
॥जय जानकी दुर्गेश्वरी ॥
द्वितीय पारितोषिक
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
जानकी आई मायेची अपार सावली… कठीण प्रसंगी पीठीशी खंबीरपणे उभी राहणारी माय माऊली… माझ्या जीवनी ती प्रवेशली ती अशाच एका अतिकठीण प्रसंगी. माझ्या मुलीच्या आजारपणात मी अगदी निराश झाले होते. अशाचवेळी मला माझ्या नणदेने बडोद्याहून जानकी आईचा फोटो, पोथी व कुंकू प्रसाद म्हणून पाठवला. त्यांनी जानकी आईला नवस केला होता. मी पोथीचे नित्य वाचन करू लागले आणि काय चमत्कार माझी मुलगी जाता जाता माझ्या हाती लागली. त्या क्षणापासून जानकी आई माझा श्वासच बनून राहिली.
मग मी दिवसभरात अगदी सहजपणे बऱ्याच गोष्टी तिच्याशी बोलू लागले आणि कठीण प्रसंगातून मार्ग निघत गेले. एके दिवशी काम करता करता माझी मुलगी माझ्या जवळ आली आणि तिने मला जानकी आईच्या तसबीरीतून वहात असलेले कुंकू दाखवले. अगदी कुंकू, हळद आणि कुंकू अशा तीन धारा वहात होत्या आणि पसाभर कुंकू तिथे जमले होते. असा हा जानकी आईचा प्रसादरूपी आशीर्वाद आजही लाभतो. मी ही कोणतेही शुभकार्य असो अथवा प्रवास असो, जानकी आईचा मानाचा नारळ काढून ठेवते. आणि तिला सोबत राहण्याचे आवाहन करते. ती माझ्या सोबत असण्याची काही उदाहरणे मी पुढे कथिली आहेत.
मला कडापकरणींचं (आमची कुलदेवता) लहानपणापासून अतिशय वेड. आम्ही दर दोन वर्षांनी कडाप्याला जायचो. जानकी आईची महती कळल्यावर आम्ही गावासही भेट देऊ लागलो. एकदा आम्ही माझ्या भाचीच्या लग्नाच्या देवकार्यासाठी कडाप्याला गेलो होतो. तिथुन पुढे मालुस्ते गावास जाण्याचाही बेत होता. पुढे आमची गाडी आणि मागे इतर कुटुंबियांच्या चार पाच गाड्या. अचानक आम्ही अशा वळणावर आलो तिथे आम्हास मार्गदर्शन करणारे कोणीहि नव्हते. पुठील, प्रवासाच्या काळजीत असतानाच माझ्या मुलीला एक हिरवीगार साडी नेसलेली, हातात हिरवा चुडा, कपाळावर ठसठशीत कुंकू आणि नाकात मोठी नथ असलेली बाई दिसली. तिच्याकडे मालुस्ते गावाविषयी विचारणा केली असता डोंगराच्या बाजूने जाण्यास सांगितले अन्यथा रस्ता चुकाल असेही सुचित केले. तितक्यात मागील गाड्या आमच्यापर्यंत पोहोचल्य. त्यांनी आम्हाला रस्त्यात थांबण्याचे कारण विचारले असता आम्ही त्या बाईबद्दल त्यांना सांगितले. पण काय आश्चर्य ती बाई कोणालाच दिसली नाही. मला कळून चुकले की ती तर माझी जानकी आई होती. तिला मनोभावे वंदन करून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.
मला अस्थमाचे दुखणे असल्याने त्यावर सतत उपचार चालू होते. अशातच एकदा डॉक्टरांनी माझा अस्थमा बळावला असताना चुकीच्या पद्धतीने मला इंजेक्शन दिले आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे माझ्या पायावर मोठी गाठ निर्माण झाली. ती इतकी झाली की त्वरित ऑपरेशन करून घ्यावे लागले. जखम खोल होती आणि रोज त्यावर मलमपट्टी करावी लागत असे. ती डॉक्टरांनीच करावी असा आग्रह होता कारण त्यासाठी स्वच्छतेची आणि अतिदक्षतेची गरज होती. आम्ही विचारात पडलो. रोज घरी कोणता डॉक्टर मलमपट्टी करेल आणि जरी केली तरी त्याचा मोबदला आपल्याला कसा परवडेल? अशावेळी एक परिचारिका स्वत:हून पुढे आली. ती घरी येऊन मलमपट्टी करून जायची. त्याचा मोबदला तिला देऊ केला असता मी एकदमच घेऊन जाईन असं म्हणत टाळत राहिली. सहा महिने झाले जखम बरी झाली आणि त्या परिचारिकेचे घरी येणे बंद झाले. आम्ही तिचा खूप शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही. शेवटी आम्हास कळून चुकले की हा तर आम्हाला लाभलेला आईचा सहवास.
पुढील अनुभव म्हणजे मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या. मी आणि माझी मुलं जानकी आईच्या पोथीचे वाचन करत होतो. शेवटचा अध्याय चालू होता. नेवैद्याचे सुग्रास भोजन तयार होते. तितक्यात लक्षात आलं की माझ्या यजमानांचं अर्धशरीर जड होऊ लागलं आहे. त्यांना त्यांच्या शरीराचा भार पेलवेनासा झाला, तोंड वाकडं झालं, शेजारच्यांच्या मदतीने आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले की त्यांना अर्धागवायुचा झटका आला आहे आणि तब्येतीच्या सुधारणेसाठी सहा महिने लागतील. तत्क्षणी मी जानकी आईस नवस केला की माझ्यावरील संकटास सामोरे जाण्यास व त्यामधून सुखरूपपणे बाहेर पडण्यास मदत कर आणि तुझ्या दर्शनासाठी गणदेवीस माझ्या यजमानांबरोबर येईन. मोठ्या हिमतीने मी त्यांची सेवा करू लागले आणि पुन्हा एकदा चमत्कार झाला. महिन्याभरातच माझे यजमान घरात चालू फिरू लागले व तीन महिन्यांच्या आत ते नोकरीवर रूजु झाले. तत्पूर्वी मी माझ्या यजमानांना घेऊन गणदेवीला गेले व नवसपूर्ण केला.
मी माझ्या घरी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा करते. ह्या दोन्ही उत्सवातील लक्षात राहण्याजोगे प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छिते. गणेशोत्सवातील प्रसंग असा की घरात दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकासाठी भोजनाची व्यवस्था केली होती. अशातच दहा ते बारा पाहुणे अचानक घरी आले. पाहुण्यांचा अंदाज चुकला आणि जेवण कमी पडते की काय या भीतीने अंगावर काटा उभा राहिला. मनात जानकी आईचा धावा सुरु केला आणि पातेल्यावर झाकण ठेवले. आलेल्या प्रत्येक पाहण्याला जेवणाचा आग्रह करत गेले आणि वाढत गेले. सगळे पाहुणे अगदी संतुष्ट होऊन गेले आणि माझा उत्साह द्विगुणित झाला.
नवरात्रीत पूर्वी मी नुसतेच फोटोची स्थापना करून पुजा करत असे. मात्र एकदा नवरात्रीपूर्वी दोन दिवस आधी जानकी आईने मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला व घट बसवून पूजा करण्यास सांगितले. अशाच एका नवरात्रातील तिसरी माळ. घारात नेवैद्याचा स्वयंपाक सुरू होता आणि काही ध्यानीमनी नसताना माझ्या यजमानांच्या छातीत दुखू लागलं. त्याक्षणी माझ्या मुलीने क्षणाचाही विलंब नकरता त्यांना रुग्णालयात दाखल केले. तिने तिथल्या ECG कर्मचाऱ्यांना काढण्यास सुचित केले. तिच्या अंगी चण्डीकाच संचारली होती. तिच्या या वागण्याने सारेच अवाक झाले होते. मग कळाले की माझ्या यजमानांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला होता. डॉक्टरांनी देखील कबुल केले की त्यांना दाखल करण्यास उशीर झाला असता तर विपरीत घडले असते. अशी ही प्रेमरूपी सावली पुन्हा मदतीला आली.
माझ्या मुलीच्या लग्नानंतर मी तिच्या घरीही जानकी आईची स्थापना करून घेतली. असच दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडली आणि काही काळाने परतली पाहते तर काय ! इमारतीखाली पोलिसांची गाडी तिला इतकेच कळाले की तिच्या मजल्यावर चोरी झाली. धावत वर येता साश्चर्यान पाहतच बसली. तिच्या आजु-बाजुची तिन्ही घरं चोरांनी फोडलेली होती. वास्तविक पाहता तिच्या घरात सगळं सोनंनाणं आणि रोख रक्कम होती. अशी ही माऊली केवळ माझ्याच नव्हे माझ्या मुलांच्याही पाठीशी उभी आहे.
मी दर दुर्गाष्टमीला जानकी आईची संपूर्ण पोथी वाचायचे आणि तिला साकडं घालायचे की माझी नातवंड तुझा कृपाप्रसाद असू देत आणि त्याची ओळख म्हणून त्यांचा जन्म दुर्गाष्टमीला होऊ देत आणि होय माझी तिन्ही नातवंड दुर्गाष्टमीची आहेत.
आज माझ्या घरी मी तिची मूर्तिरूपे स्थापना केली आहे. ही मूर्ती आम्ही गणदेवीस नेली होती. ती संगीत सावली सिडी प्रकाशनाच्या निमित्ताने तिथे आम्ही परमपूज्य श्री. मधुदादा सुळेंना भेटलो. मी त्यांना मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची विनंती केली असता ते हसले आणि म्हणाले की त्याची गरज नाही. मूर्तीत श्वास चालू आहे. अशी ही माझी जानकी आई मूर्तीरूपे माझ्या घरी स्थित आहे.
मला खरंच मधुदादा सुळेंचे आभार मानायचे आहेत. कारण त्यांच्यामुळेच जानकी आई आम्हाला कळली आणि तिचं प्रेम, तिची माया, तिचा आशिर्वाद आम्हाला आयुष्यभरासाठी लाभला.
सौ. नयना विलास देशमुख
मो. ९८१९४१२९७२ (डोंबिवली)