
विषय १
सावली वाचनाने मला आलेले अनुभव
प्रथम पारितोषिक
परमपुज्य श्री जानकी आईच्या पोथीचे सामर्थ्य आपण पामरांनी काय वर्णावे. पण ही ‘सावली’ म्हणजे खरोखरच प्रेमाची, मायेची छत्रछाया आहे, विसावा आहे. जिच्या छायेमध्ये एकदम शांत वाटते. थकलेल्या मनाला एकदम आराम वाटतो. तिच्या थंडाव्यानी जीव सुखावतो. आईची ‘सावली’ मिळणे हीच एक अनुभूती आहे.
‘सावलीचे वाचन सुरू केले आणि माझ्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण अनुभवांची मालीकाच सुरु झाली असे म्हटले तरी नक्कीच वावगे ठरणार नाही. ‘सावली’ ने आजपर्यंत अनेक अनुभूती दिल्या. तिच्या कृपेने ध्यानामध्ये अनेक देवतांची, त्यांच्या वहानांची दर्शने घडवली. विष्णूच्या दशावतारांपैकी तर बऱ्याच अवतारांचे दर्शन घडवले, हे सर्व केवळ तिच्याच कृपेने. जेव्हापासून मी ‘सावली’ वाचू लागले तेव्हा पासून माझा गाढ विश्वास आहे, मला मिळणारी रेकीची शक्ती ही परमपुज्य श्री जानकी आईकडूनच मिळते. ही ‘सावली’ माझ्यापर्यंत पोहोचली हीच मुळात माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. साधारण दहा-अकरा वर्षांपासून हा ‘सावली’ चा प्रसाद मला लाभला.
त्यावेळी मी नव्यानी व्यवसायाला सुरुवात केली होती. म्हणजे त्या आधी मी नोकरी करत होते. मी जिम मध्ये फिटनेस ट्रेनर चे काम करत होते आणि एक दिवस अचानक, मी ज्या जिम मध्ये काम करत होते ते जिम स्वत: चालवण्याची संधी माझ्याकडे चालून आली. माझी स्वप्नपूर्ती होण्याची आशा वाटल्याने मी आलेला प्रस्ताव स्विकारायचे ठरवले आणि त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली. एखादी संस्था चालवण्याची म्हटल्यावर अनेक तांत्रिक बाबी असतात, त्या ही नव्याने शिकून घेतल्या. मला हळूहळू यश ही मिळू लागले. पण व्यवसायीक आणि वैयक्तिक पातळीवरही अडचणी नाही आल्या तर कदाचीत माणूस मिळणाऱ्या यशानी हुरळून जाईल की काय म्हणून माझ्या व्यवसायात अडचणी येऊ लागल्या. अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. त्यांची उकल कशी करावी समजेना, काम करण्यातला उत्साह आटू लागला. उदासी येऊ लागली. नेमके याच वेळी श्री जानकी आईची ‘सावली’ लाभली आणि सारेच बदलू लागले.
माझी रेकी’ ची गरु. अर्थात गरु-सखी सौ. स्वाती टिपणीस, जी. श्री जानकी आईच्या नातलगांपैकी एक आहे, तिने मला हा आईच्या ‘सावली’चा प्रसाद दिला.
एक दिवस मी खिन्न मनाने माझे प्रश्न तिच्यासमोर मांडले. तिने मला आईची पोथी वाचण्याचे सुचवले. ती म्हणाली, “जो मनापासून तिला हाक मारतो त्याच्या मदतीला ती नक्कीच धावून येते, आपल्या मायेचा हात देऊन सावली पसरते. तेव्हा बघ तुझे प्रश्न नक्कीच सुटतील. मी श्री जानकी आईची महती तर जाणून होतेच. त्यामुळेच लगेच होकार दिला. तिने मला प्रथम मोठ्या ‘सावली’ चे सार असलेली छोट्या ‘सावली’ ची प्रत दिली.
मी नित्य नेमाने, मनापासून ती छोटी पोथी वाचायला सुरुवात केली, आणि अक्षरश: तीन-चार दिवसांतच माझ्या समोरील प्रश्न सुटू लागले. सगळ्यात महत्त्वाचे माझे यश न बघवणाऱ्या, मला मागे खेचणाऱ्या, अडथळा आणणाऱ्या अशा माझ्या संपर्कात असणाऱ्या शत्रूवजा माणसांची पीडा नष्ट झाली. माझ्या विरुद्ध भडकवणाऱ्यांची तोंडे बंद झाली. जिममध्ये भरपूर मेंबर्सची भरती होऊ लागली. माझे भाडे, इतर येणारा खर्च जाऊन थोडा फायदा होऊ लागला आणि मी अधिकाधीक आईच्या चरणांशी लीन होऊ लागले. हे झाले काही छोटे छोटे अनुभव जे त्या वेळी माझ्यासाठी खूप मोठे होते.
यानंतर मात्र मला मोठ्या ‘सावली’ ची आस लागली. आणि एक दिवस माझ्या गुरु-सखी ने मोठी ‘सावली’ माझ्या ओटीमध्ये घातली. हो अगदी विधीवत ओटी भरून हा ‘सावली’ चा प्रसाद मला दिला.
मिळाल्या दिवसापासूनच मी ही मोठी ‘सावली’ वाचायला सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या एक-दोन अनुभूती इतक्या हृदयस्पर्शी आहेत. ज्या खरोखर शब्दांत सांगणे अवघडच ; पण तरीही त्या मला तुम्हाला सांगण्याचा मोह आवरतच नाही. तेव्हा ते अनुभव शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करते.
खरे म्हणजे सुरुवातीला मला वाचायला वेळच मिळायचा नाही. घरातील कामे, लहान मुलीला सांभाळणे, वृद्ध सासूबाई आणि व्यवसाय या सगळ्यांचा मेळ साधून त्यातून पोथीमधील एक अध्याय वाचणे ही अवघड जात होते. पण माझ्या गुरुसखी ने सांगितले, “रोज अख्खा अध्याय वाचायला नाही जमले तरीही चालेल. जेवढे श्लोक वाचणे शक्य आहे तेवढे आणि ते ही अगदी रात्री झोपायच्या आधी वाचलेस तरीही काही हरकत नाही. जे आणि जेवढे वाचते आहेस ते किती मनापासून आहे हे महत्त्वाचे”. हे ऐकून मला हायसे वाटले. मनात आले किती हा आईचा प्रेमळ स्वभाव! याच वेळी वाच, एवढेच वाच, असेच वाच अशी कोणतीही बंधने नाहीत. पण आपण हाक मारली की ती मात्र धावून येणार. मग मी ही रोज रात्री काहीही झाले तरी जमतील तेवढे श्लोक वाचायचेच आणि मगच झोपायचे असा नेम चालू केला.
माझा पहिला अध्याय वाचून पूर्ण झाला होता आणि माझ्या नातेवाईकांसमवेत श्री क्षेत्र कडापा येथे जाण्याचा योग आला. कडापा येथे देवीच्या मागच्या बाजूला जे मोठे त्रिशूळ आहे ते श्री जानकी आईचे प्रतिक आहे असे मी माझ्या गुरुसखी कडून ऐकले होते. त्यामुळेच मी देवीबरोबरच त्या त्रिशूळाची म्हणजे अर्थात श्री जानकी आईची ही ओटी भरण्यासाठी ओटीचे सर्व साहित्य घेतले होते. माझ्या बरोबर बरेच नातेवाईक होते. पण त्यांना हे माहिती नव्हते.
मी जशी त्रिशूळाची ओटी भरु लागले, माझी ओटी भरुन झाली तसे ते त्रिशूळ जोरजोरात हलू लागले. अक्षरश: घुमल्यासारखे गदागदा हलू लागले. सगळे नातवाईक माझ्याकडे, त्रिशूळाकडे बघत होते. मी त्रिशूळाच्या समोर हात जोडून डोळे मिटून बसले होते. देवळातल्या पुजारी काकांनी सांगितले, ‘आईंनी तुमची ओटी मान्य केली. आईना खूप आनंद झाला आहे.’ त्यावेळेच्या माझ्या मनातील प्रसन्न भावना शब्दांत सांगणे केवळ अशक्य! अवर्णनिय! मग मी तेथे बसून सावलीचे वाचन केले.
तेथील देवकार्य आटोपल्यावर आम्ही घरी परत आलो. तेव्हा आलेला अनुभव तर अंगावर रोमांच उभे रहातील असाच आहे. ती एक अनुभूती होती ! ज्याची त्यानी अनुभवण्याची! पण सांगण्याचा प्रयत्न करते.
आम्ही परत येताना सुटी असल्याने माझी मुलगी आजी आजोबांबरोबर त्यांच्याकडे गेली. मिस्टरांची काही दिवसांपूर्वीच एक महिन्यासाठी अहमदाबादला बदली झाली असल्याने तेही नव्हते. घरात मी आणि सासूबाई दोघीच, त्या त्यांच्या खोलीमध्ये झोपल्या होत्या. मी नेहमीप्रमाणेच रात्री झोपायच्या आधी ‘सावली’ मधील एक अध्याय वाचला. दुसरा अध्याय, मी तेव्हा माझ्या बेडच्या वरच्या बाजुला आईचा फोटो आणि पोथी ठेवत असल्याने वाचून झाल्यावर पोथी स्थानावर ठेवली आणि बेडवर येऊन आडवी झाले. मला कधी झोप लागली कळलेच नाही. आणि अचानक खडबडून जाग आली. जागी झाल्यावर कारण लक्षात आले. साऱ्या खोलीभर चंदन, धूप, कापूर मिश्रीत सुवास दरवळत होता. मी घड्याळात बघितले. तीन वाजायला आले होते. म्हणजे तो अडीच तीनच्या मधला सुमार होता. मला प्रश्न पडला इतक्या रात्री कोण पूजा करत असेल किंवा कोणी अगरबत्ती लावली असेल? पण वेळ पहात असे असण्याची काही शक्यताच नव्हती. मग मी वापरत असलेला पावडरचा डबा, तेलाची बाटली तपासून बघितली, कशातून काही सांडले तर नाही नं ते पाहिले. त्या डब्यावर आणि बाटलीवर काय लिहीले आहे ते वाचून बघितले, कशामध्यो चंदन, धूप, कापूर यांपैकी काही जिन्नस आहेत का ते पाहिले. पण असेकाहीच नव्हते. मग मात्र मला जरा भिती वाटली. पण ती भिती क्षणभरच टिकली. माझ्या लक्षात आले,सुगंध आईच्या फोटोनजीक जास्त तीव्र आहे व बाकी ठिकाणी मंद स्वरूपात पसरला आहे. मग मी श्री जानकी आईच्या फोटोसमोर हात जोडून उभी राहिले. अशीच माझ्यावर, माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी असूदे अशी प्रार्थना केली. मला अश्रू आवरत नव्हते, प्रार्थना करून मी पुन्हा आडवी झाले. माझ्या हाताला जवळजवळ दहा-पंधरा मिनीटे चंदनाचा वास येत होता. त्या वासाच्या मंद लहरींवर मला शांत झोप लागली. सकाळी उठल्यावर मी पुन्हापुन्हा वास घेऊन बघत होते. पण ना माझ्या हाताला ना खोलीमध्ये कोठेच वास नव्हता.
मी घाईनी माझ्या गुरु-सखीला फोन करुन घडला प्रसंग कथन केला. तिने सांगितले, “अगं पहिल्या प्रहरी आई तुझ्याकडे येऊन गेली.” हे ऐकून मी धन्य झाले.
ही अनुभूती शब्दांत पकडणे खरेच खूप अवघड होते. पण शक्य तितक्या समर्पक शब्दांत गुंफण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यानंतर अनेकदा पोथी वाचतान हा गंध दरवळू लागला. जो आजुनही कधीकधी, बरेचदा रेकी चा सेमिनार घेताना दरवळतो.
त्यानंतर फिटनेस क्षेत्रामध्ये यश मिळालेच पण सध्या तिने माझ्यासाठी एक नवीन क्षेत्र खुले केले आहे. म्हणजे मध्यंतरी माझ्या थोड्या तब्येतीच्या तक्रारी उद्भवल्या. भोग का कोणाचे सुटले आहेत! आपण पोथीमध्ये वाचतोच, भोग तर तिचेही सुटले नव्हते, मग आपण कोण! पण ते भोग भोगण्याचे प्रचंड बळही तिनेच दिले आणि मोठ्या आजारातूनही तिनेच वाचवले. आजारपणामुळे फिटनेसचे क्षेत्र माझ्यासाठी बंद झाले खरे पण लगेच नवीन लिखाणाचे क्षेत्र माझ्यासाठी खुले करून दिले. तिच्याच कृपेनी सुचू लागले, लिखाण करु लागले आणि एक पुस्तकही प्रकाशित झाले. याही क्षेत्रामध्ये ती मला भरगोस यश देणार याची खात्रीच आहे.
आई, माझ्यावर, माझ्या कुटुंबावर तुझ्या मायेची सावली अशीच चिरकाल राहू दे हीच तुझ्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना.
।। जय जानकी दुर्गेश्वरी ।।
सौ. सोनाली केतन दिघे
मो ९८४९५१३५०६ (कल्याण)
Sonali madam….its very very heart touching….i got goosebumps….tumhala majha namaskar…ashirvad asava
आपला अभिप्राय वाचून आनंद झाला. ह्या वेबसाईटवर श्री मधुकर सुळे यांचे विविध साहित्य आहे. त्याचाही लाभ घ्यावा. व आपला अभिप्राय देऊन आम्हाला प्रोत्साहित करावे. 🙏 राजन सुळे