विसावा – अध्याय १

 

॥ श्री ॥
॥ अथ प्रथमोऽध्याय: ॥

श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: । ॐ नमो जी गणनायका । गौरीपुत्रा विनायका । कर जोडूनि नतमस्तक । होउनी वंदितो मी ॥1॥ साधुसंत बहुत झाले । त्यांनी तुला गौरविलें । बहुत वर्णनातें रचिले । कौतुकाते करोनिया ॥2॥ परि मला नसे बुद्धि । जरि करितो लेखनउपाधी । म्हणोनि विनवितों आधीं । कृपा मजवरी करावीं ॥3॥ जे तुज भक्तिभावें भजति । त्यांचेवर तुमची प्रीति । ऐसी तुमची महती । मी ही अनुभविली ॥4॥ तुझ्या कृपेचें होतां स्मरण । प्रफुल्लित होतें अंत:करण । रोमांच दाटती, भरती लोचन । त्या प्रसंगातें आठवितां ॥5॥ शिवरात्रीचा होता दिवस । म्हणोनि केलें संकल्पास । अकरा तासांचे पारायणास । शिवस्तुतीचे करावें ॥6॥ म्हणोनि विनविलें गुरुवर्यांला । म्हणावी शिवस्तुति प्रारंभीला । जेणे माझे मनाला । संतोष बहु वाटेल ॥7॥ वेतोबाची आज्ञा घेउन । भाऊ म्हणती येईन । कार्यांरंभातें करीन । मधुकरा तुझे घरी ॥8॥ उगवला दिवस शिवरात्रीचा । शिवरुपी दत्तात्रेयाचा । षोडषरूपी पूजनाचा । विधी सर्व केला असे ॥9॥ आज्ञा देवाची घेउन । भाऊ आले संतोषून । श्रीदत्तापुढती बसून । नमस्कारिती मनोमनीं ॥10॥ मंडळी सर्व बैसली । आतुरता अधिक वाढली । भाऊंनी सुरुवात केली । कीं कार्यारंभ होईल ॥11॥ श्रीदत्ताची पूजा पाहून । भाऊ म्हणती संतोषून । कीं आज आनंदी वातावरण । दिसतसे सर्वत्र कीं ॥12॥ शिवस्त्रोत्राचें करण्या वाचना । त्यापूर्वींच विनवू गजानना । अथर्वशीर्षांतें म्हणून । संतोषवूं त्या आधीं ॥13॥ ऐसें भाऊंनीं म्हणून । सुरु केलें पठण । तों एकाएकीं थांबून । म्हणती आश्चर्य काय हें ॥14॥ दत्तप्रतिमा अदृष्य झाली । कृपामूर्ति दिसों लागली । विनायक रूपें प्रगटली । प्रत्यक्ष त्यांचेसमोर ॥15॥ सर्वांगी रक्तिमा गुलाबाचा । रत्नजडित टोप सुवर्णांचा । कंठीं हार मौक्तिकांचा । नेत्रीं तेज झळके ॥16॥ वर्णनातीत पाहतां मूर्ति । भाऊक्षणभर भान विसरती । धन्य धन्य म्हणती । आज मी जाहलों ॥17॥ माझें कार्य सिद्ध झालें । निर्विघ्नपणें पार पडलें । अकरा तासांचे कार्य संपलें । अंती भाऊच्या शुभहस्तें ॥18॥ ऐसा तूं गजानन । माझें घरीं प्रगटला कार्यांलागून । कृपा अंत:करणी उपजोन । धन्य मजला करविलें ॥19॥ त्या तुझ्या कृपेला स्मरून । विनंती करितों गजानना । ग्रंथारंभीं येऊन । मज स्फूर्ति द्यावी ॥20॥ आतां नमितों शारदेसी । सर्व विद्या-विलासी । तुझी कृपा व्हावी मजसी । ऐसी इच्छा अंतरीं ॥21॥ वीणेवर देतां झंकार । नवरस निर्मिं अपार । चैतन्याचा भांडार । तुजपाशीं असे ॥22॥ ब्रह्म निर्गुण निराकार । तुझे शब्द देती आकार । वर्णने होते साकार । देव ही भक्तांपुढे ॥23॥ माझ्या गुरुची थोरवी। शब्दमखरांत बैसवावी । नानालंकारें नटवावी । ऐसी इच्छा मनांत ॥24॥ ब्रह्मकुमारी हंसवाहिनी । विनंती कर जोडोनी । कृपा मजवरी करोनी । ग्रंथ हा लिहावा ॥25॥ आतां नमूं कुलदेवतेसी । माझ्या माऊली एकवीरेसी । तिची कृपा मजवर ऐसी । वर्णन अशक्य मजला ॥26॥ आईची गातां थोरवी । लोचनें अश्रूंनीं भरावीं । सग्द्दित हृदयें व्हावीं । शब्द बाहेरी फुटेना ॥27॥ जरी तूं वससी वनांतरीं । तेथून लक्ष माझेवरी । माझे सुखाचे कैवारी । धांव घेसी झडकरी ॥28॥ माझ्या सर्व सुखदु:खात । तुझा सदैव पुढें हात । पाठीवरूनी फिरवीत । सांभाळीतसे माऊली ॥29॥ माझेवर तुमची प्रीति । म्हणोनि केली विनंती । दर्शन व्हावें एकांती । रेणुके मजला गे ॥30॥ म्हणे बाळा देईन । योग्य वेळीं तुला दर्शन । इच्छा करीन पूर्ण । शब्द मनी ठेवी तूं ॥31॥ मुंबई मधिल घरांत । आमच्या शयन खोलींत । घडला एक वृत्तांत । आश्चर्यकारक, कथितों मी ॥32॥ एका प्रात:काळीं शुभदिनीं । उठलों आम्हीं बिच्छान्यातूनी । पांघरुण दूर लोटोनी । उभे झालों झडकरी ॥33॥ तों आश्चर्य देखिलें नयनीं । पत्नीचे पायालागोनी । पूर्ण भरल्या कुंकवांनी । पदकमलें दिसलीं ॥34॥ पदकमलांचे घेतां दर्शन । हृदयें आलीं उचंबळून । साष्टांग घातलें नमन । आम्ही उभयतांनी माऊलीला ॥35॥ बिछान्यावरील पदकमलें । बघता सर्व आश्चर्य पावले । म्हणती तुम्हालागोनी घडलें । दर्शन आम्हा कुलस्वामनीचें ॥36॥ तेच दिनीं सायंकाळी । गुरुमाऊली घरी आली । दर्शन घेतां संतोषली । आत्यंतिक मनांत ॥37॥ पदकमलांचे घेता दर्शन । सातेरी आली धांवून । म्हणे बाळा तुजवर प्रसन्न । कुलस्वामिनी तुझीं असे ॥38॥ जरी माझे हातून कांही चुकलें । योग्यवेळीं शासन ही केलें । लाड तैसेचही पुरविले । एकवीरा माऊलीनें ॥39॥ तैशीच दुसरी कुलदेवता । शितळादेवी जलदेवता । तिची ही कृपा राहे सर्वथा । आमुचे हीं कुटुम्बावरी ॥40॥ वंशपरंपरा तिची सेवा । आमुचे हातून घडली तेंव्हा । तिच्या कृपेचा मेवा । चाखिला असे सर्वांनी ॥41॥ परि अनुभव आला पत्नीला । तो सर्वांहून आगळा । साक्षात्कार कैसा घडला । तुम्हालागीं कथितों मी ॥42॥ मुंबईमधिल घरांत । आमुचे शयन खोलींत । पत्नी एकटी बिछान्यांत । रात्रीचे समयीं पहुडली ॥43॥ तोंच अचानक खोलींत । प्रकाश प्रगटला कोपर्‍यांत । तेजोमय दिसे ज्योत । फिरतसे खोलींत ॥44॥ पत्नीसमोर स्थिर झाली । ज्योतींतून अवतरली । सौंदर्यमुर्ति हांसली । उभी राहून समोर ॥45॥ नखशिखान्त अलंकार । वरी मोकळा केशसंभार । लाल साडी बुट्टेदार । मुकुट शिरावरी शोभे ॥46॥ ऐसें घडतां दर्शन । पत्नी घाली लोटांगण । माऊली तिला उठवून । अंगावरून हात फिरवी ॥47॥ तेज बघतां शरीरीं । प्रसन्न हास्य मुखावरी । परि कंपित होय शरीरीं । पत्नी दृष्य पाहून ॥48॥ माऊली बोले बाळ नंदिनी । घाबरू नकोस मज पाहूनी । तुजवर प्रसन्न होउनी । दर्शन तुला दिलें मी ॥49॥ मी तुज जवळी राहीन । तुझे हांकेस धावेन । सर्व काळ पावेन । परी येई दर्शना माझें ॥50॥ ऐसे बोलून माउली । अदृश्य तेथेंचि पावली । पत्नी भयचकित झाली । काय ऐसें घडलें हें ॥51॥ मोठेमोठे साधुसंत । माउलीचे अगणित भक्त । तपश्चर्या करीत बहुत । कित्येक वर्षे पर्यंत ॥52॥ कोणी जाती रानांत । कोणी चंडी हवनें करित । कोणी पाठ वाचिती बहुत । दर्शन त्यांना घडेना ॥53॥ कांही होतें पुण्य गाठी । म्हणोनि घडल्या भेटी । माऊलीची कृपा दृष्टी । आम्हांवरी पडली ॥54॥ ऐसी माझी कुलस्वामिनी । विनंती नम्र तिचे चरणीं । माझी धरुनियां लेखणीं । चालवावी प्रेरणेनें ॥55॥ आजवरी केले कौतुक । म्हणोनी घातली भाक । ग्रंथ व्हावा प्रासादिक । आशीर्वांद द्यावा मज ॥56॥ आता नमूं श्रीगुरुसी । माझे आराध्य दैवतासी । साक्षात् प्रभु दत्तात्रेयासी । जन्मोजन्मीं लीन मी ॥57॥ मातपित्यांचें होतें पूण्य । म्हणोनि दिसले श्रीगुरुचरण । तेचि ठेविले घट्ट धरुन । भवसागर तरावया ॥58॥ गुरुचरित्राचें करीतां वाचन । गुरुमहाराज संतोषून । ललाटीं भस्म लावून । प्रसाद देती विभूतीचा ॥59॥ श्रीदत्ताची मजवर प्रीति म्हणोनि आल्या बहुत प्रचिती । कर्म करोनि घेती । मार्ग दाखविती भक्तीचा ॥60॥ एक संतपुरुष आंधळा । मज सांगती की बाळा । श्रीदत्त येतील जेवण्याला । तुझ्या घरीं एकदां ॥61॥ मज आनंद झाला बहुत । कीं असेन मी भाग्यवंत । परि ओळखीन कैसा दत्त । ऐसी चिंता मनांत ॥62॥ ऐसे दिवस लोटले बहुत । भाऊ घरीं येती अवचित । म्हणे भोजन करीन निश्चित । आज तुमचे घरीं मी ॥63॥ पत्नी माझी बहुत सुगृहिणी । मिष्टान्न बनवी भोजनीं । भाऊ उठती जेवूनी । म्हणती संतुष्ट जाहलों ॥64॥ तोंच आठविला बोल । की दत्त तुज घरीं येतील । संत न बोलती फोल । शब्द त्यांचा चिंतामणी ॥65॥ भाऊंना सांगितली कथा । अरे मीच तो गुरुदत्ता । परि येऊनी जेवलो आतां । ऐसें हांसून बोलले ॥66॥ प्रसाद देवला लावले । ते उत्तमाचे मधले पडले । भाऊ दत्त म्हणून जेवले । सत्य सत्य त्रिवाचा ॥67॥ माझी वाढवावी भक्ती । म्हणोनि मार्ग दाखविती । दत्त भाऊंना सांगती। कीं येईन समाधींत ॥68॥ भाऊंचे समाधीत येऊन । श्रीदत्त शरणं मम म्हणून । मंत्र देती मज लागुन । भाऊंच्या मुखा मधून ॥69॥ ऐसी योजूनी युक्ती मज भाऊंचे हातीं देती । गुरु शिष्यांची जुळवी नाती । दत्तात्रेय स्वहस्तें ॥70॥ गुरुचरणाची घडो सेवा । तोच सर्व सुखाचा ठेवा । गुरु माझा विसावा । सदा सर्वकाळ ॥71॥ ऐसें असतां देवा । कांही घडावी अल्प सेवा । म्हणोनि करीतों धांवा । ग्रंथसेवा पूर्ण व्हावी ॥72॥ तुमचा आशीर्वाद असावा । ग्रंथ माझा पूर्ण व्हावा । गुरुंचा लौकिक वाढवावा । ऐसी इच्छा अंतरीं ॥73॥ माझेवर तुमचीं प्रीति । म्हणोनि करीतों विनंती । मज द्यावी अंत:स्फूर्ति । मतिप्रकाश करोनी ॥74॥ आंता करीतो वंदन । आई-वडीलांना स्मरुन । त्यांचे पायीं सदैव लीन । प्रेम अपार मजवरी ॥75॥ वडीलांची कठोर माया । वृक्षापरी देई छाया । आईनें कष्टवून काया । जीवन माझें फुलविलें ॥76॥ वडील माझे गजानन । आई सरस्वती म्हणून । मजवरील त्यांचे ऋण । कांही केल्या फिटेना ॥77॥ माझे हातून कांहीं । त्यांची सेवा घडली नाहीं । त्रास दिला असेल कांही । होईन कैसा उतराई ॥78॥ परी घडतां गुरु-सेवा । मातापित्याला संतोष व्हावा । मोक्ष मार्ग उघडावा । माझे मुळें तयांचा ॥79॥ हीच इच्छा अंतरीं । म्हणोनि विनंती चरणांवरी । रोष नसावा अंतरी । कृपा-दृष्टि वळवावी ॥80॥ कांहीं घडला असेल अपराध । अथवा घडला असेल प्रमाद । म्हणोनि घांतली साद । काकुळतीनें दोघांना ॥81॥ यावें त्वरित धांवून मला कुशींत घेउन । प्रेमाचा हात फिरवून । आशीर्वाद मला द्यावा ॥82॥ आतां विनवू संतमंडळी । जी देवाहून नाही निराळी ज्यांची करणी आगळी । देव ही स्वाधीन जयांच्या ॥83॥ मज भेटली जी संतमंडळी । त्यांची घेऊन नामावली । साक्षीला ठेवून सगळी । बोलवीन या वेळी ॥84॥ भक्तीचा महिमा वाढवावा । हाच जयांचा हो दावा । त्याकरितां मजला हवा आशीर्वाद तयांचा ॥85॥ श्रीवासुदेवानंद सरस्वती । जी दत्तात्रेयाची प्रतिकृती । गरुडेश्वरी ज्याची वस्ती । लीन मी त्यांचे चरणीं ॥86॥ तैसेच श्रीरंगअवधूत । नारेश्वरीचे महान संत । माझ्या वसती अंतरांत । त्यांचे पदीं लीन मी ॥87॥ दादासाहेब चौबळ । भक्तिमार्ग ज्यांचा प्रबळ । मार्गदर्शन सर्वकाळ । केलें ज्यांनी मजलागी ॥88॥ तैसेच श्रीभक्तराजांचा । परमपूज्य भाई यांचा । स्नेह वाढला प्रीतिचा । म्हणोनि लीन मी पायीं ॥89॥ परोक्ष अथवा अपरोक्ष । संत भेटले जे समक्ष । विनंती हा ग्रंथ-वृक्ष । प्रीति-सिंचने फुलवावा ॥90॥ चरित्रकत्याचे गुरुजन । बापूमहाराज केणी जाण । दळवी वंशास उद्धरून । कृतार्थ केले त्यां जगीं ॥91॥ त्यांचे उपकार म्हणून । दिसले भाऊंचे चरण । त्यांचे पदीं सदा लीन । होऊन आशीष मागतों ॥92॥ कृपा दळवी कुटुंबावर । बापू करीती वारंवार । स्वयं घेती अवतार । भाऊ दळवी म्हणोनियां ॥93॥ अपरोक्ष रीत्या हे कथन । तुमचेंच होणार आहे जाण । म्हणोनि घ्यावें करून । पूर्ण ग्रंथ स्वहस्तें ॥94॥ आतां नमन श्रीवेतोबाला । चरित्र्यकर्त्याचे कुलदैवताला । साष्टांग नमन सातेरीला । भूमिया-पूर्वसांना तसेंच ही ॥95॥ गुरूच्या सर्व कुलदैवता । सांगणें माझें एकच आतां । यावें माझ्या सांगता । द्यावी सिद्धता ग्रंथाला ॥96॥ आतां नमन श्रोते जन । तुम्हांस करून वंदन । तुम्हांहून मी सान । ग्रंथ प्रयत्नें कथितो ॥97॥ ग्रंथ वाढवील प्रीती । ग्रंथ वाढवील भक्ति । ग्रंथ प्रत्यक्ष गुरुमुर्ति । अंतरी साठवावी ॥98॥ परी ग्रंथांतील कथन । माझे कांहीच नसून । घेतला असे लिहून । प्रेरणा देऊन गुरुनें ॥99॥ ऐसी ही गुरुनाथा । तुमची करील सार्थकता । भक्तिभावें जरी वाचतां । क्लेश कलह दूर होती ॥100॥ देव-वेतोबासी नमन । ग्रंथांत ज्यांचें गुणगान । ग्रंथ हा परिपूर्ण । भक्तानुभावें नटला ॥101॥ परी आज्ञा घेतल्यावांचून । कांहीं न लिहू शके वचन । पायीं होऊन मी लींन । प्रसादातें मागतों ॥102॥ या अध्यायाचें श्रीफल करून । पवित्र चरणांवरी वाहून । सांगणें करीतों नमून । ग्रंथ माझा सिद्ध व्हावा ॥103॥ जें जें असेल न्यून । त्यांतें करून घ्यावें पूर्ण । वरद हस्त ठेवून । माझे शिरावरी, देवा! ॥104॥ नको भिऊं बाळा म्हणून । मला दिले तुम्ही वचन । तेच अंतरीं बाळगून । आशेवर राहीलों ॥105॥ आशा फोल न व्हावी । ग्रंथामधून फुलवावी । चौफेर दरवळावा । परिमल तयाचा ॥106॥ आतां नमन गुरुवर्यांना । चरित्र्यकर्त्यां भाऊंना । जे देऊन प्रेरणा । ग्रंथ हा चालविती ॥107॥ ग्रंथ वाढवील प्रीति । ग्रंथ वाढवील भक्ति । ग्रंथ देईल शक्ति । भुक्ति-मुक्ति प्रदायक ॥108॥

इति श्रीभाऊचरित्रामृत प्रार्थनानाम प्रथमोऽध्याय: । श्रीदेव वेतोबार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।

विसावा – अध्याय २ >>

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *