विसावा – अध्याय ३
॥ श्री ॥
॥ अथ तृतीयोऽध्याय: ॥
श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरुभ्यो नम: । श्रीकुलदेवतायै नम: । आतां श्रोते सर्व म्हणती । अमृत घट लाविला ओठीं । तरीही न झाली तृप्ती । अधीरता अधिक वाढली ॥1॥ ह्या अध्यायांतील कथानक । भक्तिची वाढवी भूक । प्रीतीचे शब्द मूक । आसवांनी बोलती ॥2॥ देव ही भक्तांकरितां । दास होतो सर्वथा । संसाराची सर्व चिंता । भारही शिरीं वाहतो ॥3॥ असे मागील अध्यायी । भाऊकाकांस आज्ञा होई । म्हणोनि ते मुंबईस जाती । नोकरीच्या निमित्ते ॥4॥ नोकरी उत्तम मिळाली । भाऊंची थोरवी वाढली । वाहवा होऊं लागली । आंग्ल वरिष्ठांचे समोर ॥5॥ भाऊंची योग्यता पाहून । त्यांत उत्तम नोकरी म्हणून । मुली येती सांगून । प्रतिष्ठित घराण्यांच्या ॥6॥ परी आज्ञा दिल्यावांचून । मी न करणार लग्न । ऐसी अंतरीचीं खुण । भाऊंनी मनीं बांधली ॥7॥ ऐशा पाहून निश्चयाला । दृष्टांत भाऊंना जाहला । उद्यां बघशील ज्या मुलीला । तिला पसंत करावें ॥8॥ प्रसाद होईल पांचवा । तो माझा रुकार समजावा । अवमान न करावा । गृहलक्ष्मी हीच होय ॥9॥ आज्ञा देवाची समजून । मुलीस घेतलें पाहून । धनकनक संपन्न । सौंदर्यवती दिसली ॥10॥ ऐसी सद्गुण संपन्न गृहिणीं । मज लाभावी जीवनीं । देवा तुझी अगाध करणी । धन्य केलेंस मजलागीं ॥11॥ भाऊंचे लग्न जाहलें । तें थाटामाटांत गाजले । देवाचे आशीर्वाद लाभले । सुखे संसार करावा ॥12॥ भाऊ संसारी रंगले । परी नित्यचिंतन ना सुटलें । प्रपंची परमार्थां साधियलें । संसार नेटका करून ॥13॥ नेटका करावया संसार । देव स्वयें देई सहकार । मार्गदर्शनें वारंवार । देव वेतोबा करितसे ॥14॥ मुंबईतील नोकरी । सोडून येती वटोदरीं । स्पिनिंग खात्याचे अधिकारी । म्हणोनी गिरणींत बडोद्याच्या ॥15॥ तिथें मिळाला बंगला । गिरणींचे आवारा मधला । प्रशस्त सुंदर रहावयाला । भोंवताली फुलझाडे ॥16॥ परी बंगल्यामध्यें होती । भुतावळांची बहुत वस्ती । रात्रौ खोलींत नाचती । आवाज करिती विचित्र ॥17॥ दिन येतां अमावस्या । भुतें करिती बहु तमाशा । नांच गायन, हंशा । धिंगाणा बहुत चाले ॥18॥ भाऊ त्वरित पत्र लिहिती । आरवलीस प्रसाद लाविती । रुद्र करितां माझेवरती । बंदोबस्त करीन ॥19॥ येतां अमावस्येचा दिवस । भुतें देती बहुत त्रास । भाऊ बोलाविती झोपण्यांस । गिरणी मधील मंडळीस ॥20॥ जरी एकेक झोपले खोलींत । भुतें त्यांचे भोवतीं नाचत । झोपूं न देती कुणां शांत । सर्व झाले भयभीत ॥21॥ एका रात्रीं प्रतिपदे दिवशीं । भाऊ पहुडले निजावयासी । दिवे मालवून अंथरुणाशीं । अंग टेकलें क्षणभरी ॥22॥ तोंच अचानक खोलींत । प्रकाश पडला झगझगीत । सर्वत्र लख्ख प्रकाशांत । खोली अंतरंगी भरली ॥23॥ भाऊ पलंगावरी झोंपती । समोर स्थिरावे दिव्य ज्योती । ज्योतीमधून अवतरे ती । पुरुषोत्तम मूर्ति देवाची ॥24॥ शंख-चक्र-गदा-धारी । शिरीं किरीट, पद्म करीं । पितांबरधारी, गिरिधारी । उभा प्रत्यक्ष राहिला ॥25॥ किरणें निघती अंगामधून । भाऊंचे दिपून गेले लोचन । पलंगावरी बसले उठून । कर जोडून नमस्कारिती ॥26॥ उंचावून बघतां मान । अंधार दिसला खोलींतून । मात्र त्याच रात्रीपासून । भुतें ठेविली बांधून ॥27॥ ऐसें देउनी दर्शन । भुतें ठेविली बांधून भाऊंस दिलें संरक्षण । स्वयें देव वेतोबानें ॥28॥ ज्या गिरणींत काम करिती । तेथें बहुत संप होती । मालक मंडळी चिंता करिती । कैसें काम चालवावें ॥29॥ मालक म्हणती भाऊंना । कांही आंखावी योजना । कैसी चालवावी यंत्रणा । मजूर मालकांमधील ॥30॥ ऐकून मालकाची विनंती । भाऊ चिंतातुर होती । देवास प्रार्थना करिती । उभें राहून समोर ॥31॥ माझे नोकरीची चिंता । देवा तुलाच आहे सर्वथा तरी । मालकाची संप चिंता । दूर करावी दयाळा ॥32॥ ऐसी विनंती करून । भाऊ गेले झोंपून । पहाटें घडलें दर्शन । भूमिया-पूर्वसांचे तयांना ॥33॥ दोन ते:जपुंज व्यक्ति । खिडकीमधून आंत येती । शुभ्र वस्त्रे परिधान करिती । येती जवळ भाऊंच्या ॥34॥ प्रसन्नतेचें हास्य करून । म्हणती नको जाऊस घाबरून । देव्हार्याकडे वळून । अंतर्धांन पावती ते ॥35॥ दुसरें दिवशीं सकाळीं । मजूर महाजन मंडळी । मालक व अधिकारी यांची । सभा भरली एकत्र ॥36॥ कैसी आंखावी योजना । कैसी चालवावी यंत्रणा । कैसी सुटेल विवंचना । मजूरमालकांमधील ॥37॥ आंत सभा चालली । बाहेर कामगार मंडळी जमली । चर्चा बहुत झाली । तडजोड घडविण्यासाठी ॥38॥ तोंच कामगारांचा पुढारी । येऊन सांगे सर्वांसमोरी । दळवी साहेब सांगती जरी । आम्ही येऊं कामावरी ॥39॥ दळवी आमुचे पुढारी । त्यांचें शब्द कल्याणकारी । त्यांचे हाती आमची भाकरी । आम्ही कुणाचेंही न ऐंकू ॥40॥ ऐसें ऐकतां भाषण । मालक-अधिकारी गेले संतोषून । मात्र महाजन-नेता अंतर्यामी । संतापून गेलासे ॥41॥ म्हणे मी कामगार नेता असतां । कैसी दळवी-हातीं गेली सत्ता । कैसी झाली असमर्थता । नेतृत्व कैसें हिरावलें ॥42॥ कांही न बोले भाषण । गेला सभेमधून उठून । संप गेला संपून । कामगार-मालकांचा ॥43॥ भाऊ कामगारां सांगती । तुम्ही जावें खात्याप्रती । संपाची झाली पूर्ती । ऐसें जाहीर होईल ॥44॥ मजूर गेले कामावर । भाऊंचे हातीं आला । कारभार । वर्चस्व राहीलें सर्वांवर । मजूर-मालकांवरी तयांचे ॥45॥ ऐसी ही नोकरीची चिंता । देव स्वयें वाहतो सर्वथा । आणि भाऊंचे मनोरथा । आवडीनें पुरवी तो ॥46॥ एकदां डभोई गावांत । भांडणें झालीं दोंन गटांत । पोलीस पकडून कोठडींत । ठेविती म्होरक्यांना तयांच्या ॥47॥ त्यांतील कांही व्यक्ति । बडोदें गिरणींत असती । सुटूनि जामिनावर येती । भाऊंचे समीप दोघे ॥48॥ त्यावेळी भाऊंचे श्वशूर । न्यायाधीश होते मशहूर । केस त्यांचे पुढें चालणार । ऐसें कळलें तयांना ॥49॥ भाऊंचे जवळी येऊनी । विनंती करिती आर्जवुनी । आपल्या श्वशूरां सांगुनि । केस आमुची सोडवावी ॥50॥ जरी आमुची केस चालेल । नोकरीवर गदा येईल । शंभर रुपयांवर सुटेल । ऐसें कांहीं करावे ॥51॥ भाऊ मजूर नेत्यांना सांगती । प्रयत्न करणें माझें हातीं । यश देणें ईश्वरा हाती । काय होईल तें पहावे ॥52॥ परी भाऊ करिती विचार । कैसें श्वशुरांना सांगणार । सारासार केला विचार । सांगणे हे अयोग्य ॥53॥ म्हणोनि भाऊ विचार करिती । ईश्वरास मनोमनीं प्रार्थिती । ऐकावी कामगारांची विनंती । अनाथांच्या नाथा ॥54॥ मी न श्वशुरांस सांगणार । दाद तुझे पुढेंच मागणार । तूं योग्य तेंच करणार । ऐशी श्रद्धा अंतरीं ॥55॥ वीव्हिंग मास्तरासी सांगतीं । की योग्य न जाणें श्वशुरांप्रती । श्री वेतोबासी करूं विनंती । सांगूं नये मजुरांना ॥56॥ निकालाचे आदले दिवशीं । रात्री बसून देवापाशीं । जप करिती बहुत संख्येसी । विनंती करुनी झोंपले ॥57॥ तोंच पहाटें स्वप्न जाहलें । दोन यतीश्वर धांवून आले । म्हणे कामगारांना सोडलें । शंभर रुपयांवरी आम्ही ॥58॥ दुसरें दिवशीं दुपारीं । निकाल आला इच्छेपरी । कामगार येती भाऊं समोरी । हारतुरे घेऊनी ॥59॥ म्हणती सारे तुम्हा लागोनी । आम्ही सुटलों शिक्षेमधुनी । वारंवार पद वंदुनी । हारतुरे घालिती ॥60॥ हर्ष पावले कामकरी । विश्वास बैसला भाऊंवरी । भाऊंचे वर्चस्व त्यांचेवरी । सहज कैसें बैसलें हें ॥61॥ बडोद्याचे मामलेदार । होते राजाकाका पाटकर । त्यांनीं ठेविला कारकून । रेव्हेन्यू खात्यांत एकदां ॥62॥ त्यानें केली अफरातफर । रुपये दहा हजारांवर । त्याची केस होऊनी तयार । गेली कलेक्टरांपुढती ॥63॥ निकाल देती कलेक्टर । या व्यक्तीस ठेवी मामलेदार । म्हणोनि तोच जबाबदार । तरी दंड त्यालाच करावा ॥64॥ ऐसा निकाल ऐकून । राजाकाका जाती घाबरुन । कारण त्यां दोघांत भांडण । होते म्हणून संधी साधिली ॥65॥ चोरी एक करणार । शिक्षा दुसराच भोगणारं । फुकां कलंक लागणार । न्यारी रीत न्यायाची ॥66॥ म्हणोनि येती पाटकर । भाऊकाकांचे समोर । प्रश्न सांगती सत्वर । काय करावें म्हणोनियां ॥67॥ पत्र लिहिले आरवलीस । प्रसाद लाविले देवास । उत्तर ऐकून संतोष । पाटकरासी जाहला ॥68॥ उत्तम धोतरजोडी सहित । रुपये पंचवीस द्यावे त्वरित । करीन तुज दोषमुक्त । निश्चिंत रहावें अंतरीं ॥69॥ भक्तांचे भक्ता करितां । देवही धांवतो सर्वथा । आणि त्यांचा सर्वही । चिंताभार शिरीं वाहतो ॥70॥ जो निकाल देती कलेक्टर । कॉन्सीलमध्यें झाला सादर । कॉन्सीलचें ऐकून उत्तर । कलेक्टरही थंडावला ॥71॥ मामलेदार ठेवितो नोकर । त्यासी मंजुरी देतो कलेक्टर । तोही तितकाच जवाबदार । म्हणोनि पात्र शिक्षेला ॥72॥ ऐसा निकाल ऐकून । कलेक्टर गेला घाबरून । कारकुनासी बडतर्फ करून । नवसारीस धाडी पाटकरा ॥73॥ वाईटामधून निघे चांगलें । मामलेदार नवसारीस गेले । तेथें डेप्युटी कलेक्टर झाले । दैव उघडलें तयाचें ॥74॥ जे शरण देवासी जाणार । देव त्यांनाच तारणार । जे दैवाधीन असणार । त्यांनाही देव पाहणार ॥75॥ अरविंद बंधू पाटकरांचे । महाराष्ट्र सरकारी खात्याचे । बडोदें सरकार-तर्फेचे । मामलेदार म्हणून नेमले ॥76॥ बडोद्याचे दिवाण । जिवराज मेहता म्हणून । कारभाराचा सर्वांगीण । सार्थ विचार करीत होते ॥77॥ सरकारचें पहाण्या हित । नोकर वर्गाची कपात । मामलेदारचे जागेंत । करिती बहुत संख्येनें ॥78॥ इतुके मामलेदार नकोत । कशास हवेत नोकरींत । अथवा कारकुनी जागेंत । पदच्युत करावें तयांना ॥79॥ ऐसा निकाल ऐकुन । अरविंद गेले घाबरून । भाऊंकडे येती धांवून । काय करावें म्हणोनियां ॥80॥ भाऊंनी समाधी लाविली । स्वारी वेतोबाची आली । म्हणे मेहताची होईल बदली । परी तूं न होशील पदच्यूत ॥81॥ अरविंद जाती रजेवरी । महिना दोनचे अंतरीं । विश्वास ठेवून वेतोबावरी । काय होईल तें पहावें ॥82॥ अवधी बहुत लाभला । अर्ज मूंबईस गेला । सर्व्हिस कमिशननें स्वीकारला । विचारार्थ तेधवां ॥83॥ विचार करितां बहुत । हें मुळीं न योग्य दिसत । कैसे होती पदच्युत । मामलेदार मंडळी ॥84॥ बडोदें सरकारचे दिवाण । यांनी काढीलें जें फर्मान । तें कायद्यासी अनुलक्षून । योग्य नसे मुळीं ही ॥85॥ तरी पुनरपि घ्यावें ठेवुन । याच पदावरी नेमून । योग्य तरी सन्मानून । मामलेदार मंडळींना ॥86॥ ऐसा निकाल ऐकून । अरविंद गेले आनंदून । अंतरीं विनम्र होऊन । चरण धरिती वेतोबाचे ॥87॥ अरविंद म्हणती भाऊला । कैसें आळवूं वेतोबाला । तुजकरीतां मजला । सहाय्य केलें देवानें ॥88॥ मी न जाणे धर्म-कर्म । न नेणें नामचे वर्म । संसाराचें काय मर्म । तेंही कळेना मला रे ॥89॥ तुम्ही सुभक्त म्हणून । घेतला आधार जाणून । नोकरीचें विघ्न हरुन । दान पदरीं दिधलेंत ॥90॥ हळु हळू पुढती । पाटकरांना मिळे बढती । तैसीच वाढे सुकीर्ती । वकील लोकांत ॥91॥ पुढे सॉलीसीटर म्हणून । राहिले महाराष्ट्र राज्यांत । कीर्ती मिळविली बहुत । नांव लौकिक पावले ॥92॥ मुंबईच्या मांजरेकराला । एका समंधानें पछाडला । हाल हाल करुनी सोडला । जीवघेण्या छळानें ॥93॥ केले उपाय बहुत । समंध त्याला न सोडीत । विचार केला निश्चित । आरवलीला जाण्याचा ॥94॥ शरण वेतोबाला जाऊन । विनंती केली आर्जवून । या छळातुनी सोडवून । संरक्षण देई गा ॥95॥ प्रसाद देवाला लावला । म्हणे जाईरे बडोद्याला । तेथें मुक्ति समंधाला । निश्चितच मिळेल ॥96॥ त्वरित येउनी बडोद्याला । भाऊंचे चरणीं लागला । वेतोबाचा निरोप कथिला । रक्ष-रक्ष गा म्हणोनि ॥97॥ भाऊ बसती देवासमोर ।सवेंच बसे मांजरेकर । सांगणें करूनी वारंवार । समाधी लाविली भाऊंनी ॥98॥ क्षणैक दृष्टादृष्ट झाली । समंधाची स्वारी आली । क्षमायाचना करूं लागली । अपराधी म्हणोनियां ॥99॥ मी सोडितों झाडाला । परी मुक्ति द्यावी मजला । सामर्थ्य असतां तुम्हांला । काय अशक्य हे ॥100॥ झाला मुक्त मांजरेकर । आणि पिशाच्च योनीतील नर । भाऊंनी रोखतां नजर । क्षणांत मुक्ति पावले ॥101॥ येऊनियां भानावर । शिर ठेविलें चरणांवर । वाहे नयनीचें नीर । मांजरेकराचे तेधवां ॥102॥ हात मायेचा फिरवून । मांजरेकराचे पाठीवरून । आशीर्वाद देऊन । समंधासि मुक्त केलें ॥103॥ भक्ताचें राखण्या मोठेपण । वेतोबा पाठवी भक्तगण । बडोद्यास येती सर्वजण । दर्शनालागीं वारंवार ॥104॥ ऐसे भाऊंचे मोठेपण । मी काय करणार वर्णन । मी अज्ञानी पामर । असमर्थ आहे कीं ॥105॥ श्रीभुमिया पूर्वस दोघे । भाऊंचें असतां पाठिराखे । त्यावरी वेतोबा सारखे । रुद्र स्वयें सदैव असती ॥106॥ ऐसी ही गुरुची थोरवी । प्रयत्नें वर्णितों परोपरी । भक्त चित्तांत स्थिरावी । श्रवणां कारणें ॥107॥ श्रवण भक्तिचें महिमान ।जाणोनि करावें वाचन । गुरु पाठीशी राहून । तुम्हां सदैव सांभाळो ॥108॥
इति श्रीभाऊचरित्रामृत – कथनं नाम तृतीयोऽध्याय: । श्रीदेव वेतोबार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।