विसावा – अध्याय ९

 

॥ श्री ॥
॥ अथ नवमोऽध्याय: ॥

श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: । श्रोते व्हावे सावधान । तुम्हा कथिलें जें वचन । तें हृदयांतरी बाळगून । सुखमार्ग आचरावा ॥1॥ सुखी करावया जीवन । मंत्र घ्यावा गुरुमुखांतून । गुरु केल्याविना जीवन । व्यर्थ असें जाणावें ॥2॥ परि श्रोते मज पुसती । कैसा तो ओळखावा निश्चिती । फसवे गुरुही असती । भोंदु ही बहुत त्यांत ॥3॥ रामदासांनी कथिलें स्पष्ट । गुरु कसा असावा श्रेष्ठ । गुरु नसवा कनिष्ठ । दासबोध वाचावा ॥4॥ या विज्ञानाचे युगांत । तर्क वितर्क वाढले बहुत । सहसा न कोणी फसत । भोंदुगिरी पाहुनी ॥5॥ लोक जाहले चाणाक्ष । तरि असावें नित्य दक्ष । होऊं नये आपण भक्ष्य । भोळ्या भाबड्या भक्तीनें ॥6॥ लावुनियां कस सोन्यापरी । गुरुची परिक्षा करावी खरी । दिव्यत्वाची प्रचीति पुरी । येतां व्हावें नतमस्तक ॥7॥ खरी तीच असे प्रचीति । जी करील आत्म्याची उन्नती । दाखवी जो आत्मज्योती । श्रेष्ठ गुरु तो मानावा ॥8॥ तोंच अज्ञान तिमिर घालवील । मति प्रकाशित करील ।शरीरची पडुनी भूल । जिव-शिव एक करील ॥9॥ जीवन निघेल ढवळून । दृष्टि ही जाईल फिरुन । दिसेल अणु-रेणुंतून । भरलेला तो श्रीगुरु ॥10॥ परि संसारीं जे राहतीं । गुरुवरी करिती शुद्ध प्रीति । गुरु सहाय्य तयांना करिती । सगुण रुप घेवोनी ॥11॥ भक्तां अर्पूनि सुख समाधान। हळुहळु वळविती मन । प्रपंचीं परमार्थ साधुन । मुक्त करिती भक्तांसी ॥12॥ अशी त्यांची प्रीति असतां । सत्संग करावा भक्तां । सत्संगाचीं खरी महत्ता । अधिक आहे जीवनीं ॥13॥ जरी न कराल पोथी वाचन । अथवा जपतपादि ध्यान । केवळ गुरु सन्निद्ध राहून सहज मुक्ती लाभेल ॥14॥श्रीगुरुची करावी सेवा । तो सर्व सुखाचा ठेवा । गुरु सान्नीद्ध साधावा । करा असे भक्तजन हो ॥15॥ सत्संगांतून नरा । गुरु लाभ देतो खरा । सुख प्राप्तीचा सोयरा । गुरु असे सदैव ॥16॥ भींमनाथीं असतां फिरत । भाऊ मजला सांगत । वेतोबा तुज असे देत । आदेश एक चांगला ॥17॥ जो देती मज ते लिहून । मी तो तुम्हां करितो कथन । तुम्हीही घ्यावें उजळून । जीवन आपुलें त्यानेंच ॥18॥ भाऊ म्हणजे गुप्त जाण । रत्नजडित सुवर्णखाण । आम्ही दैवतें असतो तिष्टून । हृदय मंदिरी त्याचे ॥19॥ तेथून आम्ही सोडून । देतो कृपा किरण जाण । सुभक्तावरीं बरसून । सन्निद्ध असावे सदैव ॥20॥ सत्संगानें लाभे दिव्य द़ृष्टि । सत्संगानें लाभे कृपा द़ृष्टि । सत्संगानें लाभे संतूष्टि । गैरसमज न व्हावा ॥21॥ऐसें देता मज लिहून । मी तुष्टलों मनांतून । भक्तवरदा कृपा करुन । दीर्घांयुषी करी भाऊंना ॥22॥ या वरुन तुम्हांला । अर्थं लाभ असेल जाहला । की सत्संग भला रे भला । सुवर्ण संधी सोडूं नका ॥23॥ गुरु जाणावा परीस । अभक्तलोहा करितां स्पर्श । सुवर्ण करील बावन्न कस । अभक्तांचे तात्काळ ॥24॥ पूर्वीं ऐसे होते श्रीगुरु । वाटती प्रत्यक्ष कल्पतरू । स्पर्शमात्रे ते तिमिरु । दूर करिती तेधवां ॥25॥ प्रथम घेती सेवा करून । मग कृपाकर ठेवून । भक्तां करिती ज्ञानसंपन्न । स्पर्शमात्रें केवळ ॥26॥ गुरुच्या ऐशा स्पर्शांवरून । आठवली गोष्ट म्हणून । कथितसें तुम्हांलागून । भाव घ्यावा लक्षांत ॥27॥ ऐशाच एका गुरुवारी । आरती असतां माझे घरीं । भाऊ बैसले खुर्चीवरी । सहज बोलले नंदाला ॥28॥ सांगती तिचे भाच्याला । गुरु मानावें मावशीला । नमस्कारोनियां तिजला । मंत्र घ्यावा तिच्या मुखें ॥29॥ दीपक बैसला शेजारीं । नंदा मंत्रोच्चार करी । आणि ठेवितां कर शिरीं । ग्रहण करीतो मनोमनीं ॥30॥ ग्रहण करितां झाला मंत्र । नेत्रापुढें प्रगटलें चित्र । खिळले एक मात्र नेत्र । फोटो वरी दत्ताच्या ॥31॥ दत्तप्रतिमा अदृष्य झाली । सरस्वती प्रत्यक्ष प्रकटली । शुभ्र वस्त्रें परिधानलेली । करीं वीणा घेऊनियां ॥32॥ करु लागला वर्णन । किती सुंदर दिसतें ध्यान । प्रसन्न हास्य करून । सरस्वती बघतसे ॥33॥ शिरीं सुवर्ण किरींट छान । मयूरावरी येई बैसून । वाटे मना अल्हाद-प्रसन्न । दृष्य कधीं संपूं नये ॥34॥ ऐसें त्याचे भाषण ऐकून । आम्हीं गेलों थक्क होउन । भानावरी आणावें म्हणून । प्रार्थिलेंसे भाऊंना ॥35॥ भाऊ म्हणती नंदाला । तीर्थ लावावें नेत्राला । भानावरी येऊनी वदला । धन्य झालों आज मी ॥36॥ स्पर्शमात्रें दर्शन घडलें । जीवन सुफलित केलें । म्हणोनियां घातलें ।लोटांगण तयाने ॥37॥ एकदां बडोदे नगरांत । जातीय दंगे होती बहुत । संचारबंदीची जाहितरात । केलीं शहरांत त्यावेळीं ॥38॥ बंदी ती असतां जारी । मंगला पडली आजारी । कैसा बोलवावा धन्वन्तरी । बाहेर कैसें पडावें ॥39॥ विचांर बहुत केला । पाहोनी तिच्या दु:खाला । जीव तेव्हां घाबरला । आम्हां उभयतांचा ॥40॥ परी सकाळचे वेळी । दोन तासांची होती मोकळी । तिला धन्वन्तरी जवळीं । घेऊनियां गेलो मी ॥41॥ लक्षणावरून तिजला । मेनिन्जाईटिस् वाटे झाला । म्हणती दाखल करा मुलीला । दवाखान्यंत तात्काळ ॥42॥ ऐशा कडक संचार बंदींत । कैसें ठेवावें दवाखान्यांत । व्यवहार कैसा सुरक्षित । होतील तेंही कळेना ॥43॥ म्हणोनि धांवलों गुरुप्रत । सर्व सांगोनि हकिकत । म्हणती सप्तशती वाचीत । कर फिरवी तिजवरूनी ॥44॥ देवोनियां इन्जेक्शन । डॉक्टर ठेवितीं तिज झोंपून । म्हणे उद्यांची वाट पाहून । योग्य उपचार करुंच ॥45॥ परि सप्तशतीचें करितां वाचन । तिज आराम पडला पूर्ण । सोडविलें संकटांतून । आश्चर्य करिती धन्वन्तरी ॥46॥ लक्षणें तीं नच दिसत । धन्वन्तरी ऐसें म्हणत । आनंद जाहला बहुत । कृपादृष्टी पाहून ॥47॥ माझे साडूंचे स्वप्नांत । एक स्त्री येतसे नित्य । वरी तयांना झोडीत । रात्रीं बाराचे समयास ॥48॥ कळे न ती स्त्री कोण । म्हणे मज मज तूं ये शरण । विनंती नाकारता जाण । झोडीतसे ती तयांना ॥49॥ त्यांचें ऐकून संभाषण । सर्व मंडळी बसती उठून । पलंगावरी झटापट पाहून । घाबरती सर्व जण ॥50॥ लाथा बुक्क्यांनीं मारून । शरिरीं घेती ओरबाडून । शरिरावर पडती व्रण । रक्तस्त्राव होतसे ॥51॥ जरी हें घडतें स्वप्नांत । शरिरीं प्रत्यक्ष दुखापत । त्यांचे शरीर सुजून जात । अतिशय मारानें ॥52॥ दिन जातां मावळून । रात्र वाटतसे भयाण । कोण्या समयीं येईल डाकीण । सर्व झाले भयभीत ॥53॥ ऐसें सतत रांही घडत । चौदाव्या दिना पर्यंत । पंधरावा दिनीं उजाडत । मांरणार होती साडूंना ॥54॥ सुदैवानें दिली साथ । कार्यानिमित्तें होतों मुंबईत । मज सांगती सर्व हकिकत । काकुळतीनें सारे जण ॥55॥ऐकोनियां सर्व प्रकार । प्रकरण वाटे अति गंभीर । म्हणोन केला विचार । बडोद्यासि आणावया ॥56॥ रात्रीचें बैसलो गाडींत । गप्पागोष्टीं होतों करित । जैसा बाराचा समय होत । प्रवासी सर्व झोपलें ॥57॥ मज झोंप झाली अनावर । अंधार येई डोळ्यां समोर । वाटे वेगळांच कांही प्रकार ।काय होई तें कळेना ॥58॥ तोंच बाराचा समय होत । डाकीण येई अंगांत । रुप अक्राळ विक्राळ दिसत । मी झालों भयभीत ॥59॥ मुखी लाळ असे गळत । जीभ लांब काढोनी गर्जत । मनीं मी गुरुला विनवीत । धांव घ्या हो झडकरी ॥60॥ कळे न काय घडलें । मी मुस्कटांत मारिले । वरी तयांना कडकडूनी । मिठींत घेतले माझीया ॥61॥ मिठी उघडोनी वदले । प्रत्यक्ष मी श्रीगुरुंना पाहिलें । मज येऊन रक्षिलें । दर्शन दिधलें तवशरिरीं ॥62॥ ऐसा प्रकार घडला गाडीत । कपडे काढोनी पहात । व्रण जाहले होत नष्ट । आश्चर्य करिती मनोमनीं ॥63॥ येऊनिया घरा प्रत ।मी होतों पूजा करीत । सवें मनोहर बैसत । म्हणे दत्तात्रय बोलती ॥64॥ पुढें करावा तव हात । मी प्रसाद तुजला देत । वरी तैसे मनोहर करीत बिल्वदल दिसलें करीं ॥65॥ बिल्वदलाचा प्रसाद पाहोनी । सर्व हर्षित झाले मनीं । वाटे डाकीण गेली पळोनीं । रक्षिलेसें गुरुंनींच ॥66॥ मग तयांना घेऊनी । गेलो भाऊकाकांचे सदनीं । मनोहर कडकडूनी । मिठी मारीं तयांना ॥67॥ मिठीं सोडितां हर्षून वदले । भाऊ हृदयीं दर्शन घडलें ।गाडींत मजला जैसे दिसलें । मुख प्रमुख भाऊंचें ॥68॥ अंगावरी फिरवीत हात । भाऊ मंत्रोच्चार होते करित । दाह होऊनियां शांत । मुक्त करिते जाहले ॥69॥ सांगोनियां गुरु मंत्रा ते । वरी देती जपमाला हस्तें । आणि जडलें दिव्य नातें । पूर्व जन्मीचें कळेना ॥70॥ डाकीणमुक्त होती मनोहर । शरिरीं भरला विभूति संचार । करुं लागले चमत्कार । नमस्कार करिती सर्व ॥71॥ कधी बुक्का वा विभूति । काढोनी सर्वांना लाविती । कधीं गुलाब पुष्पें प्रकटती । मनोहराचे करांतून ॥72॥ फुलवातीवर कर धरुनी । प्रकाशित ज्योती करूनी । पात्रीं पळीभर जल टाकोनी । अभिषेक करिती पूर्ण ॥73॥ ऐसा घडतां घरीं प्रकार । आम्हीं बोलविले श्री गुरूवर । ते येऊनि बैसतां खुर्चींवर । मंडळी जमली सर्व ॥74॥ काकी आणि सीमा-सून । जमले माझे आप्त जन । गोष्ट निघे गोष्टीवरुन । मनोहर सांगती सर्वांना ॥75॥ आम्ही ज्ञानेश्वर काळचे । विभूति आहोंत पूर्वीचे । वर्णन करिती भिंतीचें । कैसी ती चालविली ॥76॥ कैसें ज्ञानेश्वर वदती । कैसे निवृत्ती दिसती । मुक्ता कैसी होती । सोपान देव तेघवां ॥77॥ ते ऐसे करिती वर्णन । सीमाला घडे प्रत्यक्ष दर्शन । वाटे सखी होतों । आपण । अनंत जन्मापूर्वींची ॥78॥ त्यांनी दाखविला वरदकर । सीमाला दिसला ओंकार ।तेजोमय पहातां सुंदर । भाव समाधी लागली ॥79॥ क्षणैक तिजला दिसले । भाऊ तेथें न बैसले । विष्णू स्वयं प्रकटले । मुख मात्र भाऊंचें ॥80॥करुं लागली वर्णन । अहाहा सुंदर वातावरण । वाटे शीत नी शांत जाण । आल्हाददायक चोहीकडे ॥81॥ वाटे निळ्या नभांतून । मेघ आलेसें दाटून । मोर नाचती आनंदून । तयाचे भोंवताली ॥82॥ आणि दिसलेसे शेजारी । सुवर्ण मयूरासनावरी । गुरु माऊली बैसली वरी । देवता रुप धरोनी ॥83॥ उभे चतुर्भूजधारी । विष्णु प्रसन्न हास्य करी । विनंती विनम्रतेनें करी । द्यावा माझा ओंकार ॥84॥ देई रे माझा ओंकार । मी तो कोणा न देणार । विनंती करितें वारंवार । देई रे माझा ओंकार । मी तो कोणा न देणार । विनंती करितें वारंवार । देई न रे ! परत तो ॥85॥ कधीं लाडें लाडें बोले ती । कधीं दटावून बोलती । देई रे ओंकार हाती । अंत पाहू नकोस ॥86॥ तूं किती रे आहेस चांगला । माझा लोभ असे जडला । नको परतवूं रे मजला । रिक्त हस्तानें येथुनी ॥87॥ तिचें ऐकून भाषण । सर्व जाती चक्राऊन । परि भाऊ म्हणती देऊन । टाक तिचा ओंकार ॥88॥ जपमाला देतां परतून । मनोहर आपुले हातांतून । मिळाला ॐकार पाहून । भाव समाधी उतरली ॥89॥ एका वाईटा मधून । कैसें घडलें उत्तम जाण । घालवोनियां डाकीण । प्राप्त झाली असे कृपा ॥90॥ डाकीण होती भयंकर । तिनें केलासे विचार । उचलोनी होती फेंकणार । गाडीतुंनी आम्हाला ॥91॥ परि तिलाच दिलें फेंकून । शरिरीं विभूति प्रवेशून । जी देई त्यांना संरक्षण । युक्ती योजुनी गुरुंनी ॥92॥ होती जी दिव्य विभूति । जी शरिरांत प्रवेशिली होती । ज्ञानेश्वरांचे दर्शना नेती । कृपाही करिती बहूत ॥93॥ जेव्हां गुरु कृपा करिती । त्यांना सीमा न उरती। मात्र पाहती भाव भक्ती । समर्पित होती स्वत: ॥94॥ भक्ती असतां डळमळीत । देवही होतो संशयीत । करावें की न करावे हित । संभ्रमांत पडती ते ॥95॥ देव देतो कृपाधन । तें ठेवावे सांभाळुन । होईल जरी गर्व जाण । नष्ट होईल सगळें ॥96॥ गर्व होतां श्रीमंतीचा । गर्व होता ज्ञानाचा । गर्व होतां शक्ती-भक्तीचा । सर्व नासेल समजावें ॥97॥ तैसेच आहे मंत्र धन । तें वाढवावें सव्याज करु न । सिद्धी होतां प्राप्त जाण । दुर्वर्तन करुं नयें ॥98॥ कोणाचें न करावें अहित । माया ममतेने करी प्रीत । मानवतेच्या कल्याणार्थं । पुण्य जोडावें अांपुलें ॥99॥ कोणी असतां दुखित । यथा शक्ति करावी मदत । परोपकाराचें ही व्रत । कृपाधनें साधावें ॥100॥ भक्ताचें माध्यम करूनी । देव प्रगटतो जीवनीं । आणि परपीडा हरुनी । भवीं सुख देत असे ॥101॥ अरे ! ज्याचिये सत्तेविण । हलती ना पवन-पान । तो श्रेष्ठ सृष्टि नियंता जाण । मी मी कांही म्हणूं नको ॥102॥ त्याचेच इच्छे वरुन । जीव घेती जन्म-मरण । म्हणोनि व्हावें संत रज:कण । तेणें होईल गर्वनाश ॥103॥ आपण आहोंत कोणी । ही भावनाच नसावी मनीं । शरण गुरुला जाऊनी । समर्पित व्हावें सर्वस्वीं ॥104॥ जैसी शर्करेची बाहुली । पाण्यांत नेऊनी टाकीली । विरघळतां न उरली । वेगळी त्या पाण्याहुनी ॥105॥ तैसी असावी भक्त प्रीति । सुरसागरीं जाऊनी मिळती। जी देईल जीवन मुक्ती । सुभक्त जन ऐका हो ॥106॥ म्हणोनि करितों नमस्कार । श्रीगुरुंना वारंवार । गर्वाचा करा हो संहार । पदकमलानें आपुल्या ॥107॥ तें पदकमल राहो हृदयीं । निरंतर माझे ठाई । याहून अन्य कांहीं-आई । नाहीं मी मागत ॥108॥

इति श्रीभाऊचरित्रामृत – कथनं नाम नवमोऽध्याय: । श्रीदेव वेतोबार्पणमस्तु । शुभं भवतु ॥श्रीरस्तु॥

<< विसावा – अध्याय ८        विसावा – अध्याय १० >>

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *