अशीच एकदां, ओळख झाली, करकोचा- कोल्ह्याची
गोष्ट सांगतो इसाप त्यांच्या, उपऱ्या मैत्रिची ॥धृ॥

हसत मुखाने करकोच्याला, आलिंगन दिधले
मैत्रिचा तो आव आणुनी, कोल्होबा वदले ॥१॥

तुझ्यापरि मज मित्र मिळावा, भाग्य लाभले भले
जेवण्यास घरी, येण्याचे त्या, आमंत्रण दिधले ॥२॥

दृढ मैत्रिचे पाऊल पहिले, असेल हे म्हणुनी
करकोच्यानें अनुमति दिधली, येईन रे म्हणुनी ॥३॥

चापुन जेवू मित्रा घरी या, बेत मनीं रचुनी
करकोच्यानें उपास केला, सकाळ पासोनी ॥४॥

दुपारचे मग प्रहरी आला, कोल्ह्याचे सदनी
हसत मुखानें स्वगत केले, “सुस्वागत” म्हणुनी ॥५॥

खमंग येई वास खिरीचा, कोल्ह्याचे सदनी
नकळत सुटले करकोचाच्या तोंडाला पाणी ॥६॥

तोंच घरांतुन ताट खिरीचे, कोल्होबा आणी
करकोच्याचे समोर ठेवूनि, मिष्कील हसला मनी ॥७॥

सहभोजन करण्यास आणीले,एकच की ताट
भरपुर खावी खीर सुमित्रा, भरूनिया पोट ॥८॥

ऐसे म्हणुनि लपलप चाटे, कोल्होबा खीर
टकमक पाहे करकोचा ते, होऊनिया स्थीर ॥९॥

बघतां बघतां कोल्होबाने संपविली खीर
परि न सोडला करकोच्यानें, मनांतला धीर ॥१०॥

करकोचाच्या लांब चोचिनें, केलासे घात
समजुनि आला कोल्होबाच्या, मनांतला बेत ॥११॥

वरवर हसुनी खोड मोडण्या, करकोचा वदला
उद्या सकाळी माझ्या घरी तूं, येई भोजनाला ॥१२॥

दुसरे दिवशीं खुषीत येऊनी, कोल्होबा गेले
हसत मुखानें करकोच्यानें स्वागत ही केले ॥१३॥

एक निमुळत्या तोंडाची बघ,सुरई घेऊन
कोल्ह्या पुढती ठेऊन वदला, विनम्र होऊन ॥१४॥

खीर माझीया पत्नीने बघ सुंदर बनवीली
पिऊन घ्यावी गरम गरम ती, स्वदिष्टची झाली. ॥१५॥

ऐसे म्हणुनि चोच आपुली सुरईत की खोचली
कोल्होबाच्या कडे पाहुनी, क्षणांत संपविली ॥१६॥

खजिल जाहला परि कोल्होबा, रागें गुरगुरला
शांतपणानें उत्तर देई, करकोचा त्याला ॥ १७॥

“अरे सुमित्रा, धडा शिकविला, तूच मला पहिला
मी तर त्याची नक्कल केली, डाव परतवीला. ॥१८॥

इसाप सांगे गोष्ट नितीच्या, कैसे वागावे
दिसेल करणी समोरुनि जशी, तैसे बदलावे ॥१९॥

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *