ChaitanyaGaatha

II चैतन्य गाथा II

IIॐ II

         संत पुरुषाची प्रत्यक्ष भेट होणे, त्याचा सुखद सहवास लाभणे, त्या संत पुरुषाशी संवाद साधता येणे, ही  एक मानवी आयुष्यातली अत्यंत दुर्मिळ घटना आहे. संत सहवासाची  तहान लागल्याशिवाय हे सुख लाभत नाही. संतांचा महिमा वर्णन करणे मानवी वाणीला तर केवळ अशक्य आहे. त्यासाठी संतवाणी लागते. भक्तश्रेष्ठ नामदेव महाराजांनी संत महिमा गाताना म्हटले आहे की — 

संतांचा महिमा कोण जाणे सीमा I शिणला हा ब्रम्हा बोलवेना।

संतांची हे कळा पाहता न  कळे I खेळूनिया खेळ  वेगळाची।

संतांच्या पारा नेणे अवतारा। म्हणती याच्या पारा कोण जाणे। 

नामा म्हणे धन्य धन्य भेट जाली।कल्पना निमाली संतापायी ।।

          ज्ञानदेवांची जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली, त्यांचा प्रत्यक्ष सहवास तीर्थयात्रेच्या निमित्ताने नामदेव महाराजांना झाला, तेव्हा त्यांच्या पवित्र वाणीतून हे धन्योद्गार प्रकट झाले. भक्तश्रेष्ठ नामदेव महाराजांनी संतश्रेष्ठ  ज्ञानदेवांचे अप्रतिम चरित्र दोनशे  पंचवीस  अभंगांमधून असे काही विणले की आश्चर्यलाही आश्चर्य वाटावे. ज्ञानदेवांचे अलौकिक आयुष्य केवळ या चरित्र गायनाने ज्ञात झाले. नामदेव महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. कारण त्यांच्यामुळेच भगवत्स्वरूप ज्ञानदेव आपल्या  आकलनाचा  विषय झाले. अशी संतचरित्रे आजपर्यंत अनेक लिहिली गेली. कारण संत अनुभव हा सर्वात श्रेष्ठ अनुभव आहे.  

          श्री देव दत्त महाराज अर्थात सर्व भक्तांचे परमपूज्य काका यांचे अलौकिक चरित्र, त्यांची अध्यात्म साधना, त्यांचा अधिकार,  यांची आध्यात्मिक ताकद त्यांच्यापाशी असलेली करुणा आणि मार्दव,  निष्काम कर्मयोग, सर्व प्राणिमात्रांवर विलक्षण प्रेम करण्याची अद्भुत शक्ती, वाणीतले  माधुर्य, गोडवा, प्रगाढ  शांती यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले  त्यांचे साधिक शिष्य यांनी त्यांचे ओवीबद्ध चरित्र गायन केले आणि सर्व भक्तांवर लक्ष लक्ष कृपा केली. जे कार्य नामदेव महाराजांनी केले तेच कार्य सातशे वर्षांनंतर  श्री मधुकर गजानन सुळे अर्थात भाऊदास महाराजांनी केले. नामदेव गाथेप्रमाणे ही  भाऊदास  महाराजांची श्री चैतन्य गाथा आहे. श्री देव दत्त महाराजांचे चरित्र त्यांनी गीते प्रमाणे  अठरा अध्यायांमधून साकार केले. . चित्र लिपीतून एक समर्थ चरित्र उलगडले. कुलस्वामिनी एकवीरा देवीला ते सांगतात, 

आज वरी पुरविले लाड I  तेणे ओलांडलासे मी पहाड। 

       लेखणीत असावी घोडदौडI  उच्च:श्रवा  अश्वापरी II १:२४ II 

 आणि श्री एकविरा माऊलीने  प्रसन्न होऊन श्री मधुकर सुळे अर्थात श्री देवदत्त  महाराजांचे परमशिष्य श्री भाऊदास महाराज  यांना ‘उच्च:श्रवा’  अश्‍वाची ताकद दिली आणि रसाळ  श्री चैतन्यगाथा अक्षर रूपात साक्षात प्रकट झाली. प्रत्येक माळेत जसे 10८ मणी असतात तसे प्रत्येक अध्यायात 10८ ओव्या आहेत.   हे गुरुचरित्र गायन म्हणजे १८  माळा आहेत.  सत्य सांगायचे तर ही चैतन्यगाथा म्हणजे विलक्षण आनंद देणारे अद्भुत नामस्मरण आहे.  रोज  या अठरा माळा भक्तांनी ओढल्या तर त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील एवढी ताकद या ओवीबद्ध चरित्रात आहे. हे पारंपारिक चरित्र नाही तर सत्यकथनाला सुंदर वळसे  घालत,  त्या स्मृतींमध्ये चिंब भिजत,  सद्गुरु स्मरणात अक्षरशः न्हात ओवींमधून साकार झालेले निर्गुणी तत्त्व आहे.  घटना निमित्तमात्र असतात. सद्गुरु शाश्वत असतात.  त्यांचे आशीर्वाद जगण्याला मानसिक बळ देतात याची प्रचिती प्रस्तुत गाथा देते. 

शांतिप्रीती समस्त जीवनी, सौख्यात समृद्धता 

विश्वासें  स्मरता  सहाय्य्य करिते,  हरण्यास  जी आपदा

भक्ती प्रीती प्रभू पदी फुलविते, परमार्थ दावीतसे 

ऐसी ही वरदायिनी श्री गुरुची चैतन्यगाथा असे…….. 

हा एक श्लोक  जरी प्रतिदिन  उठल्याक्षणी प्रत्येक  सद् भक्ताने    श्वासात प्राण ओतून म्हटला,  चैतन्यगाथेला  नमस्कार करून,  माथा ठेवून जर ही चैतन्य गाथा देवघरात बसून वाचली तरी आयुष्यात चैतन्याचे नवे वळण लाभेल.  आनंदाचा अखंड वारा आयुष्यभर चंदन उधळत राहील.  नवा सूर्योदय होईल.  कारण एकच.  चैतन्यगाथेतल्या  ओव्या सहजपूर्ण आहेत. लडिवाळ भाषेत  त्या प्रगट झालेल्या आहेत.  अध्याय पहिला हा नमनाचा असतो.  त्याचप्रमाणे सुरुवातीला श्रीगणेशाचे स्तवन करताना भाऊदास  महाराज आपले भाव प्रकट करताना सहजपणे कृतज्ञता व्यक्त करतात की—

 केवळ तुझी इच्छा म्हणून I  संतचरित्र घेतली लिहून I 

 तो तुझा वरदहस्त जाणून I मोदे  भारावून मी जातसे II १II 

मी नसे विद्याविभूषित I  परी तुझा असता वरदहस्त I  

ओवी स्फुरतसे स्वयंप्रेरित I सुलभ रचना होतसे II १:०५ II 

चैतन्य गाथेमध्ये श्री देवदत्त महाराजांचे जे चरित्र प्रकट झाले आहे,  त्यातून त्यांचे अवतारी स्वरूप सहजपणे व्यक्त होते.  ज्ञानदेवांनी म्हटलेले आहे की–

चातुर्य लपवी I  महत्व हारवी I 

पिसेपण  मिरवी I आवडोनी I ज्ञानेश्वरी: १३: १९१ II 

संत पुरुषांना मोठेपणाचे ओझे वाटते’. त्यांना प्रसिद्धीच्या वाटांवरून चालणे अजिबात आवडत नाही.  भरभरून बोलले तर संतपुरुष संकोचून जातात.  कुणी  सन्मान केला तर त्यांना ते संकट वाटते.  म्हणून योगीपुरुष आपल्यापायी  नांदत  असलेले ज्ञान लपवून ठेवतो.  मोठेपणाच्या सर्व वाटा बुजवून  टाकतो.  किंबहुना आपण कुणी  वेडेच  आहोत  असे तो जगाला भासवतो.  संत पुरुषाला चार लोकात मिरवलेले  आवडत नाही.  श्री देवदत्त महाराज संत कथेतले आहेत.  याची जाणीव हे ओवीबद्ध चरित्र वाचताना सतत जाणवते.  हेच या चरित्राचे मोठेपण आहे.  भाऊदास महाराज म्हणतात त्याचप्रमाणे

आपण किती भाग्यवान I  देवदत्ताचे  घडते दर्शन I 

संतसंग  नित्य चैतन्यगाथेतून I  स्मरण पुण्य जोडावे II १५ : १०८ II 

श्री चैतन्यगाथा हा एक अप्रतिम चरित्रग्रंथ आहे.  एकविसाव्या शतकाला मिळालेली ही सर्वोत्तम भेट आहे.  या चरित्राच्या निमित्ताने श्री देवदत्तमहाराजांचे प्रकटीकरण भावी विश्वाला ज्ञात होईल.  शेवटी गुरुतत्व एकच आहे याची तीव्र जाणीव देणारी ही गाथा प्रत्येकाने आपल्या ज्ञानमाथ्याला  लावावी आणि आपले भावी आयुष्य कृतार्थ करावे. 

अधिक ज्येष्ठ वद्य एकादशी शके १९२९     ११जून २००७ 

अच्युतानंद आनंद  मठ ,  डोंबिवली  (पूर्व)

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]