
॥जय जानकी दुर्गेश्वरी॥
सर्वप्रथम मी सावलीचे लेखक श्री मधुकर सुळे म्हणजेच माझे मामा ह्यांचे आभार मानते कारण त्यांच्यामुळेच तर आपल्या सर्वांना ‘जानकीआई’ मिळाली. तिच्या “सावली” खाली आलो आणि आयुष्याला एक “विसावा” मिळाला. आयुष्यात संसाराला कुठेही भरकटु न देता आमचा संसार सुखाचा केला. त्यामुळे प. पूज्य मामा व अखंड सौ. नंदामामीला विसरून कसे चालेल? त्यांना माझा त्रिवार साष्टांग नमस्कार.
शाळेत असताना “आई” ह्या विषयावर कितीतरी वेळा निबंध लिहिलाय, पण आज जानकी आई विषयी लिहिण म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे आहे. कारण हि तर विश्वाची जगन्माता आहे.
तू साऱ्या विश्वाची आई।
मी एक संसारी बाई ।
तुझ्यामुखी ओव्या सतत ।
मला एक ओवीहि न सुचत ।।
अशी काहीतरी परिस्थिती झाली आहे. तिच्याविषयी कितीही लिहिलं तरी कमीच आहे. शेवटी तिलाच म्हटलं आई तूच माझ्याकडून लिहून घे. तिने सुचविले तसे लिहिलं.
आमच्या घरी रोज सावलीच वाचन होते आणि आईची मानसपूजा. मानसपूजा म्हणताना तर आई समोर बसून सर्व करून घेते असच वाटतं. आमच्या घरांत हॉलमध्ये मुख्य प्रवेशद्वारासमोर आईचा फोटो ठेवला आहे. घरी येणाऱ्या प्रत्येकावर आईची नजर पडावी असे आम्हाला वाटते. वाईट शक्तिला आई घरांत प्रवेशच देणार नाही हे आम्हांला पक्क माहित आहे.
पदोपदी आईचे अनुभव आम्हाला येतच असतात. मला माझ्या मुलाच्या (यतिनच्या) लग्नात आलेला अनुभव इथे सांगावासा वाटतो. मला कित्येक वर्षे झाले सिनियर Osteoporosis व Collities चा त्रास आहे. खाल्लेल अन्न पचत नाही त्यामुळे अंगात ताकद येत नाही. तसच Thyroid चा पण त्रास आहे. या सर्वांमुळे रोजच्या हालचालींवर बरीच बंधन आलेली होती. अर्ध्यातासापेक्षा जास्त बसू शकत नव्हते किंवा फिरु शकत नव्हते. अशा परिस्थिती यतिनचे लग्न करायचे म्हणजे??? विचार पण करता येत नव्हता. पण एकुलता एक मुलगा आणि लग्नतर व्यवस्थित करायची इच्छा होती मग काय! हक्काच्या आईजवळ हट्टच केला, “आई मला ताकद दे माझ्या कडून सर्व काही करून घे.’ तिच्यावर सर्व भार व चिंता टाकून मी निश्चिंत झाले आणि लग्नाच्या तयारीला नव्या जोमाने लागले. लक्ष्मीरोडवर फिरून फिरून लग्नाची सर्व खरेदी केली. सुनेचे दागिने, कपडेलत्ते सर्व खरेदी अगदी मनासारखी केली. आमंत्रणे झाली. वाटल चला एक टप्पा पार पडला!
लग्नाला आठ दिवस राहिले असताना माझ्या जाऊबाईंचा फोन आला दिरांना (ह्यांच्या मोठ्या भावाला) हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे, परिस्थिती चिंताजनक आहे. आईला म्हटल ‘आई आता हे काय नवीन संकट? ईतकी सगळी तयारी करून घेतली आणि आता काय होणार? आतापर्यंत जशी साथ दिली तशी आताही दे. दिराना बरं वाटू दे. लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. आईने हाक ऐकली आणि दिरांना बर वाटल आणि ते लग्नालापण उपस्थित राहिले. लग्नाचा दिवस आला नातेवाईक आले प.पू. मामा, मामीची उपस्थिती होतीच. त्यांचा मोठ्ठा आधार होता आम्हाला. पाच दिवस लग्नाचा कार्यक्रम चालला होता. हळदीचा कार्यक्रम, सवाष्णपूजन, लग्न, सत्यनारायण आणि एकविरेला तिखटाचा नैवेद्य. सर्व अगदी व्यवस्थित पार पडले. सर्व कार्यक्रम झाल्यावर मामांनी जवळ बोलावून सांगितले. लग्नात अडचर येणार होती पण आईच्या कृपेने सर्व नीट झाले. तिचेच आभार माना. आम्ही उभयतांनी आईसमोर लोटांगण घातले आणि आईचे आभार मानले.
अशीच आई पाठीशी धावून आली ती माझ्या परदेशी दौऱ्याच्या वेळेस. माझ्या सुनेचे बाळंतपण करायला अमेरिकेला जायचे होत. तिथे सगळी काम स्वत:लाच करावी लागतात. आपल्याकडे सगळ्या कामांना बायका मिळतात पण तिथे तस नाही. इथे आमचा दोघांचा स्वयंपाक करताना मला त्रास व्हायचा तर तिथे कसे होणार? नातवाला बघायचा आनंद होणार होताच पण जबाबादारी पार पाडू शकू का? याची काळजी पण होती. द्विधा मनस्थिती झाली होती. कोणाला सांगणार? शेवटी आपण आपल्या आईलाच सांगतो न! मी जानकीआईजवळ धाव घेतली. सर्व काळजी तिच्यापुढे व्यक्त केली म्हणाले, “आई माझी लाज राख, माझ्या हातून सर्व व्यवस्थित होऊ दे.” आश्चर्य म्हणजे अमेरिकेत गेल्याबरोबर दुसऱ्या दिवसापासून मी स्वयंपाक घराचा ताबा घेतला. सकाळी मुलाचा डबा, आमचा – सुनेचा ब्रेकफास्ट आणि स्वयंपाक सर्व करू लागले. इथे ४ चपात्या लाटल्या की पाठ दुखायची तिथे १५-२० चपात्या रोज करायची. इतकच काय तर बाळाला खेळवणं मॉलमध्ये फिरण सगळ काही आनंदाने केल. एवढ करून सुद्धा मला शारिरीक त्रास झाला नाही. ३ महिने राहून आम्ही परत आलो आईनेच माझ्याकडून सर्व काही करून घेतले व माझी लाज राखली. अशी ही माझी जानकीआई आमच्या प्रत्येक अडचणीला धावून येते.
जेंव्हापासून सावली आम्ही वाचतो आम्हांला विश्वास आहे की आई दिसत नसली तरी ती सतत सावलीसारखी आपल्या पाठीशी आहे. आपल्या नशिबात जे भोग लिहिलेले आहे त्यातून सुटका नाही. पण आई त्याची तीव्रता कमी करते. आलेल्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. जानकी आईने गरीब कुटुंबात जन्म घेऊन जी संकटे सोसली, जे आयुष्य ती जगली त्यामानाने आपण खूपच सुखी आहोत. तिच्या चरणी एकच मागणी आहे. अशीच आमच्या पाठीशी सदैव रहा, सन्मती दे, तुझी सेवा करायची बुद्धि दे.
सदैव भक्तांच्या हाकेला धावली
जशी भक्ती तशी पावली
अखंड राहो तुझी सावली
जय जय जानकी माऊली ।।
सौ.रंजना योगिराज चौबळ
मो. ९८८१४६६४५४ (पुणे)