॥ अथ अष्टमोऽध्यायः ॥
श्रीगणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ ब्रह्मानंद म्हणे श्रीधर । तव गुणार्णव अगाध थोर । तेथें बुद्धि-चित्त तर्क पाहणार । न पावती पार तत्वतां ॥२॥ कनकाद्रीसहित मेदिनीचें वजन । करावया ताजवा आणूं कोठून । व्योम सांठवें संपूर्ण । ऐसें सांठवण कोठून आणूं ॥३॥ मेदिनीवासनाचें जल आणि सिकता । कोणत्या मापें मोजूं आतां । प्रकाशावया आदित्या । दीप सरतां केवीं होय ॥४॥ धरित्रीचें करूनी पत्र । कुधर कज्जल जलधि-मषीपात्र । सुरद्रुम लेखणी विचित्र । करुनी लिहित कंजकन्या ॥५॥ तीही तेथे राहिली तटस्थ । तरी आतां केवीं करूं ग्रंथ । जरि तूं मनीं धरिसी यथार्थ । तरी काय एक न होय ॥६॥ द्वितीयेचा किशोर इंदु । त्यासी जीर्ण-दशा वाहती दीनबंधू । तैसे तुझे गुण करुणासिंधु । वर्णींतसें अल्पमती ॥७॥ समर्थांच्या सुभक्तांत । अण्णा वाघ होते निष्ठावंत । पूर्वीं न मानिती साधुसंत । ईश्र्वर निष्ठा अंतरीं ॥८॥ विषय निघतां साधुसंतांचा । म्हणती भ्रम तो आहे मनाचा । भोळ्या अज्ञानी जनांचा । गैरलाभ घेती ते ॥९॥ ईश्र्वराची सत्ता मनुष्यांत । हें त्रिवार वाटतें असत्य । जीवनसीमा असतां सिमित । अगाध सत्ता कैसी त्या ॥१०॥ तरिही मित्र सांगती अण्णास । कीं दाणोलीला जावें खास । संत कैसे असती तें पहावयास । एकदां तरी जीवनीं ॥११॥ मालवणच्या आपुल्या मुक्कामांत । अण्णा जाती दाणोलींत । चिकीत्सक बुद्धी अंतरांत । घेऊनी जाती मनांत कीं ॥१२॥ जैसे ते येती समर्थांसमोर । तैसे बोलती द्यावे अत्तर । तों अण्णा करिती विचार । कैंसे द्यावे म्हणुनियां ॥१३॥ घरांत आहे कीं भरपूर । प्रवासांत कैसें असणार । तों समर्थ बोलती विचार । इतुका कैसा करतो रे ॥१४॥ तुझ्या जाकिटाच्या खिशांत । अत्तर फाया आहे आंत । तो मज देई रे त्वरित । वेळ फुकां लावूं नयें ॥१५॥ अण्णांना खात्री होती मनांत । कीं अत्तर नाहीं जाकिटांत । परि समर्थ बोलती म्हणुनी खिशांत । हात सहज घासती ते ॥१६॥ तों चांदीच्या छोट्या डबींत । अत्तर फाया होता खिशांत । तो समर्थांना देता मनांत । आश्र्चर्य अधिक वाटलें ॥१७॥ ऐशा सर्वव्यापक दृष्टीची । चुणुक लाभतां अण्णांची । दृष्टि बदलली ती पूर्वींची । भक्तिबीज रुजले अंतरीं ॥१८॥ जैसा जैसा वाढला सहवास । तैसा तैसा समर्थांचा लागला ध्यास । भक्तीपंथावरील त्यांचा प्रवास । प्रगतिपर होऊ लागला ॥१९॥ साधुसंतांविषयींचें अज्ञान । समूळ गेलें कीं निघून । हेचि भूलोकींचे देव म्हणून । जाण झाली अंतरीं॥२०॥ त्यांची ऐसी प्रीति पाहून । मालवणाच्या घरीं जाती स्वतःहून । अण्णा वाघ होती प्रसन्न । समर्थ कृपा पाहूनियां ॥२१॥ त्यांच्या वाटतसें मनांत । कीं समर्थांना न्यावें मुंबईत । चरणस्पर्श व्हावा घरांत । मुंबईमधील आपुल्या ॥२२॥ परि सुदिन उगवला एक दिन । मालवणांत येती रहावयाकारण । सकाळींच बैसती येऊन । मोटारींत ते वाघांच्या ॥२३॥ म्हणती मुंबईस जावें घेऊन । याच क्षणीं मज येथून । तों अण्णा गेले कीं आनंदून । तयारी त्वरित केलीसे ॥२४॥ जरि लहर जाईल फिरून । तरी आनंदावर पडेल विरजण । म्हणूनी निघती घेऊन । तैसेचि श्रीसमर्थांना ॥२५॥ जैसी लोकांना होई जाण । कीं समर्थ जाती गाडीमधून । तैसे मार्गात ती थांबवून । दर्शनोत्सुक करिती गर्दीला ॥२६॥ कोणी थांबती काम टाकून । कोणी पळती धंदा सोडून । स्त्रियां धांवती मुलांस घेऊन । गाडीमागें पळती तें ॥२७॥ गाडी काढवया गर्दीमधून । वीट न सांपडे म्हणून । ड्रायवरही जाई वैतागून । अत्यंत प्रयास पडती त्या ॥२८॥ त्यांत समर्थांची स्वारी । अत्यंत संतापली जनतेवरी । जैसा सूर्य येतां शिरावरी । तप्तता अधिक वाढतसें ॥२९॥ कसें तरी येती कोल्हापुरीं । वाटे येथुनी फिरावें माघारीं । कारण समर्थ संताप लहरी । आटोक्यांत काही येईना ॥३०॥ इतक्यांत रेल्वे फाटकासमोर । गाडी जाहलीसे स्थिर । तों साताऱ्याच्या मार्गावर । गाडी वळविण्यांस सांगती ॥३१॥ खंडाळ्याच्या फाटकासमोर । गाडी पुन्हा झाली स्थिर । तों समर्थ संतापले भयंकर । फाटकवानावर रेल्वेच्या ॥३२॥ म्हणती गाडी जाण्यास येथून । एक तास आहे रे अजून । तरि राहिला कां झोंपून । उठव साल्याला झडकरी ॥३३॥ तैसा ड्रायव्हर गेला धांवून । फाटकवानास दिली जाण । तो आपुली चूक झाली म्हणून । क्षमायाचना करितसे ॥३४॥ ऐशाच चिडलेल्या स्थितींत । गाडी पहाटें आली मुंबईत । अर्धा तास वाघांच्या घरांत । विश्रांती घेतली समर्थांनीं ॥३५॥ नंतर तेथुनियां उठती । टोपीवाल्याच्या गाडींत बैसती । पुनश्र्च चालली भ्रमंती । पूर्ण मुंबईंत समर्थांची ॥३६॥ परि इथेंही होई तिच गती । जनसागराला येई भरती । राजकारणी, कलावंत, उद्योगपती । सर्व समाजस्तर धांवती ॥३७॥ पोलिस अधिकारी येती धांवत । लोकांना होण्या सहाय्यभूत । पहारा देऊनी लाविती शिस्त । दिन रजनीं बिचारे ते ॥३८॥ ऐसे बहूत दिन झाले म्हणून । दाणोलीकर जाती घबरुन । न सांगतां गेले निघोन । कोठें म्हणून शोधती ते ॥३९॥ तों त्यांना शोधित शोधित । बापूसाहेब थडकले मुंबईत । समर्थांपुढती प्रत्यक्षांत । उभे राहती विनम्रपणें ॥४०॥ तों समर्थ जाती चिडून । म्हणती मी काय चोर आहें म्हणून । अथवा डाकू आहें म्हणून । पाळत ठेवितां माझ्यावरी ॥४१॥ मी अव्वल साधु आहे दुनियेचा । ताब्यांत न राहीन कुणाच्या । मी स्वतंत्र आहें पूर्ण मनाचा । भानगडींत माझ्या पडू नयें ॥४२॥ ऐसें म्हणूनियां तेथून । गाडींत जाती ते निघोन । माटुंग्यामध्यें येऊन । गणेश बागेजवळी थांबती ॥४३॥ मालक माकडछाप पावडरचे । वडेर म्हणुनी होते त्यांचें । बांधाकाम चाललें होतें घराचें । तेथें उतरती समर्थ ॥४४॥ तेथिल एका झोपडी शेजारीं । ते लवंडले जमिनीवरी । झोंपून गेले ते क्षणभरी । सांगून सर्व भक्तांना ॥४५॥ पुढें अकरा वर्षांनंतर । तेथे जाहले मंदिर l माटुंगा-व्हिंसेंट रोडवर । वडेर यांनी बांधलें तें ॥४६॥ असो, तेथुनि पुढें निघती । भटकुनी गोरेगावांत येती । रात्रौ एक वाजतां फिरती । माघारी मुंबईस यावयां ॥४७॥ गाडी येतां कीं मुंबईत । ‘खडी करो’ पुकारिती समर्थ । उतरोनि जाती हाॅटेलांत । एका ईराणी माणसाच्या ॥४८॥ साले डुक्कर खाव म्हणून । मोठ्यानें बोलती दरडावून । काॅफी तयार आहे कां म्हणून । विचारिते झाले इराण्याला ॥४९॥ चार खुर्च्या लावाव्या म्हणून । चार पानपट्ट्या द्याव्या म्हणून । ऐसें बोलती ते ओरडून । इराण्याकडे पाहुनियां ॥५०॥ इराणी गेला चिडून । तों अण्णा गेलें धावून । खुर्ची बसावयास देऊन । समजूत काढती त्यांची ते ॥५१॥ रात्री एक वाजला म्हणून । हाॅटेल काढलें होतें धुवून । खुर्च्या बाजुला ठेवून । हाॅटेल बंद करीत होता तो ॥५२॥ इतक्यांत मंडळी शिरली आंत । तेणें इराणी झाला संतप्त । तों समर्थ बोलती उर्दुंत । कलाम एक कुराणाचा ॥५३॥ काहीं मौलवी होते शेजारी । ते ऐकून आले सामोरी । येऊन बैसती अवलिया शेजारीं । कुतुहलानें ऐकीत तो ॥५४॥ पैकीं एक व्यासंगी मुसलमान । समर्था संगे बोले कुराण । परि समर्थांचे पाहुनिया ज्ञान । या अल्ला, या अल्ला करुं लागला ॥५५॥ हमपर दुवा करो साई । ऐसें म्हणुनि लागला पायीं । तों इतर सर्व मुसलमान भाई । शरण जाती समर्थांना ॥५६॥ वेडा माणूस क्षणापूर्वींचा । कैसा अवलिया झाला त्यांचा । इराण्यासह मुसलमानांचा । भ्रमनिरास जाहला ॥५७॥ काॅफी आणिली तयार करून । पानपट्ट्याही घेतल्या मागवून । वरी पाय हाॅटेलास लागले म्हणून । आभार मानिले सर्वांचे ॥५८॥ सर्व पाय धरतानां पाहून । एक पोलिस आला धांवून । आशीर्वाद घ्यावा म्हणून । वंदन करितां झाला तो ॥५९॥ तों हात ठेवुनि शिरावर । समर्थ बोलले मधुरस्वर । कल्याण होईल रे हवालदार । निश्र्चिंत असावें अंतरीं ॥६०॥ परि बोले जोडुनी हात । या वशिल्याच्या राज्यांत । हवालदार होणें नाहीं नशिबांत । शिपाई साधा आहे मी ॥६१॥ तेव्हां समर्थ बोलले हंसुन । तुज देवानें दिलें वरदान । मेवा तोची खाईल रे जाण । सेवा देवाची जो करितो ॥६२॥ हवालदार झाल्याची ॲार्डर । दुसरेच दिवशी मिळतां सत्वर । शोधत गोरेगांवचें घर । दर्शनाकरितां आला तो ॥६३॥ ऐसें कांहीं दिवस राहून । दाणोलीस परतले सर्वजण । परि अण्णास आली पूर्ण जाण । गुरुसेवा कठिण असे ॥६४॥ कोकणामधील शिरसीकर । यांचा नेटका न चाले संसार । गरिबी होती भयंकर । उपाशी दिन काढती ते ॥६५॥ बुद्धीनें होते पुष्कळ । परि सर्व यत्नें जाती निष्फळ । साध्या नोकरीचाही सुमेळ । कांहीं केल्या जमेचिना ॥६६॥ जेव्हां दैव न देते साथ । ईश्र्वर आठवतो मनांत । किंवा संतांचा घेती शोध । आशेचा किरण जाणुनी ॥६७॥ ऐसें असतां ते चिंतीत । समर्थ कीर्ति होते ऐकीत । वाटे दर्शन घ्यावें प्रत्यक्षांत l दाणोलीमाजी जाऊनी ॥६८॥ सारासार करुनि विचार । दाणोसीस पावले लौकर । धर्मशाळेंत उतरुनि सत्वर । दर्शनास गेले मठांत ॥६९॥ तों तेथें मिळाली माहिती । कीं समर्थ झोपुन असती । नयनही ते न उघडती । तीन दिवस झाले तरी ॥७०॥ असंख्य भक्तगण जमती । दर्शनाकरितां तिष्ठत बैसत । शिरसीकर मात्र दुशण देती । दुर्दैव म्हणुनि नशिबाला ॥७१॥ परि झोंपलेल्याच स्थितींत । दर्शन घेण्यां होती उत्सुक । तों शांत मुखावर दिसले स्मित । सुगंध मंद जाणवला ॥७२॥ त्यांची शांत मुद्रा पाहून । उभयतां झाले अति प्रसन्न । मुखावलोकनें गेले मोहून । भक्तिभाव उचंबळला ॥७३॥ मनोमनीं भावपुष्पांजली वाहून । धर्मशाळेंत परतले दोघेजण । दुसरे दिवशी जाती म्हणून । तों समर्थ संतप्त होते कीं ॥७४॥ ऐसे दिवसां मागुनी दिवस जाती । समर्थांची न होय भेटप्राप्ती । उभयतां मात्र सेवा करिती । प्रतिदिनी प्रेमानें मठांत ॥७५॥ कधीं समर्थ दिसती समोर । परि वळवुन घेती नजर । कधीं सांगती सत्वर । अंगण सारव शेणानें ॥७६॥ ऐसी नित्य होत असे निराशा । परि त्यांनी न सोडिली आशा । किंवा न गुंडाळला गाशा । चिकटून राहिले तेथेंच ॥७७॥ ऐसें तीन महिनें काढून । सेवा केलीसे कठीण । तेंव्हां कर्मभोग गेला संपून । भाग्य उजळलें दोघांचें ॥७८॥ एकदां उभे असतां ते रस्त्यांत । या दोघांनी घातला दंडवत । मनोमनीं होते विनवीत । कृपा करावी म्हणुनियां ॥७९॥ जैसें समर्थ त्यांना खुणविती । तैसें उभयतां जवळ धांवती l वाण्याच्या टोपलींत हात घालिती । तांदुळ घेती मुठींत ते ॥८०॥ शिरसीकरांचे देती हातांत । तांदुळ घेतले जे मुठींत । म्हणती येथूनि जावें त्वरित । उभयतांनी माघारीं ॥८१॥ पुनश्र्च करुनियां नमस्कार । धर्मशाळेंत येती सत्वर । परि कोठें जावें याचा विचार । करित होते मनांत ।॥८२॥ मुंबईस जावें पाहून । ऐसा विचार करिती दोघेजण । परि पैसे नव्हते म्हणून । चिंतित होते अंतरीं ॥८३॥ तरि मोटारतळावर जाऊन । सहज येती ते पाहून । तों हांक आली पाठीमागून । शिरसीकरांच्या तेधवां ॥८४॥ सहज पाहती ते वळून । तो बालमित्र होता म्हणून । अंतरीं गेलें आनंदून । आश्र्चर्य वाटलें अंतरीं ॥८५॥ कोठें जातोस म्हणून । त्यानेंच विचारला प्रश्र्न । तैसी सर्वकथा सांगून । चिंता सांगितली मित्राला ॥८६॥ तो म्हणें तूं न व्हावें चिंतिंत । नोकरी जाहली रे निश्र्चित । मजसंगे यावे मुंबईत । सहभागी करिन धंद्यात ॥८७॥ माझा धंदा चालला जोरांत । तेणें भागिदाराच्या आहे शोधांत । तुझाच विचार होतों करीत । तोंचि अचानक येथें सापडलास ॥८८॥ माझा तांदळाचा आहे व्यापार । तो वाढला असे रे चौफेर । जरि तुझा लाभेल सहकार । कार्य माझें साधेल रे ॥८९॥ शिरसीकर गेले आनंदून । वर्षाव गुरुकृपेचा पाहून । तैसेची जाती निघून । मित्रांसवें मुंबईला ॥९०॥ तेथें मित्रासवें काम करुन । धंद्याची केली शिघ्र जाण । रंगूनला दिले पाठवून । तांदूळ खरेदी करावया ॥९१॥ पुढें ब्रह्मदेशांत राहून । स्वतंत्र पेढी उघडली छान । दृढ मैत्रीही सांभाळून । धंद्यांत श्रीमंत झाले ते ॥९२॥ दरवर्षीं येती दाणोलींत । समर्थां सेविती भक्तियुक्त । विहीर बांधली स्मरणार्थ । समर्थ मठांत त्यांनी हो ॥९३॥ सुवर्ण पादुका केल्या छान । त्या समर्थांस केल्या अर्पण । परि समर्थ देती त्या जाणून । राजवाड्यांत श्रीमंतांच्या ॥९४॥ प्रतिवर्षी पुण्यतिथीला । पालखिंत देति मिरविण्याला । अन्यथा असती त्या पुजेला । सावंतवाडीच्या राजगृही ॥९५॥ जैसा श्रीकृष्ण मंदिरी । सुदामा आला होता दरिद्री । नशिबांत असतां क्षयश्री । यक्षश्री केलें कृपेनें ॥९६॥ तैसें समर्थांच्या कृपेंकरून । ज्यास महागलें होतें अन्न । त्याला अन्नदाता करून । वैभव त्यांचें वढवले हो ॥९७॥ आजही ते तांदूळ मुठीभर । जपुनि ठेविती शिरसीकर । गुरुप्रतिमेंपरि देऊनि आदर । नित्य पूजेंत वंदिती ते ॥९८॥ ऐसे हे शिरसीकर । गुरुभक्त झाले थोर । प्रेम करिती अपरंपार । जीवन सर्वस्व समर्पिलें ॥९९॥ जरि अपार मिळाली संपत्ती । तरि गरिबांवर करिती प्रीती । दातृत्वाची ठेवुनी वृत्ती । सेवाव्रत आचरती ते ॥१००॥ जैशीं दाण्या दाण्या वरती । खाणाऱ्यांची नांवें असती । तैसी धनसंपत्ती वरती । नांवे असती भोक्त्यांची ॥१०१॥ तेणें परी असतें कृपाधन । सद्गुरु करिती हे जाणून । कीं तुम्हीं द्यावें तें वाटून । इतरां संतृप्त करावें ॥१०२॥ परि गुप्त ठेवावें मनांतून । इतरां न व्हावी त्याची जाण । तेणें वृद्धिंगत होतें कृपाधन । ज्ञानधन सहज लाभतसें ॥१०३॥ होतां ज्ञानाची प्राप्ती । गुरु कैसें दूर राहती । जीवशिवाची प्रीति । संगम अंतरीं होतसे ॥१०४॥ तरी अभयंकर शिरीं ठेवून । चरणस्पर्शानें करावें पावन । जीवन करावें धन्यपूर्ण । भाऊदास प्रार्थितसें ॥१०५॥
इति श्री भाऊदास विरचित । श्री समर्थ सौरभ ग्रंथस्य अष्टमोऽध्याय गोड हा । श्री सांबसदाशिवार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।