
“कल्पवृक्षाची सावली”
सत् चित् आनंद’ अशा परमात्म्याचे ‘सत्यम् शिवम् व सुंदरम्’ असे ही वर्णन आहे. या मध्ये शिवम् शब्दाचा अर्थ होतो कल्याण. ईश्वर कल्याणमूर्ती असून तो शरण आलेल्या प्रत्येकाचे कल्याण करतो. हे त्याचे जगत्कल्याणाचे कार्य विविध त-हेने आणि रुपाने अविरतपणे सुरु आहे. त्यासाठी योग्य साधन व साधक याची निवड सुद्धा तोच करतो. साधकाची साधना जेव्हढी उत्कट तेव्हढे त्याच्या द्वारे भगवंताचे कार्य विनासायास होत रहाते. आपल्या सर्वांच्या सुदैवाने सद्गुरुंचे संन्निष्ठ साधक पूज्य श्री आबा साहेब (मधुकर)सुळे यांची निवड ‘सावली’ नामक मायेने ओथंबलेल्या ग्रंथासाठी ‘त्याने’ केली.
वास्तवत: सावली ही दिली जात नसून घेतली मात्र जाते. सावली घराची असो का वृक्षाची, घर किंवा वृक्ष आपण काही मूल्यवान कोणाला काही देतोय असा भाव न ठेवता त्याच्या केवळ मात्र अस्तित्वाने निःस्पृह सावली निर्माण होत असते. प्रस्तुत सावली ग्रंथात तीर्थरूप पूज्य जानकी आईने प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक, मी लोकांचे कल्याण करीत आहे. या भावनेने काहीच केलेले नसताना केवळ मात्र तीच्या सान्निध्याने जनकल्याण झालेले आहे. ज्या प्रमाणे उन्हातान्हातून आलेल्या थकल्या भागलेला, अतिश्रांत झालेल्या, कदाचित वाट चुकलेल्या पांथस्थास सावली दिसताच जसे हायसे होते तसेच पू. आईंचा हा चरित्रग्रंथ दृष्टी पडताच वाटते.
सावलीच्या अधाराने आश्रिताचा श्रम-परिहार होतो. त्याचे शारिरीक कष्ट व थकवा दूर होवून मन शांत होते. शरीर व मनांस आराम मिळाल्याने थोड्या अवधीनंतर तो पुढची वाटचाल करण्यास उत्साही होतो व अंती स्वत:च्या घरी सुखरुप पोहोचतो. ‘सावली’ ग्रंथ सुद्धा वरील प्रमाणेच उपकारक व उपचारक ग्रंथ आहे. त्याच्या आश्रयाला आलेल्या आपल्यासारख्या जिवनध्येया पासून भरकटलेल्या कष्टी जीवांचा सुनिश्चित उद्धार होतो. परमप्रिय वात्सल्यमूर्ती जगद्जननी, पूज्य जानकी आई शरणार्थ्यास पूर्ण प्रेमाने गोंजारून त्याचे श्रांत मन शांत करते. तीच्या ममतेचा, पावित्र्याचा, तेजाचा व शुचितेचा प्रभाव वाचकावर अवश्य होतो, ग्रंथ पठण करणाऱ्या श्रोत्या-पाठकाचे आमूलाग्र परिवर्तन होवून त्याच्या शरीरात, मनात व अंत:करणारत संपूर्ण सकारात्मकता व दिव्यता निर्माण होते व रोग निर्मूलन पण होते.
एकदा का शरीर निरोगी व मन शांत झाले की अंत:करणात देवाचा ध्यास लागतो. पूज्य जानकी आईंची ओढ व तळमळ सातत्याने रहाते. पूज्य आईने स्वप्नात काढून दाखवलेली ‘कुंभ’ व ‘ध्वज’ ही प्रतिके सुद्धा सार्थक आहेत. कुंभ किंवा कलश हे साधनेद्वारा संपादन केलेल्या उर्जेचे सुरक्षित कवच असून त्या द्वारे सावलीच्या पाठकाचे आत्मकल्याण व्हावे हा आशय आहे. कुंभ स्वच्छतेचे प्रतिक असल्याने वाचकाची आंतरबाह्य शुद्धी होवून त्यास पू, आईचे दर्शन सबाह्य अभ्यंतरी विश्वव्यापक जननीच्या स्वरुपात होत रहाते. त्याच प्रमाणे ‘ध्वज’ सुद्धा मांगल्याचे प्रतिक आहे. आकाशत उन्नतपणे अविरत फडकत रहाणारा ध्वज हे विजयाचे सूचक चिन्ह असून सावलीचे पठण दर्शेद्रियांवर विजय मिळवते. सावलीचा एकनिष्ठ उपासक सर्वेद्रियांचा निरोध करून पू, जानकी आईच्या अनुसंधानात सतत रहातो. ज्याचा विचार आपण सातत्याने करतो तसेच आपण होतो. पूज्य जानकी आईने स्वत:च्या पूर्वायुष्यात अत्यंत खडतर व कष्टाचे दिवस काढले. अतिशय गरीबीत व पोरक्या अवस्थेतपण मालजाईची पुजा मनोभावे करीतसे. हिच पूण्याई भविष्यात तीच्या कामी आली. तात्पर्य हेच कि बाल्यावस्थेत कशाही विपरीत परिस्थितीतपण आपण नामस्मरण सातत्याने करीत रहावे, हि शिकवण आपणास मिळते.
भगवान श्रीकृष्णाने श्रीमद् भगवतगीता रुपी अमृताचे आपणांस यथेच्छ प्राशन करवले आहे. त्यामध्ये त्याने अर्जुनास वचन दिले आहे की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होईल तेव्हा तेव्हा मी त्या त्या वेळी अवतार घेईन. पूज्य आईंचा जन्म व अवतार ह्याची आपणांस ह्या वचनाची वारंवार प्रचिती देतो. घोर कली युगात भ्रष्टाचार, अत्याचार, बलात्कार, व्यभिचार व ईतर अनेक पाशवी तत्त्वांनी थैमान मांडले असताना व संपूर्ण नकारात्मकता व्याप्त झालेली असताना त्यातून सामान्य जनांची मुक्ति करण्यासाठी व अधर्म अटकवण्यासाठीच पूज्य जानकी आईने अवतार धारण केला. वास्तविक समग्र सृष्टी व अखंड ब्रह्मांडाचे संपूर्ण संचालन, व्यवस्थापन, नियमन व संगोपन एकमात्र सर्वव्यापक समष्टी शक्ति करीत आहे. हे कार्य सुसंयोजितपणे होण्याकरिता हीच आद्यशक्ति विविध रूपे धारण करीत असते. ह्याच परमेश्वरीय दिव्यशक्तिचा प्रसादरुपे पू. जानकी आई कु. दुर्गेच्या स्वरुपात अवतिर्ण झाली.
भूत, प्रेत, राक्षस, डाकिण, पिशाच्य इत्यादी भयंकर प्रकारच्या भीतीदायक योन्या असून त्या सर्व भोलेनाथ शिवशंकराच्या आधिन आहेत. पूज्य जानकीआई विश्वजननी पार्वतीचेच दूर्गारुप असल्याने गणदेवीतल्या दरुवाड्यातील भूतांचा तीच्या समोर टिकाव लागला नाही. एवढेच नाही तर तीने त्या सर्व नकारत्मक तत्त्वांना मुक्त करून मोक्ष दिला. धूतपापेश्वर अशा पावन गंगेचे तेथे अवतरण करवून शाश्वत सुचिता त्या स्थानी निर्माण केली.
पातंजल योगासुत्रात भगवान पतंजल ऋषिंनी विभूतीपादामध्ये अष्टसिद्धींचे वर्णन केले आहे. योगमार्गात अंतरंग साधनेच्या अंतर्गत साधकाला अणिमा, लघीमा, महीमा, गरीमा प्राप्ती, इशित्व व वशित्व प्रकारच्या सिद्धी आपसूक मिळतात. या सर्व सिद्धी पूज्य आईच्या चरणी लोळण घालत होत्या. त्यामुळेच गोशाळेतला उंच धिप्पाड रेडा, मणिधर भूजंग, दरुवाड्यातील भूते, आकाशातील वीज सर्वजण पूज्य आईंच्या प्रेमांकुशात बध्ध झाले.
तुळसी हे केवळ सामान्य रोप नसून त्याच्या आयुर्वेदीक गुणांबरोबरच अंत:करणाच्या शुचितेचा पण प्रगाढ संबंध आहे, असे पण पू. जानकी आईने सिद्ध केले. ‘पूर्ण मिंद’ अवतार असणारी माउली रोज तूळशीपूजन करीतसे. ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे’ ही उक्ति तीने वृक्षवेलींवर अतोनात प्रेम करून प्रमाणित केली व पर्यावरणाची सुरक्षा आणि जवाबदारीचा संदेश आपणांस दिला. विराट विश्वमोहीनी दर्शनाचा प्रत्यक्ष लाभ जो कालेला मिळाला त्याचा आपणा सर्वांस मनोमन हेवा व हळहळ वाटते. समग्र ब्रह्मांडाचा आरंभ, पालन व संहार अशा ब्रह्मा, विष्णु, महेशाची प्रचिती आपणांस या ग्रंथात नेमकी आढळते. गर्भवती हीराबाईच्या गर्भस्थ विद्रुप शिशुस सुंदर सुदृढ करून स्वत:चे ‘ब्रह्मा’ स्वरूप दाखवले. गोठ्यातील गाई-म्हशींवर हाथ फिरवून यथेच्छ दुग्धपान गोर-गरीबांना वाटुन, आपला स्वत:च्या मूलास पोटशूलाण्याच्या व्याधितून मुक्त करून स्वत:ची पोषक ‘वैष्णवी’ लीला दर्शवली. भूत-पिशाच्यांचा नायनाट करून तसेच ज्वालाग्नी पसरवून दादांना समज देवून स्वत:चे ‘त्रिनेत्र’ स्वरुप अनुभवास आणून दिले.
तात्पर्य पूज्य जानकी आई, दुर्गा, बायजी ही सर्व एकाच शक्तिची विविध रूपे असून तीच्या लीलांचे अप्रतिम वर्णन पू. आबासाहेब (मधुकर सुळे) सुळ्यांच्या हस्ते अभिव्यक्त झाले आहे. ते स्वत: पूण्यात्मे असल्यामुळेच या प्रकारचे आर्ष वाङमय निर्माण झाले. सद्गुरु पूज्य श्री भाऊकाका दळवी हे सुद्धा सूक्ष्मरूपाने या पावन ग्रंथाच्या मर्मस्थानी आहेत. असा हा पूण्याविष्कार ग्रंथ वाचक-श्रोत्यांचे जन्मोजन्मीचे पाप विनाश करतो. या अद्भूत ग्रंथाचे पठण भाग्यवान भक्ताची कुंडलीनी शक्ति जागृत करून त्यास अनुग्रहाद्वारे परात्पर अनुभूती सुद्धा देवू शकतो. “सावली’ वाचल्यावर आध्यात्म्याच्या पुढच्या वाटचाली करता जो सातत्याने अखंडपणे पूजनीय आईचे स्मरण करतो व अनुसंधानात रहातो त्यास ‘सधोन्मूक्ति’ सुनिश्चित आहे.
॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥
श्री. श्रीनिवास सोलापूकर
मो. ८८४९०४७५१५ (बडोदे)