शिवलीलामृत सार
शिवलीलामृत सार

॥ श्री श्र्लोकबद्ध शिवलीलामृत सार॥

व्यासादि सूत महिमा कथिती शिवाचा
“घेई षडक्षर महा शिवमंत्र वाचा”
घेता दशार्ह नृप मंत्र गुरु मुखाने
गेला कलावतीसवें भव उद्धरोनी ॥१॥

ते बिल्वपत्र बहुप्रीय उमापतीला
पावें सदैव वहता मनु सद्गतीला
व्याधास पूजन वनी शिवरात्रि झालें
बोधामृतें हरिणीने भवमुक्त केलें ॥२॥

शापें वसिष्ठ अपराध नसे नृपाचा
कल्माषपाद हरितो जिव ब्राम्हणाचा
केली कृपा नृपवरें ऋषि गौतमानें
गोकर्णि पाप परिहारिति दर्शनानें ॥३॥॥

ऐकुन राजपदरीं मणि दिव्यकीर्ति
कांक्षा मण्यास हरण्या निज शत्रु येती
पांही पुजा नृपगृहीं, करी गोप बाळा
पावोन शंभु कुमरा नृप उद्धरीला. ॥४॥

तो राजबाळ वनिं सांपडला उमेस
शांडिल्य राज द्विज पुत्र करीं भविष्य
सांगूनि मंत्र व्रत आचरण्या प्रदोष
हो प्राप्त सर्वगतवैभव बाळकांस ॥५॥

सीमंतिनी करितसे व्रत सोमवार
पातालिचा शिवकृपें परते भ्रतार
दीर्घायुषेच, सुख, वैभव प्राप्त झालें
जन्मांतरी करुनि पुण्य शिवा मिळाले ॥६॥

जातां पुजेस धरुनी पतिपत्नि रूपा
सीमंतिनी तपबले फिरवी स्वरूपा
पूर्वार्जिचे स्मरुनि पुण्य यती पुजेचें
संजीविले सुमति बाळ अभागिनीचें ॥७॥

भद्रायु शास्त्र करि पूर्ण गुरु कृपेनें
शत्रूस जिंकूनि पिता करि मुक्त-भेणें
भद्रायु सत्व हरण्या धरिं व्याघ्र रुपा
शंभू कृपा करिति दावुनि स्वस्वरुपा ॥८॥

हा वामदेव फिरतो विभुती तनूसी
हो दिव्यज्ञान यति स्पर्शित राक्षसासी
सांगून गोष्ट शबरी दृढ लिंग भावा
मी भस्मधारणविधी कथि वामदेवा ॥९॥

वैधव्य नेणुनि वदे ऋषि शारदेसी
“होशील पुत्रवति माऊलि तूंच खासी”
“भेटेल स्वप्नि पति, होईल पुत्र प्राप्त”
अंबा प्रसन्न करि नैधृव बोल सत्य ॥१०॥

कुक्कुट मर्कट पराशर वृत्त सांगे
अल्पायुषीच नृप-मंत्रि सुता प्रसंगे
रुद्राभिषेक करिता नच मृत्यु येई
रुद्राक्ष-रुद्र महिने शिव स्वर्गि नेई ॥११॥

केले कुकर्म जिवनीं अनुतप्त होती
गोकर्णि विप्र-बहुला भव उद्धरीती
भस्मासुरा सुजन जाळुनि मत्त झाला
मोहीनि रुप हरि घेऊनि भस्म केला ॥१२॥

मातापितादि अवमानिति पार्वतीला
उध्वस्त यज्ञ विरभद्रें क्षणेंच केला
त्या तारकासुर बळे, सुर जिंकियेले
कार्तिकस्वामी शिवसूत करें वधीलें ॥१३॥

खेळोनि सोंगटीपटा शिव नागवीला
भिल्लीण होऊनि उमा हर मोहवीला
कांडूनि देति चिलया शिवभोजनाला
शंभू, श्रियाळ, सुत उद्धरी चांगुणाला ॥१४॥

झाले स्वधर्मच्युत लोकही जैन धर्मे
लोपोनि वेद, जनही करिता न कर्मे
जिंकी जगद्गुरुही, मंडणमिश्र अय्या
खंडोनि जैन मत रक्षित वेदकार्या ॥१५॥

हा ग्रंथ श्रीधरमुखें शिव बोलवीला
सारांश श्र्लोकमय दत्तकृपेच केला
हें गीतपुष्प मधु अर्पितसे गुरुला
वाचेल भाव धरुनी शीव तारि त्याला ॥१६॥

॥ श्री सांब सदाशिवार्पणमस्तु ॥
॥ शुभं भवतु श्रीरस्तु ॥

कवि: मधुकर गजानन सुळे

Click to rate this post!
[Total: 10 Average: 4.5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *