विसावा – अध्याय ७

 

॥ श्री ॥
॥ अथ सप्तमोऽध्याय: ॥

श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: । उदयाचलीचा प्रभाकर । हळू हळू येई पृथ्वीवर । दिसे दृश्य मनोहर । निसर्गरम्य सृष्टीचे ॥1॥ सूर्यबिंब चढतां वर । हळु हळु वाढे आकार । रंगछटा पसरता सुंदर । प्रसन्न वाटे चित्ताला ॥2॥ तैसें हें कथाबिंब सार । गुरुची वाढवी प्रतिमा सुंदर । प्रसन्न चित्तें भक्तांवर । रंग उधळी आनंदाचे ॥3॥ जैसा सूर्य चढे वरवर । प्रकाश टाकी धरेवर । अंधार पळे चौफेर । दडे कोठें कळेना ॥4॥ तैसा हा ग्रंथप्रभाकर । प्रकाश टाकी भक्त चित्तावर । क्षणांत अज्ञानतिमिर । ज्ञानेतेजें दूर करी ॥5॥ म्हणून श्रोते म्हणती । सांगावी श्रीगुरुंची महती । आम्ही ऐकतों प्रसन्न चित्तीं । मोह होतो ऐकण्याचा ॥6॥इंदौर मधील गिरणींत । भंडारी मिलचे आवारांत । भाऊ जाती मुलाखतीप्रत । अधिकाराचे जागेवरी ॥7॥ कार्यकारी मंडळींत । मतभेद होते बहुत । कीं या वृद्धासांप्रत । घ्यावें कींवा नाही ॥8॥ कांही ऐसे ही म्हणती । या वृद्धाची अल्प मति । कांहीं वृद्धां ज्ञानी म्हणती । अनुभवामुळें तयाच्या ॥9॥ कांही पुरस्कर्ते नवरक्ताचे । तरुण अधिकारी योग्यतेचे । प्रगतीवरी मिलचे । म्हणती प्रभाव पाडतील ॥10॥ अशी चर्चा होती चालत । तोंच भाऊ समोरुन येत । शेटजी तयांना पहांत । प्रागणांतून येताना ॥11॥ शेट खिडकींतून बघती । दिसे भव्य दिव्य व्यक्ती । मनीं म्हणती अद्भूत व्यक्ती । येतसे कोण मजकडे ॥12॥ भाऊ येती ऑफिसांत । शेट आश्चर्यानें बघत । हीच का ती व्यक्ती म्हणत । संभ्रमांत मोठ्या पडती ते ॥13॥करोनियां सस्मित स्वागत । आदरें बैसविती खुर्चींत । भाऊंचा अति प्रभाव पडत । मंडळींवरी वेगळा ॥14॥ वाटे कार्यकारी मंडळींना । अधिकार द्यावा तयांना । मतभेद विसरोनी नाना । कार्यभार सोपविती ॥15॥ भेटीगांठी होती बहुत । शेटजींना वाटे निश्चित । ही व्यक्ती न साधी दिसत । आहे कोणी अलौकिक ॥16॥ परिस स्पर्शतां जरी । लोह होय सुवर्णापरी । तैसें श्रींशेट भंडारी । पार बदलून गेले हो ॥17॥ भक्ति जडली भाऊंवरी ।मानोनियां पूज्य गुरुपरी । निष्ठावंत शिष्य खरोखरी । झाले कीं ते भाऊंचे ॥18॥ त्यांची पत्नी प्रसूत झाली । पुत्र जन्मला अशक्त भारी । काळजी करिती धन्वन्तरी । कैसा वाचेल तो कळेना ॥19॥ बालक अशक्त निश्चेत । धुगधुगी म्हणून जीवंत । उपाय काही निश्चित । करावा म्हणती धन्वन्तरी ॥20॥ धन्वन्तरींची भरे समिती । विचार विनिमय करिती । शेट भंडारी मात्र धांवती । गुरुचणांपाशींच । ॥21॥ सांगता सर्व हकीकत । भाऊ समाधी लाविती त्वरित । वेतोबा येऊनी सांगत । बाळ अवलिया असे कीं ॥22॥ प्रसादपुष्प घेऊनी करी । भस्म देऊनी सांगती वरी । जाऊनी लावी बाळाशिरीं । पुष्प देई माउलीला ॥23॥ भस्म लावितां हुषारी । बाळा आली तरतरी । आश्चर्य करिती धन्वंतरी । अवलीया म्हणोनिया ॥24॥ ऐसी करितां चिंता दुरी । पुत्र घाली चरणावरी । सांभाळीं गा श्रीहरी । म्हणोनी विनविती भंडारी ॥25॥ त्याच गिरणीच्या आवारांत । एका मोठ्या बंगल्यांत । भाऊकाका होते रहात । पत्नीसहीत दोघेच ॥26॥ त्यांची द्वितीय पुत्र जाया । एकदां आली रहावया । आणि इंदौर पहावया । श्वशूर गृहीं एकटी ॥27॥ त्या नवपरिणीत सुनेला । श्री वेतोबाच्या अनंत लीला । भाऊ सांगती अनेकवेळां । विश्रांतीचे सुखसमयीं ॥28॥ कैसा श्रीवेतोबा येऊन । गेला दर्शन देऊन । नभींचे गडगडाटांतून । प्रकट कैसा जाहला ॥29॥ भाऊं ऐसें वर्णन करिती । चित्र दिसावें नयनापुढती । हुबेहुब प्रसंग वर्णिती । ठसा उमटे चित्तावरी ॥30॥ ऐसा प्रसंग सांगून । आणि दिवे मालवून । गेले तिघेही झोंपून । खोलीमध्यें एकदां ॥31॥ तोंच पहाट समयीं । सून खडबडून जागी होई । सासूचे जवळी जाई । घाबरलेंल्या हृदयानें ॥32॥ म्हणती काय झालें तुजला । जीव कां तुझा घाबरला । अंगावरुनी हात फिरविला । मायेनें मग तिचेवरी ॥33॥ पाहिलें नभीचे गडगडाटांत । विजांच्या झगझगाटांत । साकारुनी मनुष्याकृतींत । तेज दिसलें मला हो ॥34॥ आकाशांतून पोहत । मजसमीप ती व्यक्ती येत । सुवर्णकिरीट वरी शोभत । प्रकाशमान जाहलें ॥35॥ समीप येता पाहून । गेलें मी घाबरुन । वाटे मज कीं ओरडून । जागें तुम्हा करावें ॥36॥ परी निश्चेत झाले शरीर । घाम फुटला खरोखर । शरीर कांपे थरथर । सांगतांना तियेचें ॥37॥भाऊ म्हणती हांसत । अग! वेतोबा तुज दर्शन देत । वरी तुज मिठींतही घेत । बालकापरीं तयाचे ॥38॥ फुका तूं गेलीस घाबरुन । तुज देतां तो दर्शन । पुनरपि ऐसा क्षण । कधीं येईल सांगावें ॥39॥ विनंती करुनी म्हणे सून । मज न व्हावें ऐसें दर्शन । ॥40॥ तुमचे पुण्यपावन चरण ।अखंड सेंवूं द्या मजला ॥40॥ तुम्हा सारखा लाभला श्वशुर । हेंचि आमुचें भाग्य थोर । तुमचा शुभाशीर्वादकर । असों द्यावा मजवरी ॥41॥ ऐसें म्हणोनि लागे चरणीं । भाऊ जाती आनंदोनी । शिरीं वरदकर ठेेवोनी । आशीर्वाद देती प्रेमें ॥42॥ भाऊंची ज्येष्ठ पुत्र जाया । मुंबईस असे रहावया । तिज एकदां बघावया । भाऊ जाती पुत्राघरीं ॥43॥ भाऊ जेथें जेथें जाती । पूजासाहित्य तेथें नेती । बरोबरी सदैव ठेविती । प्रसाद प्लेट देवाची ॥44॥ वेतोबाची आज्ञा म्हणूनी । पितळी चौकट घेती करूनी । तिजवरी प्रसादांस लावूनी । कौल घेती देवाचा ॥45॥ वाटे जरी पितळी चौकट ।देवापरी तिज मानीत । देव तिजवरी बोलत । सांकेतिक भाषेत ॥46॥ तांदळाचे लावुनी प्रसाद । त्यावरी होते संकेत । ती भाषा तत्त्वत: जाणत ।भाऊकाका एकटेच ॥47॥ सुना येती ज्या नवीन । त्या न जाणती संकेतखूण । मनी शंकाकुशंका आणून । ठेविती ना विश्वास ॥48॥ काय ही पितळी चौकट । तिज कैसें म्हणावे दैवत । काय हे तांदूळ पडत । सत्य किंवा असत्य ॥49॥ चौकटीवर नाही आकृती । ती कैशी म्हणावी प्रतिकृती । सासर्‍यांची काय मती । विचलित झाली असे ॥50॥ अशी ही ज्येष्ठ पुत्र भार्या । ती घेई मनीं संशया । परी श्वशुरां विचारावया । धैर्य तिचें होईना । ॥51॥ देवखोलींत ठेविली चौकट तिथें झोपली स्नुषा ज्येष्ठ । तेज पाहोनी झणीं उठून । बिछान्यावरी बैसली ॥52॥ वाटे कोणी दिवा लाविला । परी प्रकाश तेथें न दिसला । चौकटीवरी पाहिला । तोच प्रकाश तियेनें ॥53॥ वरी पाहतां रोखून । वेतोबाचें दिसें आनन । चौकटीवरी देतां दर्शन । घाबरोनी झोंपली ॥54॥ नि:संशय रहित होता मनीं । पहांटे लौकर उठोनी । श्वशुरांचे लागे चरणीं । क्षमा करावी म्हणोनी ॥55॥काय झालें तुला म्हणोनी । भाऊ सहज पुसती हांसोनी । म्हणे संशय होता मनीं । चौकटी बद्दल माझीया ॥56॥ चौकटीवरी प्रकटोन । श्रीवेतोबा देई दर्शन । मज नि:संशय करोन । दृढ श्रद्धा बैसविली ॥57॥ निराकार निर्गुण होऊन । त्या चौकटीत राहून । देव स्वयें बोलून । कार्य करितो भक्तांचे ॥58॥ जे जे संशयी येती भक्त । त्यांना ही चौकटीवरी दिसत । विष्णू विठ्ठल वा दत्त । चित्रित केल्यापरी ॥59॥ ज्यांचे मनीं जैसा भाव । त्याला तैसा दिसे देव । ऐसा चौकटीचा प्रभाव । पडतसे भक्तांवरी ॥60॥ ठेवूनी चौकट समोरी । भाऊ बसती आसनावरी । वाटे देव त्यांचेसमोरी । उभा राहिला असे कीं ॥61॥ कोकणी भाषेंत पुसती । लाडे लाडे बोल बोलती । देवास प्रश्न टाकिती । बोल साहेबा म्हणोनी ॥62॥ बोल साहेबा कृपा कर । मागती प्रश्नाचें उत्तर । आणि देव ही खरोखर । तांदूळ टाकी पाहिजे ते ॥63॥ वाटे ते देवाशीं बोलत । गुजगोष्टी प्रेमें करीत । कार्य भक्ताचें साधित । प्रसादाच्या सहाय्यानें ॥64॥ भाऊ असतां बडोद्यांत । वत्सलाबाई भेटण्या येत । भाऊ विषयीं ऐकून बहुत । उत्सुकता त्यांची वाढली ॥65॥ प्रसाद घ्यावा म्हणून । देवखोलींत बसून । फराळशदि चहा घेऊन । गप्पागोष्टी करिती त्या ॥66॥ वत्सलाबाई सांगती । माझे गुरु शिलनाथजी । बालपणीं मी त्यांचे संगती । राहिलें असे म्हणून ॥67॥ देवास जवळील गावांत । शिलनाथ होते जंगलांत । त्यांची धुनी सतत तेवत । असते त्यां वनांत ॥68॥ गुरुंचें करीत होत्या वर्णन । भाऊ ऐकत होते रंगून । एक डोळा मोठा दिसला म्हणून । सहज पाहती भाऊंकडे ॥69॥ तोंच आश्चर्य देखिलें नयनीं । तोचि डोळा तेजस्वी होउनी । कृश मुखावरी दाढी येऊनी । केशसंभार दिसला पिंगट ॥70॥ आपुल्या गुरुंचे घडतां दर्शन । वत्सलाबाई जाती आनंदून । जयजय शिलनाथजी म्हणून । चरण धरती भाऊंचे ॥71॥ भाऊ म्हणती काय झालें । मी प्रत्यक्ष गुरुला पाहिलें । आपल्या मध्येंच प्रकटले । माझे शिलनाथ गुरुदेव ॥72॥ हर्ष जाहला बहुत । म्हणे तुम्हीच माझे शिलनाथ । दृढ विश्वास ऐसा होत । आतां न द्यावें अंतर ॥73॥ ऐशीच दुसरी घडली कथा । ती सांगतों मी आतां । भाऊंची पूर्वजन्मकथा । कथिलासे कोणी एकें ॥74॥ भाऊंच्या कोणी आप्तासी ।भेटे एक संन्यासी । गोष्ट सांगे त्यांसी । मद्रास मध्यें असतांना ॥75॥ होते बापूमहाराज केणी । जे गुप्त होती सावंतवाडीतूनी । दोनशें वर्षापूर्वींची कहाणी । सांगत होते तयाला ॥76॥ ते पुनरपि जन्म घेऊनी । भाऊ दळवी म्हणूनी । वावरती या धरणी । बडोद्यामाजि आज ॥77॥ आप्त झाला चकित । म्हणे कैसें अघटित । ते गृहस्थ माझे आप्त । धन्य केलें वंशाला ॥78॥ ही ऐकून होतों हकिकत । वरी वाचिलें केणी चरित । पंढरीचा वारकरी सुभक्त । दासगणू सांगती ॥79॥ माझे बंधू पत्नीसहित । नित्य भाऊंचे घरी जात । एकदां बैसले खुषींत । देवापुढें तिघे ही ॥80॥ गोष्टी रंगल्या विनोदांत । प्रसाद घेतां घेतां बोलत । भाऊही होते खुषींत । दोघांवरी त्या दिनीं ॥81॥ अशा पूर्व जन्मावरुन । चालतसें संवाद भाषण । कथा सांगती रंगून । वेगवेगळ्या संतांच्या ॥82॥ बंधु पत्नी शालन । पाहे उचलोनि नयन । परी तेथें भाऊ नसून । दिसली एक अन्य व्यक्ति ॥83॥ उघड्या सतेज शरिरीं । टक्कल दिसे शिरावरी । शेंडी उडे वार्‍यावरी । ऐशी व्यक्ती दिसली ती ॥84॥ न कळे कोण हे गृहस्थ । मती जाई गोंधळून । क्षणांत भाऊ दिसले म्हणून । शांत झाली झडकरी ॥85॥ आनंदोनी म्हणे भाऊंना । मला आतांच घडलें दर्शना । म्हणूनी करीतसे वर्णना । भाऊ पुढती शालन ॥86॥ अगे! ते! बापू महाराज केणी । तुज दिसले जे नयनीं । माझी पूर्वजन्मची कहाणीं । दडली असे तयांत ॥87॥ तूं जें केलेंस वर्णन । त्यापरीच होते बापू जाण । तुजवरी कृपाकरुन । दर्शन दिधलें तुला गे ॥88॥ झाला आनंद दोघांना । की बापूंचे घडलें दर्शना । पूर्वजन्मीच्या कथांना । अर्थ असतो निश्चित ॥89॥ ऐशा अनेक भक्तांना । भाऊकाकांत होई दर्शना । जाणोनी शुद्धभावना । दैवतें दिसती निराळीं ॥90॥ कोणा दिसले राम-कृष्ण । कोणा द्वारकेचे श्रीकृष्ण । कोणा शिव-दत्त म्हणून । दर्शन देती स्वत:त ॥91॥ कोणा दिसले श्रीवेतोबा । कोणा दिसले श्रीखंडोबा । कोणा दिसले त्यांचे बाबा । मृत्यूनंतर भाऊंत ॥92॥ वेगवेळ्या स्वरुपांत । जाती भक्तांचे स्वप्नांत । आदेश देऊनी सांगत । मंत्र हाचि जपावा ॥93॥ कधीं मागती इच्छाभोजन । कधीं परीक्षा पाहती जाण । पूर्ण करितां जाती आनंदून । भक्तावरी तयांच्या ॥94॥ माझे काकांचे घरीं । एक येई वृद्धभिकारी । ऐन दुपारचे प्रहरीं । भिक्षा दारीं मागावया ॥95॥ होते काका समोरी वृद्धा बैसवोनी ओटीवरी । पत्नीस म्हणती द्या भाकरी । आणोनी झडकरी ॥96॥ ठेवितां भाकरी समोर । वृद्ध म्हणे कशी मी खाणार । दांत नसतां मुखांत । चावणार कैसें मी ॥97॥ म्हणे बाळा रहावें सुखांत । जरी मज कांहीं न देत । ईश्वर तुझें पुरवील हेत । गेला बोलून झडकरी ॥98॥ सायंकाळी काका जाती । भाऊंचे घरीं सहज बोलती । शिरजोरी भिकारी असती । अन्न कांही न घेती ॥99॥ भाऊ म्हणती कैसा भिकारी । वर्णन करावें मज समोरी । फाटके कपडे अंगावरी । होता वृद्ध दंतहीन ॥100॥ पितळी चष्मा डोळ्यावरी । एकच काडी कानावरी । वृद्ध किडकिडा भिकारी । झोळी होती खांद्यावरी ॥101॥ भाऊ बोलती केलेस काय । ते वेतोबा आले तुझ्या घरास । त्यांना न ओळखिलेंस । परतविलेंस उपाशीं ॥102॥ ऐसे सांगता भाऊंनी । काका जाती घाबरोनी । स्वयें अभागी म्हणोनी । सुवर्णसंधी घालविली ॥103॥ पत्नीस देती दूषण । परी क्षण गेला निघोन । देवा जाती शरण । क्षमायाचन करावया ॥104॥ भाऊ सांगती संसारीं । आदरातिथ्य करा खरोखरी । प्रसंगी कोण येईल अवतारी । भाग्य कांही कळेना ॥105॥ येतां अतिथी घरींदारीं । विन्मुख न करावे जन्मांतरीं । सर्व सुखाची सोयरी । आदरातिथ्य गृहस्थासी ॥106॥ म्हणोनि प्रार्थितों गुरुचरणी । मती न द्यावी चळोनी । अक्षय लय लागो चरणी । अहंकारांतें झडोनी ॥107॥ श्रीगुरुचरणाची धूळ । भक्तांची अभ्यंग आंघोळ । करावया मन निर्मळ । मार्ग श्रेष्ठकथिलासे ॥108॥

इति श्रीभाऊचरित्रामृत – कथनं नाम सप्तमोऽध्याय: । श्रीदेव वेतोबार्पणमस्तु । शुभं भवतु ॥श्रीरस्तु॥

<< विसावा – अध्याय ६        विसावा – अध्याय ८ >>

Click to rate this post!
[Total: 1 Average: 3]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *