॥ अथ द्वितीयोऽध्यायः ॥

श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ जेथे सर्वदा शिवस्मरण ।  तेथें भुक्ति मुक्ति आनंद कल्याण । नाना संकटे विघ्ने दारुण । न बाधतीं कालत्रयीं ॥२॥ संकेत अथवा हास्येंकरून । भलत्या मिसें शिवस्मरण । न कळतां परिसासी लोह जाण । संघटतां  सुवर्ण होई कीं ॥३॥ न कळता प्राशिलें अमृत । परी अमर करी कीं यथार्थ । औषधी नेणतां भक्षितां । रोग हरे सत्य कीं ॥४॥ तैसे न कळता घडें शिवस्मरण । परी सकळ दोषां होय दहन । अथवा विनोदें करोन । शिवस्मरण घडों कां ॥५॥ ऐसे शिवनामाचें सिद्ध पण । जाणतां आलें मनांतून ।मग संतलीलेचें स्मरण । काय लाभ होईल ॥६॥ संत म्हणजे  शिवलीला । संत म्हणजे भूमीवरला । देव साक्षात अवतरला । सकलजन हिताय ॥७॥ लीला ऐकता होईल ज्ञान । लीला बघतां कळेल थोरपण । लीला चिंतीतां कळेल कारण । संत विभूती जन्माचें ॥८॥ संत विभूती जन्मा येती । प्रभुइच्छेची  जिवंतमूर्ती । संसारांतिल उत्तम भक्ती । आदर्श होऊन दाखविती ॥९॥ विक्षिप्त वागती देहांत । विक्षिप्त बोलती जनांत । प्रत्यक्ष राहुनि संसारांत । असूनही नसत्या परीच ते ॥१०॥ त्यांना नसतो जीवनस्वार्थ । परी परोपकार कल्याणार्थ । सज्जना दाखवण्यां परमार्थ । वाक् मन काया झिजविती ते ॥११॥ हाच हेतू धरूनि मनीं। लीला दाखविती ते करुनी।त्या लीलांच्याही स्मरणीं । संत संगती लाभतसे ॥१२॥ जितुकी शिवनामाची महती । तितुकीच देते संतसंगती । विनासायास सुलभ करिती । परमार्थ मार्ग मोकळा हो ॥१३॥ असो, मागील अध्यायीं कथिलें । नारायणाचें भाग्य थोरलें । तेणें पुण्य फळासि आलें । द्वितीय पुत्र शंकर हा ॥१४॥ नारायणाची मध्यम स्थिती । त्यांत दोन पुत्रांची संगती । संसाराची परिपूर्ती । करूं न शकती गांवांत ॥१५॥ संसाराचें बघता भविष्य हित । कोकणांत नव्हता मुळींच अर्थ । म्हणूनि येती ते मुंबईत । कामाठीपऱ्यांत राहती ॥१६॥ शंकराचें बालपण । हुंदडण्यांत गेलें निघोन । कुसंगतीनें यौवनपण । विद्याविहीन गेलें हो ॥१७॥ अल्पशिक्षणें कारण । नोकरी न मिळे छान । सर्वत्र भटकून थकून । गुत्त्यावर राही  पारशाच्या ॥१८॥ तेथें दारूडे, जुगारी, सट्टेबाजी । यांची नित्य चाले बाचाबाची । ऐशा चांडाळचौकडी माजी ।  शंकर फसून गेला की ॥१९॥ जैशे शेण पडता मातींत । मातीसवें येईं हातांत । तैसें राहता कुसंगतींत । कलंक अंगी लागतो की ॥२०॥ तीच गती झाली शंकराची । अंगी वृत्ती जडली मस्तीची । दादागिरी चाले त्याची । सर्वत्र परिसरांत त्या ॥२१॥ शांत सज्जन साटमांची । निराशा झाली स्वप्नांची । आणि त्यांच्या मनोरथांची  । होळी पूर्ण झाली हो ॥२२॥ जिकडे तिकडे घराघरांत । शंकराचीच चाले बात । कैसा निपजला हा पूत । किं शाप कोणत्या जन्माचा ॥२३॥ पुत्र व्हावा ऐसा पुंडा । त्याचा तिन्ही लोकीं झेंडा । परि हा निपजला गुंडा । कुलकर्णी कलंकित करावया ॥२४॥ ऐसे सर्वत्र जन बोलती । लक्ष्मीनारायणस दूषिती। ते सदाशिवास सांगती ।काय भद्रकारका केलेंस ॥२५॥ हे आनंदवन विलासा । आमची पूर्ण केली निराशा । आमच्या सर्व आशापाशा । नजरेसमोर जाळिल्या कीं ॥२६॥ तूं सच्चिदानंद निर्मळ । परी आमुचें केले अमंगळ । तुझें हें प्रसादफळ । कुजून कैसें जातें रे ॥२७॥ हे करुणासिंधो कैरवलोचना । आमुचें काय चुकलें म्हणून । शिक्षा केलीस रे दारूण । आशापाश लावोनियां ॥२८॥ हे त्रितापशमना, त्रिलोचना । संसाराच्या सर्व विवंचना । ज्वलंत करोनि नयना ।समोर तुवां दाखविल्या ॥२९॥ हे जगदानंदकंदा कृपार्णवा । आमुच्या संसाराच्या नावा । भोवऱ्यांत गुंतवुनि डावा । सांग कोणत्या साधिलेस ॥३०॥ हे निलग्रीवा भाललोचना । तुझी केली जी उपासना । व्यर्थ गेली का कैलासराणा । आशीर्वाद भ्रष्ट होतो कां ॥३१॥ ऐसी करुणा भाकती । विषण्णतेनें दूषण देती । वाटे आपुली दृढ भक्ती । लय पावली कां इथेंच ॥३२॥ वाटे लग्न द्यावें करून । तेणें सुचले शहाणपण । सुधरेल त्यांचें जीवन । यत्न पाहती करून ॥३३॥ जनाबाईंच्या संगती । लग्नाची झाली पुर्ती । तरी पुत्र स्वभावाप्रति ।  फरक काही पडेचिना ॥३४॥ तंटे बखेडे चिडाचिड । यांची नित्य होत असे वाढ । तेणें शंकरदादाची दृढ । छाप जनांत बैसली हो ॥३५॥ पारशाच्या या गुत्त्यांत । अभक्ष भक्षण होई नित्य । सदैव दारूचा मुखास । वास त्याच्या येतसे ॥३६॥ दिवस रजनी गुत्त्यांत । पडून राही तो शांत । संसार हिताची बात । मुळींच ध्यानी येत नसे ॥३७॥ ऐसे  शंकराचें दुर्वर्तन । वडील बंधूनें जाणून । हांकलून द्यावे घरांतून । म्हणुनी सांगे वडिलांना  ॥३८॥ आप्तइष्ट परिवारांत । आपुली न राही कांहीं पत ।  शंकर नव्हे हें भूत । पलित राहील जोंवरी ॥३९॥ म्हणूनि घरांत न घेती । ताटवाटी बाहेर ठेविती । अंथरूणही फेकती । अंगणांत ते उघड्यावरील ॥४०॥ तैशा स्थितीतही शंकर । नाराज न होई कोणावर । मात्र वेळ काळी गुत्त्यावर । रात्रंदिन अधिक तो ॥४१॥ ऐसी जाणुनियां दुर्गति । माता-पिता चिंता करिती । परि पाहुनियां परिस्थिती ।कठोर अंतरी होती ते ॥४२॥ दोष  दैवाला देती । निष्फळ झाली कीं भक्ति । हे दीनदयाळ कैलासपती । अपराध आमुचा सावरावा ॥४३॥ पुत्र दिला हिरा म्हणून । परि गारगोटी निघाली छान । वंशादीप देतां विश्वासून । काजवा कोठून आला रे ॥४४॥ जरी आमच्या नव्हते नशिबांत । तरी पाप कां घातले पदरांत । ऐसी शिक्षा जन्मांत । देवा कुणां देऊं नको ॥४५॥ ऐसे नित्याचे बोलती  । शंकरास बघतां तळमळती । इच्छा तुझी कैलासपती । म्हणोनि खंगत चालले  ॥४६॥ हळूहळू दोघेजण । देवाकडे गेले निघोन । त्यांच्या उणीवेची जाण । शंकरास होऊं लागली ॥४७॥ सासू-सासरे गेल्यावरती । जनाबाई ही निघोन जाती । माहेरा परतोनी जाती । एकला सोडून पतिला ॥४८॥ ऐसे  मासा संगे मास जाती । वर्षांपरी वर्षे जाती ।  शंकरा बद्दल सहानुभूती । कुणां न राहिली तितकीशी ॥४९॥ पुढे एकोणीसशे दहा सालांत । प्लेगची आली मोठी सांथ । त्यात वहिनी गेली प्रथमांत । नंतर दादा तिच्या सवेंही ॥५०॥ ऐसी कुटुंबाची होतां विल्हेवाट । शंकर जाहला चिंताग्रस्त । अखंड राही चिंतनमग्न ।  एकलेपणा बोचतसे ॥५१॥ सर्व पाश गेले तुटोन । तेणें गुत्त्यावर राही पडोन । चित्तीं करीतसें चिंतन । काय अर्थ जगण्याचा ॥५२॥ आई वडील गेले निघोन । दादा वहिनी न येती परतेन । एक दिन माझें ही जीवन । ऐसेंची लुप्त होणार ॥५३॥ जरि नश्वर आहे जीवन । तरि शाश्वत काय म्हणोन । सत्य कोणतें चिरंतन । ओळखावें कळेचिना ॥५४॥ जें जें पाहती नयन । तें तें नष्ट होणार जाण । सच्चिदानंदचें आत्मज्ञान । कोणतें  असेल वेगळें ॥५५॥ ऐशा विचारांत मग्न । शंकर राही रात्रंदिन । रात्रीं गुत्ता बंद करून । विहिरीवर येई पारशांच्या ॥५६॥ चर्चगेट स्टेशनच्या जवळ । पारशांची आहे पवित्र विहीर । तेथे सदासर्वकाळ । पांथस्थ बैसती येऊन ॥५७॥ शंकर तेथेंच जाई । रात्र रात्र बैसोनी राही । पांथस्थांची गंमत पाही । परक्यापरी दुरून  ॥५८॥ पाणी पिण्याकरितां म्हणून । संत बैरागी येती जमून । विश्रांति सुख पावून । परमार्थ चिंतन करिती ते ॥५९॥ त्यांचें तें श्रवण कीर्तन । शंकर ऐके देऊनि कान । भगवंताचें गुणगान । आवडीनें ऐके कीं ॥६०॥ ज्याला म्हणतात भगवंत । आहे कां तो या जगांत । कैसा होईल तो प्राप्त । मजलागीं कळेना ॥६१॥ ऐसा विचार येता मनांत । तों पाठीवर पडला हात । एक अवलिया होता बोलत । काय बेटा चिंतिसी रे ॥६२॥ तुझ्या मनांतले चिंतन । मज न वाटे वेडेपण । प्रत्यक्षातचि तें शहाणपण । अज्ञानी जन नेणती ॥६३॥ जो तो धडपडतो सुखासाठीं । स्त्री पुत्र धन मानासाठीं । अक्षय सुखाची मिठी । कोणी नाहीं मागत ॥६४॥ इथें वेड्यांचा बाजारांत । जो देवास देतो चित्त । तोचि मूर्ख मूर्तिमंत । जन ऐसें मानती ॥६५॥ तरि तूं न व्हावे चिंतित । मज देवानें केलें आज्ञापित । तुझा धरोनियां हात । मार्गदर्शन करावें तुला ॥६६॥ ऐसें ऐकतां मधुर वचन । शंकराने धरिला साधूचरण । हृदय गेलें विरघळून । नवनीतापरि तेथेंच ॥६७॥ अवलिया देई आश्वासन । ज्या तेजाचें मज  घडें दर्शन । तें मी तुजला घडवीन । तरी पूर्व दिशेस जाऊं या ॥६८॥ ईश्वराच्या भेटी करतां । जितुकी आहे तुज उत्कंठा । तितुकीच तुझ्या भेटी करतां । उत्कंठा देवास लागली रे ॥६९॥ असें म्हणुनि शिरावर । सहज ठेविला वरदकर । चैतन्य संचरलें शरीरांत । कुंडलिनी जागृत जाहली ॥७०॥ तोचि ठरला अद्भूत क्षण । शंकरांत घडवी परिवर्तन । मलिनता जाऊनि पूर्ण । शुद्धात्मा जाहला निव्वळ ॥७१॥ विश्वास बैसता अंत:करणीं । सर्वस्व सोडिलें  तत्क्षणीं । शरण अवलियाला जाऊनी । पूर्व दिशेस निघाले ॥७२॥ आतां देहांत नव्हता विकार । तेजाचा घडला साक्षात्कार । निर्गुण ब्रह्माचा आविष्कार । सर्वत्र जगीं पाहिला ॥७३॥ जेथें-जेथें पाही लोचन । तेथें भगवंताचें घडलें दर्शन । सृष्टींत राहिला भरून । याचें ज्ञान अंतरीं घडलें ॥७४॥ परि कोण जाहला कैवारु । कोण भेटला सद्गुरु । जेणें घडविला साक्षात्कारु ।साटमांना प्रत्यक्ष ॥७५॥ कोण होता अवलिया । ज्याला खरीच आली दया । आणि साटमांचा काया – । पालट ज्यांनी केला हो ॥७६॥ जैसें निवृत्तींना भेटती । गहिनीनाथ  दर्शन देती । आणि आपुली चिन्मयशक्ती । कृपा प्रसादें देती ते ॥७७॥ तैसें हे अब्दुल रहेमान । सटमांना भेटती येऊन । आणि परमार्थ मार्ग सोपान । सिद्ध करिती चढावया ॥७८॥ जीवा-शिवाचें मिलन । सद्गुरु आणि घडवून । नर होतसे नारायण । याच देहीं कळतें कीं ॥७९॥ कोकणाच्या आंबोली घाटांत । साटम राहती अज्ञातवासांत । तपश्चर्या होते करित । गुरव आज्ञा वंद्य मानुनी ॥८०॥ तेथल्याच परिसरांत । नवनाथ असावे फिरत । साटमांना होते भेटत । ऐसें जन सांगती ॥८१॥ तेथे नाथअवलियांच्या संगती । त्यांची झाली तपस्या पूर्ती । आणि समर्थ होऊनियां येती । सकल जन उद्धाराया ॥८२॥ जैसा रातराणीचा सुगंध । रात्रीं न राही बंदिस्त । तैसा साटमसौरभ धुंद । जन परिसर कराया येतसे ॥८३॥ सावंतवाडीच्या गाडीतळावर । गांवचा भरतसे बाजार । सकलजनांचा होई वावर । सदासर्वकाळ तेथेंच ॥८४॥ आषाढ कार्तिक महिन्यांत । वारकरी जाती पंढरपूरांत । जयजयकार विठ्ठलाचा करीत । दिंड्या पताका घेऊनी ॥८५॥ महाराष्ट्रांतून  वारकरी येती । गाडीतळावर विश्रांती घेती । पुढें आपुला मार्ग क्रमिती । पंढरीकडे जावया ॥८६॥ सावंतवाडीचा गाडीवान । दिंडी सवें जाई म्हणून । घ्यावया विठ्ठलाचें दर्शन । प्रतिवर्षी नेमानें ॥८७॥ चंद्रभागेत करुनिया स्नान । पांडुरंगाचे घेतले दर्शन । अंतरीं झाला धन्यपूर्ण । सुखसमाधान पावुनी ॥८८॥ उदयिक निघणार परतून । तोंड काॅलऱ्यानें घेतले पकडून । अत्युच्च तापानें हैराण । होत निश्चित जाहला ॥८९॥ शुद्ध गेली हरपून । दोन दिवस राहिला पडून । तरी बरे होण्याचें चिन्ह । आता कांही उरेचिना ॥९०॥ आतां मरणार  हें जाणून । वारकरी जाती त्या सोडून । पंढरींत यावें मरण । भाग्यांत त्याच्या असेल कीं ॥९१॥ गाडीवान येता शुद्धीवर ।कोणी न दिसे बरोबर । म्हणून प्रार्थी रखुमावर । वेगें सोडवी म्हणुनी ॥९२॥ देवा या सांथीमधून । मज द्यावें जीवदान । अथवा द्यावें मरण । जैसी इच्छा तुझी रे ॥९३॥ तुझें सुंदर तें ध्यान । पाहतां पावलों समाधान । आतां खितपत ठेवून । कष्ट देवा देऊं नको ॥९४॥ ऐशा विचारानें होतां क्षीण । त्यास झोप गेली लागून । दृष्टांत झाला तत्क्षण । एक साधू दिसतसे ॥९५॥ साधु म्हणे त्या हलवून । काय झोपलास रे अजून । वारकरी गेले टाकून । तुज एकट्याला इथें कां ॥९६॥ पीठलें भात ठेवलें करून । तो जात असे निवून । तरीं लौकर यावें निघून । वाट मी पाहतसें ॥९७॥ पुनश्च त्याला हलवून । तो जात असे निघोन । तों जाग आली तक्षण । उठुनी शोधे त्याला ॥९८॥ ताप गेला अंगांतून । उत्साहित झाला मनांतून ।  विठ्ठलाचे आभार मानून । माघारी तो फिरतसे ॥९९॥ प्रेमानें करीत भजन । पताका खांद्यावर घेऊन । आंबोलीमध्यें येऊन । धर्मशाळेत उतरला ॥१००॥ तेथें ओहळावर जाऊन । हात पाय घेतले धुवून । तोंच कोणी झाडींतून । हांक त्याला मारितसे ॥१०१॥ कोण आहे म्हणून । गाडीवान पाहे वळून । तों आश्चर्य पावला मनांतून । स्वप्नांतील व्यक्ती पाहतां ॥१०२॥ व्यक्ती पाहिली जी स्वप्नांत । तीच होती हांक मारित । तेथें जाऊनियां धावतं । चरण धरिले साधूचे ॥१०३॥ वाटें कीं पंढरीनाथ । साधूच्या आला वेषांत । मज येऊनि रक्षित । उपकार कैसें फेडूं मी ॥१०४॥ ऐसे विचार येतां मनांत । तों आनंदाश्रूंना फुटली वाट । नतमस्तक झाला चरणांत । पायी मिठी मारितसे ॥१०५॥ महाराज उठवोनि बोलती । तुज पटकी कां झाली होती । उपवासी अशक्त किती । मजलागीं दिसतोस ॥१०६॥ पिठलें भात करून । ठेविलासें तुज कारण । तो जात असे निवून । मजसंगे चलावे तूं ॥१०७॥ ऐसें ऐकतां वचन । गाडीवान गेला समजून । याच विठ्ठलानें येऊन । मजा संरक्षिले निश्चित ॥१०८॥ उभयतां आले धर्मशाळेंत । तो धनगर आला नमस्कारित । शिदोरी ठेवूनियां पुढ्यांत । विनंती करू लागला ॥१०९॥ काल पत्नीच्या स्वप्नांत । महाराज तुम्ही आलांत । करण्यास सांगितले पिठले भात । दोन व्यक्तींचे तिजला ॥११०॥ तो आलों मी घेऊन । त्याचा स्वीकार घ्यावा करून । तिची इच्छा करावी पूर्ण । विनंती करितों मी ॥१११॥ ऐसे ऐकता भाषण । गाडीवान गेला थक्क होऊन । संशय फिटला मनांतून । मनोमनी वंदितसे ॥११२॥ तिघांनी केले जेवण । मनांत अति संतोषून । प्ररमोच्च आनंदाचा क्षण । सद्भाग्यें तया लाभला ॥११३॥ ऐसी साधूची प्रीति । आणि भक्तांची भक्ती । यांची स्नेहयुती । प्रीती भोजनीं जाहली ॥११४॥ पुढे आशीर्वाद निरोप घेऊन । गाडीवान निघाला तेथून । आंबोली घाट ओलांडून । दाणोली गांवांत पातला ॥११५॥ तोच हांक आली कानांवर । परिचित वाटला सुस्वर । दमलास काय येथवर । येताना वाटेत बाळा कां ॥११६॥ हात फिरविला पाठीवरून । तो अंग गेले शहारून । त्या साधूला पुनश्च पाहून । आश्चर्य अंतरीं दाटलें ॥११७॥ म्हणे बाळा तुझ्यासोबत । येतो मी वाडी पर्यंत । तुज पोहोचवावें घरापर्यंत ईश्वर इच्छा वाटतसे ॥११८॥ आतां मात्र गाडीवान । नि:संशय झाला मनांतून । हा साधु न कोणी साधारण । विठ्ठलची असावा प्रत्यक्ष ॥११९॥ घरापर्यंत करूनी सोबत । गाडीवानास केलें भाग्यवंत । ऐसे हे साटम समर्थ । प्रगट जनांत जाहले कीं ॥१२०॥ जय जय श्रीसमर्थ साटमा । तुमच्या घेतां गोड नामा । सुख शांती आणि विश्रामा । सदैव भक्ता लाभतसे ॥१२१॥ तुमची कृपा होईल जरी । जीवनास येईल माधुरी । इहजन्मीं याच संसारी । परमार्थ साध्य होईल ॥१२२॥ तुमच्या लीलांचें करितां स्मरण यातना जातात निवळून । पाप भस्मांकित होऊन । मन आनंद डोहीं डोलतसें ॥१२३॥ काया वाचा बुद्धि मन । आपुल्या पायीं असावें लीन । प्रेमानें द्यावें आलिंगन । दूर कधीं लोटूं नका ॥१२४॥ ऐसी कृपा करावी भक्तांवरी । मान्य करावी सेवा चाकरी । भाऊदास विनवी परोपरी । विनम्र चरणीं वंदून ॥१२५॥

इति श्री भाऊदास विरचित । श्री समर्थ सौरभ ग्रंथस्य द्वितीयोऽध्याय गोड हा । श्री सांबसदाशिवार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]