सावली – अध्याय १७

।। श्री ।।
।। अथ सप्तदशोऽध्याय: ।।

श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।। ऐसें हें जानकीचें जीवन । जणूं गंगेचा प्रवाह जाण । अखंड तो वहात राहून । सुख समृद्धी अर्पितसे ।। १ ।। या प्रवाहाचें निर्मळ जीवन । जेथें धांवलें दुथडी भरुन । तेथें सकल जन उद्धरून । तीरी निर्माण झाली तीर्थक्षेत्रें ।। २ ।। स्वत: मिळाली सिंधूस । तरीही सतत चालला प्रवास । घेतलेल्या असिधाराव्रतास । खंड पडूं न दिधला ।। ३ ।। बीजरूप झाली आपण । अंकुरली भक्त हृदयांत । पुन्हां पूर्ववत् वृक्ष होऊन । सावली केलीस भक्तांवरी ।। ४ ।। जैसा क्रम चाले सृष्टींतुन । वृक्ष जाई बीज ठेवून । पुन्हां तोंचि येई अंकुरून । फळें पुष्पें द्यावया ।। ५ ।। तैसे जानकीनें केलें । जाण्यापूर्वी कार्य रचिलें । बीज आपुलें ठेविलें । कन्याहृदयी रक्षावया ।। ६ ।। मागील अध्यायी सांगितलें । कालेचें जेव्हां लग्न झालें । त्यानंतर कुसुमला सांगितलें । निर्वाण कार्य आपुले करावया ।। ७ ।।तेव्हांच बोललीसे तिजला । माझा कार्यभाग राहिला । तो मी तुलाच असे सोंपविला । पुढें चालत रहावा म्हणून ।। ८ ।। आतां आम्हांस जाणें लौकर । ऐसें बोलुनी धरिला कर । म्हणे कांटेरी मुकुट शिरावर । आज तुझ्या मी ठेवितसे ।। ९ ।। तुवां तो करावा धारण । तयाकरितां तूंच योग्य जाणून । तें सर्व तुला सोंपवून । निवृत्त मी आज ।। १० ।। परि कुसुम जाई कोपून । म्हणे मला न यातले ज्ञान । त्यांतून मी सासुरवाशीण । मज न कार्य हें झेंपेल ।। ११ ।। तेव्हां जानकी बोले हांसून । योग्य समय येतां जाणून । मी तुजला सहाय्य करीन । तूं निमित्तमात्र राहशील ।। १२ ।।जैसा कृष्ण राही पार्थापाशीं । तैशीच मी तुजपाशी । कार्य करीन माझे वंशी । अपूर्ण जे जें राहिलें ।। १३ ।। तुला देते भगवद्गीता । जीवनांत आचरण्याकरितां । कर्म-फलाचा त्याग करिता । कर्म करावें संसारी ।। १४ ।। कुसुमच्या तें न आले ध्यानांत । काय आहे आईच्या मनांत । काय आहे कांटेरी मुकुटांत । त्या फकीरनृपाचे भूषणीं ।। १५ ।। ऐसें झाले संभाषण । तेव्हांच बीजाचें झालें रोपण । शक्तिपात गेली करून । भविष्य पुढील जाणून ।। १६ ।। जरी काळाचा सन्मान करून । जानकी झालीसे निर्गुण । तरी बीज आलें अंकरून । सगुण रूप धराया ।। १७ ।। यावें यावें श्रोतेजन । तुम्हांस मी जातों घेऊन । जेथें भक्तिजल सिंचून । वृक्ष बहरला त्या क्षेत्रीं ।। १८ ।। जैसें वृक्षातळीं बैसून । बुद्धदेवानें केलें तपाचरण । त्या वृक्षास लागे नाम भूषण । बोधी वृक्ष म्हणोनियां ।। १९ ।। दत्तात्रेय बैसती विश्रांतिसाठीं । ज्या औदुंबर वृक्षाखाली । मिळाले मोठेपण त्यालाही । कल्पवृक्ष तो झाला ।। २० ।। जैसी शिवभक्तांची पावनकाशी । जीव उद्धरती वंशोवंशी । दर्शनें जोडिती पुण्यराशी । दर्शना धांवती म्हणून ।। २१ ।। जैसी विष्णुभक्तांची पंढरी । प्रत्यक्ष वैकुंठ आहे भूवरी । दर्शनार्थ करिती वारी । भक्तवृन्द जीवनीं अनेकदां ।। २२ ।। जे शक्तीची उपासना करिती । त्यांना त्या स्थानाची वाटे प्रीति । दर्शनार्थ धांवती अतिप्रीति । जीवनीं धन्य व्हावया ।। २३ ।। कोणी जाती पावगडीं । कोणी जाती माहूरगडीं । कोणी जाती कार्लागडीं । तैसेची कोणी आबूगडीं ।। २४ ।। म्हणोनियां श्रोतेजन । तुम्ही एकदांतरी घ्यावें दर्शन । जें तीर्थक्षेत्र झाले निर्माण । जानकीच्या वसतीनें ।। २५ ।। आजही तें रम्य स्थान । तितकेंच आहे परमपावन । जानकी गेली ठेवून खूण । आपुल्या पूर्ण अस्तित्वाची ।। २६ ।। जरी तें घर झालें परधन । त्याचा मालक भक्त हें आहे जाणून । घर सोडितां आला निघोन । स्वयंभू त्रिशूळ देव्हार्यांत ।। २७ ।। त्यानेंही अती निष्ठा ठेवून । स्थान महिमा ठेवला सांभाळून । तेंचि परमतीर्थ स्थान । आपण पाहूं या प्रत्यक्ष ।। २८ ।। जरी मजसवें याल कल्पनेनें । चित्र दिसेल वर्णनानें । प्रयत्न करितो तुम्हां कारणें । तीर्थयात्रा घडवाया ।। २९ ।। मथुरेस जाती संतजन । कृष्णलीलेचें पाहती ठिकाण । यमुनेसही करिती वंदन । रज:कण शिरीं लावूनिया ।। ३० ।। तैसेंची आहे गाणगापूर । प्रत्यक्ष वसती श्रीगुरुवर । भक्तांचा लोटतसे पूर । आशीर्वाद घ्याया गुरुंचा ।। ३१ ।। ऐसा स्थान महिमा जाणून । तीव्र इच्छा होई मनांतून । एकदां पहावें डोळा भरून । जानकीस्थान गणदेवीचें ।। ३२ ।। म्हणोनि विनंती मालूस केली । जी तात्काळ तिनें मान्य केली । आमची सहकुटुंब यात्रा निघाली । बिल्लीमोर्या उतरली । थोडा एस.टी.नें केला प्रवास । तो स्मृति उजळल्या खास । मालू वर्णतसे प्रसंगांस । पुढें पुढें जातां मार्गानें ।। ३४ ।। वेंगणिया नदी लागली मार्गांत । जेथील शिवमंदिराचे प्रांगणांत । आजी खेळली नवरात्रांत । दोन रूपांत दिसली जी ।। ३५ ।। आणि याच नदीमधून । त्रिंबकाला घेतले उचलोन । पावसाळ्यांत वाहे भरून । जरी ओढ्यापरी दिसतसे ।। ३६ ।। तोही पुढें गेलों ओलांडून । तों दुसरे मंदीर दिसलें छान । म्हणे येथलाच तो भाग्यवान । पुजारी अभिषेक करणारा ।। ३७ ।। ऐसें मार्गांत चाले वर्णन । तो गाडी चालली गांवांतून । तें खेडेंवजा गांव पाहून । कुतूहल दाटलें मनांत ।। ३८ ।। मामलेदाराची कचेरी पाहिली । जेथें दादांनीं नोकरी केली । तेथेंच आमची एस.टी.थांबली । वंदन केलें त्या भूमीला ।। ३९ ।। गावांत गेलो थोडं चालत । पूजनार्थ पुष्पे घेतली विकत । मालू एकटीच होती सांगत । एकेक आठवणी बालपणींच्या ।। ४० ।। दरुवाड्याच्या वळणावर । एक दर्गा दिसला सुंदर । नित्य इथलेच भक्तपीर । दर्शन घेती जानकीचें ।। ४१ ।। जरा पुढें आलों चालून । एक मंदीर दिसलें नूतन । तुळजाभवानीचें दर्शन । घडलें तेथे आम्हांला ।। ४२ ।। बाहेर पडतां मंदीरांतुन । तो जानकी मंदीर दिसलें छान । दुमजली कौलारू वाडा पाहून । जयजयकार केला मनांत ।। ४३ ।। पूर्वाभिमुख आहे प्रवेशद्वार । पुढें प्रांगण आहे सुंदर । उभे राहिलो घरासमोर । लक्षपूर्वक न्याहाळीलें तें ।। ४४ ।। ओटा प्रशस्त दिसला छान । तोच करूनि देई आठवण । शिर मांडीवर ठेवून । रेडा-बंधू जेथें बैसतसे ।। ४५ ।। येथेच नभी लक्षून । वीज दाखवीलीसे थांबवून । आणि हेंचि तें पवित्र प्रांगण । जेथें गंगा प्रकटली दारांत ।। ४६ ।। येथेंच सर्व बैसती । गप्पा गोष्टी कराया जमती । यथेंच येई श्रीगणपती । आमंत्रण द्याया आजीला ।। ४७ ।। जैसी नामदेवाची पायरी । जिला भक्त प्रेमानें नमस्कारी । तितुक्याच आदरें ओट्यावरी । पायरी वंदुनियां चढलों ।। ४८ ।। आम्ही प्रवेशिलों पहिल्या खोलींत । विश्रांती घेण्या वैसलों शांत । मालू आम्हांला होती सांगत । पूर्वीं होता झुला येथें ।। ४९ ।। खोली दक्षिणेस होती लांब । मध्यभागीं दिसलेसे खांब । दारें होती पूर्वपश्चिमेस । कपाट दक्षिणेस मध्यभागीं ।। ५० ।। येथेंच या झोंपाळ्यावरी । दर्शन देई दुर्गेश्वरी । झुला घालीत परोपरी । तिज आनंदानें देवता ।। ५१ ।। आणि याच झोंपाळ्यावरती । बालपणीं बोललों शुभं करोति । नानारूपें पाहिलीं होतीं । जानकीचीं आम्हीं याचि जागीं ।। ५२ ।। मग प्रवेशलों दुसर्या खोलींत । उत्तरेस दिसे कोनाडा शांत । दक्षिणेस जिना वरती जात । पश्चिमेस होते स्वयंपाकघर ।। ५३ ।। कोनाड्याचें घेतां दर्शन । त्रिशूळ दिसतां झालें स्मरण । हीच ती परमपावन । स्मृति जानकीनें ठेवलेली ।। ५४ ।। येथेंच या देवखोलींत । लीला झाल्या असती अनंत । प्रत्यक्ष येती नवरात्रांत । देवी गरबे खेळावया ।। ५५ ।। आणि या खालील कोनाड्यांत । नारळ निघती असंख्यांत । प्रसादपुष्पेंही लाभत । अथवा जें जानकी देत असे ।। ५६ ।। देव्हार्याचे डावे बाजूस । एक खांब आहे भिंतीत । त्याच्याही छोट्या कोनाड्यांत । जानकी हात घालीतसे ।। ५७ ।। तेथें औषधें तिज लाभत । जीं दु:खितांना होती देत । खांबास टेकुनि नित्य बैसत । मुख करोनी देवाकडे ।। ५८ ।। येथेंच या देव्हार्याखाली । गंगा तिनें स्थापन्न केली । येथेंच जानकी दिसली । तीन वर्षे पुजार्यास ।। ५९ ।। बाजूस दिसलें मोठें कपाट । अन्नपूर्णा बैसली आंत । आणि ह्याच्याच त्या आरशांत । कृष्णलीला तिनें दाखविल्या ।। ६० ।। येथेंच आला मोठा भ्रमर । नव्हें ! राजे सयाजीच मरणोत्तर । सात चिचुंद्र्या आल्या सुंदर । लक्ष्मीरूपें येथेंच ।। ६१ ।। या पश्चिमेच्या दारांत । आणि खिडकीमधील जागेंत । जानकी नित्य बैसे तेथ । तंद्री शून्याकडे लावुनी ।। ६२ ।। याच या पवित्र जागेत । होती आशीर्वाद भक्तां देत । कोणी दर्शने होती तृप्त । मनोवांछित लाभोनि ।। ६३ ।। पुढें शिरलों स्वयंपाक खोलींत । तेथें पाण्हेर्याची जागा पाहत । तीन चिंबोर्या निघाल्या जेथ । लिंगरूपें झाल्या ज्या ।। ६४ ।। बाहेर पडलों मागील अंगणीं । तेथें आठवणींच्या असंख्य श्रेणी । मालूस आले उचंबळोनि । काय सांगू नी काय नको ।। ६५ ।। पश्चिमेस थोड्या अंतरावर । वेंगणीयाचें आहे तीर । तेथें पिशाच्चांचा केला उद्धार । गंगा बोलवूनि अंगणीं ।। ६६ ।। येथेंच येई नाग मणिधर । जानकीस वंदाया वारंवार । येथें ती रूप दाखवी भयंकर । महाकालिकेचें कन्येला ।। ६७ ।। दक्षिणेस पाहिली लांब खोली । जी गवत लाकडांनी असे भरली । येथेंच ती आग लागली । गर्व दादांचा हराया ।। ६८ ।। गोठा होता लांब उत्तरेस । जेथें गायीवासरांचा वास । जेथें गोधन दिसते नजरेस । तेथें क्षीर समृद्धीचा वास ! ।। ६९ ।। तुलसी वृंदावन होते अंगणीं । फुलें सुवासिक चहुबाजुनी । धुंद जाहलों त्या जागेवरीं । प्रत्यक्ष कथा ऐकूनि ।। ७० ।। पुन्हां देवखोलींत प्रवेशिलों । पहिल्या मजल्यावर चढलो । धान्य कोठारांत शिरलो । दक्षिण-उत्तर बाजूंच्या ।। ७१ ।। पहिली बाळंतिणीची खोली । होती चांगली सारवलेली । कुंकुमपदकमलें उमटलीं । देवीची येथें अनेकदां ।। ७२ ।। ऐसा न्याहाळूनि परिसर । आम्ही बैसलों देवा समोर । भावें केली आरती सुस्वर । फलें-पुष्पें अर्पोनियां ।। ७३ ।। फोटो जगदंबेचा सुंदर । ठेवला होता समोर । जानकीच बैसली वाघावर । ऐसा भास झाला क्षणैक ।। ७४ ।। संकल्प केला मनांत । कीं जानकीचें लिहावें चरित्र । तें मालु मजला सांगत । त्याचा प्रथमोध्याय वाचावा ।। ७५ ।। प्रथम अध्याय वाचाल । तैं प्रसाद आम्हां लाभला । ढीग कुंकवाचा निघाला । चरणांजवळ देवीच्या ।। ७६ ।। म्हणे बाळा तुझे लिखित । आम्हां आवडलें बहुत । तुझे पूर्ण होतील मनोरथ । आहे आशीर्वाद आमुचा ।। ७७ ।। यावरून श्रोतेजन । तुम्हां आलें असेल कळून । कीं जानकी न गेली येथून । प्रसादरूपें प्रकटलीं ।। ७८ ।। आहे हें स्थान परमपावन । म्हणोनि घ्यावें जाणून । जीवनांत व्हावें धन्य । दर्शन एकदां घेऊनियां ।। ७९ ।। कुसुमला येथेंच मिळाली । आई सद्गुरु परी लाभली । भक्ति येथेंच अंकुरली । तिच्या करुणाजल-सिंचनें ।। ८० ।। सदैव रात्रींत असली जागृत । एकमेकांची करिती सोबत । ऐशा या सुखसहवासांत । कार्य सोंपविलें कन्येला ।। ८१ ।। हें कोणास न आलें कळून । कीं तिने शिष्य केला उत्पन्न । भक्तांसी झालें आकलन । यथा समय पुढें पुढे ।। ८२ ।। अशी मातेची असतां जागृती । कुटुंबजन कैसे विसरती । मंगल कार्ये घडतां येती । ओटी मातृदेवीची भरावया ।। ८३ ।। ऐसें हे परमपावन श्रद्धास्थान । जेथें कन्येस लाभलें वरदान । तेंचि काशी-गया-प्रयागासमान । सकल कुटुंबास जाहलें ।। ८४ ।। फार पूर्वी या भागांत । देवीचे गण असावे रहात । इतिहास असावा प्रख्यात । काळ उदरीं दडलासे ।। ८५ ।। परी जानकीनें केलें पावन । । देवीगणांसह राहिली आपण । नांवांचें सार्थक केलें जाण । गणदेवी म्हणोनियां ।। ८६ ।। मालुस्ते गांवाहुन आली । या गणदेवीस राहिली । प्रकट-गुप्त येथेंचि झाली । अदृश्य रूपें वावरतसे ।। ८७ ।। तेणें स्थानमहिमा झाला । वाडा मंदीररूप बनला । ऐशा या कीर्तिमंदीराला । भेट द्यावी एकदां ।। ८८ ।। म्हणोनि या भेटींत । आम्हीं संतृप्त झालो मनांत । माघारीं फिरलों तिला स्मरत । सायंकाळचे समयास ।। ८९ ।। जरी निघालों मंदीरातुन । तरी मन मागेच राही रेंगाळून । पुन्हां केव्हां होऊनि दर्शन । पारणें फिटेल लोचनांचें ।। ९० ।। ऐशा अनेक सुखद विचारांनीं । आम्ही पोहोंचलो सदनीं । अंतर्मनांत आनंदोनी । यात्रा पूर्ण झाली म्हणोनियां ।। ९१ ।। म्हणोनियां श्रोतेजन । तुम्हांस विनंती केली जाणून । निश्चयें पहावें पवित्र ठिकाण । श्रद्धा ठेवूनी अंतरी ।। ९२ ।। जो श्रद्धेविना जाईल । त्याला भलतेच काहीं दिसेल । पडलेल्या वाड्याची जाणवेल । ठाईठाई रुक्षता ।। ९३ ।। ज्याला पडका वाडा दिसेल । पाय शेणामातींत भरतील । शुष्क रानवटापरी दिसेल । परिसर सभोंवतींचा ।। ९४ ।। जैसे तुम्ही खोलीत शिराल । शीऽ शीऽ म्हणुनि बाहेर याल । हेंचि बाह्य चक्षुला दिसेल । भक्तिविन शुष्क तुम्हांला ।। ९६ ।। परि श्रद्धा असतां हृदयांत । सृष्टी वेगळीच दिसेल डोळ्यास । अंतर्मनें जाल भूतकाळांत । कल्पनेनें दिसेल सर्व पूर्ववत् ।। ९७ ।। जानकी तेथें कैसी वावरली । सर्व जागा पावन केली । जिथें तिची पदकमलें उमटलीं । लल्लाटीं लावाल ती माती ।। ९८ ।। ‘ संतचरण लागतां पायीं ‘। याची मिळेल तेथेंच ग्वाही । सर्व तीर्थांना होईल घाई । पावन तुम्हां करावया ।। ९९ ।। हीच ती गुरुचरणाची माती । तीच भक्ताची भागीरथी । ऐसी ठेवाल जरी सन्मति । स्थानमहिमा समजेल ।। १०० ।। श्रोते मज सांगती गहिंवरून । धन्य आम्हांस केलेंस सांगून । गणदेवी यात्रा केली पूर्ण । प्रत्यक्ष स्थान जणूं पाहिले ।। १०१ ।। आम्ही संकल्प करूं मनांत । कीं गणदेवीस जाऊ निश्चित । जानकीचें तें लीलामृत । प्राशन करूं भक्तीने ।। १०२ ।। परी म्हणती सांग आम्हांला । तिचा नवा अवतार कोंठे झाला । तो वृक्ष कोठे बहरला । सावली द्यावया भक्तांना ।। १०३ ।। शांत व्हावें श्रोतेजन । तेंही मी तुम्हांस सांगेन । अवतार कथेचें वर्णन । पुढील अध्यायीं थोडक्यांत ।। १०४ ।। जानकी-जीवनप्रवाहांत । दुसरे तीर्थक्षेत्र झालें निर्मित । त्याचेंही सांगेन अल्पवृत्त । शांत चित्ते परिसावें ।। १०५ ।। ज्योतीनें ज्योत पेटवून । असंख्या दीप होती निर्माण । तैसें हें जानकीजीवन । असंख्य ज्योतींनी तेजाळलें ।। १०६ ।। असंख्य ज्योतींचा होईल । एकच तो प्रकाशमय गोल । कोटीसूर्यसमप्रभ दिसेल । अज्ञानतिमीर हराया ।। १०७ ।। येथेंच सर्व स्थिरावलें । स्थितप्रज्ञ मुक्ती पावले । तेची भक्तिभावें पोहोचलें । जानकीचें चरणांजवळ ।। १०८ ।।

इति श्रीजानकीमहिमाकथनं नाम सप्तदशोऽध्याय:। श्रीजगज्जननी जगदंबा-एकवीरा मातार्पणमस्तु । शुभं भवतु ।श्रीरस्तु।

<< सावली – अध्याय १६        सावली – अध्याय १८ >>

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *