एके दिवशी दोन मांजरी, भेटती प्रेमाने
अंग चाटती दोघीजणीत्या, अतिशय लाडाने ॥धृ॥

डोळे फिरवुनी अंग फुगविती, लाडे गरगुरती
इकडुनि तिकडे उड्या मारुनि, शेपुट डोलावती ॥१॥

फिरता फिरता एक भाकरी, दोघींना दिसली
चटकन धांवुन दोघींनी ती, मुखांत की धरिली ॥२॥

खाण्यावरूनि दोघींची ही, मैत्री फिसकटली
प्रेम जाऊनि रागाने बघ, अंगे फुगवटली ॥३॥

भांडण त्यांचे असे जुंपले, हार न खाई कुणी
पाहुनि सारे झाडावरचा, वांदर हसला मनी ॥४॥

गोड कल्पना चाटुनी गेली, त्याच्या डोक्यांत
शांतपणाने वदला त्यांना, मधूर शब्दांत… ॥५॥

भांडण करणे योग्य न काही, व्हावे सुविचारी
वाटुन देतो अर्धि अर्धि, तुम्हास ही भाकरी ॥६॥

गोड कल्पना क्षणांत त्याची, दोघींना पटली
अविचाराने करण्या तैसी, इच्छा दर्शविली ॥७॥

तैसे वांदर धावुन गेला, दुकानांत जवळी
एक तराजु घेऊनच आला, दोघींच्या जवळी ॥८॥

भाकरिच्या त्या तुकडे करुनि, तराजूत टाकी
लहान मोठ्या तुकड्यावरती, नजर जरा फेकी ॥९॥

मोठ्या तुकड्या मधुनी छोटा तुकडा तोडूनी
सहजपणे तो मुखांत घाली, मनांत की हसुनी ॥१०॥

ऐसे वारंवार करितसे लबाड तो हसुनी
टकमक बघती दोन मांजरी, बावरल्या नयनी ॥११॥

वरती खाली होणाऱ्या त्या, तराजूस बघुनी
मनांत गेल्या समजुनी दोघी, वांदराची करणी ॥१२॥

बघतां बघतां सर्व भाकरी, गेला खाऊनी
तुच्छपणाने हांसत गेला, झाडावर चढुनी ॥१३॥

मूर्खपणा हा येतां ध्यानी, मनांत की लाजल्या
गळ्यांत घालुनि गळा मांजरी, हिरमुसुनि बैसल्या ॥१४॥

दोघींच्या या भांडणतुनि, लाभ काय झाला?
सुलभपणाने तिसऱ्याचा तो, पोटोबा भरला ॥१५॥

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *