॥ अथ प्रथमोध्याय: ॥

श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नम:। श्री कुलदेवतायै नम:। श्री गुरुभ्यो नम:॥१॥ जय  गणेशा मंगलमूर्ति l निर्गुण ब्रह्माची उत्पत्ती।ओमकाराची सगुण मूर्ती । गौरीपुत्रा विनायका ।।२।। ब्रह्मा-विष्णु-महेश । ही तुझीच रूपे विशेष । अनंत ब्रम्हांडाधीशा । शिवसुता गजानना ।।३।। तुझी नावे अनंत ।  तुझ्या लीला ही अमित । वेदही झाले स्तिमित । कृष्णपिंगाक्ष वर्णावया।।४।। वक्रतुंडा एकदंता । विश्वावर तुझी सत्ता । अखिल सृष्टीचा उपभोक्ता । अनेक होऊनि एकलाची ।।५।। विघ्नराजेंद्रा लंबोदरा । ग्रह-नक्षत्रे शशीभास्करा । संपूर्ण विश्वाचा पसारा । भालचंद्रा चालविली ।।६।। विनम्र भावे करितो नमना । घेऊनी आलो याचना । कृपा करावी म्हणोनिया ।।७।। विकट देवा, गणपती । होऊन गुरुमूर्ति। जगामाजीं  प्रकटसी । भक्तजना उद्धराया ।।८।। तेचि झाले कृपावंत । मानवरूपी हे संत ।  यांचे गाण्या चरित्रगीत । दान पायी मागतसें ।।९।। तरी द्यावी अंत:स्फूर्ति । श्रीगणेशा मंगलमूर्ती । प्रकाशावी अल्पमति । वेदमूर्ती तुझ्या कृपें ।।१०।। आतां नमितो सरस्वती ।  विश्वेश्वराची धारणाशक्ति । शब्द ब्रह्मांडाची उत्पत्ती । जितेंद्र पासुनी जाहली ।।११। देववाणीचे ऋग्वेद । यजुर्वेद आणि सामवेद । परममंगल अथर्ववेद ।  विधीमुखें वदविले ।।१२।। तूंच भगवंतांची माया । त्याला देऊनियां काया । त्याची होऊनियां जाया । शब्दशृंगारे तो नटविला ।।१३।। वीणेवर देऊनि झंकार । सप्तसूर काढिले सुंदर । भगवंत केला साकार । शब्द सूर मिळवुनी ।।१४।। नमस्ते शारदे देवी ।  कैसे वर्णावी तुझी थोरवी । माझी विनंती ऐकावी ।  विनम्र होऊनी करितसे ।।१५।। संतांचे करावे संकीर्तन । संतांचे करावे गुणगान । ऐसी इच्छा आलो घेऊन । सहाय्य द्यावे मजलागी ।। १६।। तुझी कृपा होता परिपूर्ण । शब्दही सुचतील छान । नवरस होतील निर्माण । प्रसाद युक्त भाषेला ।।१७।। तुकारामाच्या अभंगंत । श्री ज्ञानदेवांच्या ओळींत । वाल्मीकींच्या छंदात । अक्षर वांग्मय जाहली ।।१८।। मज नाही मोठी आशा । परि न व्हावी निराशा । दुग्धशर्करा मिश्रित जैसा । भाषेस गोडवा द्यावा कीं ।।१९।। मज नाही अभ्यास ज्ञान ।  तुजवरती आहे अवलंबून । संतांचे करावे गुणगान । इच्छा प्रबळ अंतरी ।।२०।। प्रयत्न असतां परमेश्वर । सहाय करीतो खरोखर । याचा व्हावा साक्षात्कार ।  कृपा भाक मागतसें ।।२१।। आता नमितो कुलस्वामिनी । एकविरा नवलाई जननी ।  बालकाची ऐका विनवणी । पायी लुडबुड करितो ।।२२।। संसाराच्या सुखदुःखात ।  तुझाच राही वरदहस्त । लाड पुरविशी असंख्यांत । अपराध पदरी घालोनी ।।२३।। जे जे मागितले हट्टाने । तें तें पुरविले प्रेमाने । आता करितो जी यत्ने । अंगीकारावी ती विनवितो ।।२४।। तुझे असता अभयदान । मजा चिंता नाही जाणं । अढळ विश्वास ठेवून । लेखणी करीं घेतली असे ।।२५।। तरी धरूनियां हात। । अनुभव द्यावा सुखद । मनांतील उत्पन्न हेत ।  पूर्ण घ्यावा करुनियां ।।२६।। आता नमितो दत्तात्रेया । अनन्यभावे पडतो पाया । सकलजन उद्धाराया । जे अवतार घेत संतरुपे ।।२७।। अंबरीष राजाचे संरक्षण । स्वयें केलें ब्रीद राखून । दूर्वासांचा शाप मागून ।  स्वशिरी घेतला सानंदे ।।२८।। दशवतार झाले प्रख्यात । उपअवतार असंख्यांत । संत रूपाने संसारांत । वावर ते राहती ।।२९।। पूर्व पुण्य होते गाठी । म्हणोनि संतांची झाली भेटी ।  श्रीदत्तपदांबुजाची मिठी । इह जन्मोजन्मी लाभली होती ।।३०।। तीच लाभावी जन्मोजन्मी । दत्त बैसावे ह्रदय धावांनी । भक्ती घडावी ऊत्तमनामी ।याचना चरणी करीतसे ।।३१।। संतांचे करिंता गुणगान । श्रीदत्तात्रेय होती प्रसन्न । सहज भक्तीचे सोपान । चढावया मागतो मी ।।३२।। परी तुमच्या इच्छेवांचून । मी न लिहू शके प्रमाण । समर्था द्यावें वरदान ।  मति शक्ति लिहावया ।।३३।। “बाळा तुझे मनोवांछित  । पूर्ण होतील रे निश्चित ।  ऐसे माझे शुभाशीर्वाद  ।  तुजलागीं दिलें मी” ।।३४।। या आशीर्वादाचें होता स्मरण । प्रफुल्लित झाले माझे मन ।  सस्मित तरळले  तुमचे ध्यान ।  नयाना समोर माझिया ।। ३५।। चैतन्य संचारले अंगांत । दृढ विश्वास झाला मनांत  । सद्गुरु बैसोनि हृदयांत । साक्षीभूत होतील ॥३६॥ गुरुवांचुनि दत्तभक्ती । शून्यांत होते गणति । जरि हवी फलप्राप्ती । तरी गुरु करावा निश्चित ॥३७॥ परि मी आहे भाग्यवान  । स्वयें दत्तात्रेय देती आणून । भाऊकाकांस समोरून । गुरु शिष्य भेटविले ॥३८॥ गुरु भेटीचा तो शुभदिन । हृदयांत गेला ठसून । हात फिरवितां पाठीवरून । शरीर रोमांचित जाहलें ॥३९॥ मन गेले कीं हरवून । जाणही गेली शरीरांतून  । वाटे फिरलों  शून्यातून । पुनश्च आलों स्थितीत ॥४०॥ श्रीगुरूंच्या स्पर्शसंगती । वेगळीच आली अनुभूती । म्हणुनी मी अतिप्रीति । चरण धरिले हृदयांत ॥४१॥ जैसा जैसा वाढला सहवास । मज नकळत जडला ध्यास । सद्गुरु भेटीची तीव्र आस । दिन रजनी वाढतसे ॥४२॥ मज हृदयी घेती ओढून । आशीर्वच देती आनंदून । म्हणत संत चरित्राचें गान । बाळा तुवां लिहावं ॥४३॥ हीच खरी गुरुभक्ति । आदरावी तूं अतिप्रीती । तया माझी अनुमति । सदैव तुज आहे रे ॥४४॥ भाऊकाकांच्या प्रेरणेतून । तीन चरित्रे झाली लिहून । चौथ्या चरित्राची उत्पन्न । आस अंतरी जाहली ॥४५॥ परी गुरूंचे स्मरता वचन । उत्साहित झालं अंतकरण । अभयकराची होता  जाण । सत्कर्म प्रवृत्त जाहलों ॥४६॥ सद्गुरु श्रीअवधूतानंदा । साटमनंदन परमानंदा । तुमच्या पवित्र चरणारविंदा । अनंत नमनें करीतसें ॥४७॥ भाऊकाका गेले जगातून । त्यांची उणीव भासे मनांतून । परि  तुमचें घडता दर्शन । पुन: प्रत्ययानंद लाभला ॥४८॥ भाऊ काका गेले जे सांगून । त्यांचे तुम्ही केले उच्चारण । आम्हास घेतले कवटाळून । हृदयी आपल्या निरंतर ॥४९॥ प्रेम दिले अपार । भक्तीचे सांगितले सार । सत्पथाचा सुंदर । मार्ग सकलां दाखविला ॥५०॥ त्या मार्गास अनुसरून । आपल्या इच्छेचे करितो पालन ।साटम चरित्राचे छान । गान उत्तम करीन ॥५१॥ जरि वचन गेलो बोलून । तरि घाबरलो म्हणून । उत्तुंग गिरीपरी समर्थजीवन । पेलवेल का सांगावया ॥५२॥ कैलास पर्वताच्या पदतलीं । मुंगी गर्वोक्तीनें  बोलली । शिखरावर जाईन एकली । हास्यास्पद जैसे वाटतसें ॥५३॥ तैसी मज वाटे भीती । कीं माझी न व्हावी गर्वोक्ति । जरी तुम्ही द्याल शक्ति । तरी अशक्य ते शक्य होईल ॥५४॥ तेव्हा “बाबा” बोलले हसून । शंका-कुशंका काढून । नको जाऊस रे  घाबरून । सहाय्य तुजला करीन मी ॥५५॥ अदृश्य रूपाने शेजारी । माझी राहील रे हजेरी । साटम चरित्राची शिदोरी । मीच तुला भरवीन ॥५६॥ जैसे जैसे भरेल पोट । तुझ्या गाथेंत भरेल रंग । साटम चरित्राने संतृप्त । जनमन होईल सगळें ॥५७॥ ऐसे मिळता आश्वासन । अंतरी पावलो समाधान । समर्थ गाथेचे गान । करण्या पुढती सरसावलों ॥५८॥ “धन्य-धन्य तेचि जन । जे शिवभजनी परायण । सदा शिवलीलामृत पठण । किंवा श्रावण करिती पैं ॥५९॥ शिव कीर्तन नावडे अणुमात्र  । ते अत्यंत जाणूनि अपवित्र । लेईले  नाना वस्त्रालंकार । तरी ते केवळ प्रेतची ॥६०॥ शिव शिव म्हणता वाचें । मूळ न राहें पापांचें । ऐसे महात्म्य शंकराचे । निगमागम वर्णिती ॥६१॥ जो जगदात्मा सदाशिव । ज्यासि वंदिती कमलोद्भव । गजास्य इंद्र माधव । आणी नारदादि योगेंद्र ॥६२॥ जो जगद्गुरु ब्रम्हानंद । अपर्णा हृदयांब्ज मिलिंद । शुद्ध चैतन्य जगदादिकंद । विश्वंभर दयाब्धि ॥६३॥ तो तूं स्वजन भद्रकारिका । संकटी रक्षिसी भोळे भाविका । ऐसे कीर्ति अलौकिका । गाजतसें ब्रम्हांडी ॥६४॥ म्हणोनि भावें तुजलागून । शरण  रिघालों असे मी दीन ।  तरि या संकटांतून । काढून संपूर्ण संरक्षी” ॥६५॥ ऐसी शिवस्तुती म्हणून । नारायणाने पिंडी वरून । कळशी घेतली काढून । शिवांग पुशिलें वस्त्रांनी ॥६६॥ अभिषेक झाला परिपूर्ण । अंतरी पावला समाधान । त्रिपुंड्र शिरीं लावून । बिल्वदलें वाहीली प्रेमानें ॥६७॥ दुग्धशर्करा मिश्रित । नैवेद्य दाखविला वाटींत ।  निरांजनाने ओवाळित । आरती सप्रेम केलिसे ॥६८॥ आरती करितां लोचन । नारायणाचे आले भरून । भानही गेला विसरून । काळ-वेळ स्मरेना ॥६९॥ पिंडीस घेती आवळून । गुजगोष्टी करीत मनांतून । वाटे शिवासंगे बोलून । सुख समाधान पावती ॥७०॥ अखंड चालें शिवस्मरण। षडाक्षरींचे  मंत्रोच्चारण ।  सदाशिवाचें अखंड ध्यान । दिन रजनी करिती ते ॥७१॥ ऐसे हे नारायण साटम । त्यांचा चाले दिनक्रम । शिवमंदिर हेंच विश्राम । धाम त्यांना वाटतसे ॥७२॥ मालवणच्या मसुरे जिल्ह्यांत । कोहीळ नांवाच्या गांवांत । चारिवडे या वाडींत । नारायण साटम राहती ॥७३॥ लक्ष्मी नारायणाची जोडी । त्यांना शिवभक्तिची गोडी । धार्मिक वृत्तीच आवडी । उभयतांना होती की ॥७४॥ व्रतवैकल्यें पूजाअर्चा । यांची नित्य चाले दिनचर्या । नारायणाची प्रिय भार्या । लक्ष्मीबाई करितसे ॥७५॥ सोमवारचा करिती उपवास । प्रदोष व्रताचाही ध्यास । सोडा सोमवारांचेही खास । व्रताचरण त्यांनी केले हो ॥७६॥ कोहीळ गांवच्या परिसरांत । शिवमंदिर होतें प्रशांत । उभयतां जाती मंदिरांत । दर्शनालागीं प्रतिदिनीं ॥७७॥ परिस्थिती होती साधारण । उपजीवीकेचें नव्हतें साधन । मिळेल ते ते काम करून । गुजराण होते करीत ते ॥७८॥ नारायणराव होते शिवभक्त । त्यांना  पत्नीची होती साथ । उभयतां चिंतिती मनांत  । पुत्र व्हावा शिवापरी ॥७९॥ पूजा-अर्चा जपजाप्य । नित्य चालत असे अमूप । सदैव मंदिरा समीप । राहणें असे तयांचें ॥८०॥ जेथे-जेथे चालले शिव किर्तन । उभयतां जाती धावून ।  शिवरात्रीचा येता शुभदिन  । निर्जल उपवास आचरती ॥८१॥ लक्ष्मीबाई नित्य जाती । दुग्धस्नान देवास घालिती । बेलफुलें पिंडीवरती  । वाहुनि प्रार्थिती मनोभावे ॥८२॥ हे श्री सांब सदाशिवा । वंशाचा दीप उजळावा । याकरिता करिते सेवा । धांव पाव  मजलागी ॥८३॥ देवा आम्हास नाही माहिती । पूजेच्या या शास्त्रोक्त पद्धती । जैसी जैसी सांगते अल्पमति ।  तैसी सेवा करितें मी ॥८४॥ परि आमची निर्मळ प्रीती । सदैव आहे तुझ्याचवरती । मायबाप सखा सोबती । तूच शिवा आमचा कीं ॥८५॥ तुझ्यावाचुनि कोणाजवळ । आम्ही सांगावी ही तळमळ । तूं दाता सर्वकाळ । जवळी आमच्या असताना ॥८६॥ ऐसी प्रार्थना करून । त्याही निघती मंदिरांतून । नित्य पतीस वंदून गृहकार्यस लागती ॥८७॥ ऐसे दिन प्रतिदिन जाती । मासासंगे वर्षेही जाती । नारायणाची दास्यभक्ति वृक्षापरी फोफावली ॥८८॥ एकदा श्रावण मासांत । सोमवारचे असतां शिवव्रत । नारायण जाती मंदिरांत । शिवाभिषेक करावया ॥८९॥ मनोभावे पूजा करून । बिलवाक्षताफुलें वाहून । कर्पूर आरती ओवाळून । ध्यानस्थ बसती समोर ॥९०॥ वाटे सदाशिव समोरून । ऐकतो आहे देऊनी कान । “ओम नमः शिवाय” म्हणून । सांगते झाले प्रेमाने ॥९१॥ हे पार्वती मनोहर प्रिया । माझी प्रिय लक्ष्मी जाया । तिची ऐकावी सदया । चरणी विनंती करिते जी ॥९२॥ हे निलग्रीवा अहिभूषणा । आमची पुरवावी कामना । पुत्र द्यावा कुलभुषणा । तुझ्याच परि आम्हाला ॥९३॥ ब्रम्हानंदा,भाललोचना । आमच्या सर्व विवंचना । दूर करोनि त्रिलोचना । कृपा कटाक्षें पहावें ॥९४॥ हे अर्धनारीनटेश्वर भवभंजना महेश्वरा । तुझ्याविना आसरा । नाही नाहीं रे संसारी ॥९५॥ हे गिरीजारंगा गिरिशा । आमची न करावी निराशा । संसाराच्या आशापाशा । पंचांनना  चरणी अर्पियेल्या ॥९६॥ तूं वंद्य भोळा चक्रवर्ति । ऐकोनि तुझी सुकिर्ती । सेवा करितो अतिप्रीति । परममंगला जगदीशा ॥॥९७॥ हिमाद्रीजामाता गंगाधरा । सुहास्यवदना कर्पूरगौरा । आमच्या या संसारा । मोगरा देऊनी फुलवावा ॥९८॥ हे आनंद कैलास विहारा । आम्हास द्यावा ऐसा हिरा । जो सकलजनांच्या संसारा । पूर्ण आधार होईल ॥९९॥ हे जगदात्मन सदाशिवा । निर्मळ भाव जाणावा । आणि वंशाचा दिवा । स्वये तुवांच उजळावा ॥१००॥ हे अपर्णाहृदयाब्ज मिलिंदा । शुद्ध चैतन्य जगदादिकंदा । देवपिता होण्याचा आनंदा । इहजन्मी लाभूं दे ॥१०१॥ स्वजनभद्रकारका। ऐसी कीर्ति अलौकिका । म्हणोनि भाव मुका । शब्दावीण बोललोसे ॥१०२॥ अश्रू वाहता नयनांतून । तों भावसमाधी गेली भंगून  । क्षणिक भानावर येऊन । स्वगृह जाते झाले ॥१०३॥ तेची दिनी पहाटेला । स्वप्न पडले नारायणाला । वाटे गाभार्‍यांत की बैसला । ध्यानस्थ पिंडीसमोर  ॥१०४॥ इतुक्यांत झाला घंटानाद । नंदी उभा राहिला तटस्थ । अदृश्य झाला पार्वतीनाथ । नजरेसमोरून त्याचिया ॥१०५॥ गर्भस्थ लक्ष्मी दिसली समोर । बिल्वदलें होती शरीरावर । छत्र धरिले पोटावर  । स्वयें  पंच फणींन्द्रानें ॥१०६॥ दिव्य तेजानें भरून । गाभारा गेला उजळून । आनंद उर्मी उसळून । नारायण अंतरी आल्या कीं ॥१०७॥ उर्मी न होता सहन । जागृत झाला नारायण । देवाचा आशीर्वाद जाणून । धन्य अंतरीं जाहला ॥१०८॥ लौकर उठोनिया सकाळी । पत्नीस बोलाविलें जवळी । आनंदभरें सांगितली । हकिकत दिसल्या स्वप्नाची ॥१०९॥ ती मनांत गेली लाजून । दिवस गेल्याचें सांगून । देवाचे आभार मानून । मनोंमनीं शरण जातसे ॥११०॥ ऐसे पूर्ण होता नवमास । पुत्र झाला लक्ष्मीस ।  उभयतांच्या आनंदास । पारावार न राहिला ॥१११॥ देवाचा प्रसाद म्हणून । शंकर नांव ठेविलें जाणून । मंदिरांत जाती घेऊन । दर्शनालागी उभयतां ॥११२॥ सदाशिवा आमुची प्रार्थना । तुवां ऐकली पार्वतीरमणा । आता आमच्या कुलभूषणा । कृपेसहित रक्षावें ॥११३॥ आमची स्थिती साधारण । कैसें करावें लालन पालन । कैसें द्यावे उच्च शिक्षण । आकळेना ना आम्हांला ॥११४॥ आम्ही नांवाचे मातापिता । तूंच खरा जगत् पिता । बाळाची सर्वांग सांगता । तूच करावी जगदीशा ॥११५॥ तरि आतां संरक्षावें । आमुचें न्यूनत्व परिहारावे । कवटाळूनि हृदयीं धरावे । बाळ  शंकरास आमुच्या ॥११६॥ दशरथ आणि कौसल्येला । वसुदेव आणि देवकीला । अत्रिऋषी नी अनसूयेला ।  सच्चिदानंद जो लाभला ॥११७॥ तोच सद्-भाग्यें अनुभवला । पुत्र होऊनि अवतरला । आमुचा वंश उद्धरिला । धन्य केलेस  आम्हांला ॥११८॥ उभयतांचे ऐकून भाषण । मी हर्ष पावलों मनांतून । ह्या लक्ष्मीनारायणाचे चरण । आदरपूर्वक वंदिलें ॥११९॥ ऐसा हा साटमांचा अवतार । सांगितला मी सविस्तर । वंदन करुनी वारंवार । पायीं याचना करीतसें ॥१२०॥ जय जय समर्थ साटमा । भक्त काम कल्पद्रुमा । तुमचा अगाध महिमा । आकळावा कैसा हो ॥१२१॥ मी आधींच मतिहीन । त्यांत  अभ्यास आहे शून्य । जरी कृपा होईल परिपूर्ण । तरीच लिहूं शकेन ॥१२२॥ तरि लक्ष्मीनारायण नंदना । माझी स्वीकारावी प्रार्थना । भाऊदास करीतसे नमना । पदकमलावर आपुल्या ॥१२३॥

इति श्री भाऊदास विरचित । श्री समर्थ सौरभ ग्रंथस्य । प्रथमोध्याय गोड हा । श्री सांब सदाशिवार्पणमस्तु ।शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]