॥अथ तृतीयोऽध्याय:॥

श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ हे वामदेवा अघोरा । तत्पुरूषा ईशाना ईश्र्वरा । अर्धनारी नटेश्र्वरा । गिरिजारंगा गिरीशा ॥२॥ धराधरेंद्र मानससरोवरीं । तूं शुद्धमराळ क्रीडसी निर्धारीं । तव अपार गुणांची परोपरी । सर्वदा वर्णिती आम्नाय ॥३॥ नकळे तुझें आदिमध्यावसान । आपणचि सर्वकर्ताकारण । कोठें प्रकटसी याचें अनुमान । ठायी नपडें ब्रह्मादिकां ॥४॥ जाणोनी भक्तांचें मानस । तेथेंची प्रकटसी जगन्निवास । सर्वकाळ भक्त कार्यास ।स्वांगें उडी घालिसी ॥५॥ जैसी सदाशिवाची कीर्ति । तैसीच अवताराची प्रकृती । देवापरीच कार्य करिती । प्राणिमात्र उद्धाराया ॥६॥ विचित्रपणें  लीला करिती । वैचित्र्यपूर्ण बोल बोलती । विचित्रपणें कार्य साधिती । अतर्क्य अगम्य वाटतसे ॥७॥ कधीं दाखवोनी चमत्कृती । भक्तां मनोवांछित ते देती । ऐसी ही संत संगती । महद्भाग्यें लाभतसे ॥८॥ असो गाडीवानाच्या संगती । समर्थ सावंतवाडीत येती । वेड्यापरी फिरत राहती । नग्न होऊनि गावांत ॥९॥ दाढी वाढली मुखावर । जटाभार होता शिरावर । कांबळं घेऊनि खाद्यांवर । फिरतानां दिसती सर्वत्र ॥१०॥ सर्व सामान्य जनांत । चर्चा चाले आपसांत । हा कोण वेडा भटकत । असतो गावांत कळेना ॥११॥ त्याची वेडसर वृत्ती पाहून । टवाळकी करिती दुष्टजन । शाळकरी मुलेंही वेडवून । दगड मारिती त्या गमतीनें ॥१२॥ परि महाराज न बोलती । मूकपणें घाव सोशिती । स्वतःची ही निंदानलस्ती । शांतपणें साहती ते ॥१३॥ त्यांचे ऐसे हाल पाहून । कळवळ्यानें धावे गाडीवान । सर्वांग त्यांचें पुसून । भोजन प्रेमें भरवितसे ॥१४॥ तो एकटाच होता जाणून । जन न जाणती मोठेपण। अज्ञानानें मनोरंजन । कैसें करुन घेती हे ॥१५॥ समर्थांस विचारी गाडीवान । त्रिकालदर्शी तुम्हीं सर्वज्ञ । मग शारीरिक क्लेश करून । कशाला घेतां कळेना ॥१६॥ टांकीचे घाव सोसून । मूर्ति घडते सुंदर छान । मग कारागिरावर रागावून । चालेल कां सांगावें ॥१७॥ जैसा सोटा कुंभाराचा । सांगतो ना पक्का कीं कच्चा । तैसा सोशितों निंदेचा । सोटा, परिपक्व ठरावया ॥१८॥ ऐसें ऐकता वचन । निरुत्तर झाला गाडीवान । अंतरीं आदरभाव ठेवून । स्वयें सन्मान करीतसे ॥१९॥ महाराजांचें अगोदर । दोन ख्रिस्ती होते वेडसर । वाडींत फिरती घरोघर । परिचीत होते लोकांना ॥२०॥ त्यांचीही हेटाळणी करिती । ऐशाच परी त्रास देती । परि ते दोघे प्रेम करिती । समर्थांवरती अत्यंत ॥२१॥ भिक्षा आणिती मागुन । सवें महाराजांना घेऊन । भोजन करिती मिळून । आनंदानें तिघेच कीं ॥२२॥ ऐंसे पहातां लक्षण । लोकांना वाटे विलक्षण । कैसें यांचे वेडेपण । जगा वेगळें कळेना ॥२३॥ समर्थांच्या उजव्या खांद्यावर । एक जखम होती भयंकर । ती कुजुन पिकतां अंगावर । किडी वळवळत राहती ॥२४॥ आंबोलीच्या अरण्यांत । समर्थ असतां साधनेंत । वाटे वाघाच्या तडाख्यांत । तेंव्हा होते सांपडले ॥२५॥ पंजा मारूनि खांद्यावर । जखम केली भयंकर । तीं ओली राही जोंवर । तोंवर फिरती वाडींत ॥२६॥ वाण्याच्या दुकानांत जाती । म्हणे गुळ द्यावा मजप्रती । माझी पोरें उपाशी राहती । किती दिवसांपासुनियां ॥२७॥ कटकट नको म्हणून । तो गुळ देतसे काढून । त्याचा चुरा करून । जखमेंत हळुवार भरती ते ॥२८॥ गूळ भरतां जखमेंत । किडी होत्या वळवळत । त्या खालीं होत्या पडत । जखमेमधून बाहेर ॥२९॥ त्यांना हळूच पकडती । पुनश्र्च जखमेंत ठेविती । नका जाऊं रे म्हणती । आपुल्या घराला ॥३०॥ ऐसें वारंवार येती । जखमेंत गूळ भरती । लोक आश्र्चर्यानें बघती । जगावेगळा म्हणून ॥३१॥ ऐसा भरतां भरतां गूळ । जखम गेलीसे समूळ । तिची निशाणी मात्र मूळ । जागेवर तैशीच राहिली ॥३२॥ पुढें सोडुनि सावंतवाडी । दाणोली गांवांत राहती । परि तेथें ही न ओळखिती । जन त्यांना कोणीच ॥३३॥ जटा दढी वाढलेली । खांद्यावर होती कांबळी । हातांत होती ताटली । वेड्यापरि हिंडती तें ॥३४॥ कधीं गोणपाट नेसती । कधी नंगेही फिरती । ऐसी पाहुनी ही व्यक्ती । तिरस्कार वाटे सर्वांना ॥३५॥ कधी जाती कुणां घरी । म्हणे माय भिक्षा दे तरी । तों ती आणतां दारीं । सहज टोकिती तिजला ॥३६॥ करंज्या आहेत घरांत । कां न त्या घालिशी भिक्षेंत । ती घेऊनि येतां दारांत । अदृश्य तेथून होती ते ॥३७॥ ऐसा अनुभव दाणोलींत । घराघरांतुनी होता येत । तेंव्हां लोक झाले शंकित । वेडा कैसे म्हणवें या ॥३८॥ थोडे कुतुहल झालें ऊत्पन्न । आदर जागला मनांतून । टवाळी न करिती सर्वजण । हवें तें देऊं लागले ॥३९॥ एक नबीसाहेब म्हणून । वृद्ध होता मुसलमान । तो जांता रस्त्यांतून । समर्थ समोर भेटले ॥४०॥ त्याने घालोनि लोटांगण । अल्ला म्हणूनि केलें वंदन । तें पाहिलें समोरून । येण्याऱ्या एका व्यक्तिनें ॥४१॥ म्हणें काय हे वेडेपण । वेड्यांस घालतां लोटांगण । काय अल्ला या समजून । नमाज ऐसा पढलां कीं ॥४२॥ वृद्ध हांसला मनांतून । तुम्हां न झाली यांची जाण । तुम्ही अज्ञानी मूढ जन । पुढे येईल कळोनी ॥४३॥ माझ्या दृष्टीचें अधूपण । यांनींच काढिलें तेज देऊन । हाचि अल्ला देव जाण । याची प्रचिती येईल ॥४४॥ याचे चमत्कार पाहून । लोक येतील याला शरण । राजेमहाराजे ज्ञानी जन । दया याचना करतील ॥४५॥ माझे हे भविष्य जाण । इहजन्मीं येईल कळोन । दाणोलीचें भाग्य पूर्ण । याच्या पदकमळानें उजळेल ॥४६॥ अण्णाबुवा वसईकराला । श्रीदत्ताचा दृष्टांत झाला । माझ्या दिगंबर स्वरुपाला । बघण्यांस यावें दाणोलींत ॥४७॥ प्रथम न आणिती मनांत । तेणें पुनश्र्च झाला दृष्टांत । श्रीदत्तात्रेय ठेविती वरदहस्त । अण्णाबुवांच्या मस्तकीं ॥४८॥ नमस्कार करण्या बघती वर । तों तेथें नव्हते गुरुवर । एक नंगा फकीर । हांसत उभा पाहिला ॥४९॥ प्रकाश होता सभोंवार । तेजःपुंज होतें शरीर । दाणोलीस ना येणार । म्हणुनि अदृश्य जाहले ॥५०॥दत्तजयंतीचा दिवस साधून । दाणोलीस आले धांवून । धर्मशाळेंत उतरून । वाट पहात बैसले ॥५१॥ श्रीदत्तात्रेय, दीन दयाळा । वाट पाहुनि शिणला डोळा । जीव माझा अधिर झाला । दर्शन घ्याया तुमचें हो ॥५२॥ तुमचे दृष्टांताकारण । आशेंत गुंतलों येऊन । निराशा न व्हावी दारूण । श्रीपादवल्लभा नरहरी ॥५३॥ ऐसें बोलतां मनांतून । तों प्रकटले दत्त म्हणून । नग्न साधुपरि येऊन । सस्मित मुखें बोलले ॥५४॥ पूजा घ्यावी उरकून । मुक्त करावें दत्तवचनांतून । ऐसी पटता मनीं खूण । साष्टांग लोळण घेतली ॥५५॥ नागझरीस नेऊन । अभ्यंग घातलें स्नान । वरी सुगंध लेपन करून । भगवें वस्त्र नेसविलें ॥५६॥ शोडषोपचारें पूजा करूनी । ऊच्चरवें जयजयकार करोनी । श्रीदत्त साटमेश्वरा वंदूनि । कृतार्थ जीवनीं जाहले ॥५७॥ अनंतकोटी ब्रह्मांडनायक । राजाधिराज योगी एक । सच्चिदानंद सद्गुरु प्रमुख । समर्थ साटम महाराज हे ॥५८॥ जयजयकाराच्या घोषणेंत । दाणोली झाली जागृत । त्यागी, भोगी, रोगी भक्त । धांवती मधमक्षिकांपरी ॥५९॥ वाटें गंगा प्रकटली दाणोलींत । सकलजन पापक्षालनार्थ । जो तो धांवे दाणोलीप्रत । दर्शनें पावन व्हवया ॥६०॥ हिन्दु ख्रिश्चन मुसलमान । पार्शी बंगाली इतरेजन । संत महंत ज्ञानीजन । दर्शनाकारणें येती हो ॥६१॥ पंढरींत जैसा रखुमावर । रामेश्र्वरांत जैसा रामेश्र्वर । दाणोलींत तैसा साटमेश्र्वर । सर्वांमुखीं जाहला ॥६२॥ सावंतवाडीचे प्रजापती । बापूसाहेब होते नृपती । न्यायप्रिय धर्मप्रीती । ऐसी सुकीर्ति गाजतसे ॥६३॥ दयाळु कृपाळु राजावरती । जनतेची होती अतप्रीति । प्रजापालनाची कर्तव्यनीती । दक्षतेनें ते आचरती ॥६४॥ ही सरकारस्वारी श्रीमंत । बैसोनियां मोटारींत । दाणोली मार्गें होती जात । कामानिमित्त बाहेरी ॥६५॥ ऐसे श्रीमंत असतां जात । मध्यभागीं रस्त्यांत । एक वेडा होता लोळत । आणि ओरडत तैसाची ॥६६॥ गाडीसमोर येऊन । थांबवली ती ओरडून । थांबली गाडी कां म्हणून । राजेसाहेब विचारती ॥६७॥ म्हणे वेडा कोणी रस्त्यांत । आडवा पडला पुढ्यांत । हातानें असे खुणवीत । म्हणून गाडी थांबविली ॥६८॥ तेंव्हा चिटणीस खाली उतरून । चौकशी येती करून । वेडा अथवा अवलिया म्हणून । सांगते झाले तयांना ॥६९॥ पुनश्र्च गाडी चालू करिती । तो वेडा येऊनियां पुढती । ओरडून सांगे श्रीमंतांप्रती । कशास पळतो दिल्लीला ॥७०॥ येथोनी परतावें माघारी । ताट निवतें वाड्यावरी । ऐसें सांगे परोपरी । गाडी मागें ढकलीतसे ॥७१॥ वेड्याचे ऐकता उद्गार । नकळत केला विचार । वाड्यावर फिरती सत्वर । तों प्रचिती तेथेंच पावली ॥७२॥ दिल्लीवरील महत्वाचा । लखोटा होता हुकुमाचा । तो पाहतां भाग्याचा । लाभ त्यांना जाहला ॥७३॥ दिल्लीस जाण्याचें कारण । समूळ गेलें निघून । त्या वेड्याचें वचन । साक्षात सत्य झालें कीं ॥७४॥ कोण कोठला म्हणून । चौकशी आले करून । आशीर्वाद घ्याया कारण । पुनश्र्च जाती दर्शना ॥७५॥ विश्र्वास बैसला अंतःकरणीं । विनम्र झाले साधुचरणीं । गुरू आपुला म्हणूनी । त्यांचे जन्माचे झाले दास ॥७६॥ बापूसाहेब लागतां चरणी । जन पाहती आदरें करोनी । तैसेंच राजगुरू म्हणुनी । मान्यता समर्थपावले ॥७७॥ परि समर्थ आपल्याच मस्तींत । नित्य राहती धुंदींत । अलख निरंजनाच्या स्थितींत । फिरती अवधूतावस्थेंत ॥७८॥ कधीं वस्त्र नेसती जरतारी । छाटी धोतर लुगडें भारी । परि लहर फिरल्यावरी । काढून नग्न फिरती ते ॥७९॥ कधीं झोपती बहुत दिन । कधीं न जेवती कित्येक दिन । कोणी भरवितां घेती जेवण । लहान मुलांपरीच ते ॥८०॥ जिभेवर घेती अन्नकण । जिभेनेंच घ्यावा उचलून । ऐसें भक्तांसी सांगून । उचलावयां लावती ते ॥८१॥ उच्चनीच न पाहती । कोणासही घेण्यांस सांगती । आणि त्याची दैवगती सहज बदलून जातसे ॥८२॥ भयंकर चिडलेल्या स्थितींत । शिव्यांची करिती बरसात । दगड घेऊन धांवत । फिरती कुणांस माराया ॥८३॥ परि शिव्या देती ज्यास । अथवा दगड मारतील त्यांस । भाग्य आले उदयांस । ऐसा अनुभव येतसे ॥८४॥ परि राग राहे किंचित वेळ । अढळ शांती थोडा वेळ । बालोन्मत्त पिशाच्च वृत्तींत । सदैव दिसती सकलांना ॥८५॥ असतां बालोन्मत्त स्थिती । वृद्ध स्रियेला सांगती । मज घ्यावें कडेवरती । हट्ट करिती विचित्र ॥८६॥ परि घेतां ती उचलोन । तिज न वाटे कांही वजन । फुलांपरी हलके होऊन । फिरत राहती कडेवरी ॥८७॥ कधीं उंच कधीं ठेंगणे । नाना रुपेंही बदलणें । नाना रंगही दाखविणें । ऐसे खेळ चालतीनित्याचे ॥८८॥ अनेक भाषाही बोलती । हिंदी मराठी मालवणी गुजराथी । उर्दु शायरीही गाती । एकतारी वाजवुनी ॥८९॥ ऐसी पाहूनियां मूर्ती । लोकांची जडली प्रीती । अंतरी जागतसे भक्ती । गर्दी प्रचंड होतसे ॥९०॥ एकदां समर्थ असतां रागांत । मुसलमान स्रीयेला होते मारित । तुला सोडणार नाहीं म्हणत । बेदम मारिते झाले ते ॥९१॥ समर्थांना घडविण्या अद्दल । एका दुष्टानें लढविली अक्कल ।पोलीसांना नेले त्या तत्काळ । बाईच्या मुलास सांगुनी ॥९२॥ पोलीसांनी केले बंदिस्त । जेंव्हा केस आली कोर्टांत । भक्त झाले चिंताग्रस्त । काय करावें कळेना॥९३॥ घेऊनि जाता न्यायमंदिरांत । वायंगणकर होते सोबत । म्हणति या इंद्र दरबारांत । जाऊनी नमस्कार करावा ॥९४॥ मीही करीन नमस्कार । तैसा तूंही करावा नमस्कार । आणि न्यायाधिशासमोर । हात जोडीले दोघांनी ॥९५॥ सारासार करितां विचार । न्यायाधिशानेंकेला उच्चार । सुटका करीन जामिनावर । हमी देत असेल कोणी ॥९६॥ तेंव्हा वायंगणकर पुढें येती । हमी देऊनी करिती मुक्ती । जयजयकार सर्व करिती । भक्तगण मिळोनियां ॥९७॥ पुढें वायंगणकरांचें घरांत । समर्थ राहिले मालवणांत । घर झालें रुपांतरीत । समर्थ मंदिर म्हणोनियां ॥९८॥ ज्या बाईस होतें मारीत । तिचा पति होता घटका मोजित । प्लेगच्या सांपडला साथींत । दूर कोठल्या गांवांत ॥९९॥ त्याने स्वप्नांत पाहिलें । फकिराने पत्नीस बडविलें । बोबडी वळतां जागे झाले । सर्वांग डबडबलें घामानें ॥१००॥ तीन दिवस होता बेशुद्धींत । पाणी मागण्या झाला जागृत । स्नेंही झाले आनंदित । उठला म्हणोनी बिचारा ॥१०१॥ घरीं येऊनियां हकिकत । पत्नीस होता सांगत । तेंव्हा खात्री पटली मनांत । कां मारिलें समर्थांनी ॥१०२॥ समर्थ चरणीं दोघे जाती । क्षमा याचना करिती । समर्थ हांसोनी बोलती । उद्देशून स्रियेला ते ॥१०३॥ मज अल्लाच्या दरबारांत । जावें लागते न्यायाप्रत । आतां नाही संसारांत । चिंता कोठली तुम्हाला ॥१०४॥ ऐसी हकिकत जाणून । विचार करिती सर्वजण । समर्थांचा शिव्यामार खाऊन । धन्य होण्या ईच्छिती ॥१०५ ॥ परि जैसा भाव तैसा तारी । शिवसाटम सौख्यकारी । विश्र्वास ठेवावा चरणांवरी । अढळ निर्मळ अंतरी ॥१०६॥ शिवसाटम सौख्यकारी । शिवसाटम भद्रकारी । शिवसाटम कल्याणकारी । दिन रजनी त्यां स्मरावें ॥१०७॥ शिवसाटम दुःखहारी । शिवसाटम ताप हारी । शिवसाटम मृत्यु हारी । मोक्ष दातां एकलाची ॥१०८॥ शिवसाटम कल्पद्रुम । शिवसाटम विश्राम । शिवसाटम आराम । जीविताचा असावा ॥१०९॥ ऐसा भाव मनांत ठेवून । भाऊदास करीतसे नमन । यावें व्हावें विनम्र शरण । विकल्प अंतरीं ठेवूं नका ॥११०॥ 

इति श्री भाऊदास विरचित । श्री समर्थ सौरभ ग्रंथस्य तृतीयोऽध्याय गोड हा । श्री सांबसदाशिवार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]