ChaitanyaGaatha

।। श्री ।।

।। अध्याय पहिला ।।

श्रीगणेशाय नमः ।  श्री सरस्वत्यै नमः । श्री कुलदेवतायै नमः ।  श्री गुरुभ्यो नमः।।१। श्री गजानना गणराया I चिन्मयरुपा सद्गुरू स्वरुपा  । सकल शास्त्रविद्येच्या मायबापा । कृपा भाकतो प्रेमाने ।।२।। आजवरी केले प्रेम। माझ्या हृदयी तुझे धाम । तुझ्या भक्तीचे निष्काम । फल प्राप्त झाले असे।।३।। केवळ तुझी इच्छा म्हणून ।संतचरित्रे घेतली लिहून । तो  तुझा वरदहस्त जाणून ।  मोदे भारावून मी जातसे ।।४।। मी  नसे विद्याविभूषित । परी तुझा असता वरदहस्त । ओवी स्फुरतसे स्वयंप्रेरित  । सुलभ रचना होतसे ।।५।। तुझ्या प्रेमाने झालो मोहित । उपकार राहिले स्मरणांत । आजन्म राहावे मी ऋणांत ।  हेचि भाग्य मज लाभावे ।।६।। स्वये माझे घरी प्रकटून । भाऊकाकांस दिले दिव्य दर्शन । स्वकरातील  पुष्प देऊन । मजला धन्य केले असे ।।७।। तुमचे जाता मंदिरात । मनोभावे असता प्रार्थित ।  दर्शन दिले भाऊ रूपांत ।  पत्नीस माझ्या तुम्हीच ना ।।८।। लेण्याद्रीचे घेता दर्शन ।  सुवर्णशुंडा फिरविली अंगावरून । प्रेमाने दिले आलिंगन । पत्नीस भाग्यवती केलेस ना ।।९।। आसा तू श्री गजानन । मज  कृपेचे घातले पांघरूण । मजवरील प्रेमाचे ऋण ।  कैसे फेडू श्री गणराया ।।१०।। तू रिद्धीसिद्धीचा दाता । आमच्या आयुष्याचा उपकार कर्ता ।  केवळ तुझ्या सेवेकरिता ।  दान देवा मागतसे ।।११।। श्री सद्गुरु गेले सांगून । उर्वरित माझे जीवन ।  संत सेवेस द्यावे म्हणून । कार्यप्रवृत्त झालो असे ।।१२।। तरी द्यावी मज स्फूर्ती । ग्रंथ घडावा उत्तम रीती ।  वाचकाची  फुलावी  भक्ती । प्रेम हृदयी रमवावे ।।१३।। आता नमितो श्री सरस्वती ।  शब्दब्रम्हाची दिव्यशक्ती । सकल वेदशास्त्रांची उत्पत्ती  । जिये  पासुनी झाली असे ।।१४।। जिच्या कृपेच्या सावलीत।  माझे पुरलेसे मनोरथ । सावलीसारखा निर्मिला ग्रंथ । आद्यशक्ती प्रकटली ।।१५।। सावली येता प्रकाशात । सुभक्त झाले भाग्यवंत । जानकी आली संसारात । वाङ्मयरूपाने वाटतसे  ।।१६।। तिच्या या सत्कार्यात । पुनश्च मी व्हावे संमिलीत । म्हणुनी घालावे पदरात ।लेखणी दान मागतसे ।।१७।। संतचरित्राचे लेखन । प्रज्ञाबुद्धीचे दिव्य दर्शन । सुलभ भाषालंकाराचे प्रदर्शन । अन्य कोण करू शके? ।।१८।। स्पर्श करावा लेखणीस ।  सतत रमवावा शांतरस । भक्तीला जो राही पोषक । प्रेम वाहावे सरितेपरी ।।१९।। संत प्रेमाचे रूप । संत देवाचे स्वरूप । तेणे भाषा असावी अनुरूप ।सत्य दर्शन घडविण्या ।।२०।। संत परमार्थाचे सोपान । संत संसाराचे मार्गदर्शन । संत भक्तीचे भूषण । लक्ष करावे ऐसे जे ।।२१।। म्हणून श्री हंसवाहिनी । तुझी विद्या वीणा छेडुनी । भाषा भरावी अलंकारांनी । लयनाद सुमेळ साधावा ।।२२।। आता विनंती कुलस्वामिनी । एकवीरा नवलाई जननी । तुझ्या बाळाची विनवणी ।  लडिवाळे स्वीकारावी ।।२३।।  आजवरी पुरविले लाड। तेणे ओलांडलासे  मी पहाड । लेखणीत असावी घोडदौड । उच्चश्रवा अश्वापरी  ।।२४।। तुझ्या पदराच्या सावलीत । माझी मती राहतसे जागृत । वर्णन करीत मी रसभरित । आनंद ऊर्मी उठतील ऐसे ।।२५।। देव आनंदाचा सागर । संत सुखाचे आगर । परि  आपुला हा संसार । भरती-ओहोटीत चालतसे ।।२६।। म्हणोनि श्री कुलस्वामिनी । कूर्मदृष्टीने पाहोनी ।  मज घ्यावे सांभाळोनी ।यशसिद्धी देताना ।।२७।। आता वंदन सद्गुरूला । भाऊकाकांच्या पदकमला । पात्र केले या मधुकराला । शिष्यत्व दिले प्रेमाने ।।२८।। सहजसुलभ दिली दिक्षा । कधी न पाहिली परिक्षा । प्रेमाची ओलांडुनी कक्षा । माया भरभरून केली असे ।।२९।। वरी दिले आशिर्वचन । देवी सेवा घडेल हातून । बायजीचे  घडले दर्शन । सावली लिहिली गुरुकृपे ।।३०।। सावलीतून लाभली माऊली । श्री गुरुकृपेत विसावली । उभयतांची कृपा लाभली ।  परमार्थ गवसला वाटतसे ।।३१।। आता विनवू  जानकीला । जगन्माता दुर्गेश्वरीला । जिच्या या अनंत लीला । सावलीत वर्णिल्या असे मी ।।३२।। जरी लौकिक मते गेली निघून । तरी कार्यान्वित अदृष्यातून । संतांचे माध्यम साधून । उर्वरित कार्य ती करीतसे ।।३३।। भक्तांचे करावया  कल्याण । त्यांच्या संकटाचे करुनी हरण । त्यांचे संतोषुनिया ध्यानमन  । सन्मार्ग प्रदीप्त करीतसे ।।३४।। ऐसा  तिचा हा मानसपुत्र ।मज गवसला पार्ल्यात I  देवदत्त नामे भाग्यवंत  । पूर्वसुकृते भेटला असे ।।३५।। अथवा तिचीच  असावी योजना । दोन पुत्रांना भेटवावे पुन्हा । सत्कार्याला देण्या चालना ।  योग घडविला असे की ।।३६।। त्यांच्या पहिल्या भेटीत ।मज गवसले अंतरात । काहीतरी अद्भुत । चैतन्य येथे वसतसे ।।३७।। येथे जानकीचा दिसला वास । वरी दिसला दत्त सहवास ।  दिव्यत्वाचाही झाला भास ।  हृदय फुलले आनंदे ।।३८।। वाटे इथे गुरु-माऊली ।  भक्त कार्यास्तव  एकत्र झाली । म्हणून लेखणी उचलली । सुपुत्र  कीर्ती गावया ।।३९।। संत सेवेचे वचन । पुढे चालवावे म्हणून  ।  जानकी आईचे पदी वंदून । सेवारंभ करीतसे ।।४०।। काही कुटुंबे असती भाग्यवंत । त्यांचे असता पूर्वसुकृत । पुत्र लाभतसे पुण्यवंत । वंशोध्दार करीतसे ।।४१।। परी ऐसा हा सुपुत्र । बालपणी राही अज्ञात । पाय न दिसती पाळण्यात । दुर्लक्षित  की राहतसे ।।४२।। परी काही क्षण येती जीवनात । चुणुक   दाखविती प्रत्यक्षात । माझी वेगळीच आहे जात । सर्वसामान्यांपासुनी  की ।।४३।। ऐसा हा प्रकाश वढावकर । त्यांचा सर्व परिवार । एकदा जाती यात्रेवर । गणेशपुरीला वज्रेश्वरी ।।४४।। त्यावेळी वढावकर कुटुंबाची । परिस्थिती होती गरिबीची । आर्थिक चणचण भासायची ।  मनस्ताप त्यांना देत असे ।।४५।। नित्यानंदांची ऐकून  कीर्ती । वाटे नयनी  पहावी गुरुमूर्ती । शरण जाऊनी चरणाप्रति । आशिर्वाद  घ्यावा वाटतसे ।।४६।।   परी पूर्वी गणेशपुरीत । मार्ग नव्हता सुरक्षित । बैलगाडीचे वाहनात । रखडत जाणे असे की ।।४७।। उतरण्याची नव्हती सोय ।  अन्य कोणताही नव्हता उपाय । रात्रीचे वाटत असे भय ।  राहण्याची सोय कोठे नसे।।४८।। दुकाने बंद झाल्यावर । त्यांच्या रिकाम्या ओसरीवर ।  पांघरूण घातली लादीवर  ।  इतुकाच आसरा लाभतसे ।।४९।। जाणे असे जंगलातून । राहणे बैसणे वाटे भयाण  । परि संतांचे  घेण्या दर्शन । सहन करणे भाग असे ।।५०।। ऐशा त्या काळात । मंडळी जाती गणेशपुरीत । प्रकाश बाळ होता बागडतं ।  चार वर्षाचा की तेधवा ।।५१।। गणेशपुरीचे  नित्यानंद । साक्षात मूर्तिमंत परमानंद । भक्तांचा जो आनंदकंद । प्रकटला  ऐसे वाटतसे ।।५२।। काळाकभिन्न  श्री मूर्ती । धष्टपुष्ट देहाकृती । वाटे पंढरीचा श्रीपती । देह धरुनी आला असे ।।५३।। ते न बोलती  वचन । परि करद्वारे करिती खूण ।  भक्त जाणती मनोमन । आशीर्वाद ऐसा लाभतसे ।।५४।। नित्यानंद बैसती तरुतळी । सभोवताली बैसती मंडळी  । एकेकाची येता दर्शन पाळी । सन्मुख त्यांच्या जाणे असे  ।।५५।। जैसा यशवंतरावांचा येई नंबर । प्रकाश धरुनी त्यांचा कर । स्वामींना करीतसे नमस्कार । बाळ भावाने मनोमनी ।।५६।। तैसे स्वामी उचलती वरचेवर । बाळास बैसविती मांडीवर ।  हात फिरविती  पाठीवर । लाड करिती कौतुके ।।५७।। बिस्कीट  देती तोंडात । काही पुटपुटती  ते मनात। प्रसन्नतेने येती  खुशीत । बाळ भाग्यवान वाटतसे ।।५८।। नकळत लाभला आशीर्वाद । आई संतोषली  मनांत। प्रेमाने घेतले कवेत । पटापट चुंबने घेती  झाली ।।५९।। संत ओळखती संतास । जाणुनी  त्याचे पूर्वायुष्य । आशीर्वाद देती मुमुक्षांस । सुकृत समृद्ध करण्याला ।।६०।। इथे  मज झाली आठवण । रंग अवधूतांचे बालपण । वासुदेवांचे घेता दर्शन । प्रसंग घडला त्याचे हो ।।६१।। पांडुरंगाचे झाले मौंजीबंधन । त्यास वाडीस  नेती दर्शना कारण । वासुदेवानंद होते ते दिन । नरसोबावाडीस तेधवा ।६२।।  पांडुरंग बाळ आठ वर्षाचा । बटू सुंदर लंगोटीचा । हात धरुनी  माऊलीचा । दर्शना त्यांच्या आला असे ।।६३।। गुरुमाऊलीस पाहता दुरून ।  बाळ धावला आनंदून ।  मांडीवर गेला बैसून । भक्तगण घाबरले ।।६४।। शिवला शिवला म्हणून । भक्त ओरडती लांबून । बाळ गेलासे घाबरून । अधिक त्यांना बिलगत असे ।।६५।। त्यांचे सोहळे कडक म्हणून । लोक लांबून घेती दर्शन । आता बाळाचे कारण । स्वामी कोपतील वाटतसे ।।६६।। परी बाळास देती आलिंगन ।  हात फिरवीत पाठीवरून I  वरी विचारती प्रश्न छान । कोणाचा असे तू सांगावे ।।६७।। म्हणे मी तुमचाच म्हणून । पांडुरंग सांगे तत्क्षण  । ऐसे बटूचे उत्तर ऐकून । स्वामी सांगती आईस ।।६८।। हे अमुचेच बाळ असून । अमुचे कार्य चालवील परिपूर्ण । योग्य वेळी देऊ दीक्षादान ।  निश्चिंत तुम्ही असावे ।।६९।। पुढे प्रकाश असता बोरिवलीत । कुणाच्या घरी पाहिली गंमत । लोक उभे होते रांगेत । जिज्ञासा उद्भवली पाहून ।।७०।। चौकशी  अंती आले कळून । संत गुळवणींचे घेण्या दर्शन । भक्त उभे ताटकळून । उत्सुकता मनात जागली ।।७१।। तैसा तोही उभा राहिला I वाटे योग चांगला आला I रांगेशेवटी उभा राहिला I   दर्शन घ्यावया महाराजांचे II ७२ II  तेवढ्यात दोन सेवेकरी I  धावत आले प्रकाश समोरी I म्हणे चलावे बरोबरी I  महाराज बोलवती तुला रे  II७३ II  म्हणे मज कैसे बोलावती । मी न ओळखितो  ही व्यक्ती । मज  नसता काही माहिती । बोलावतील कैसे ते ? ।।७४।। परी उभय सांगती निक्षून । आम्हास अंगुलीनिर्देश दाखवून । या मुलास आणावे बोलावून । झडकरी माझ्याकडे बोलती ।।७५।। तैसे उभयतांचे सोबत । प्रकाश गेला त्यांचे खोलीत । विनम्र भावे नमस्कारीत । सन्मुख उभा राहिला असे ।।७६।। त्यांची शांत वृत्ती तेजस्वी लोचन । प्रकाश पाहता गेला मोहून । परि सस्मित हास्य करून । स्वामी विचारते झाले की ।।७७।। बाळा नाव काय म्हणून । प्रश्न विचारला त्यांनी हसून । परि आडनाव त्याचे ऐकून । पुनश्च प्रश्न केला असे ।।७८।। तू मच्छी कांदा लसून ।  सोडशील का रे म्हणून । परि  ते शक्य नाही म्हणून । प्रकाश त्यांना सांगत असे ।।७९।। बरे बरे ठीक म्हणून । कोपऱ्या कडे बोट दाखवून।  म्हणे बैसावे तेथे जाऊन । शांतपणे बाळा रे ।।८०।। प्रकाश बैसला कोपऱ्यात । तरीही गर्दी नव्हती संपत । संध्याकाळ झाली तेवढ्यात । खोली बंद केली असे ।।८१।। सन्मुख  त्याला बैसवून । म्हणे शर्ट काढावा अंगातून । तुझी मुंज झाली का म्हणून । प्रश्न विचारला असे की त्यांनी ।।८२।। होय म्हणता झाले प्रसन्न  ।  म्हणे दीर्घ ॐ कार उच्चारून । गायत्री म्हणून घ्यावे आचमन । मजसंगे तू बाळा रे ।।८३।। जैसा ॐकाराचा केला उच्चार । तैसा वरदहस्त ठेविला शिरावर। बाळास पडला पूर्ण विसर । अस्तित्व पूर्ण हरपले ।।८४।। त्याच्या पाठीच्या कण्यावरुन । हात  फिरविला कुरवाळून । कुंडलिनी जागृत करून । शक्तिपात वाटे  केला असे ।।८५।। प्रकाश गेला शून्यात । अर्ध्या तासावर राहिला शांत । त्यानंतर करुनी जागृत । गुरुमंत्र दिधला प्रेमाने ।।८६।। अकरा वेळा घेतला उच्चारून । म्हणे याचे  करावे तू रटण ।  जैसे जमेल तैसे करावा  यत्न । सवडीनुसार  बाळा रे ।।८७।।  देवसेवा करावी मनापासून । त्यात तुझे आहे रे कल्याण ।  पुन्हा माझे होईल रे दर्शन । तेव्हा पुनश्च बोल रे ।।८८।। साष्टांग करुनी  नमस्कार । प्रकाशने गाठले त्वरित घर । आईस  सांगितला सर्व प्रकार । धन्य मातोश्री झालीअसे ।।८९।। आई मनात गेली समजून । अलभ्य लाभ झाला म्हणून । प्रकाश झाला भाग्यवान । गुरुकृपा झाली वाटत असे ।।९०।। सुवर्णसंधी येती अकस्मात । भाग्य उजळती  अज्ञानात । जाण होत असे की प्रत्यक्षात । फलप्राप्ती दिसू लागताच की ।।९१।। जैसा मंत्राची होई प्रगती । तैसी  वाढू लागली दत्तप्रीती । गिरिनारी जाण्याची इच्छाशक्ती । प्रबळ झाली वाटतसे ।।९२।। वाटे  गुरुशिखरी  जाऊन । दत्त दर्शन करावे नयन भरून । प्रांत:काळी  जाती उठून । गिरीनार चढू लागले ।।९३।। जरी होती अंधाराची वाट । गिरिनारी धुके होते दाट । काही न दिसे पाऊलवाट । अंदाजे पुढे जात असे ।।९४।। तोची नागराज प्रकटे  पुढती । वाट दाखविण्या  सळसळती । शुभ्र श्वान येई मागुती । प्रकाश संगती चालती ते ।।९५।। गुरुशिखराच्या पायथ्याशी । उभे राहिले पाठीशी । प्रकाश चढला सावकाशी ।  पादुका दर्शन घ्यावया ।।९६।।  श्रीचरणावर मस्तक ठेवून । बैसला तो ध्यान लावून । अनन्यभावे शरण जाऊन । कृपाभाक मागतसे ।।९७।। श्री दत्तात्रेया करुणाकरा । या पामरावर कृपा करा । माझी प्रेम भक्ती स्वीकारा । आसरा द्यावा पदकमली ।।९८।। ऐसे मनोभावे विनवून । परतण्यास निघाला तेथून । अर्ध्या वाटेवर आले दिसून । तरुतळी कोणी दिसतसे ।।९९।। जवळ जाता आनंदून । तो व्यक्ती दिसली ध्यानमग्न । मोर-लांडोर होते छान । द्वय बाजूस तिचिया ।।१००।। वाटे असावी श्रीगुरुमूर्ती । आशिर्वाद देण्या प्रकटती । तैसे प्रकाश आनंदुनी चित्ती । सन्मुख त्यांच्या गेला असे ।।१०१।। त्यांची ध्यानस्थ मूर्ती पाहून । प्रकाश अंतरी गेला मोहून ।  तन्मय चित्ते आकर्षून । रूप अंतरी साठवीतसे ।।१०२।। तोची गुरुमूर्तीने लोचन । उघडून दिले शांत दर्शन । नीट पाहिले न्याहाळून  । स्मितहास्य केले असे ।।१०३।। हवेत फिरविला हात । तो एक पुडा आला करात ।  माहीमचा हलवा होता त्यात ।  गरम गरम दिला असे ।।१०४।। प्रसाद देऊनी  हातात । आशीर्वाद दिला मनसोक्त । प्रकाश येऊनी खुशीत । निघाला असे झडकरी ।।१०५।। मागे पाहता वळून । तो अदृश्य झाले दिव्य दर्शन । मनात गेला समजून । दत्त दर्शन झाले असे ।।१०६।। ऐशा  एकेका  प्रसंगातून । प्रकाशचे घडले अध्यात्म जीवन । सद्गुरु पाठीशी राहून । कार्यप्रवृत्त करीतसे ।।१०७।। प्रकाशचे प्रकाशमय जीवन ।  बालपणीचे केले कथन । कैसे देवदत्तात  झाले परिवर्तन । पुढील अध्याय पाहूया ।।१०८।।

इतिश्री भाऊदास विरचित । श्री देवदत्त चैतन्यगाथा प्रस्तुत 

भक्तेच्छा करोत  संतृप्त ।अध्याय पहिला गोड हा । 

इति श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु । शुभं भवतु । श्रीरस्तु ।


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]