
॥ जय जानकी दुर्गेश्वरी ॥
१९८५ साली माझे लग्न श्रीयुत मधुकर सुळे यांचा मुलगा रविंद्रशी झाले आणि मला “सावली’ मिळाली. जमेल तसे मी सावली, जानकी बावनी वाचत असे. जशी जशी मी सावली वाचत गेले, माझी जनकीआई वरील श्रद्धा वाढत गेली. माझ्या प्रत्येक अडी अडचणीत व वेळोप्रसंगी प्रत्येक क्षणी आई आपल्या बरोबर आहे व तिची प्रचंड कृपा आपल्यावर आहे असे भासत गेले. पावलो पावली तिच्या अस्तित्वाची प्रचिती येणारे अनुभव येऊ लागले. त्या अनेक अनुभवांपैकी येथे मी माझा एक अनुभव आपल्या पुढ्यात ठेवते.
१९९५ साली च्या नवरात्रीतल्या ललीता पंचमी ची ही गोष्ट. संध्यानगरला सौ. कुसुमताईं कडे जाऊन जानकीआईची ओटी भरून आले. रात्री माझा मुलगा (चि. अमोल) वय वर्ष ८ यास ब्रोन्काईटीसचा मोठा अॅटॅक आला होता. रात्री ९.३० च्या सुमारास त्याला खुपच त्रास होत होता. त्याच्या श्वासांचा आवाज समुद्राच्या लाटांसारखा येत होता. तो खुप बचैन होता. त्याला झोप लागत नव्हती. डॉक्टरकडे जावे म्हटले तर डॉक्टर Immediate Relief साठी इन्जेक्शन देतील व उद्या परत तसेच मी तशीच त्याला जवळ घेऊन काळजी करत बसले होते. नकळतच उठले, देव्हाऱ्यात ठेवलेली “सावली” घेऊन आले. त्याच्या जवळ बसुन एखादा अध्याय वाचावा ज्याने तो झोपु शकेल असा विचार करून जानकीआईस नमस्कार करून वाचायची सुरवात केली. आश्चर्य म्हणजे अध्याय संपता संपता अमोल माझ्या मांडीवर डोके ठेवून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. म्हणुन दुसरा अध्याय वाचू लागले, त्याला शांत झोप लागली मी वाचनाच्या धुंदीत एकानंतर एक अध्याय वाचत गेले आणि “सावली” चे सगळे अध्याय पूर्ण वाचुन झाले. घड्याळात रात्रीचा एक वाजला होता. अमोल एकदम जागा झाला आणि त्याला भहभडून उल्टी झाली आणि तो एकदम स्वस्थ झाला. आम्ही दोघेही झोपलो. सकाळी नित्य नियमाप्रमाणे उठुन शाळेत गेला, जसे काल काहीच घडले नाही. तो एकदम बरा झाला, आईची केवढी प्रचंड कृपा.
अशी ही भक्तवत्सल आईची वाङ्मय मूर्ति आम्हा सामान्य लोकांपर्यंत पोचवल्याल बद्दल मी ति. पप्पा म्हणजेच माझे पिता तुल्य श्वशुरांची अत्यंत ऋणी आहे. तसेच हा उपक्रम करून “सावली’च्या माध्यमाने श्री जानकीआईच्या अनुभवाचा अमृत कलश भक्तगणांच्या ओटीत घातल्या बद्दल ति. दादा म्हणजेच माझे जेष्ठ दिर यांना माझा मन:पूर्वक नमस्कार.
“जय जानकी दुर्गेश्वरी”
सौ.ऋचा रविंद्र सुळे (बडोदे)