सदाशिवास प्रार्थिती मनोमन । दीर्घायुषी करी समर्थांना ।।८०।। तरी त्यांच्या क्षीण स्थितीत । भक्तांनी बैसविलें पालकमंत्री  । रात्रीं मिरवणूक काढली थाटांत । पूर्वीं निघाली न ऐसी जी ।।८१।। जयजकाराच्या गजरांत । भजनवृंदाच्या रंगसंगतींत । प्रदक्षिणा करोनि गावांत  । मिरवणूक पहांटे परतली ।।८२।। जैसें गजाननानें उचलून । समर्थ सदनांत ठेविले नेऊन । तैसें समर्थ बोलती वचन । पुत्रा ऐक सांगतो जें ।।८३।। जें जें पूर्वीं आले चालून । तैसेची पुढती चालू ठेवा निक्षून । माझी साक्ष राहील हें जाणून । खंड कार्यांत पडू न दे ।।८४।। नंतर महाप्रसाद होऊन । जरि उत्सव गेला संपून । तरी समर्थांचे वरील वचन । मनांत खटकत राहिलें ।।८५।। स्वास्थ्य सुधारण्याचें लक्षण । मुळींच न येई दिसून । दिवसेन् दिवस जाती खंगून । डॉक्टर येती बघावयां ।।८६।। डॉक्टर मेथा कर्णिक दोन्ही । नित्य जाती तपासून । परि औषध न घेति  म्हणून । सचिंत अंतरी होती ते ।।८७।। मेथा करिती औषध सक्ती । त्यांचेशीं प्रीतिनें बोलती । परि कर्णिक  त्यांना सुई टोचती । तेणें संतापती ते भयंकर ।।८८।। मेथा मनांत होते समजून । औषधानें न येईल त्यांना गुण । इच्छाशक्तित असती यांचे गुण । निमित्त मात्र औषध असे ।।८९।। ऐसी बघुनियां परिस्थिती । बापूसाहेब मनी चिंता करिती । रात्रंदिवस मठांत राहती । सेवाचाकरी करावयां ।।९०।। कैसें बरें वाटेल म्हणून । नाना उपाय पाहती ते करून । डॉक्टर भडकमकरांना पुण्याहून । त्वरित बोलावून आणिलें ।।९१।। त्या काळांतीलश्रेष्ठ डॉक्टर । म्हणून होते श्री  भडकमकर । निरोपासरसीं येति सत्वर । समर्थांना तपासाया ।।९२।। समर्थांना करुनि नमस्कार । हातांत घेती त्यांचा कर । नाडीचे ठोके मोजती सत्वर । परि आश्चर्यचकित जाहलें  ।।९३।। नाडी पूर्णपणें बंद असून । समर्थ मात्र बोलती हंसून । तैसे भडकमकर जाती चक्रावून । नमस्कारूनि परतले ।।९४।। बापूसाहेबांना ते सांगती  । मज लाभली जी अनुभूति  । ती चमत्काराची होती प्रचिती । वैद्य शास्त्रांत न देखिलें ।।९५।। सत्पुरुष असती इच्छामरणी  । त्यांचेवर न चाले वैद्यकरणी । माझी पूर्वपुण्याई म्हणूनी  । दर्शन घडलें संताचें  ।।९६।। वैद्यकीय प्रयत्नामधला । अखेरचा आधारही तुटला । तेणें श्रीमंतांच्या मनांतला । धीर गळून पडला हो ।।९७।। कार्य उरकोनिया ज्ञानेश्वर । समाधी घेण्यास निघती सत्वर । निवृत्तीनाथ त्यांचे गुरुवर । थोपवूं शकले कां सांगावे ।।९८।। तेथें बापूसाहेब सरकार । तैसेचि त्यांचे वैद्य डॉक्टर । समर्थांना कैसे अडविणार  । इच्छा मरणामधून सांगा हो ।।९९।। सर्व गोष्टींचें असून ज्ञान । आशा न सुटते मनांमधून  । गजाननासी सांगती विनवून  । बापूसाहेब शांतपणें ।।१००।। हवाफेर केल्यास येईल गुण । ऐसें मज वाटतें मनांतून । तेव्हां गजाननभाऊ सांगती हंसून । वेडा खुळा विचार हा ।।१०१।। जे एका कृपाकटाक्षांत  । जगाचा घालवून शकती ताप । त्यांच्या या देहांतील ताप । म्हणजे खेळ इच्छेचा असें कीं ।।१०२।। जरी ताप आला कीं सूर्याला । अगर थंडी भरली चंद्राला । वात झाला कीं वाऱ्याला । तरी उपाय कोणता असे कीं ।।१०३।। यावरती दोघे हंसून । मनोमनीं करिते झाले नमन । इच्छामरणीची लीला जाणून । तटस्थ राहून पाहती ते ।।१०४।। मालवणकर मंडळी आली म्हणून । समर्थ चाखीती थोडे जेवण । पाठीवरती हात फिरवून । ताईस सांगते झाले ते ।।१०५।। परमेश्वर तुमचा सारथी असून  । जेव्हां जेव्हां जिथें काढाल आठवण । मी तिथेच आहें हें जाणून । मालवणांस परत जावें कीं ।।१०६।। जेव्हां आज्ञेचें करिती पालन । जड पावलांनी निघती तेथून । अश्रू ओघळत्या नयनांमधून। वंदन करून निघती ते  ।।१०७।। समर्थांच्या या सान्निध्यांत । जे नित्याची सेवा होते करीत । त्यांत उमा होती प्रामुख्यांत  । सुभक्त श्रेष्ठ जणू कीं ।।१०८।। नागझरी वरती जाऊन । समर्थांचे कपडे आणी धुवून । सतत केरवाराही उरकून । समर्थ सदन स्वच्छ ठेवी ।।१०९।। पाहुणे येति जे मठांत । त्यांची व्यवस्था होती ती पहांत । तैसेचि राहे स्वयंपाक घरांत । सतता फिरत्या पायांवरी ।।११०।। समर्थांच्या सर्व भक्तांत  । उमा सर्वत्र होती भासत । परि कोठे नव्हती ती दिसत । वाऱ्यासम वावर करी ।।१११।। जैसा वारा अंगास लागून । शीतलतेची देतो जाण । परि कोठें न येतो तो दिसून । तैसेचि उमा कार्य करी ।।११२।। सकाळीं उठोनियां लौकर । सडा-रांगोळी काढी सुंदर । समर्थ सेवेस राही तत्पर । रात्र उलटून जाई तरी ।।११३।। जीवनांतील दुःखें विसरून । ती समर्थ सेवेंत गेली रंगून । अखंड नामस्मरण करून । अविश्रांत सेवा करितसे ।।११४।। अशी ही उमा तपस्विनी । समर्थ खोली ठेवी सजवुनी  । धूप-दीप देई उजळूनी । वंदन चरणीं करीतसे ।।११५।। तैसे उमेस जवळ बोलावुनी । समर्थ बोलले विनोदांनी । तुला नी मला बाळकृष्णसदनीं । मरावयाचे आहे कीं ।।११६।। ऐसें त्यांचे।उद्गार ऐकून । थट्टेनें हंसले सर्वजण  । परि पुढें तैसेचि आले घडून । समर्थ वचनापरी उमेचें ।।११७।। नश्वरकाया ईथें सोडून । उमा गेलीसे  उद्धरून । कापूरा परि देह झीजवून । प्रकाशांत विरून गेली ती ।। ११८।। असो, समर्थांचें घ्यावया दर्शन । जनसागर आला धांवून । चरणांवरती मस्तक घासून । एक एक पुढें जातसे ।।११९।। दिवस-रात्र अखंडपणे । अव्याहत चाले दर्शन घेणें  । जाति भेदाची सर्व वैगुण्ये । विसरून सर्व येती हो ।।१२०।। समर्थांचे घेतां दर्शन ।  प्रत्येकास लाभे समाधान  मनांत होती ते पावन । चरणरज लाविती भाळी ।।१२१।। काय आहे म्हणून । माया येत असे कीं दिसून । तिज क्षणांत दूर लोटून । समर्थ निश्चेष्ट जाहले ।।१२२।। जैसें काळ्या ढगांनी मिळून । सूर्यास टाकावे झाकून । तैसें शोकानें ग्रासिलें सदन । समर्थ सूर्य मावळतां  ।।१२३।। डॉक्टरही आले धांवून । नाडी पाहती ते तपासून । ठामपणे निर्णय देऊन । गेल्याचे सांगती सर्वांना ।।१२४।। तोंचि ते नेत्र उघडून । मोठ्याने गरजले त्रासून । काय गोंधळ करितां म्हणून । चले जाव! ऐसें बोलले ।।१२५।। सर्वजण गेले गोंधळून । डॉक्टरही गेले घाबरून । परि पुनश्च काष्ठवत होऊन  । निश्चेत झाले समर्थ ।।१२६।। तेव्हां डॉक्टरांचा समूह मिळून । देहास पाहति तपासून ।  मनाची पक्की खात्री करून । निर्णय गेल्याचा ।।१२७।। गोपी तसवंगड्यांना सोडून । जैसा श्रीकृष्ण गोकुळामधून  । अक्रुरासवें जातां निघून  । आकांत वियोग मांडिला जो ।।१२८।। तैसा या समर्थ सदनांत  । वियोगानें झाला आकांत । कोणी होऊनियां मूर्च्छीत ।  कोणी छाती मस्तक फोडिती  ।।१२९।। आम्हीं जातों आमच्या गांवा । अमुचा रामराम घ्यावा । ऐसा भजनाचा गवगवा । मठाबाहेर सुरूं झाला ।।१३०।। इतुक्यांत डोळे उघडून । इथें काय चाललें म्हणून । क्षीणरवें ते गर्जून । चले जाव यहॉंसे बोलले ।।१३१।। आपआपल्या घरीं जाऊन । पोटभर घ्यावें तुम्हीं रडून । इथे मात्र गोंधळ करून । शांतता भंग करूं नये ।।१३२।। बाळकृष्णास सांगती बोलावून । पांढऱ्या कोंबडीचें मटण । रडणार्‍यांना द्यावें नेऊन  । हाकलून द्यावें सर्वांना ।।१३३।। ऐसी दुपार गेली उलटून । तो गोंद्यास घेती बोलावून । गांठ ढिली मारूं नकोस म्हणून  । सांगते जाहले त्याला कीं ।।१३४।। तो मनांत गेला समजून । देह विसर्जनाचा आला क्षण । देह कापडांत गुंडाळून । ठेवणें मत्कराने इच्छिती ते ।।१३५।। पायावर पडला कोसळून । तुमच्या नंतर कैसें जीवन । परि त्यास शांत करून । सांगते जाहले बाळकृष्णा ।।१३६।। एक रुपया प्रसाद म्हणून । गोंद्यास द्यावा रे काढून । बाळकृष्ण पाळी वचन  । रुपया देता झाला कीं ।।१३७।। जैसें संध्याकाळचे सहा वाजती  । तैसें समर्थ बाळकृष्णस सांगती । अंघोळ घालावी मतप्रतिपादनात्मक  । तात्काळ येथें गादीवरी ।।१३८।। तैसें घालिती मंगलस्नान । रुद्राचें करोनियां उच्चारण । माजघरांत ठेविती नेऊन  । जैसे सांगती तैसें ते  ।।१३९।। जैसी मध्यरात्र गेली उलटून । तैसें बोलावून घेतले भक्तजन । सर्वांना सांगतील ते निक्षून । आतां खरेंच जातों मी ।।१४०।। माझा बाप केव्हांपासून । दारांत थांबलासे येऊन । मज घेण्यास आला लांबून । बोटीचा भोंगा वाजतसे ।।१४१।। तुम्हीं जिथें जेव्हां काढाल आठवण । मी तिथेंच आहे हें जाणून । रडूं नका मी जातों म्हणून । देहत्याग भाग असे ।।१४२।। जोंवरी तुमच्या हृदयांत । प्रेमाचा पाझर आहे वाहत । तोंवरी नाहीं ताटातूट । ध्यानांत ठेवा सुभक्त हो ।।१४३।। ऐसें म्हणूनी श्रीसमर्थांनीं । ओंकाराचा दीर्घ उच्चार करोनी । सर्व सुभक्तांच्या साक्षींनीं । महासमाधी घेतली हो ।।१४४।। महासमाधीची ही हकिकत । वणव्यापरि पसरली देशांत । तारा ही गेल्या महाराष्ट्रांत । जो तो धांवे दाणोलीकडे ।।