विसावा – अध्याय ८
॥ श्री ॥
॥ अथ अष्टमोऽध्याय: ॥
श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: । बोलती मधुकर । तू जे कथिले सूर-मधुर । जीव होतो अधीर । ऐकाया आमुचा ॥1॥ फुलांपरीं ओवी घेऊन । करीत असती जी गुंफण । सुंदरसा हार बनवून ।अध्याय माला बनवितोस ॥2॥ विविधानुभवें नटली । ऐशी फुलें वेंगवेगळीं । भरोनी घेऊनि अंजली । गुरुचरणीं वाहिली ॥3॥ जे केलेस अनुभव कथन । तेणें हृदय येई भरून । आम्हांस केलेंस पावन । चरित्र गंगा शिंपोंनी ॥4॥ गंगेत अथवा नर्मदेत । कोणी सहज जरी डुंबत । ते पावन अथवा मुक्त । होतात या जीवनीं ॥5॥ तैसें हें श्रीगुरुचरित । भक्तीने जे श्रवण करित । ते होवोत पावन-मुक्त । ऐशीं ईच्छा अंतरीं ॥6॥ तुमची विनंती ऐकून । माझें हृदय आलें भरून । भक्तेच्छा करावी पूर्ण । विनंती गुरुमाउली ! ॥7॥ भक्त जें जें सांगती । तें तें द्यावें कृपामूर्ती । संतोष द्यावा भक्त चित्तीं । तुम्हा काय अशक्य ॥8॥ जे गुरुचरणाला भजती । ते विन्मुख कधीं न होती । परी पाहीजे सद्भक्ती । संशयातीत तयांची ॥9॥ । संशयाचे करावे निरसन । शुद्ध करोनी आपुलें मन । गुरु ॐ ! गुरु ॐ ! म्हणून । जप करावा सदैव ॥10॥ जप करिती जे रात्रदिन । गुरु राही तयांना बिलगून । विमुक्त भक्तां सोडून । राहूं न शके कधींही ॥11॥ निवृत्तीनंतर भाऊंची । नित्य फेरी असावयाची । माझे घरीं यावयाची । दांड्या बाजारांत ॥12॥ येती प्रत्येक गुरुवारीं । आरतीला माझे घरीं । ती संपता त्यांचे घरी, । पोहोंचवीत असें मी ॥13॥ कधीं जाऊं फिरावया । सुखगोष्टी करावया । अथवा मित्रांसी भेटावया । फिरत असूं सहज ॥14॥ चालतांना रस्त्यांतूनी । भाऊ मध्यें मध्यें थांबोनी । गोष्ट करिती फिरफिरुनी । टाळी मागती हातावर ॥15॥ चालावया छोटे अंतर । वेळ लागतसे फार । भान विसरती सत्वर । गोष्टींच्या नादांत ॥16॥ ऐशी त्यांची विचित्र सवय । सर्वांना तिचा परिचय । तरी ही वाटे गंमत । त्यांचे सवें चालतांना ॥17॥ भाऊ बोलती बहुत । ऐकणारा होई मोहित । वरि विनोदें हास्य करित । येत असूं त्यांचे घरीं ॥18॥ भाऊ येंतां आपुले घरीं । विश्राम करिती पलंगावरी । मी गुरुचरण सेवा करी । पाय दाबीत तयांचे ॥19॥ऐशाच एके शुभदिनीं । विषय निघे कुंडलिनी । गुरु तीं केवळ नजरेनी । जागृत करिती भक्तांची ॥20॥ कोणी करिती शक्तीपातानें । कोणी करिती मंत्रानें । कोणी करिती वाचनें । स्त्रोत्रादिकांच्या पाठानें ॥21॥ करिती पाठीचे करण्यांतुनी । अथवा ती नाभीतुन । जागृत करिती सर्पिण । संत मंडळी भक्तांची ॥22॥ ऐसें चालतां भाषण । आम्ही दोघे होतों बसून । श्रीगुरुचे दाबीत चरण । पलंगावरी बैसोनी ॥23॥ मी असतां चरण चुरित । नंदा बैसलीसे खुर्चींत । मजकडे बघावें म्हणत । मंत्राक्षर सांगोनी ॥24॥ मंत्राक्षरातें उच्चारोनी । नजर नजलेला भिडवोनी । क्षणैक डोळे घेई मिटोनी ।श्वास चाललां जोरांत ॥25॥ जागृत झाली कुंडलिनी । पाठीचे मणक्यातुनी । वर वर येई चढोनी । शिरीं प्रकाश दिसला ॥26॥ शरिर जाहलें रोमांचित । वेगळीच अनुभूती येत । सांगो न शके ती शब्दांत । काय जाहलें असेल ॥27॥ शरिर झाले हलके । वाटे वार्यावर घेई झोकें । शब्द जाहलें मुके । वर्णवेना आनंद ॥28॥ कोणाच्या जाऊनी स्वप्नांत । कुंडलिनी करिती जागृत । ऐसे हे वेतोबा सुभक्त । गुरुमाउली आमुची ॥29॥ येती माझे घरीं गुरुवारीं । बैसती आराम खुर्चीवरी । मी गुरुचरित्र वाचन करी । आरती तदनंतर ॥30॥ घरांतील मंडळी जमती । सायंकाळी होई आरती । दत्तमूर्तिला प्रार्थिती । आनंदाने सर्वजण ॥31॥ देवासी करिती वंदन । भाऊंचे धरिती चरण । ऐसा हा प्रघात जाण । बहुत वर्षे चालला ॥32॥ भाऊंचे धरोनी चरण । नंदा करितसे वंदन । पदीं प्रकाश पाहोन । नयन दिपले तियेचे ॥33॥ दिव्य प्रकाशें दिपोनी । तिला न दिसले कोणी । उठतां धडपडोनी । डोळे घेतले झांकून ॥34॥ भाऊ देती कराधार । ती सांगे सर्व प्रकार मनी संतोषती फार । भाऊकाका तिजवरी ॥35॥ देव म्हणजे प्रकाश । देव म्हणजे आकाश । देव म्हणे विकास । सुभक्ताच्या भक्तीचा ॥36॥ ऐशाच एके शुभदिनीं । भाऊं असतां बैसोनी । आरती चाले रंगोनी । मोठमोठ्यांनें आमुची ॥37॥ संपवूनी आम्हीं आरती । म्हणत होतों करुणात्रिपादी । भाऊंपुढें प्रगट होती । श्रीरंग अवधूत बापजी ॥38॥ बैसले होते खुर्चींवर । भाऊ करिती नमस्कार । प्रकाशमय होतें शरीर । केश-दाढी सुवर्णांची ॥39॥ क्षणांत होउनी बिंबाकार । भाऊंचे भृकुटीसमोर । मिटल्या नयनां समोर । ये सतेज मुख त्यांचे ॥40॥ मज आंनदोनी सांगती । रंग अवधूत दर्शन देती । स्थिरावे त्यांची दिव्य ज्योती । मम लोचनां समोर ॥41॥ आम्हां झाला हर्ष बहुत । जय-जय-रंगअवधूत गर्जत । श्रीचरणांना नमस्कारित । आशीर्वाद घेतला ॥42॥ ऐसी त्यांची दिव्यज्योती । भाऊ नयनीं सदैव ठेविती । दर्शन त्यांना सदा देती । पूर्णविरामापर्यंत ॥43॥ कधी थके बहुत शरीर । मग मी गांठी त्यांचें घर । फेरी करी धरुन कर । सभोंवताली घराच्या ॥44॥ सयाजीगंज विस्तारीं । मोठा चौक रस्त्यावरी । होता एक फर्लांगावरी । घरापासोनी तयांच्या ॥45॥ पार सुंदरसा बांधलेला । त्या वरी पटेलांचा पुतळा । लोक येती फिरावयला । सायंकाळी सुवेळीं ॥46॥ धरोनियां त्यांचा कर । जात असूं पारावर । बैसोनियां तासभर । फिरत असूं माघारीं ॥47॥ गोष्टींत गोष्टी निघोनी । सांगती मधुर आठवणी । सयाजीगंजांत त्यांनीं । काय काय पाहिलें ते ॥48॥ लग्न तेथेंच जाहलें । वर्हाडी तेथेंच उतरले । श्वशुर येथेंच राहिले । भीमनाथा जवळीच ॥49॥ बडोदा मिलचे आवारांत । जरी होतों तेंव्हा रहात । तरी येत असूं चालत । येथपर्यंत फिरत ॥50॥ जैशीं मुलें मोठीं जाहलीं । भीमनाथचे शाळेंत गेलीं । आजोळीं राहती जवळी । लाड करिती म्हणून ॥51॥ ऐशा एकेक आठवणी । सांगतीं ते फिरफिरुनी । मार्गात मध्यें मध्यें थांबोनी । टाळी मागती हातावर ॥52॥ म्हणे माझे घरीं चांगली । येई उत्तम ताजी मासळी तूं नव्हतास रे त्यावेळी । मजा येई खरोखर ॥53॥ मोठी ताजी मासळी । काकी बनवितसे चांगली । अरे ! अभागी त्यावेळीं ।कैसा नाहींस भेटलास ॥54॥ काकींचे स्वायंपाकावर । वाटे अभिमान खरोखर वर्णिती चव रुचकर । पाणी सुटतें तोंडाला ॥55॥ तुम्ही फार उशीरां भेटला । वाटे कांहीं द्यावें तुला । परी जर्जर माझे देहाला । आतां शक्य नसे तें ॥56॥ कधीं असतां अति खुशींत । पुत्र जन्मकथा सांगत । वेतोबा कैसें दर्शन देत । ज्येष्ठ पुत्राचे समयीं ॥57॥ श्रीवेतोबाचे नाभीतून । कमल उमललें छान । आंत गोजिरे बालक सान । सुरेश ऐसे दीधलें ॥58॥द्वितीय पुत्राचे समयाला । बालक चरणावरी दिसला । आप्पा उचलोनी तयाला । देते झाले मम करी ॥59॥ काळ्यासावळ्या बालकाला । करीं देता वदले मला । वेतोबा पुत्रापरि दिधला । सांभाळी याला प्रेमें तूं ॥60॥ म्हणोनि माझा रमेशावरी । सदैव असे लोभ भारी । वेतोबा जन्म घेई उदरीं ।पुत्र म्हणोनी लाडका ॥61॥ तैशीच सुकन्या जन्मली । वेतोबाचे मांडीतुनी आली । लता भाग्यशाली लाभली । बहुत लाडकी माझी ती ॥62॥ ऐशा एकेक आठवणी । भाऊ सांगती थांबथांबोनी । दत्तमंदिरीं जाऊनी । दर्शन घेऊ मूर्तीचें ॥63॥ कधीं कधीं सोमवारी । जात असूं भीमनाथ मंदिरीं ।परिसराची करितां फेरी । शीळ घालिती मंजुळ ॥64॥ पिंडीपुढें उभे राहती । मी म्हणत शिवस्तुती । पूर्ण करोनी मग ती । मस्तक टेकी आदरें ॥65॥ मस्तक ठेविता पिंडीवरी । आवाज येई मनांतरी । शिव उभे तुज शेजारी । कोणा वंदिशी येथें तूं ॥66॥ मस्तक ठेवितां चरणांवरती । भाऊ शिव शिव उच्चारिती । कर ठेवोनी खांद्यावरती । निघत असूं बाहेर ॥67॥ वाटेंत भेयती जे कोणी । त्याची पुस्ती कहाणी । हिन्दी-गुजराथीं भाषेतुनी । चौकशी करिती तयांची ॥68॥ ऐसें बोलत बोलत । येऊं आम्हीं घराप्रत । भाऊ पलंगावरी झोंपत । थोडी विश्रांती घ्यावया ॥69॥ कधीं बसत असूं देवाजवळ । गाऊनिया भजनें प्रेमळ । कधीं जीव होई उतावीळ । समाधी दर्शन घ्यावया ॥70॥ मनोहर मूर्ति वेतोबाची । घडविली असे चांदीची । सत्वर आज्ञा होता देवाची । मुंबईत कैसी घडविलीं ॥71॥ छोटी मोहक आहे मूर्ति डोळे जीवंत जणूं गमती । ओठ उमलोनी बोलेल ती । ऐसें कांहीं वाटतें ॥72॥ शिवलिंग आहे शेजारीं । अभिषेक करिती तयावरी । श्रींवेतोबा रुद्रावतारी । प्रगटलासे मूर्तींत ॥73॥ कधीं सुनेला सांगती । तेल चोळण्या डोक्यावरती । तेल घेऊनियां हातीं । हसत येई झडकरी ॥74॥ तेल डोक्यावर घालोनी । सीमा चोळे हातांनीं । विजेचे प्रवाह निघोनी ।चटके बसती हाताला ॥75॥ मस्तकांतुनी निघे प्रवाह । तो करद्वारें व्यापी देह । शरीराचा होई दाह । सुखानुभव येतसे ॥76॥ शिरतां त्यांचे देवखोलींत । प्रवाह पूर्ण शरिरीं भरत । भरोनि जाई नवखा भक्त । कांपू लागे थरथर ॥77॥ असतां कितीही विचारांत । खोलींत शिरतां वाटे शांत । चित्त न होतां विचलित । आनंद वाटे वेगळा ॥78॥ त्यावरी भाऊ मृदु बोलत । वाटे सुख सरी बरसत । भक्त चिंतामुक्त होत । न कळत घडे सर्वही ॥79॥ भाऊ बोलतां बोलतां थांबत । भक्तांवरीं नजर रोखत । आणि काय आश्चर्य घडत । दर्शन होई देवाचें ॥80॥ मधुमेह होतां शरिरीं । मिष्टान्न भोजन करिती तरी । जीवन त्यांचें सुईवरी । असे अवलंबून सदाचे ॥81॥ बहुत लाडकी सीमा सून । प्रेमें करोनियां वंदन । जेवण्यापूर्वीं देई टोचून । इंजेक्शन तयांना ॥82॥ तिज न वाटती हे श्वशुर । वाटे प्रत्यक्ष परमेश्वर । गुरु मानोनियां निर्धार । अखंड सेवा करीतसे ॥83॥ वाद होई खाण्यावरुन । तुम्ही करावें मांस भोजन । मधुमेहाला उत्तम जाण । डॉक्टर ऐसें बोलती ॥84॥ वेतोबाची आज्ञा म्हणून । मांस दिलें होतें सोडुन । परी सर्व बोलती म्हणून । सहज पुसती देवाला ॥85॥ सांगती भाऊंला । तव देह शुद्ध जाहला । मांसादि भोजनाला । हरकत नाहीं कोणती ॥86॥ देह निर्मळ गंगेपरी । जरी खाशील कांहीतरीं । ते शुद्ध होईल शरिरीं । चिंता न करावी आतां ॥87॥ ऐसे सांगता मंडळीस । आग्रह करिती खाण्यास । परी स्विकारलेल्या व्रतास । कधींही न ढळती ॥88॥ विनोदी म्हणती सूनेला । तूं टोंचतेस सुईला । शक्ति लाभतसे तुजला । माझ्या अंगातली ॥89॥ औषध जातें माझे शरिरीं । शक्ति पसरे तव शरिरीं । ऐसा उलट प्रवाह तरी । होत असे बालिके ॥90॥ ऐशा सुखसंवादांतुन । निमित्तालागी सुई करुन । शक्तिपातते करीत । भक्तावरी आपुल्या ॥91॥ जेंव्हा गुरुचरित्रवाचन । मी करीतसें पूर्ण । पूर्णांहूती दिवशीं जाण । भाऊ असती भोजनाला ॥92॥ ऐशाच एके शुभदिनीं । दोघे येती दंपती म्हणोनि । माझे घरींच भोंजनी । पूर्णाहूतीचे दिवशीं ॥93॥ झाली आरती, केले वंदन । भाऊंची समाधी लागे जाण । स्वयें दत्तात्रेय येऊन । प्रसन्न प्रसन्न म्हणती ॥94॥ वरी आदेशातें सांगून । जो भाऊ देती लिहून । तैसें वागतां जाण । सुखी होशील तूंहि रे ! ॥95॥ आदेश सांगतों तुम्हाला । जरी तैसेचि वागलां । सन्मार्ग होईल मोकळा । तुम्हांस ही श्रोतेजन ॥96॥ वागावे सद्गृहस्थापरीं । असावें नम्र परोपरीं । सर्व लाभेल ईच्छेपरी । भाग्य तुमचें उजळेल ॥97॥ भाऊ म्हणती याचपरी । वागलों जीवनांतरीं । हें वाक्य सुभाषितापरी । बाळगावें अंतरीं ॥98॥ एक तरी सुभाषित । आणावें आचरणांत । जेणें जीवन सुखाप्रत । हळूहळू जाईल ॥99॥ म्हणोनि हो श्रोतेजन । केलें हें वाक्यकथन । जे गुरु सांगती मजलागोन । जीवन तुमचें उजळावया ॥100॥ श्रोते म्हणती मजला । उपकार बहुत केला । श्रीगुरुचा शब्द कथिला । धन्य केलें सर्वांना ॥101॥ गुरुवाक्य असे गंगेपरी । जो जो डुबेल तयांतरीं । सुखदु:खाच्या सर्व लहरी । ओलांडून जाईल तो ॥102॥ जो गुरुवाक्य अव्हेरी । त्याचेहाल कोण विचारी । दु:खाची होऊन भोंवरी । पाताळांत गाडील ॥103॥ सकाळीं उठल्या पासोनी । जे कर्म कराल जाणोनीं । तें तुझीच इच्छा म्हणोनी । घडलें असें म्हणावें ॥104॥ तुम्ही असाल खातपीत । ते मनीं करावे समर्पित । मनीं श्रीगुरुचरण स्मरत । प्राशन करावें नंतर ॥105॥ जरी घडलें बरे-वाईट । तरी न व्हावें दु:खित । जैसें ठेविलें असे त्यांत । सुख मानावें भक्त हो ! ॥106॥ गुरुपायीं नसे अंधार । परी निश्चित आहे उशीर । मनीं धरावा सबूर । अधीरता वर्जोनी ॥107॥ संपूर्ण समर्पितां भावना । जैसी जैसी वाढेल जाणा । गुरु हा सुभक्ताविना । वेगळा न राहूं शके ॥108॥
इति श्रीभाऊचरित्रामृत – कथनं नाम अष्टमोऽध्याय: । श्रीदेव वेतोबार्पणमस्तु । शुभं भवतु ॥श्रीरस्तु॥