॥ अथ पंचमोऽध्यायः ॥

श्रीगणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुभ्यो नमः ॥१॥ जेथें शिवनाम घोष निरंतर । तेथें कैंचें जन्म मरण साचार । तिहीं कळिकाळ जिंकला समग्र । शिवहरहर छंद ज्यातें ॥२॥ पाप जाळावया निश्र्चिती । शिवनामी आहे जितुकी शक्ति । तितुकें पाप त्रिजगती । अद्यापी कोणीं नसेल केले ॥३॥ जैसें प्राणियांचे चित्त । विषयीं गुंतलें अत्यंत । तेवीं शिवनामीं होतां रत । कैचें बंधन मग तयासी ॥४॥ धनइच्छा धरूनि चित्तीं । धनाढ्याची करिती स्तुती । तैसें शिवध्यानीं प्रवर्तले । तरी जन्म मरण कैंचे तया ॥५॥ मुंबईचा मुसलमान व्यापारी । त्याची पत्नी राही आजारी । तेणें विचलित राही अंतरी । लक्ष धंद्यात लागेना ॥६॥ पोटशुळाच्या वेदनेनें । तिचें असह्य झालें जिणें । जीव देण्याचेही प्रयत्न । करूनी पाहिले तिनें हो ॥७॥ परि पतिच्या अति दक्षतेनें । फोल झाले तिचे यत्न । सर्व डाॅक्टरांचेही प्रयत्न । निष्फल झाले अखेर ॥८॥ ऐसा व्यापारी असतां चिंतेत । एक मित्र भेटला अकस्मात । म्हणे अजमेरला न्यावें त्वरित । प्रसिद्ध दर्ग्यावरी आपुल्या ॥९॥ दुवा मागावी अल्लाची । जरि मेहरबानी होईल पिराची । तैसी सुटका होईल रे चिंतेची । पत्नीस आराम पडेल ॥१०॥ विचार पटला मनांत । तैसा अजमेरला गेला त्वरित । त्याच रात्रीं स्वप्नांत । पीरसाहेब आले कीं ॥११॥ आंबोलीच्या घाटाखाली । गांव आहे रे दाणवली । तेथें जातां मनांतली । इच्छा पूर्ण होईल ॥१२॥ ऐसा लाभतां आशिर्वाद । व्यापाऱ्यास झाला आनंद । पत्नीस केला विदित । दृष्टांत पिर साहेबांचा ॥१३॥चादर चढविली दर्ग्यावर । दानधर्म ही केला भरपूर । दुवा मागुनी दर्ग्यावर । निघता झाला तेथुनी ॥१४॥ इकडे सकाळीं दाणोलींत । समर्थ बैसले दुकानांत । त्याला सांगती बाटलींत । राॅकेल द्यावे भरून रे ॥१५॥ राॅकेल भरूनी बाटलींत । समर्थ बैसले वाट पहात । तो दुकानदार झाला शंकित । कशास घेतलें म्हणून ॥१६॥ त्यांना विचारतां ते सांगती । अजमेरहून येणार जी व्यक्ति । तिला द्यावयाची ही भेट अंतीं । पहा गंमत येथें तूं ॥१७॥ ऐसें बोलती न बोलती । तों समोरून येई ही दंपती । समर्थांस ते नमस्कारिती । बैसावया सांगती तयांना ॥१८॥ जैसे बैसण्यास जाई ती दूर । तैसे समर्थ उठती लौकर । तिचे पकडोनी दोन्हीं कर । बाटली मुखांत कोंबली ॥१९॥राॅकेल भरलेली ती बाटली । तिला बळजबरीनें पाजली । तैसी ती भडभडा ओकली । निश्चेत पडली भूवरी ॥२०॥ दुकानदार गेला घाबरून । त्यालाच होती त्याची जाण । हा मुसलमान करील खून । बरेंवाईट झाल्यास ॥२१॥ तिचा पतिही गेला घाबरून । मनांत गेला गोंधळून । म्हणे पीराने काय म्हणून। इथें मजला धडिलें ॥२२॥ जैसी ती हळुं हळुं उघडी लोचन । तैसा निश्वास सोडिला विश्वासून । तों ती जात असे धावूंन । चरण धरण्या समर्थांचे ॥२३॥ तेंव्हापासुनि तिचा पोटशूळ । तत्काळ गेलासे समूळ । पोटांत दडलेला कर्दनकाळ । समर्थें सामर्थ्यें घालविला ॥२४॥ समर्थ झाले त्यांचा अल्ला । सर्वत्र झाला बोलबोला । पीरसाहेब मानुनी समर्थाला ।कुराण पढती समोर ॥२५॥गुलाबी थंडीच्या दिवसांत । सकाळच्या कोवळ्या उन्हांत । समर्थ बैसले दुकानांत । अवधूत दिगंबर ऐसें कीं ॥२६॥ चरणाजवळ होती बैसलीं । चार कुत्रीं गांवांतली । वाटे दत्तमूर्ती कीं प्रकटली । दर्शन द्याया सुभक्तांना ॥२७॥ गुरुवार होता ते दिनीं । रीघ लागली दर्शना कारणीं । एका छबीकारानें येऊनी । विनंती केली समर्थांना ॥२८॥ आपुले शांत प्रसन्न ध्यान । आम्हां आवडलें मनापासून  । तो चिरंजीव करण्या क्षण । छबी काढूं द्यावी कीं ॥२९॥ आजचें सुंदर ध्यान पाहून । जैसें आम्ही झालों प्रसन्न । तैसें इतरांनी व्हावें म्हणून । विनंती विनम्र करितसें ॥३०॥ त्याचा भक्तिभाव पाहून । सम्मती दिली आनंदून । तेंचि चित्र विशेष करून । आवडलें हो सुभक्तांना ॥३१॥ जैसे चित्र झाले काढून । तैसे शिवराम शिवराम म्हणून । समर्थ घेती बोलवून । भाऊ डिंगे यांनाच कीं ॥३२॥ प्रेमानें जवळी घेऊन । बोलले ते हात फिरवून । उगाच भटकलां तिर्था कारण । देव सर्वत्र असतांना ॥३३॥ देवही आहे सर्वत्र । तीर्थेंही आहेत सर्वत्र । तूं हांक मारितां होईल प्रकट । तीर्थ धांवून येईल कीं॥३४॥ तेव्हां डिंगे म्हणाले गमतींत । कीं तुमच्यापुढें होईल प्रकट । आमच्या हांकेला ही धांवत । नाहीं कधी देव येणार ॥३५॥ मला वाटलें कीं गंगेत । माझे धुवावें हे प्रारब्ध । गंगा थोडीच येणार धांवत । पायासमोर माझिया ॥३६॥ बघ गंगा आली म्हणून । दोन्ही पुढे केले चरण । तत्क्षणीं पवित्र पायांतून ।गंगा प्रकटली साक्षात ॥३७॥ सचैल घातले स्नान । भाऊ डिंगे झाला पावन । आनंदाने गेला गहींवरून । चरण घट्ट धरिले हृदयीं ॥३८॥ जयजय समर्थ श्रीगंगाधर । मज कैसा पडला रे विसर । तूं प्रत्यक्ष असतां समोर । अनेक तीर्थें हिंडलों मी ॥३९॥ यात्राही केल्या असंख्यांत । तरी देव न भेटला मंदिरांत । तुम्हीं प्रत्यक्ष असतां दोणोलींत । ओळख कधीं न पटली ॥४०॥ तुमच्या कृपेनें झालों मी पावन । तेणें मज झालें आत्मज्ञान । आतां हे परमपावन चरण । कधीं न विसंबावें जीवनीं ॥४१॥ जमलेल्या सर्व सुभक्तांनीं । जयजयकार केला गर्जुनी । दाणोली गेली दुमदुमनी । कैलासापरी गमली ती ॥४२॥ राजे बापुसाहेब श्रीमंत । यांच्या विचार आला मनांत । एकादशीला जावें पंढरपुरांत । समर्थांसवें एकदां ॥४३॥ विचार दाखविला बोलून । तैसी होकारार्थी हलविली मान । बापूसाहेब गेले आनंदून । तयारी करूं लागले ॥४४॥ कांहीं भक्तांच्या आलें मनांत । यात्रा जाणार पंढरपुरांत । सरकारी या लवाजम्यांत । संधी मिळेल जाण्याची ॥४५॥ फुकटच्या या प्रवासांत । जाणें होईल पंढरपुरांत । पुण्य ही पडेल पदरांत । विठ्ठलाच्या दर्शनानें ॥४६॥ जैसी जवळ आली एकादशी । बापूसाहेब जाती समर्थांपाशीं । हे समर्थ सद्गुरु पुण्यराशी । उदयिक निघणें यात्रेला ॥४७॥ तैसे समर्थ गेले चिडून । छाटी फेकून झाले नग्न । कटेवरी कर ठेवून । उभे राहिले विठ्ठलापरी ॥४८॥ बघ पांडुरंग आला धांवुन । तरि घ्यावा तो पाहून । ऐसे म्हणतां घडले दर्शन । चैतन्यमूर्ती नारायणाचें ॥४९॥ कनककिरीट शिरावरती । मकरकुंडलेंही चमकती । पीतांबर शेला अंगावरती ।तुळशीमाळ गळ्यांत ॥५०॥ ऐसें पाहतां सुंदर ध्यान । बापूसाहेब झाले आनंदमग्न । साक्षात पांडुरंग प्रकटून । इच्छा पूर्ण केलीसे ॥५१॥ अरे या पावन दाणोलींत । प्रत्यक्ष विठ्ठल असतां वावरत । कशास जाणें पंढरपुरांत । अंतरी बोध झालासे ॥५२॥ सुवर्ण संधी हुकली म्हणून । निराश झाले भक्तजन । तेव्हां समर्थ रागावून । बोलते झाले सुभक्तांना ॥५३॥ काय जेवणावळी घातल्या म्हणून । पंढरपुराची आला इच्छा धरून । तेंही तुम्हांला आजच देईन । खास मटण-पुरीचें असेल तें ॥५४॥ मटण-पुरीचें नांव ऐकून । जो तो गेला पाघळून । कारण प्रत्येकास होती जाण । समर्थांच्या वचनाची ॥५५॥ जरि दुपार गेली टळून । तरी भोजनाचें न दिसें लक्षण । जरि आज न मिळेल अन्न । रात्रीं एकादशी लागते कीं ॥५६॥ ऐशा विचारें भुकेनें तळमळून । विचारतां झाला एक जण । म्हणे आतांच देतो जेवण । गाडी इतुक्यांत येईल ॥५७॥ तोंचि मालवणाच्या एस.टी. मधून । उतरून आले चौघेजण । समर्थांस करूनि वंदन । हार घालूनि त्यां पुजिले ॥५८॥ चौघेही दिसती रुबाबदार । सुरवार कोट फेटा शिरावर । वाटे असावेत कीं सरदार । छाप ऐसी पडतसे ॥५९॥ पैकीं समोर येई एकजण । समर्थांस करी वंदन । देवा आणिलें असे जेवण । जैसे सांगितलें स्वप्नांत ॥६०॥ मटणपुरी आलों घेऊन । मनांतली ईच्छा करावी पूर्ण । सर्वांनीं करावें सहभोजन । इच्छा अपूर्ण राहिली जी ॥६१॥ केव्हांची तुमची वाट पाहून । ही मंडळी गेली थकून । चला नागझरीवर जाऊन । सहभोजन करूं या ॥६२॥ सर्व जाऊनि नदीवर । झाडाखाली बैसलें हिरवळीवर । मध्यें बैसले श्रीगुरुवर । सभोवताली मंडळी कीं ॥६३॥ एक चेपीतसे समर्थचरण । दुसरा गात असे भजन । तिसरा बैसला ताल धरून । चौथा गोष्टी करितसे ॥६४॥ भक्त विचारती चौथ्याला । कोण कोठूनी तुम्हीं आला । सांगे असतों मी मालवणाला । दर्शना कारणें आलों इथें ॥६५॥ जेव्हां समर्थ येती मालवणांत । आमुची इच्छा असे मनांत । जेवणास यावें आमुच्या संगत । समर्थांनी एकदां तरी ॥६६॥ ती आज केली परिपूर्ण । बाबूसिंगाला देऊनि दृष्टांत । मटणपुरी आणावी दाणोलींत । सहभोजन करावया ॥६७॥ आम्ही व्यवसायाने भंगी असून । समर्थांनी न केला अवमान । आमुच्या भक्तीचा ठेविला मान । ऐसा सत्पुरुष न देखिला ॥६८॥ त्यांचे ऐसे ऐकतां भाषण । इतरांचे चेहेरे गेले उतरून । भंग्याच्या हातचें भोजन । करणें पाप वाटलें कीं ॥६९॥ हळुं हळुं तो भक्तगण । नजर चुकवुनी गेला निघून । उरले फक्त हरीजन । आणि पतितपावन समर्थ ॥७०॥ सावंतवाडीचें संस्थान । म्हणजे सद्धर्माचें निधान । प्रजेस होता अभिमान । न्यायप्रिय सच्चरित राजाचा ॥७१॥ एका प्रजाजनाचे हातून । अन्याय घडलासे जाणून । त्याच्या राज्यकलंकाची जाण । होता राजा दुश्वासला ॥७२॥ प्रजेंचें करिती लालन पालन । तरी कां विषयीं गुंतती जन । अपराध करिती ज्ञानीजन । विवेक कोठें जातसे ॥७३॥ जरी शिक्षा केली जाणून । तरी हे मूर्ख बेरड अज्ञजन । यांना न येईल समजज्ञान । शिक्षा स्वयेंच भोगावी ॥७४॥ तेणें संकल्प करिती मनांत । राज्यांत घडला जो अपराध । त्यांत सुधारणा होईपर्यंत । निराहार उपोषण करीन ॥७५॥ समर्थांचे करुनी स्मरण । संकल्प सांगितला मनांतून । सुरूं करुनियां नामस्मरण । उपवास आरंभिला कीं ॥७६॥ ऐसे दिवस होती तीन । इकडे समर्थ राहिले झोपून । अन्नपाण्याविना रात्रंदिन । कुणाशी न बोलती ते ॥७७॥ रात्रीचा देती दृष्टांत । विवेंकें विचारितां हित । माझी आज्ञा घेणें उचित । नाही कां वाटलें तुला रे ॥७८॥ तैसी येती ते भानावर । चिटणीसांस पाठविती लौकर । समर्थांचा काय विचार । आहे म्हणुनि विचारण्या ॥७९॥ जैसे चिटणिस येऊनी बैसती । समर्थांस येई जागृती । नृपवराचा ते निरोप सांगती । आज्ञा काय विचारती ॥८०॥ दुसऱ्याच्या न कराव्या पंचायती । दैवात असेल तरी खाती । अथवा प्रारब्धही भोगिती । आपण चिंता करुं नये ॥८१॥ ऐसें लाभतां उत्तर । उपवास सोडिती सत्वर । आत्मक्लेशानें बलवत्तर । दैव कधीं न बदलतें ॥८२॥ दैव बदलावयाचें आहे साधन । एकची आहे सद्गुरुचरण । अनन्यभावें जातां शरण । भवभयहरण निश्र्चित रे ॥८३॥ जैसे बापूसाहेब सोडती उपोषण । तैसे समर्थही सोडिती तत्क्षण । म्हणति आनंदाने करूं या गायन । ‘चेडवा’ माझी आली कीं ॥८४॥ शामला माजगांवकर म्हणून । एक कन्या आली मुंबईहून । तिचें सुश्राव्य झालें गायन । मंत्रमुग्ध केलें तिनें सर्वांना ॥८५॥ पेटी वाजवुनी खावें सुखांत । ऐसा देती ते आशिर्वाद । भविष्यांत झाली नामवंत । श्रेष्ठ गायिका श्रुत असे ॥८६॥ दोन्ही पंजाला फडकी बांधून । दाजिबा येती गर्दीमधून । समर्थांचे घेती दर्शन । दूर जाऊनि बैसती ते ॥८७॥ चौकशीअंती कळलें कारण । महारोग झाला म्हणून । रोगमुक्ती अथवा मरण । मागण्यां प्रार्थना करिती ते ॥८८॥ समर्थ चरणांची माती । ललाटी लावती अतिप्रीती । उभय हातांसही फांसती । श्रद्धापूर्वक प्रेमानें ॥८९॥ त्याची श्रद्धभक्ती पाहून । समर्थ सांगती आनंदून । कोंबड्याचें पित्त मिसळून ।तिळाचें तेल चोळावें ॥९०॥ श्रद्धापूर्वक तैसे करिती । करांत आली चैतन्यजागृति । दाजिबा रोगमुक्त होती । समर्थ कृपेनें तेधवा ॥९१॥ जैसी लाभतसे रोगमुक्ती । तैसें सेवव्रताला ते आचरती । नित्य राहती मठासंगती । खोली घेऊन भाड्याची ॥९२॥ कांसारचा धंदा करिती । गुजराण होई त्याचेवरती । नित्य लाभतसे संतसंगती । हाचि जिवनानंद भोगती ते ॥९३॥ जवळपासच्या खेड्यांत फिरती । गुजराण करिती धंद्यावरती । समर्थांच्या कथा ऐकती । हाचि आनंद लाभतसे ॥९४॥ ऐसें असतां एक दिन । आजाराने गेले पछाडून । हाडें खिळखिळी होऊन । अशक्त अत्यंत जाहले ॥९५॥  म्हणे कोणत्याही क्षणीं । हा निघून जाईल प्राणी । म्हणोनी घरमालकांनीं । विचार त्याला सांगितला ॥९६॥ तुझ्या ऐशा नजुक स्थितीत । शुश्रुषा करणें नाहीं जमत । तुज पाठविणें दवाखान्यांत । काळजी घेतील डाॅक्टर ॥९७॥ परवां आहे गणेश चतुर्थी । तुझी न योग्य येथे वसती । म्हणुनि सांगतो मी माहिती । राग मित्रा मानु नको ॥९८९॥ ऐसा मालकाचा निश्र्चय ऐकून । दाजिबा गेले गडबडून । रात्र काढिती ते तळमळून । विचार अंतरीं केला कीं ॥९९॥ मनीं निश्र्चित झाली जाण । कांही दिवसांचा मी मेहमान । मग मठांत यावें मरण । सद्गुरु चरणांजवळी ॥१००॥ ऐसा करूनि ते विचार । रात्रीं पडले घराबाहेर । परि साथ न देतां शरीर । रस्त्यावर ते पडले कीं ॥१०१॥ जैसें मालक शेजारी उठती । घरांत आणूनियां ठेविती । तोंचि सकाळी समर्थ येती । दाजिबांस बघावया ॥१०२॥ अरे देव नसतो रे मठांत । तो वसतो मम शरीरांत । ऐसे म्हणूनि फिरविती हात । दाजिबांचे अंगावरी ॥१०३॥ सोम्या तूं बरा झालास म्हणून । एक विडी देती ते काढून । ही ओढतां होशिल जाण । पूर्ण बरा तूं यांतूनी ॥१०४॥ जैसी विडी घेती ते ओढून । राख झालिसे परिपूर्ण । ताप गेला शरीरांतून । पुनर्जीवन लाभलें ॥१०५॥ ऐशा समर्थांच्या ऐकता कथा । चित्तीं अत्यंत वाटे प्रसन्नता । अधिकतम ऐकण्याची उत्कंठता । अंतरी माझ्या वाटतसे ॥१०६॥ एक एक चमत्कार ऐकून । भक्तिभाव येतो उचंबळून । अतीव प्रेमरसानें ओथंबून । हृदय माझें येतें कीं ॥१०७॥ वाटे समर्थांची प्रेमळमूर्ती । अढळ असावी माझें चित्तीं । भुंग्यापरी होऊनी वृत्ती । पदकमली मी गुंजावें ॥१०८॥ जैसें भुंग्यांचे हें गूंजन । श्रवणसुख देतें छान । तैसें भाऊदासाचें हें गूंजन । श्रवणें सुख देवो भक्तांना ॥१०९॥

इति श्री भाऊदास विरचित । श्री समर्थ सौरभ ग्रंथस्य पंचमोऽध्याय गोड हा । श्री सांबसदाशिवार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]