॥ अथ चतुर्थोऽध्यायः ॥

श्रीगणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ जय जय मदनांतका मनमोहना । मद मत्सर कानन दहना । हे भवपाश निकृंतना । भवानी रंजका भयहारका ॥२॥ हिमाद्रिजामाता गंगाधरा । सिंदुरवदन-जनका कर्पूरगौरा । पद्मनाभ-मनरंजना त्रिपुरहरा । त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥३॥ नीलग्रीवा सुहास्यवदना । नंदिवाहना अंधकमर्दना । गजांतक-दक्षक्रतु-दलना । दानवदमना दयानिधे ॥४॥अमित भक्त प्रियकरा । ताटिकांतकपूज्य त्रितापहारा । तुझे गुण वर्णाया दशशतवक्त्रा । शक्ती नव्हेचि सर्वथा ॥५॥ एका सायंकाळच्या शुभवेळीं । दर्शनार्थ जमली मंडळी । भजनी मंडळीही आली ।सेवा रुजु करावया ॥६॥ समर्थ बैसले गादीवर । भगवी छाटी अंगावर । प्रसन्नमुद्रा होती सुंदर । शांतस्वरूप ते दिनीं ॥७॥ समया लाविल्या बाजूस । उदबत्त्यांचा सुटला वास । रंग चढतसे भजनास । मस्तीत दंग जाहले ॥८॥ तेंव्हां शास्त्री सातवळेकर । मुलास आणिती बरोबर । आणि समर्थांच्या पायांवर । स्वयें घालिती मुलाला ॥९॥ समर्थ बोलिती शास्त्रींस । मुलाला बसवा गाण्यांस । तों उपरणें लाविती डोळ्यांस । अश्रु दाटले म्हणून ॥१०॥ जन्मापासूनि मुका  बहिरा । आज वर्षे झाली बारा । कसा होईल पुत्र बरा । चिंता मजला जाळितसे ॥११॥ तेव्हां जवळ घेऊनि मुलाला । तोंडावरुनि हात फिरविला । किल्ली लावुनि कुलुपाला । शास्त्री ! पहा उघडतों मी ॥१२॥ ऐसे बोलुनि सांगती । भजनी मंडळींत बैलविती । शास्त्रीही पुत्रा संगतीं । जवळी जाऊनि बैसले ॥१३॥ जैसा भजनाला चढला रंग । धुंदींत आला भक्तवृंद । उच्चरवाने पांडुरंग । पांडुरंग गाऊं लागले ॥१४॥ समर्थ उठले गादीवरून । मंडळींत गेले मिसळून । स्वतः नाचती ते जाऊन । पांडुरंग हरी, नारायण हरी ॥१५॥सर्व सभाही उठून । गाऊं लागली कीं नाचून । तों मुलाच्या मुखांतून । ऊत्स्फूर्त शब्द निघाले हो ॥१६॥ “हंसतमुख या साटमठाईं । चित्त धरावें त्यांचे पायीं” । ऐसी ऐकतां सुंदर ओवी । शास्त्री गहिंवरून गेले कीं ॥१७॥ तूं मुक्यासी देशी वाणी । याची साक्ष पटली तत्क्षणीं । जयजयकारांच्या गर्जनांनीं । अवकाश सर्व दुमदुमलें ॥१८॥ अघटित ऐसी बघतां करणी । शास्त्री लागती समर्थ चरणीं । जन्म जन्मांतरींचा ऋणी । म्हणती गुरुदेव मी जाहलों ॥१९॥ परि लहर कधीं लागेल । अथवा कधीं ती फिरेल । याचा नसे काळवेळ । चंचल वृत्ती दिसतसे ॥२०॥ क्षणांत कधी ते हंसतील । क्षणांत कधीं ते चिडतील । क्षणांत ते शांत होतील । मृदु निष्ठुर तैसेची ॥२१॥ एका चैत्राच्या ऐन दुपारीं । प्रखर सूर्य होता डोक्यावरी । समर्थ संतापले कुणावरी । राग आवरे ना कुणांस ॥२२॥ छाटी नेसली ती सोडून ।स्वयें होऊनियां नग्न । सभा सर्व लाथाडून । बाहेर अंगणीं येती ते ॥२३॥ मज घालावी आंघोळ । मज घालावी आंघोळ । ऐसे बोलती तें बोल । आकाशाकडे बघोनियां ॥२४॥ शिष्य करिती तयारी । परि समर्थांची ऊग्र स्वारी । उभी न राहे जागेवरी । राग संताप वाढतसे ॥२५॥ भिरभिर फिरती अंगणांत । उंच करोनियां हात । आकाशाकडे राहती बघत । आंघोळ घाल म्हणोनियां ॥२६॥ निरभ्र त्या आकाशांत । सूर्य होता कीं तळपत । प्रखर गरमींने आसमंत । पूर्ण भरला ते दिनीं ॥२७॥ तोंच ढग आले समोरून । सूर्यास टाकिले त्यांनीं झाकून । पाऊस आला कीं भरून । सचैल स्नान घातलें ॥२८॥ तेंव्हा होऊनियां शांत । सर्व परतले कीं घरांत । समर्थ येतां खुषींत । कव्वाली गाऊं लागले ॥२९॥ एकदां समर्थ असतां खुषींत ।बापूसाहेब येती दर्शनार्थ । बोलावुनियां मित्र कलावंत ।बाबूराव पेंटर म्हणुनियां ॥३०॥ पेंटर होते फोटोग्राफर । त्यांच्या मनांत येई विचार । समर्थांच्या फोटोवर । पैसे मिळतील चांगले ॥३१॥ परि गुप्त ठेविती मनांत । कुणा न ऐसे सांगत । वायंगणकरांचे मार्फत । विनंती करिते झाले कीं ॥३२॥ बापूसाहेबही सम्मती देती । तैसे वायंगणकरही विचारती । सहज देतां अनुमती । आश्र्चर्य सर्वांना वाटलें ॥३३॥ पडत्या फळाची आज्ञा घेऊन । कॅमेरा येती घेऊन । फोटोही काढिले एकूण । अठरा पध्दतींत वेगळ्या ॥३४॥ अंगांत छाटी गळ्यांत हार । समर्थ बैसती व्याघ्रासनावर । कधीं बैसती ते खुर्चीवर । फेटा बांधून कोल्हापुरी ॥३५॥ कधीं नेसले शर्ट धोतर । कधी नग्न श्रीदिगंबर । असे धरुनियां अवतार । फोटो काढू देती ते ॥३६॥ सर्व काढून झल्यावरती । ‘बरें यावें रामराम’ म्हणती । पेंटरही खुशीत दिसती । नमस्कारोनियां निघती ॥३७॥ जैसे ते जाती निघून । समर्थ हंसले खदखदून । यावरती पैसे मिळवून । श्रीमंत होशिल ना रे ॥३८॥ दुसरें दिवशीं आनंदून । नेगेटीव्ह बघती धुवून । तों आशेवर पडलें विरजण । निराश अंतरी जाहले ॥३९॥ एकाही नेगेटिव्हवरती । समर्थांची प्रतिमा नव्हती । पेंटर हिरमुसले होती । गर्व हरण जाहला ॥४०॥ मनांत केला जो विचार । तो निघून गेला वाऱ्यावर ऐसा समर्थांचा चमत्कार । नास्तिका दूर ठेविती ॥४१ परि भाविक आणि श्रध्दावान । यांचा ठेवूनियां मान । फोटो देती काढून । तेचि ऊत्तम येती हो ॥४२॥ दांडेकर आणि करमळकर । यांचे फोटो आले सुंदर । तेचि आज घरोघर । सर्वत्र दिसती पूजनीं ॥४३॥ मालवणीचे गजानन वायंगणकर । यांचे श्र्वशूर कृष्णाजी पाटकर । एकमेकां सांगती सुंदर । कथा संत विभूतिंच्या ॥४४॥ तेव्हां काका पाटकर वदती । दोणोलीस आहे कोणी व्यक्ति । अवलिया म्हणुनि ओळखिती । चमत्कार पुष्कळ ऐकिले ॥४५॥ वाटे एकदा घ्यावें दर्शन । सुट्टींत यावें जाऊन । मजसंगे यावें गजानन । उभयतां जाऊं बरोबरी ॥४६॥ परि वडिल होते बिछान्यांत । गंभिर नाजूक ऐशा स्थितींत । गजानन होते पितृभक्त । निर्णय घेऊं न शकती ॥४७॥ तोंच ताई पुढती  येऊन । म्हणें गजानना यावें जाऊन । निश्र्चिंत घ्यावें संत दर्शन । तात चिंता करु नयें ॥४८॥ त्यांचे घेऊनिया दर्शन । आशिर्वाद घ्यावा मागून । आपुल्या वडिलांचें कारण । विलंब मुळी करूं नयें ॥४९॥ ऐसी ताईची मिळता संमती । उभयतां दाणोलीस जाती । सद्भाग्ये समर्थ भेटतीं । कट्ट्यावर बैसले दुकानाच्या ॥५०॥ हार घालोनियां गळ्यांत । गजानन घाली दंडवत । मनोभावें होते प्रार्थित । वडिलांचे करिता तें ॥५१॥ हार काढोनियां गळ्यांतला । तो गजाननाला घातला । म्हणे देव पाहील कसोटीला । सिद्ध असशील काय रे ॥५२॥ तेव्हां मिठी मारुनि चरणीं । सांगे तुम्हींच घ्यावें साभाळूनी ।आम्ही बालक मूढ अज्ञानी । कसें उतरूं कसोटीला ॥५३॥ तेव्हां समर्थ बोलती हंसून । घरच्या देवास सोडून । इथें येण्याचें कारण । काय होतें रे तुजला  ॥५४॥ तुझे वडिल असतां आजारी । योग्य न इथें येणें तरी । पितृचरण सेवा खरी । हीच ईश्र्वर सेवा असतांना ॥५५॥ ऐसे ऐकतां भाषण । गजाननाचे उघडले लोचन । सिद्धत्वाची पटली खूण । त्वरित येति परतोनी ॥५६॥ वडिलांच्या मृत्युनंतर । मालवणांत आली मोटार । तोंच गर्जला जयजयकार । समर्थ आले म्हणोनियां ॥५७॥ लगबगें बाहेर येती । तों समर्थ उभे दारापुढती । ललाटी लाविली तिथली माती । तटस्थ उभे राहती ॥५८॥ हें माझें घर, हें देवाचें घर । ऐसे काढोनि उद्गार । आंत जाऊनि पलंगासमोर । स्तब्ध उभे राहिले ॥५९॥ अश्रु ओघळती नयनांमधून । जणूं श्रद्धांजली केली अर्पण । परि तात मृत्युची जाण । कैसी कोणी दिली असे ॥६०॥ परि त्याच दिवसापासून । हे माझे घर समजून । गजाननासी पुत्र मानून । येते झाले अधिमधि ॥६१॥  नवी गाडी घेतली म्हणून । पत्नी पार्वतीसवें बैसून । श्रीमंत येती दर्शनाकारण । समर्थ पदपंकजी एकदां ॥६२॥ नमस्कार केला उभयतांनी । तोंचि सांगितले समर्थांनीं । चिंता न करावी म्हणुनी। तुजही वांचविन ॥६३॥ समर्थ वचनाचा कांहीं । अर्थ बोध झाला नाहीं । ऐसी गूढ वचनें नेहमीं । बोलत असतां आढळती ॥६४॥ पुढें आठ दिवसांची कहाणी। मार्गस्थ असतां घाटांमधुनी । झेप मारिली वाघानें । मोटारीवर त्यांचिया ॥६५॥ तत्क्षणीं झाडिलें पिस्तूल ।परि प्रयत्न गेला फोल । तोंचिं सांवरुनिया तोल । पत्नी पिस्तूल झाडितसे ॥६६॥ नेम लागला बरोबर । तैसा वाघ पडलासे समोर । वचन बोलिले जें गुरुवर । प्रत्यय त्याचा आला कीं ॥६७॥ तीच गाडी समर्थचरणीं । अर्पण केली श्रीमंतांनीं । आणि व्याघ्रचर्म काढोनी । सद्गुरु चरणीं अर्पियलें ॥६८॥ जवळी असतां सुंदर गाडी । क्वचितची ते ती वापरती । परंतु ते नित्य फिरती । सर्विस गाडीमधून जनतेच्या ॥६९॥ समर्थ बैसती ज्या गाडींत । भक्त मंडळी शिरती तींत । मग गाडी जाई धांवत । समर्थ सांगतील तिकडे ॥७०॥ नियोजित मार्ग सोडून । समर्थ आज्ञेने जाती घेऊन । गाडी निघे वाडीमधून । मालवणांत येई अखेर तीं ॥७१॥ मार्गांतील प्रत्येक खेड्यांत । जन लोटती असंख्यांत । गाडी होई सुशोभित । गच्च फुलांनी पूर्णत: ॥७२॥ ज्या ज्या धांवतसे खेड्यांत । समर्थ सत्कार होई उत्स्फूर्त । जयजयकाराच्या गर्जनेंत । आनंदा उधाण येई ॥७३॥ अखेर येती मालवणांत । सवें घेऊनि असंख्य भक्त । आणि गजाननाच्या घरांत । मुक्काम पडे सर्वांचा ॥७४॥ पत्नी अहिल्या, ताई बहीण । तयार करिती उत्तम भोजन । सर्व तृप्त होती जेवून । कुणी न राही उपाशी ॥७५॥ असंख्य समुदाय असून । कधी न संपले त्यांचें अन्न । वाटे अन्नपूर्णा होती प्रसन्न । अक्षय थाळी लाभली कीं ॥७६॥ परि या खेळाचा कर्ता करवितां । प्रभु प्रत्यक्ष तेंथें असतां । अनंत करानें झाला देता । समृद्धता कृपेनें ॥७७॥ हें माझें घर, हें देवाचें घर । ऐसें बोलले जें गुरुवर । तेणें हा सुभक्त संसार । समर्थ स्वयें चालविता ॥७८॥ डाॅक्टर इनामदार नांवाचे । एक भक्त होते साईंचे । त्यांना वेड होतें अध्यात्माचें । तेणें शिर्डीस ते राहती ॥७९॥ साईबाबांचा घडतां सहवास । अंतरी झाला विश्वास । ईश्र्वरी सत्तेचा वास । प्रत्यक्ष तेथें घडतसें ॥८०॥ जरी कृपा होईल बाबांची । तरी जागृति होईल ज्ञानाची । ऐशा सुवर्ण संधीची । वाट पहात बैसले ते ॥८१॥ दिन रजनी जाती निघून ।तरी बाबा न बोलती वचन । शेवटीं जाती कंटाळून । परत फिरती निराशेनें ॥८२॥ विचार करिती ते मनांत । कीं दुसरा पहावा कोणी संत । त्याची कृपा करुनि संपादित । कार्यभाग साधुया ॥८३॥ जात असतां ते वाटेंत । एक भेटती सद् गृहस्थ । म्हणें जात असे मी दाणोलींत । संतदर्शन घ्यावया ॥८४॥ उत्सुकता जागतां मनांत । कोण कोठला कैसा संत । डाॅक्टर विचारतां तो गृहस्थ । समर्थ महिमा सांगतसे ॥८५॥ महिमा ऐकून ते डाॅक्टर । प्रसन्न झाले खरोखर । दाणोलीस येती सत्वर । त्याच गृहस्थासंगे ॥८६॥ परि दिवस जाती निघून । तरि समर्थांचे न घडें दर्शन । निराश झाले मनांतून । विचार करिती फिरण्याचा ॥८७॥ इतक्यांत दत्त म्हणून । समर्थ आले समोरून । अभंग स्वयें गाऊन । नाचून म्हणूं लागले ॥८८॥ एकावरी नाहीं तुज भरवंसा । तुजलागी पावे कोण कैसा । त्राता व्हावा तुज कोण तो कैसा । न घडे साम्यता विचाराची ॥८९॥ नित्य नवा देव, मनीं नाहीं भाव । भक्तीचा व्यर्थ आविर्भाव । काया वाचा मनीें सेवी एक संत । निश्र्चयें संसारीं उद्धरील ॥९०॥ ऐसा अभंग गाऊनी । दृढ आलिंगन देऊनी । म्हणे शिर्डीस जाऊनी । सेवा करावी तिथेंच ॥९१॥ आशीर्वाद लाभतां डाॅक्टरास । नाना विचार गेले लयास । वंदन करोनियां समर्थांस शिर्डीस जाती झाले ते ॥९२॥ डाॅक्टरला पाहूनि शिर्डीत । साईबाबा बोलती हंसत । देव भरला रे सर्वत्र । सांग कोठें नाहीं तो ॥९३॥ पुढे दृढ निष्ठा बैसली । साई सेवा केली चांगली । बाबांची त्यांना आज्ञा झाली । सौोराष्ट्रामध्यें जाण्याची ॥९४॥ साई महिम्यांचें करिता गान । संतपदी बैसले जाऊन । घोंगडीवाले बाबा म्हणून । जनांत कीर्ति पावले ते ॥९५॥ कुडाळ नांवाच्या खेड्यांत । ग्यानुमहाराज होते रहात । चांगदेवापरि होता जागृत । अहंभाव त्यांच्या अंतरी ॥९६॥ समर्थ असतां मार्गस्थ । ग्यानुसंत दिसती दुकानांत । मोटार थांबवुनि वाटेंत । मंडळीस सांगती तेधवा ॥९७॥ तुम्ही यावें चहा पिऊन । ग्यानुमहाराजांस द्यावा नेऊन । त्यांचा न करावा अवमान । अवलिया पुरुष असे तो ॥९८॥ तैसे चहाभजी घेऊन । अवलियास देती नेऊन । तों ते बोलती रागावून । आम्ही न घेऊ कुणाचेंही ॥९९॥ आम्ही स्वतःच शिजवून । खात असतों रे जेवण । ऐंसे म्हणूनि देति ढकलून । चहा भजी तत्काळ ॥१००॥ सर्व होऊनियां हिरमुसलें । समर्थांजवळी परतले । तेंव्हां समर्थ  हंसत बोलले । रांधक इला म्हणजे झाला नाय ॥१०१॥ जरि पाकशास्त्रांचे झाले ज्ञान । परि वस्तुंचे न समजलें प्रमाण । स्वादिष्ट न होईल भोजन । कोणी न खाती व्यर्थ तें ॥१०२॥ जरि संत झाले सर्वज्ञ । तरि सामर्थ्याची न होता जाण । कृतार्थ न करिती प्राणिजन । कुशल गृहिणी परी ते ॥१०३ ॥ पुनश्र्च सर्व गाडींत बैसती । तैंसें समर्थ समजोद्गारती । दुकान मोठें आहे परंतु । गिऱ्हाईक मुळींच नाहीं रे ॥१०४॥ ग्यानु महाराजांना उद्देशून । समर्थ बोलले हें वचन । सिद्ध असुन् ज्ञान प्राशन । करण्या कोणीं न जाती ॥१०५॥ समर्थांच्या मृदुल मनांत । नित्य जाणवतसे खंत । परमार्थज्ञान मार्गाचें सत्य । जाणण्या कोणी न येती ॥१०६॥ जो तो मायेंत गुरफटला । येऊनि मजजवळीं बैसला । आशीर्वाद तैसाची मागितला । कर्दमीं रुतण्याचा अधिक ॥१०७॥ तीव्र जिज्ञासा मनीं घेऊन । जो मागेल रे मार्गदर्शन । त्याला देवाचें घडवीन दर्शन । सत्य सत्य त्रिवाचा ॥१०८॥ ऐसे समर्थांचें आश्र्वासन । ऐंकता झालों मनीं प्रसन्न । आमुचे तिमिरापरि अज्ञान । समर्थसूर्या उजळा हो ॥१०९॥ कमळ जन्मले जे कर्दमांत । त्याला तुम्हींच ना देतां हात । कैसे उचलतां ते अलगद । तैसें आम्हासीं उचलावें ॥११०॥ शिवसमर्थ शिवसमर्थ । उच्चारितां नेणता अर्थ । त्याला शिवसाटम पार्थ । होऊनियां रक्षितसे ॥११२॥ शिवसमर्थ शिवसमर्थ । सुधेपरि ज्याचा अर्थ । सर्व जीवनाचा भावार्थ । पूर्णार्थानें भरला असे ॥११३॥ शिवसमर्थ शिवसमर्थ । ऐसें उच्चारितां उत्स्फूर्त । त्याचे सर्व मनोरथ । अर्थपूर्ण होतील ॥११४॥ शिवसमर्थ शवसमर्थ । हेचि होणें कृतार्थ । याहुनी अन्य पदार्थ । भाऊदासा नकोच कीं ॥११५॥ 

इति श्री भाऊदास विरचित । श्री समर्थ सौरभ ग्रंथस्य चतुर्थोऽध्याय गोड हा । श्री सांबसदाशिवार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]