Sawali Saurabh
Sawali Saurabh

॥जय जानकी दुर्गेश्वरी॥

          आजीच्या अनेक अनुभवांतील हा एक मनात घर करुन असलेला अनुभव जो प्रकर्षाने सांगावासा वाटतो.

          १३ फेब्रुवारी २०१६ चा दिवस, माझी मुलगी डॉ. नेहा हरिष कर्णिक (नेहा टिपणीस) हि श्रीलंका महिला क्रिकेट टिमची फिजीओ होती. ती त्यांच्या टिम सोबत भारतात रांची येथे सामने खेळण्यासाठी आली होती. आम्ही दिवसातून फोनवर एकदा तरी संपर्कात असावयाचो.

          दुपारी चारच्या सुमारास मी हॉलमध्ये शांत बसलेली असताना आजी नेहाला वाचव असे शब्द मोठ्याने बाहेर पडले. प्रथम मलाच माझे कळले नाही. मी असे कसे बोलून गेले, आणि मग मात्र मी हादरलेच कारण माझ्या डोळ्यासमोर नेहा व्हिल चेअर वर बसलेली आहे व तीच्या तोंडामधून रक्त वाहत आहे. तिचा अख्खा टि शर्ट रक्ताने माखलेला आहे व सर्व सहकारी तिला वाचवा तिला वाचवा असे म्हणत धावपळ करित आहेत.

         मी यामुळे खूपच अस्वस्थ झाले. मला काहि सुचेना मी आजीचा धावा करू लागले, आणि माझे पती विवेक कॉलेज मध्ये गेले होते त्यांना हे फोन वर कसे काय सांगावयाचे मला प्रश्न पडला होता. या अस्वस्थ विचाराने मी फक्त त्यांना फोन करून विचारले की नेहाचा आज काहि संपर्क झाला होता का? प्रत्येक वेळी नाहि हेच उत्तर यावयाचे. त्यादिवशी ते आईला (माझ्या सासूबाईंना) भेटण्यास मुलूंड येथे परस्पर कॉलेज मधून जाणार होते व रात्री यावयास उशीर होईल असे सकाळी जाताना सांगून गेले होते. मी मात्र खूपच अस्वस्थ होते. सारखा आजीचा धावा करित होते. रात्री विवेक खूप उशीरा आल्यामुळे मला काय दिसले ते त्यांना सांगितले नाहि. रात्र तशीच तळमळ राहिले. सकाळी मात्र मला रहावेना मी सर्व हि गोष्ट त्यांना सांगितली व तिला व्हॉट्स अॅप वर ती कशी आहेस विचारण्यास सांगितले. त्यांनी लगेच नेहाला मेसेज केला व त्याबरोबर नेहाचा मेसेज आला, “थोडे लागले म्हणून बोलता येत नाहि” बस, हे वाचून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला लगेचच माझे जावई हरिष यांना बडोद्याला फोन लावला तर ते म्हणाले तुम्ही घाबराल म्हणून रात्री फोन केला नाहि. आत्ता सकाळीच तुम्हाला फोन करणार येवढ्यात तुमचाच फोन आला. नेहाला तोंडावर बॉल लागला आहे व मला तेथे रांचीला हॉटेलवर जात येत नाही. कारण तेथे सर्व लेडीज टिम रहात आहेत. तुम्ही जावू शकाल का? मी क्षणाचा विचार न करता होकार दिला व जी फ्लाईट मिळेल त्या फ्लाईटने मुंबई येथून रांचीस जावयास निघाले. तसे मी नेहाला कळविले व लगेचच तीचा मेसेज आला तू ये तुला एअरपोर्ट वरून घेऊन यावयाची व्यवस्था बी.सी.सी.आय.ने केली आहे.

            मी संध्याकाळी रांचीला पोहचले तर बी.सी.सी.आय. ने मला त्यांच्या हॉटेलवर नेले व लगेचच सर्व सुरक्षेच्या बाबी पुर्ण करून नेहाच्या रूमवर नेले. तो पर्यंत सर्वजण मला भेट्रन सांगत होते तुमची नेहा व तुम्ही खूपच पुण्यवान आहात. नेहा वाचली आहे.

          नेहाला जेव्हा मी प्रथम पाहिले तेव्हा मी खूपच घाबरले व नेहा पाहताच तिला रडू आले. नेहाचा संपूर्ण चेहरा सुजलेला होता आणि तोंडावर बॅन्डेज होते. तिला काहि खाता येत नव्हते ती कशी बशी स्ट्रोने पाणी पीत होती. नेहाची अशी अवस्था पाहून घशाखाली घास उतरेना तेव्हा नेहाच तिला बोलता येत नव्हते म्हणून ती आजीचा फोटो दाखवून इशारा करित होती आजी आहे काळजी करु नकोस. नंतर नेहाच्या सहकाऱ्यांनी मला त्या झालेल्या अपघाताविषयी सांगितले तेव्हा क्षणभर मी स्तब्ध झाले. नेहमी प्रमाणे सर्व जण नेट पॅक्टीस करित होते, नेहा खेळाडूंच्या चाचण्या घेत होती. अचानक खेळाडूने मारलेला चेंडू नेहाच्या दिशेने आला व तोंडावर आदळला. नेहा चेंडूच्या आघाताने खाली पडली, सर्व भारतीय व श्रीलंकेचे सहकारी नेहा कडे धावले व एकच ओरडा झाला नेहाला चेंडू लागला तिला वाचवा, आमची नेहा आमची नेहा म्हणून भारतीय व श्रीलंकेचे सहकारी मदतीसाठी धावले कारण या आगोदर ती भारतीय महिलासंघाची सुद्धा फिजीओ होती. नेहा खूपच धीराची हॉस्पीटल मध्ये नेत असताना ती स्वत:ला बेशुद्ध पडू नये म्हणून स्वत:च्या मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करित होती. हेच दृष्य आजीने मला डोंबिवलीला घरी दाखविले व त्याच वेळी माझ्या तोंडून शब्द निघाले आजी नेहाला वाचव. नेहाला उत्कृष्ट वैद्यकीय मदत मिळाली, तिच्या सर्व वैद्यकीय चाचण्या झाल्या. तिच्या ओठाला मोठी जखम झाली होती व जबड्याला मार लागला होता. ओठाला आतील बाजूने १७ टाके पडले बाकी कुठल्या प्रकारची ईजा झाली नाही. या मुळे नेहाच्या सहाकऱ्यांमधे आनंदाचे वातावरण पसरले कारण काही दिवसापुर्वीच परदेशात एक खेळाडूला कपाळावर चेंडू आदळून जीवाला मुकावे लागले होते. आजीनेच नेहाला वाचविले. 

          नंतर दुसऱ्या दिवशी नेहा बरोबर बोलताना समजले की चेंडू तिच्या नाकाच्या वरच्या बाजूला कपाळावरच आपटणार होता पण अचानक हाताने अडविल्या प्रमाणे चेंडू क्षणभर थांबला व ओठावर आदळला. या आगोदर रांची येथेच मॅच चालू असताना पॅव्हेलियन मधे दोनदा चेंडू नेहा सर्वात पुढिल रांगेत बसते त्याच ठिकाणी आला होता व नेहा यात बचावली होती. खरच आजीचे किती आपल्यावर लक्ष असते आणि प्रेम सुद्धा आहे. ती सतत आपल्याला सांभाळत असते. आजीच्या आशीर्वादाने आज नेहा पुर्णपणे चांगली आहे व क्रिकेट मध्ये चांगली यशस्वी डॉक्टर कार्यरत आहे. खरोखरच हाच आजीचा आपल्या सर्वांवर वरदहस्त आहे कृपादृष्टि आहे. 

जय जानकी दुर्गेश्वरि आजी तुझ्या चरणी शतदा प्रणाम!!!

सौ.स्वाती विवेक टिपणीस

(डोंबिवली)

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *