Sawali Saurabh
Sawali Saurabh

॥ जय जानकी दुर्गेश्वरी ॥ 

॥तुझ्या या वाङ्मय सेवेत । माझे वास्तव्य आहे मूर्तिमंत । भावेवाचील जो भक्त । सावली राहील तयावरी॥

            या ओवीची प्रचिती मला “सावली” पोथीचे वाचन व स्मरण केल्यानंतर, अनुभूती प्राप्त झाली.

           मी सौ. स्वप्ना विनोद रणदिवे रहाणार बोरीवली, पूर्वाश्रमिची कु. आशा ताम्हणे, माझी आई कै. सुशिला य. ताम्हणे व वडील कै. यशवंत ताम्हणे, यांची कन्या. माझ्या आई वडीलांनी आम्हाला लहानपणापासूनच सकाळी आंघोळ झाल्यावर, बाहेर जाताना व रात्री झोपण्याच्यापूर्वी श्री देवांचा अंगारा लावावा व नमस्कार करावा असे संस्कार आम्हांवर केले होते.

          माझी नणंद सौ नयना देशमुख या नियमित सौ कुसुमताईकडे जात असत. माझ्या नणंदेने त्यांना माझ्या ६०व्या वाढदिवसा बद्दल प.पू. सौ कुसुमताईना सांगितले असता, त्यांनी माझ्या वाढदिवसा प्रित्यार्थ प.पू. जानकी आईंचा फोटो व “सावली” पोथी माझ्या नणंदे मार्फत मला दिला. त्यावेळी मला इतर सर्व भेटींपेक्षा ती भेट खूपखूप अनमोल वाटली.

              सौ. नयना देशमुख यांचे कडील प.पू. बायजी आईंच्या फोटोमधील कुंकवातून आपोआप कुंकू निघत आहे. मी त्यांच्याकडून तो अंगारा कुंकू नियमति आणत आहे व आम्ही रोज सर्वजण मी, पति, दोन्ही मुली, दोन्ही जावई, दोन्ही नातू आंघोळ झाल्यावर बाहेर जाताना व रात्री झोपण्यापूर्वी श्रद्धेने आजतागयात लावत आहोत. विशेष म्हणजे डबीतील अंगारा कित्येक दिवस जसाच्या तसाच असतो ही बायजीआईंच्या कृपादृष्टिचा चमत्कार आहे.

          माझे पति श्री विनोद रणदिवे यांना सन २००७ मध्ये ‘पार्कीगसन’ हा आजार झाला. ह्या आजारांत, रक्ताचा पुरवठा मेंदूपर्यंत नीट जात नाही, बऱ्याचदा त्यांच्या डोक्याचा मागिल भाग खूप खूप दुखत असे. त्यावेळी मी प.पू. बायजी आईंचा अंगारा श्रद्धेने व आईंचे स्मरण करून लावित असे. अंगारा लावल्यावर त्यांना १५ मिनिटात बरे वाटत असे व आता तो त्रास त्यांना फारसा होत नाही. सदर आजारामुळे माझे पति कुठे बाहेर कामासाठी जाऊ शकत नाही. म्हणून मलाच सर्व कामे करावी लागतात. बाहेर पडतान मी प.पू. बायजी आईंचे स्मरण व अंगारा लावून पडत असल्याने माझी सर्व कामे कोणतीही अडचण न येता लवकर सफल होतात. मला सतत जाणवत असते की माझी आई माझ्या बरोबरच आहे.

            सन २०१० मध्ये माझी धाकटी मुलगी सौ. श्रुति महेश प्रधान गरोदर होती. तिला डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले होते. त्याच काळात माझ्या पतिंना “चिकन गुनिया” या आजाराने ग्रासले. घरांत माझी मुलगी व पति सतत झोपून असल्याने सर्व कामाचा भार माझ्या एकटीवर पडायचा. त्यामुळे माझा हृदयविकाराचा आजार बळावला. मला तीन Blockeges होते. त्यापैकी एक ९५% व दोन ७०-७०% होते. त्यावेळी आम्हाला हा खूप मोठा धक्का होता. माझ्या हृदयाची शस्त्रक्रिय करण्याच्या मन:स्थितीतच आम्ही नव्हतो. दुसरा पर्याय म्हणून आम्ही “किलेशन थेरपी” घेतली. आम्ही सर्व नियमति बायजी आईंचा अंगारा पूर्ण श्रद्धेने लावत होतो. तसेच सदर थेरपी घेताना मी नियमित बायजीआईंचे स्मरण मानतल्यामनांत करत होते. त्यामुळे चार महिन्यानंतर Blockeges चे प्रमाण २४% १३% व १२% वर आले व मी बरी झाले.

माझ्या मुलीची सौ. श्रुति ची प्रसूति ९९.९९% ऑपरेशन करून करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले होते. ती सुद्धा नियमित श्रद्धेने बायजीआईंचा अंगारा लावित असे. प्रसुति अगदी नॉर्मल झाली व नातू झाला. बायजी आईंच्या कृपेने सुखरूप बरे झालो.

           मी व माझे पति आम्ही “किलेशन थेरपी’ घेऊन डॉक्टरांकडून रिक्षाने घरी येत होतो. तेव्हा रस्त्यांत आमची रिक्षा उलटली व आम्ही दोघे बाहेर फेकले गेलो. परंतु बायजी आईंच्या कृपेने माझ्या पतिंना काही दुखापत किंवा साधा ओरखडा सुद्धा पडला नाही. मला मात्र मुकामार खूप लागला.

            अेकदा मी रात्री गॅसवर नुकताच कुकर लावला. परंतु कसे काय थोड्याच वेळांत झाकण उडले, ते माझ्या आगदी जवळ पाया जवळ पडले. पण मला आईंच्या कृपेने काहीसुद्धा झाले नाही. आश्चर्याची गोष्टी म्हणजे मला पटकन गॅस बंद करावयाचा हे सुद्धा सुचले नाही. पण गॅस आपोआपच बंद झाला.

          “सावली’ या पोथीचे वाचन करण्यापूर्वी मला वरचेवर अशी स्वप्ने पडायची. की मी कोणाबरोबरतरी बाहेर गेली आहे, परंतु नंतर ती माणसे मला सोडून दुसरीकडे कुठेतरी गेली आहेत व मी एकटीच अनोळखी जागेत इकडे-तिकडे भटकत आहे.पण मला घर कधी सापडायचेच नाही. परंतु ‘सावली’ चे सतत रोज एक अध्याय, “श्री बायजी बावनी’ “श्री बायजींची आरती’ व “पाऊलाष्टक” प,पू. बायजी आई माझ्याकडून नियमित वाचन करून घेतात. सदर पोथी वाचताना कित्येकदा वाचत असलेल्या पानातून “कुंकू” प्रसादाच्या रूपाने प्रकट होते. त्यावेळी माझे मन आनंदाने भरून येते. सदर आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही. 

           “सावली’ या सप्तशतीचे वाचन करण्यापूर्वी मला कायम मनांत एक प्रकारची भिती दुसऱ्यांबरोबर कसे बोलावयाचे हा प्रश्न नेहमीच पडत असे परंतु आता मी एकटीच दुसऱ्या कार्यालयात जेथे काम असेल तेथे जाऊन मुद्याला अनुसरून योग्य संवाद साधण्याची कला मला आई मुळेच अवगत झाली आहे.

              मला घरातील सर्वांना रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री बायजी आईचा अंगारा लावून झोपायची अजूनही सवय आहे. एके दिवशी रात्री अंगारा लावताना डबी माझ्याहातून पडली व सर्व अंगारा जमिनीवर सांडला. पूर्वीची मी असते तर मला खूप वाईट वाटले असते परंतु जणू बायजी आईच मला सतत सांगत आहेत. “घाबरु नकोस काही वाईट होणार नाही’ असे मला जाणवत होते. सांडलेला सर्व अंगारा मी बायजी आईचे स्मरण करून डबीत पूर्ण भरला व बायजी आईची मनातल्या मनांत माफी मागितली. परंतु आईच्या आशीर्वादाने कृपेने मला माझ्या मनाला अजिबात रुखरुख सुद्धा लागली नाही. मला पूर्ण समतोल ठेवले ते माझ्या बायजीआईनेच.

           प.पू. बायजी आईंना नाक घासून व पदर पसरून आम्ही सर्व कुटुंबिय मंडळी मनापासून प्रार्थना करतो की, आम्हा सर्वांना सदैव तुमच्या चरणांशी नतमस्तक व कृपाछत्राखाली ठेवा. तुमचे नाम आम्हां सर्वांच्या मुखात येऊ द्या. आम्हाला तुमचा अगदी शेवटपर्यंत कधीही विसर पडू देऊ नका.

“जय जानकी दुर्गेश्वरी”

सौ स्वप्ना विनोद रणदिवे (बोरीवली)

फोन : ०२२-२८९६६६१८

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *