एक कावळा चोरुनी आणी, मासा चोचींत
खावयास तो बसे येऊनी, झाडाच्या फांदीत ॥धृ॥

विचार होता करित कावळा, कोठे ठेवावा
पकडुनि त्याला पायामध्यें, शांतपणे खावा. ॥१॥

शोधित असतां झाडावरची, जागा ती चांगली
कोल्होबाची नजर कावळ्यवरती की पडली. ॥२॥

काक मुखांतिल छान चिमुकला, मासा पाहोनी
नकळत सुटले कोल्होबाच्या, तोंडाला पाणी ॥३॥

कसा कावळ्याच्या चोचिंतुन, पळवावा मासा
विचार सुचला कोल्होबाला, अति उत्तम खासा ॥४॥

झाडाखालुन कोल्होबा हा, मधुर मृदू बोलला
सुंदर किती दिसतोस कावळ्या, पक्षिराज गमला. ॥५॥

काळ्या काळ्या रंगात शोभते, कांति तव छान
आवाजही अति गोड चांगला, सुखी मी कर्ण. ॥६॥

कोकीळ काळी कुट्ट बावळी, कर्कश:ची गाते
तुझ्यापुढे तिची योग्यता जणूं, शून्यापरी गमते. ॥७॥

एकच इच्छा माझी मित्रा, करावेस पूर्ण
गोड गळ्यानें गाऊन माझे , करी समाधान. ॥८॥

ऐकून स्तुतिही काकराज हे, गर्वाने फुगले
गाण्याकरिता म्हणुनि तयानें, तोंडचि उघडीलें. ॥९॥

तोंच मुखांतुन निसटुनि मासा,वृक्षातळीं पडला
झटकन त्याचा कोल्होबाने, फडशा ऊडवीला ॥१०॥

इसाप सांगे धोका असतो, चतुरांचे भाषणी
खोट्या स्तुतिनें भुलता येतो, मुर्खपणा ध्यानी ॥११॥

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *