विसावा – अध्याय २

 

॥ श्री ॥
॥ अथ द्वितीयोऽध्याय: ॥

श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: । मागील अध्यायी केला नमस्कार । सर्व देवांना वारंवार । आतां श्रोते झाले आतुर । पुढील कथानक एकावया ॥1॥ आरवली गांवाचें देवस्थान । देव वेतोबाचें महान । प्रति पंढरीच सान । शोभतसे भुवरी ॥2॥ शिरोडें वसे दक्षिणेस । समुद्र असे पश्चिमेस । सावंतवाडी पूर्वेस । उत्तरेस आरवली ॥3॥ ऐसें निसर्गरम्य स्थान । तेथें परमपावन । देव बसविला महान । श्री भूमिया नाथानें ॥4॥ फिरतां फिरतां दक्षिणेस । नाथ भूमिया वसतीस । राहिले आरवलीस । कार्य करण्यालागोनी ॥5॥ पाहुनी उपेक्षित जनता । करूणा उपजे भूमियानाथा । कैसी करावी सनाथा । हीन दीन जनतेला ॥6॥ म्हणोनि विनवी नाथा । कीं हे अनाथांच्या नाथा । येथें कोणी नसे त्राता । धांव घेई झडकरी ॥7॥ येथील जनता बहकली । त्यांना नसे कोणी वाली । अध:पतनातें पावली । धांव घेई झडकरी ॥8॥ तूंच दीनांचा कैवारी । तूंच दु:ख ताप-हारी । तृषार्तांची तृषा-हारी । धांव घेई झडकरी ॥9॥ ऐसी करुणा ऐकून । देव धांवला संतोषून । म्हणे कशाला बोलावून । घेतलेंस मजलागीं ॥10॥ वेतोबांस विनविलें नाथांनी । कीं येथेंच तुम्ही राहोनी । कृपादृष्टिनें पाहोनी । सनाथ जनता करावी ॥11॥ देव बोलले नाथा । तुजकरितां येतो आतां । परी तुलाही माझे सांगाता । राहावें लागेल ॥12॥ म्हणोनि दोघे राहिले । सवें सिद्धेश्वरासही घेतलें । माउली सातेरीस आणिलें । स्थान रम्य वसविलें ॥13॥ देव वेतोबाचें स्थान । भू वैकुंठापरी जाण । ऐसें क्षेत्र वसे महान । आरवली गांवांत ॥14॥ देवानें कृपा केली । सर्व जनता सुधारली । शेती सर्व समृध्द झाली । सुख शांती संचारली ॥15॥ सवें शिरोडें गांवात । बापूमहाराज झाले संत । विठ्ठलाचे महान भक्त । पंढरीचे वारकरी ॥16॥ गांवोगांवीं हिंडती । भगवत् कीर्तनें करिती । भक्तिचा मार्ग दाखविती । सकळ भाविक जनांशीं ॥17॥ पंढरीस नित्य जाती । मार्गीं आरवलीस वसती । वेतोबा देवासी नमिती । पंढरीनाथ म्हणोनियां ॥18॥ बापू म्हणती या देवा । साक्षात पंढरीनाथ पहावा । राम प्रत्यक्ष पहावा । नाथ कैलासाचाही ॥19॥ हाचि झाला दत्त । हाचि झाला नाथ । हाचि म्हाळसाकांत । राधा-रमण तोहीं हा ॥20॥ अष्टसिद्धींचा दायक । हाचि भूतांचा पालक । अष्टकोटींचा मालक । क्लेश-ताप-दु:खहारी ॥21॥ बापू सांगती किर्तनांत । वेतोबा देवाचे मंदिरांत । हीच कृष्णमूर्ति अंतरांत । साठवावी प्रेमानें ॥22॥ नाम संकीर्तन चाले । बापूही नाचूं लागले । सवें देवही धांवले । तेहीं नांचती कीर्तनी ॥23॥ ऐसी कीर्तनें रंगलीं । भक्तांची गर्दी झाली । पंढरीच अवतरली । आरवली गांवांत ॥24॥ ऐशा या क्षेत्रांत । पांडुरंग दळवी होते रहात ।वेतोबाचे परमभक्त । दैवें मृत्यु पावले ॥25॥ सर्व तयारी झाली । मंडळी सर्व जमली । अंत्ययात्रा चालली । रस्त्यां मधून गांवाच्या ॥26॥ तोंच देखिले नयनी । बापूमहाराज केणी । म्हणती कोण हा जीवनीं । अपूर्णता ठेवुनी चालला ॥27॥ बघतां प्रेत जवळून । न्यावे घरीं परतवून । पांडुरंगा कैसें मरण । घडलें ते पाहूं द्यावें ॥28॥ लोक म्हणती कैसें विपरीत । प्रेता कैसें जीवित । कैसें सांगतो अनुचित । प्रकार कांही कळेना ॥29॥ बापूंची जाणुनी कीर्ति । यात्रा फिरें घराप्रती । खाली उतरवून ठेविती । सर्व टकमका पाहती ॥30॥ बापू म्हणती याच संसारीं । सुपुत्र होतील यासि चारी । सौभाग्यवती संसारीं । पत्नी ह्याची असेंकीं ॥31॥ श्रीफलाचा रस काढला । तो प्रेतशिरीं लाविला । चैतन्य येई सर्वांगाला । उठून बैसला पांडुरंग ॥32॥ लोक करती जयजयकार । पांडुरंग घाली नमस्कार । संसाराचा सर्व भार । चरणांवरी अर्पिला ॥33॥ तेव्हापासून दळवींचा । वंश वाढला साचा । वरदहस्त बापूंचा । सर्व कुटुंबावर असे ॥34॥ बापूमहाराज म्हणती । तुम्हीं भजावें वेतोबाप्रती । सर्व सौख्यें लाभती । तुजलागी पांडुरंगा ॥35॥ पांडुरंगाचा वंश वाढला । तो अनेक पिढ्या चालला । गोविंद दळवींपर्यंत आला । प्रपितामह ते भाऊंचे ॥36॥ गोविंद दळवी पिता । नर्मदाबाई माता । त्यांचा सुपुत्र चौथा । विष्णुपंत दळवी हो ! ॥37॥ बाळपणापासून । विष्णूस आवडे कीर्तन । कोठें असल्यास भजन । धांव घेई आवडीनें ॥38॥ सेवा मातपित्यांची । मनोभावें भाऊ करिती । सर्व सुखाचा ठेवा ती । चरणसेवा पुण्यदायी ॥39॥ पुंडलिकांची सेवा पाहून । देव आले संतोषून । परि न सोडिले चरण । मातपित्यांचे तेधवां ॥40॥ मात-पित्यांचे चरण । श्रेष्ठ देवांहून जाण । न लगे जप-तपादि ध्यान । साधन पैं सोपें हें ॥41॥ जो मातपित्यांस संतोषवी । देव तेथेंच उभा राही । सर्व सिद्धी त्याचे पायीं । ओळखूंन राहती ॥42॥ भाऊ सेवा करिती । पित्याचे चरण चुरती । शब्द त्यांचा झेलती । उणें पडूं न देती ते ॥43॥ आईवर त्यांची प्रीति । चरण सेवा न चुकती । वचन संतोषून पाळती । रोष न केला कधींही ॥44॥ वडील सांगती गोष्टी । भाऊ रंगून ऐकती । वेतोबाची करण्या प्राप्ती । भूमिया-पूर्वसासी नमावें ॥45॥ तात ऐसें सांगती । भाऊ अंतरीं सांठविती । कैसा भेटेल श्रीपती । ओढ अंतरीं लागली ॥46॥ देववेतोबाचे भक्ता । आळवावें तुम्ही आतां । भूमिया-पूर्वसा नाथा । शरण रिघावें अंतरीं ॥47॥ बाळपणापासुन । भूमियाचें आवडे ध्यान । नाथांचें नामस्मरण । अंतरंगी भाऊंच्या ॥48॥ जे जें काही घडेल । माझा भूमियाच करील । बाळपणीचें ऐसे बोल । दृढ भक्ती देवा पायीं ॥49॥ दृढ भक्तीचे उदाहरण । घडला विनोद म्हणून । भाऊंच्या शाळेमधून । बाळपणीं एकदां ॥50॥ एक मास्तर प्रख्यात । विज्ञान होते शिकवित । सावंतवाडी शाळेंत । इंग्रजी पांचवीला ॥51॥ म्हातारा बहुत खाष्ट । म्हणे कशाला येता वर्गांत । बलभीमपाक नित्य । मठ्ठ पोरांनों खात जा ॥52॥ कधीं न येईल विज्ञान । तुम्ही रहाल अज्ञान । ऐसें नित्य म्हणून । रागावितसे पोरांना ॥53॥ जे घरीं अभ्यास करून । अथवा येती अन्य शाळेमधून । त्यांचे काढुनियां न्यून । नापास बळेंच करवी ॥54॥ म्हणोनि भाऊंवर ठेवी डोळा । म्हणे तुला देईन भोपळा । बैससी जरी परिक्षेला । माझें विषयांत तूंही ॥55॥ भाऊ करिती विचार । विज्ञानाचा लिहिला पेपर । तरी हा खाष्ट मास्तर । नापासची करणार ॥56॥ बसून व्हावें नापास । मग कां न जावें लग्नास । न बसतां झालो नापास । कलंक तितुका न लागे ॥57॥ म्हणोनि योजिलीं युक्ति । पेपर विज्ञानाचा न लिहिती । सावंतवाडीस न रहाती । निमित्त काढून लग्नाचें ॥58॥ म्हणे असेल माझा देव । तरी राखील माझा भाव । माझा हाचि स्वभाव । स्वाभिमानी राहीन ॥59॥ परीक्षा गेली संपून । परिणाम आला कळून । भाऊ पास झाले म्हणून । आश्चर्य करिती मनोमनीं ॥60॥ काय घडले अचानक । कां मास्तरांची झाली चूक । कां देवानें ऐकली हांक । नवल कैसें घडलें ॥61॥ सर्व विषयांचे मार्क मिळाले । परी विज्ञानाचे न मिळाले । हेडमास्तर संतापलें । काय झालें म्हणोनियां ॥62॥ विज्ञानाचे पेपर्स हरवले । मास्तरांना दूषण आलें । सर्वांनाच पास करविलें । विज्ञानांत त्यावर्षी ॥63॥ ऐशा ह्या नटनारायणें । युक्ति योजिली भक्ताकारणें । करोनि गुरुजींना विस्मरणें । लाज राखिली भक्ताची ॥64॥ हळुहळु वाढलें यौवन । परि न सुटलें नामस्मरण । अंतरी मूर्ति साठवून । शिक्षण पूर्ण केलेंचि ॥65॥ शालेय शिक्षण संपलें । म्हणोनि मुंबईस आले । शिक्षण तेथेंही घेतलें । अंती आले भडोचला ॥66॥ मेहुणे नाबर भडोचला । मॅनेजर म्हणून कामाला । भाऊ जाती शिक्षणाला । त्यांचे सवेंच राहती ॥67॥ लग्नाकरितां म्हणून । मेहुणे म्हणती येतो जाऊन । तुम्ही येथेंच राहून । घर माझें सांभाळावें ॥68॥ आरवलीचे घरांत । भाऊंची वहिनी होती रहात । आजारी पडली बहुत । उपाय कांहीं चालेना ॥69॥ औषधी उपाय संपले । प्रसाद देवाला लाविले । जर कां भाऊ आले । तरीच ही वांचेल ॥70॥ परी भाऊ कैसे येती । ते तर भडोचला असती । कैसी कळेलं माहिती । याच क्षणीं भाऊंना ॥71॥ त्याच पहांटे मंगलदिनीं । भाऊ उठले झोपेंतुनी । गडगडाट नभाचा ऐकूनी । वीज सभोवार चमकलीं ॥72॥ वींजेमधून प्रकटली । तेजोमय मुर्ति दिसली । भाऊंचे समीप आली । अंतराळीं पाहून ॥73॥ ऊंच भव्य काळी मूर्ति । अंगांतून प्रभावळी फाकती । तेज न साहूं शकती । नेत्र दिपले भाऊंचे ॥74॥ अंतरीं उपजे भीति । तरी प्रयत्नेंच बघती । सुवर्ण किरीट शिरावरती । पाहतां धन्य झाले ॥75॥ देव समीप येऊन । भाऊंस सांगती हलवून येथें न रहावें म्हणून । त्वरीत जावें मुंबईस ॥76॥ वेतोबानें दिले दर्शन । परी भाऊ गेले घाबरून । देवाची आज्ञा ऐकून । विचार करिती मनोमनीं ॥77॥ पहांटे उठती लौकर । म्हणे कैसें सोडावें हें घर । भाच्यासह करिती विचार । दृष्टांतावर ते दोघे ॥78॥ दृष्टांत देवाचा झाला । कीं मी न रहावें भडोचला । परी येथून निघण्याला । कारण काय सांगावें ॥79॥ तोंच सकाळी पत्र मिळालें । मुलीचे वडिलांनी लिहिलेलें । भाऊ तुला पाहिजे आलें । मंगल कार्यांकरितां ॥80॥ पत्र पाहतां आनंदले । त्वरित साहेबाकडे गेले । पत्र त्यांनीं वाचलें । आज्ञा दिली जाण्यास ॥81॥ भाऊ भाच्यासह निघती । त्वरित मुंबईस येती । वर्‍हाडी तेथेंच भेटती । सर्व येती आरवलीस ॥82॥ लोक आश्चर्य करिती । भाऊ कैसा आला म्हणती । दृष्टांत कथा सांगती । भाऊ स्वयें बंधूना ॥83॥ चौघे बंधू मिळून । उभे देवसमोर राहून । प्रार्थना करिती विनवून । आरोग्य द्यावें वहिनीला ॥84॥ परी वहिनीची प्रकृति । अत्यंत नाजूक गंभीर स्थिति । उद्यांची कैसी स्थिति । होईल तेही कळेना ॥85॥ प्रसाद देवाला लावले । भूमिया पूर्वसांसी प्रार्थिलें । आशीर्वाद त्यांचे घेतले । निश्चिंत राहती अंतरीं ॥86॥ लग्नाची निघे वरात । शिरोड्याचे देऊळांत । सर्व होते आनंदांत । कार्य निर्विघ्न उरकलें ॥87॥ मधुर वाजंत्रीं वाजती । सर्व स्त्रियाही चालती। पुरुष मंडळी निघती । वधुवरांसह आनंदें ॥88॥ ऐसी वाजत-गाजत । निघालीं असें वरांत । भाऊ मधुनीच जात । निघोनियां घराकडे ॥89॥ लोक म्हणती काय झालें । भाऊ येथूनि कां गेले । काय प्रकृतीस झालें । तर्क वितर्क करिती ते ॥90॥ भोंवळ आली म्हणून । निघती वराती मधून । लगबगें घरीं येऊन । माडीवर चढले ते ॥91॥ माडीवर वहिनी झोंपली। ती एका दाराची खोली । दारांत सतरंजी घातली । वरी गाढ झोपले भाऊ ॥92॥ मंडळी सर्वं परतली । भाऊंची चौकशी केली । भाऊंना झोप लागली । दारामध्येंच वहिनींच्या ॥93॥ पहांटे हांक वहिनींची ऐकून । भाऊ त्वरित गेले उठून । प्रफुल्लित त्यांचे वदन । पाहून संतोषले ॥94॥ आराम पडला वहिनींला । संतोष सर्वांना झाला । परी मृत्यू कैसा परतला । दिवस उगवला मंगल ॥95॥ समर्थांचा होता सेवेंकरी । त्यास मरण होते खरोखरी। चरण सेवेनें निवारी । रामदास तयाचे ॥96॥ चरणसेवा होता करित । मृत्यु समोरूनीं सांगत । कीं यावें माझे संगत । गुरुचरणा सोडून ॥97॥ परी न सोडिले पाय । मृत्युचा थकला उपाय । समर्थांची असतां छाया । कळिकाळाचें भय नाही ॥98॥ ऐसाच प्रकार घडला । वहिनीला न्यावया आला । दारांत बघूनी भाऊला । मृत्यु तेथेंच थबकला ॥99॥ शक्ति न चाले त्याची । भाऊंना ओलांडण्याची । वेळ टळतां आत्म्याची । नमस्कारूनी परतला ॥100॥ भाऊंचे सामर्थ्य कळलें । देवांनीही शब्द पाळिले । मनोमनीं हर्ष पावले । सर्व कुटुंबीय मंडळी ॥101॥ जो सर्वस्वी देवाचा झाला । त्याचा स्वार्थ मुळीं न उरला । देव करितो नाना लीला । नामा निराळा राहून ॥102॥ जो दीनांचा प्रभू कैवारी । जो दु:ख तापादि हारी । ऐसा गुरु हा श्रीहरी । अंतरंगी ठसावा ॥103॥ ऐसी ही परमपावन कथा । तुम्हांलागोनी सांगतां । परम संतोष माझ्या चित्ता । अमृताचा घट ओठी ॥104॥ कामधेनु माझे भाऊ । त्यांचे चिंतन मनीं ठेवूं । जें जें होईल तें तें पाहूं । विश्वास चरणीं ठेवूनी ॥105॥ हा अध्याय जो वाचील । त्याचा अपमृत्युही टळेल । सौभाग्यही लाभेल । सुख शांतीसहीत ॥106॥ गुरूचे धरावे चरण । गुरुचें करावें स्मरण । त्वरित करील पावन । अनन्य भक्ती पाहून ॥107॥ व्हांवया संसारी धन्य । गुरुविना न कोणी अन्य । तुमचे मधील न्यून । गुरु एकटाची दूर करी ॥108॥

इति श्री भाऊ चरित्रांमृत कथन प्रार्थनानाम व्दितीयोऽध्याय:। श्री देव वेतोबार्पणमस्तु। शुभं भवतु। श्रीरस्तु।।

<< विसावा – अध्याय १        विसावा – अध्याय ३ >>

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *