इसाप सांगे गोष्ट मुलांना, वनराजा नर-सिंहाची
गुहेमध्ये जो बसून पाहे, वाट अपुल्या भक्षाची ॥धृ॥

वनांत सारी चर्चा चाले, राजा पडला आजारी
जर्जर झाला म्हणुनि पडेना, गुहेतुनी तो बाहेरी ॥१॥

चिंतातुर मग सर्व जाहले, पशु-पक्षीदि प्राणी तसे
उपाशी पोटी राहील राजा, होईल त्याचे मग कैसे ॥२॥

प्राणी प्रजाजन सर्वही जमती, दाखविण्या त्या सहानुभुति
एकेकानें मग बघण्या जावे, ठराव ऐसा ते करिती ॥३॥

राजाला मग बघण्या जाती,आळीपाळीनें प्रतिदिनीं
कोल्ह्याची मग पाळी येतां, चिंतातुर तो होई मनीं ॥४॥

गुहेत जाणाऱ्या वाटेवर, गुपचुप बैसे येऊनी
नीट लक्षीतो पायवाट ती, विचार पूर्वक बुध्दिनी ॥५॥

पाऊल वाटेवरती दिसती, जाणऱ्याचे फक्त ठसे
येणाऱ्याचे ठसे न दिसती, कांहींतरी मज गोम दिसे ॥६॥

जाणुनि सारे हांक मारितो, राजाला तो मोठ्याने
महाराजांना कसे वाटते, पुसतो विनम्र भावाने ॥७॥

दीन वाणीने राजा वदला, अजून कांही बरे नसे
लांबून करितो कशी चौकशी, योग्य तुला का सांग दिसे? ॥८॥

आलो असतो जवळी परंतु, पाऊल वाटेवर दिसती
शिरणाऱ्याच्या फक्त खुणा, अन् निघणाऱ्याच्या नच दिसती ॥९॥

गोष्टीतुन या इसाप सांगे, संकट चाहूल जाणावी
सावधगिरीनें चटकन कैसी, मती आपुली बदलावी ॥१०॥

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *