
‘श्री कालीकाई जानकी आई’
तृतीय पारितोषिक
“सावली” शब्दाचा अर्थ किती सुंदर आहे. अर्थच शोधायला गेलो तर एका डेरेदार वृक्षाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. घनदाट पसरलेला पाना-फांद्यांचा पसारा, त्यावर आश्रय घेऊन घरटे बांधून राहणारे छोटे मोठे पक्षी, उंदीर, घुशी, खारी, ससे अशा अनेक प्राण्यांनी वसवलेली वृक्षाभोवतालची वसाहत, झाडाला असणाऱ्या ढोली मध्ये वसती करुन लपलेला नाग, सावलीत निवांत पणे रवंथ करत बसलेली गुरे, ढोरे तसेच कुत्रे वा तत्सम प्राणी, पांथस्थ, वाटसरु कुठलीही आशंका किंवा अविश्वास न बाळगता विसावलेले!!! असे निसर्ग चित्र पाहतांना, निसर्गातील ही करामत पाहतांना, खरेतर मन व्याकुळ होते. कशामुळे ते कळत नाही पण, असेच माझे काहीसे माझे सावली पोथीच्या प्रथम आवृत्ती-वरील मुखपृष्ठावरील चित्र पाहील्यावर झाले. निरभ्र मोकळे आकाश व त्या आकाशात पंख पसरुन उडणारा पक्षी, जो आपल्या पंखाखाली सर्व जग सामावुन घेऊ शकेल इतका आत्मविश्वास!!! चित्रकाराच्या कल्पनाशक्तीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे पण पोथीचे वाचन करण्यापुर्वीच या चरीत्र वाचनाने आपल्याला काहीतरी नक्कीच सापडेल अशी खात्री झाली.
सावली पोथी आपल्याला जानकी आईचे (सरवातीला ज्यांना बायजी म्हणून संबोधले जायचे त्यांचे) जीवन वृतांत सांगते. त्याचे सारे चरीत्रच आगळे-वेगळे!! आदीमातेनेच दुर्गाच्या रुपाने एका सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतला. लहानपणीच माय पित्याचे छत्र हारपल्यामुळे भावंडांची झालेली फारकत व आजोळी घ्यावा लागलेला आश्रय! ह्या सर्व घटना कोणाच्याही आयुष्यात घडू शकणान्या! आजोळही काही पालखी पदस्थ नाही तर कष्टकारी वर्गामध्येच मोडणारे. त्यामुळे कष्ट केले तरच पोटातल्या भूकेचा डोंब शमणार नाहीतर काहीच हाती न लागणारे!! त्यामुळे बालपणही खडतर परिस्थिती मध्येच हरवलेले!! प्रत्यक्षात ही परिस्थिती बदलण्याची शक्ती स्वाधीन असतांनाही बायजीनी मात्र प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेऊन आपल्यासारखेच सामान्य जीवन त्या जगल्या. यातच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होते! यातुनच त्यांनी सामान्य परिस्थितीमध्ये जन्माला आलेल्या आपल्यासारख्या सर्वांना प्राप्त परिस्थितीमध्ये आंनद कसा मानायचा याची ओळख करुन दिली. त्या काळातील पद्धतीनुसार जेव्हा त्या उपवर झाल्या तेव्हा आजोबांनी बिजवराशी लग्न लाऊन दिले व आपली जबाबदारी पार पाडली. अतिशय उग्र रागीट स्वभावाच्या माणसा बरोबर आयुष्य काढायचे म्हणजे एक प्रकारे अग्नीपरीक्षाच. ती पण त्यांनी शांतपणे आणि आयुष्यभर दिली. अगदीच जेव्हा गळ्याला तात बसु लागली तेव्हा मात्र त्यांनी आपल्या मुळ स्वरुपाची चुणुक आपल्या पतिदेवांना दाखवुन दिली. त्यानी जसे माणसावर प्रेम केले तसेच सर्व प्राणीमात्रांवर जीवापाड प्रेम केले व जे प्राणी परमेश्वरानी जन्मास घातले आहेत त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे हे ही आपल्या वर्तणुकीतून दाखवुन दिले!! पशु तसेच भुते खेते जे परलोकी जाऊन सद्गति मिळवण्यासाठी झगडत होते त्याना मोक्ष प्राप्त करून दिला व बाधित जागाही संरक्षित केल्या. प्राप्त झालेल्या परिस्थितीमध्ये संसाराची नड भागवण्यासाठी काही हलकी कामेही करावी लागली. त्याचे बक्षिस म्हणून लग्नघरी झालेला चोरीचा आरोप, पण तोही त्यांनी शांतपणे झेलला आणि त्याचे निराकरण करतांना लग्न मांडवात जमलेल्या सर्व व-हाड्यांना क्षणभरासाठी नखशिखांत दागिन्यांनी मढलेल्या देवीच्या रुपात दर्शन देऊन त्यांचे जीवन सार्थकी लावले. त्याक्षणी जरी त्यांनी आपल्या शक्तीची जाणीव लग्नमांडवातील व-हाड्यांना करून दिली असली तरीही ज्याने काही चूक केली नाही त्याने आलेल्या प्रसंगाने घाबरून न जाता त्याचा मुकाबला करावा हे ही त्यांनी आपल्या कृतीतुन दर्शविले!!!
समाजामध्ये चमत्कारशिवाय लोकांच्या विश्वासाला पात्र होऊ शकत नसल्याने त्यांनी अनेक चमत्कार केले. त्यामध्ये अनेकांची अंगभुत व्यंगे तसेच रोग बरे केले. पण हे करतांना त्यांनी सध्याच्या जमान्यात चालु असणारी बुवाबाजी किंवा जाहिरातबाजी केली नाही. त्यांनी आपल्या आचरणातुन देवावर निस्सिम श्रद्धा ठेवा व नीट विचार करून नंतरच त्यावर निर्णयाप्रत येऊन कृती करा हा विचार लोकांच्या मनामध्ये रुजविला. देवावर श्रद्धा असेल तर विचारान्ती ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मार्ग मिळू शकतो, पण देवावर श्रध्दा असावी लागते हे सत्य त्यांनी समाजामध्ये रूजविले.
महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी! केवढी मोठी संत परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पण या संतांचे जीवनही तावून सुलाखून निघाल्यानंतर समाजाने त्यांना संतपद बहाल केले. या संतांच्या अनेक गोष्टी, अनेक काव्ये, अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. पण त्यांचा काळ हा प्राचीन काळ होता. त्यामुळे त्यांच्या काव्याची भाषा ही कठीण आहे. समजायला क्लिष्ट असल्याने त्याचे आकलन झटकन होत नाही. तसेच ही संत मंडळी १५व्या शतकापुर्विची. त्यामुळे त्यांच्या कथा या ऐकीव कथा या वर्गात मोडणाऱ्या पण जानकीआई ह्या आपल्या काळातल्या संत. त्यांना भेटलेली त्यांची भक्त मंडळी आपल्याला भेटू शकतात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवरून जानकीआईंचे वागणे-बोलणे किती साधे होते ते सहजच कळुन येते. संतांनी निर्माण केलेले वाङमयातील तत्वज्ञान हे आधुनिक काळासाठीही मार्गदर्शक तत्त्वे म्हणून उपयोगात येतात. तसेच जानकी आईचे आचरण हे समाजाच्या आजच्या परिस्थितीमध्ये भानावर राहून आपले आचरण कसे असावे, स्थितप्रज्ञ राहून देवावर श्रद्धा ठेऊन सबुरीने निर्णय कसा घ्यावा हे शिकवते.
सावली पोथी वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये जे गोंधळ निर्माण झाले होते ते हळू हळू शांत होत गेले व त्यावेळेस निर्माण झालेल्या प्रश्नावर मी शांत पणे विचार करु लागले व त्यातुनच प्रश्नाचा तिढा उलगडत गेला. सावली पोथीने हा आत्मविश्वास दिला. त्याचप्रमाणे सावली पोथीवरील पंख पसरुन झेप घेणाऱ्या पक्षाच्या आधाराने मी जानकी आईवर माझे मन सोपवून निश्चिंत झाले!!!
सौ. निलीमा पी. गुप्ते (मुंबई)