
॥ जय जानकी दुर्गेश्वरी ॥
माझा पुतण्या डॉ. पराग देशपांडे ठाण्यातील सुप्रसिद्ध कार्डीऑलॉजिस्ट आहे. त्याचे वर्तक नगर येथे प्रथमेश नावाचे एक हॉस्पिटल पार्टनरशीपमध्ये आहे.
ही गोष्ट सन २००९ सालची आहे, डॉ. पराग हा कौशल्या हॉस्पिटलमध्ये “कन्सलटिंग कॉर्डिऑलॉजीस्ट म्हणून सुद्धा जात असे. मी स्वत; (वय-७२) दम्याचा पेशंट असल्याने डॉ. परागकडून नियममित चेक अप करीत असे.
मला खुप दिवस बरं वाटत नसल्याने मी डॉ. परागला टेलीफोनवर सांगितले. त्याने मला काही टेस्ट करून त्याचे रिपोर्ट पाठविण्यास सांगितले. मी रिपोर्टस् पाठवील्यावर अचानक डॉ. परागचा फोन संध्याकाळच्या सुमारास आला. त्याने मला फोनवर सांगितले “काका उद्याच्या उद्या सकाळी ९ वाजता तू व सौ. दीपाकाकी (माझी पत्नी) माझ्या घरी या. सौ प्रिती (डॉ. परागची पत्नी) तुला घेऊन कैशल्या हॉस्पिटल मध्ये जाईल. तेथे अॅडमिट हो”. मी थोडी टाळाटाळ करत होतो. परंतु परागने निक्षून सांगितले की “काका, वेळ थोडाच आहे व मी कौशल्यामध्ये तुझ्या नावाने स्पेशल रूम बुक केली आहे. तू आणि सौ. दीपालीकाकी दोघेही राहू शकाल.
मी व माझी पत्नी दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर ९ वाजता परागच्या घरी पोहोचलो सौ. प्रिती खालीच उभी होती. ती आमच्या टॅक्सीत बसली व आम्ही कौशल्या हॉस्पिटलमध्ये गेलो. तेथं सिस्टरने मला एक कॉटवर झोपण्यास सांगितले. सौ. प्रिती माझे क्रेडीट कार्ड घेवून ऍडमिशन फॉरमाल्लिटीज पुर्ण करण्यास गेली. त्यानंतर २ मिनिटातच मी संपूर्ण बेशुद्ध झालो. म्हणजे मला काहिही कळत नव्हते. मधून मधून जाग आली तरी मी कुठे आहे जवळ कोण आहे काहीही समजत नव्हते. याचे कारण माझ्या शरीरातील ऑक्सिजन व सोडियमचे प्रमाण खूपच खाली झालं होत.
हॉस्पीटलमध्ये एका रुममध्ये मला सलाईन लावून ठेवण्यात आलं होतं, व औषधउपचार डॉ. पराग यांच्या मार्गदर्शनाखाली चालले होते. त्या रात्री मी अचानक उठून चालायला लागलो. त्यामुळे माझ्या सलाईनची सुई बाहेर निघून सगळीकडे रक्त पसरले. माझ्या पत्निने घाबरून सौ. प्रितीला व डॉ. परागला बोलावीले. त्यानंतर ICU मध्ये नेण्यात आले.
त्यारात्री डॉ. परागने सबंध रात्र माझ्याजवळ थांबून निरनिराळे उपचार केले. व्हेंटिलेटरही लावण्यात आला.
सकाळच्या सुमारास माझी तब्येत थोडी स्थिर झाली. मला थोडी जाग आली तेव्हा मी माझ्या पत्निला सांगितले “जानकीआईंना कळव”, तेव्हा तिने मला विचारले, “म्हणजे कोणाला कळवू?” मी सांगितले “आपण ठाण्याला ज्यांच्याकडे जातो त्यांना”, “सुरेखाताईंना?” मी ही म्हटले व डोळे मिटले.
माझ्या पत्नीने ताबडतोब सुरेखाताईस फोन करून सांगितले की माझे मिस्टर सिरिअस आहेत व त्याना व्हेंटिलेटर लावला आहे. सुरेखाताई म्हणाल्या, “मी येते बघायला” नंतर सुरेखाताई तेव्हा ICU मध्ये आल्या तेव्हा माझ्या पत्निने मला उठवीले व सांगितले मी त्या स्थितीत, की जेव्हा मी कुणालाही ओळखत नव्हतो, तरी सुरेखाताईना चटकन ओळखले व नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. तसेच खूण करून मला अंगारा लावा असे सुचविले. त्या म्हणाल्या “हो, मी आईचा आंगारा आणलाच आहे?’ व त्यांनी मला तो डोक्यावर लावला, व सांगितले “दिवाळीच्या आत तुम्ही सुखरूप घरी जाणार”, दिवाळी आठ दिवसांवर होती. अगदी तसेच झाले पुढे मला आराम पडत गेला व डॉ. परागने दिवाळीच्या दोन दिवस आधी मला डिस्चार्ज दिला.
माझा पुतण्या डॉ. पराग ह्याने अथक प्रयत्न करून आपले कौशल्य पणास लावून माझ्यावर अनेक उपचार केलेच.
परंतु जानकीआईचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे मला व माझ्या पत्नीला भिती वाटली नाही व त्या दारूण प्रसंगातून आम्ही बाहेर पडू शकलो.
श्री. नंदकुमार रामचंद्र देशपांडे (घाटकोपर)
मो. ९६१९४२३१४१