१४५।। इकडे समर्थ पत्नी मुंबईंत । नित्याची सेवा होती करीत । ती दिवा असता लावीत । वारंवार तो विझतसे ।।१४६।। तैसेंचि पतीच्या फोटोला । नमस्कारोनि हार घातला । तो ही तासाची तुटूं लागला । आश्चर्य तिजोरीत वाटतसे ।।१४७।। परि दुसरें दिवशी पहाटेंला । त्यांचा मावसभाऊ धांवत आला । त्यानें सांगितले काशीबाईला* । समर्थ समाधिस्थ झाले कीं  ।।१४८।। तैसें सौभाग्य अलंकार काढून । पतिच्या फोटोपुढें दिले ठेवून । तों रात्रीं समर्थ आले धांवून । दृष्टांत द्यावया पत्निला ।।१४९।। तिचा पलंग गदगदाम हलवून । तिज सांगितले जागें करून । तूं अखंड सौभाग्यवती असून । सौभाग्यालंकार घालावे ।।१५०।। मी चिरंजीव आहें म्हणून । तुझें सौभाग्य न होईल क्षीण । तैसे त्या करिती परिधान । अलंकार कुंकुम काढिले जें  ।।१५१।। जेव्हां या पतिव्रतेस आले मरण । तिच्या चितेंत आला निघून । हिरवा चुडा ओटीचा खण । पुत्र वसंतास लाभला जो ।।१५२।। जिकडे देह ठेविला समर्थांनीं । तिथेंच त्यांना बैसवोनी । अंगी केशरी छाटी नेसवोनी  । पटका शिरी बांधला ।।१५३।। चेहऱ्यावरील तेजप्रभा पाहून  । गेल्याची न दिसे किंचित खूण । जनवृंद घेई त्यांचे दर्शन । अश्रू ओघळत्या नयनांनीं ।।१५४।। बापूसाहेबांच्या विनंतीवरून । सखारामाने केले ऐसें मान्य । पादुका  समर्थ सदनांत ठेवून । देह मठांत विसर्जावा ।।१५५।। समर्थ सदनाच्या खिडकींतून । समाधीचें घडावे दर्शन । उत्सवांत द्यावा पहिला मान । नंतर सर्व मठांप्रती ।।१५६।। रात्रीचे बारा गेले वाजून । तैसी पालखी निघाली सदनांमधून । बापूसाहेब, सखाराम पुढे होऊन । खांदा लाविती पालखीला ।।१५७।। ऐसी पालखी हलली तेथून । जयजयकार चाले गर्जून । गांवोगांवीचे मिळती जन । भजनें दिंड्या सवें चालती ।।१५८।। परि जो तो अश्रू पुसून । हृदयांत ठेवीतसे सांठवून । मनांचे हुंदके आवरून । समर्थ दर्शन अखेरचें ।।१५९।। देवा आम्हांस पोरके करून । तुम्ही गेलांत कां निघून । आतां कोणास हांक मारून । हृदय मोकळें करावें ।।१६०।। तुमच्या केवळ दर्शनाकारणें । आमुचें निश्चिंत होतें जिणें । तुमच्या आधाराविणें जगणें  । कठीण वाटतें आम्हांला ।।१६१।। ऐसें प्रत्येकाचे मनांत । विचार होते कीं नाचत । जरि पालखी चाले संथ संथ  । विचार धांवती वेगानें ।।१६२।। तुमच्या कृपेच्या छत्रछायेंत । आम्हीं पूर्णपणें होतों सुरक्षित । आतां दुर्दैव मांडिल विच्छेद । त्यांतून सोडविल ।।१६३।। तुमच्या पदकमलांच्या स्पर्शेकरून । आमुचें निर्मळ होतसें मन । आतां मलीनतेचें जन्मावरण । कैसें अमल होईल ।।१६४।। तुमच्या नांवाचें कवच पांघरून । भवभय जाऊं आम्हीं तरून । ऐसें तुमचें अभयदान । सदैव राहो आम्हांवरी ।।१६५।। ऐसें विचार चालती मनांत । तों सर्व फिरुनी गांवांत । जयजयकारानें गगन भेदित । पालखी मठांत आली कीं  ।।१६६।। तैसे बापूसाहेब पुढें येती । सखारामास नम्र विनविती । देह स्थानावर उतराविती । समर्थ इच्छेनुसार ते ।।१६७।। सखारामानें आजवरी । अनेकदां घेतले खांद्यावरी । आतां उचलताना शरीरी । बळ न राहिलें मुळींच ।।१६८।। कसातरी तोल सांवरून । आसनावरी बैसविले उतरून । चादरीची घट्ट गांठ मारून । वरती येता झाला तो ।।१६९।। कापूराची एक एक पुडी वाहून । समाधी खोली भरली पूर्ण । वरी शिळा दिली ठेवून । रात्रीं पावणेदोन वाजतां कीं ।।१७०।। ऐसा फाल्गुन कृष्ण द्वितीयेचा । दिवस तुकाराम बीजेचा । परलोक प्रवेश येशू ख्रिस्ताचा । संगम दिन साधला कीं ।।१७१।। कोकणच्या या तुकारामांनीं । गमन केलें वैकुंठ भुवनीं  । सर्वांना रामराम करोनी  । कार्य पूर्ण करोनियां ।।१७२।। बापूसाहेबांनीं नंतर । खोली बांधून घेतली सुंदर । तेंचि झाले समाधी मंदिर । साटम राजाधिराजांचे ।।१७३।। ऐशा या समाधी मंदिराचें । मज भाग्य लाभले दर्शनाचें  । तेणें जन्मजन्मांतरींचें  । सार्थक माझें झालें  हो ।।१७४।।  परमपूज्य अवधूतानंदांनी  दाणोलीस मज नेऊनी । समर्थांची सांगितली जी कहाणी । अमृतापरी अवीट जी ।।१७५।। तिचेंच केलें हें वर्णन । त्यांच्या इच्छेचें केलें पालन । समर्थ सौरभ ग्रंथ लिहून । अर्पण त्यांना करितसें ।।१७६।। केवळ बाबांच्या** कृपेकरून । सौरभ ग्रंथ झाला लिहून । यांत माझे न कांहीं मोठेपण । लेखकु झालों बाबांचा ।।१७७।। त्यांनीं जैसें दिले मज ज्ञान  । तैसेंचि कथिले मी वर्णन । कांहीं दिसून आल्यास न्यून  । क्षमा करावी सुभक्त हो ।।१७८।। संत महिमा अपरंपार । जेथें वेदही होती स्थिर । तेथें मी अल्पमती पामर । वर्णन काय करूं शके ।।१७९।। जरी संत जाती कार्य संपवून । तरी सौरभनें भरे वातावरण । जो सर्वांतरीच्या हृदयीं भरून । जीवन सुखमय करितसे ।।१८०।। म्हणुनी दाणोलीस जाऊन । नागझरींत स्नान करून । समाधीचें घ्यावे दर्शन  । प्रेमपूर्वक भक्तीनें  ।।१८१।। समर्थांच्या चरण स्पर्शेकरून । दाणोली झाली वैकुंठभुवन । गंगेपरी झाली पावन  । नागझरी तिर्थ रूपानें ।।१८२।। श्रद्धेनें येथील माती । जरी लावाल भाळावरती । ताप शमून सुखप्राप्ती । सहज तुम्हां लाभेल ।।१८३।। इतुकेंच काय घ्यावी प्रचिती । सौरभावरील पावन विभूती । भक्तीनें लांवितां भाळावरती । कार्य सुलभ होईल ।।१८४।। तेणें समर्थांचे वाङमयरूप । तुमच्या आणिलें मी समीप । जेणें हरावा भवताप । समर्थ कृपा कारणें ।।१८५।। आषाढ शुद्ध एकादशीला । सौरभग्रंथ पूर्ण झाला । भाऊदास कृतार्थ झाला । आनंद ओसंडून वाहतसे ।।१८६।। अनंत कोटी ब्रम्हांडनायक । राजाधिराज योगीराज । श्री सद्गुरु सच्चिदानंद । साटम महाराज की जय ।।१८७।। 

इति श्री भाऊदास विरचित । समर्थ सौरभ ग्रंथस्य पंचदशोSध्याय गोड हा  ।श्री दत्तात्रेयार्पणमस्तु  । शुभं भरती। श्रीरस्तु ।


Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]