Sawali Saurabh
Sawali Saurabh

॥ जय जानकी आई प्रसन्न ॥

              गेली काही वर्षे माझे मिस्टर अशोक कारखानीस गुडघेदुखीमुळे त्रस्त होते. त्यांना चालणे त्रासदायक झाले होते. सुरवातीला “क्युअरऑन’ तेल गुडघ्याला लावले. काही दिवस बर वाटल. पण काही दिवसानंतर परत त्रास सुरु झाला. ‘ऑर्थो’ नावाचे तेल कुणी लावायला सांगितले ते लावले. काही दिवस बर वाटल पण नंतर परत त्रास सुरु झाला. एका वैद्याने काही गोळ्या दिल्या आणि रोज १० मिनीटे दोन्ही पायाच्या गुडघ्याला एक पट्टा बांधायचा, इलेक्ट्रीक करंट सुरु करायचा हा उपाय महिनाभर केला. प्रत्येक सीटींगला ते १००/- रुपये घेत असत. औषधाचे वेगळे पैसे. पण काही फायदा झाला नाही. आळशीचे पाणी सकाळी उपाशीपोटी ६ महिने पीत असत पण फायदा तात पुरता होत होता. हळुहळु दुखणे वाढत चालले होते. घरात चालण्यासाठी काठी आणली. काठी घेऊनच चालावे लागत असे. दुबईला मुलाकडे सचिनकडे गेलो तर मुंबई विमानतळावर आणि दुबई विमानतळावर व्हील चेअर वर बसवून प्रवास करावा लागायचा, दुबईला कुठल्या मॉल मध्ये गेलो तरी ह्यांना एका जागेवर बसवून ठेवावे लागायचे.

             भारतामधे सुद्धा बडोद्याला गेले तर ‘भाचे मंडळी’ व्हील चेअर अरेंज करायचे. रेल्वेस्टेशन मुंबई आणि बडोदा व्हील चेअर लागायचीच. पलंगावर झोपणे आणि ज्याच्याकडे कमोडची सोय असेल त्यांच्याचकडेच जाणे व्हायचे.

           शेवटी ऑर्थोपेडीक डॉक्टरकडे गेलो. त्यांनी XRAY वगैरे काढाला आणि ऑपरेशन हाच उपाय आहे म्हणून सांगितल. दोन्ही गुडघ्यांचे (KNEE REPLACEMENT) नी रीप्लेसमेन्ट करावे लागेल असे सांगितले.

            निरनिराळ्या ठीकाणी शोध घेतल्यानंतर असें कळले की पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटल मधे डॉ. हेमंत वाकणकर हे ‘नी रीप्लेसमेंट’ चे ऑपरेशन करतात आणि ऑपरेशन १००% शंभर टक्के यशस्वी होते असे अनेकांनी सांगितले. म्हणून एप्रिल २०१६ ला त्यांची अपॉईंटमेंट घेतली. त्यांच्याकडे प्रचंड गर्दी असल्यामुळे ऑपरेशनची तारीख ११ ऑक्टोबर २०१७ ची मिळाली. माझे दीर अण्णासाहेब (अरुण कारखानीस) पुण्यातच असतात, त्यांच्या मुलाकडे सूजीतकडे राहण्याचे ठरले. ११ ऑक्टोबर डॉ. वाकणकरांनी ह्यांच्या दोनही गुडघ्यांचे ऑपरेशन केले.

          ऑपरेशन नंतर ५ दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागते. साधारण तिसऱ्या दिवशी ‘पेशंट’ उभा राहतो. वॉकरच्या साहाय्याने चालतो. पण ह्यांचे उभे राहणे, चालणे दूरच पाय टेकवणे सुद्धा ह्यांना अशक्य झाले. कुशीवर वळणे, पाय हालवणे वगैरे साठी माझी किंवा सचिन, राहूल ची मदत घ्यावी लागायची. डॉक्टर म्हणायचे उभे राहा, वॉकरच्या मदतीने चाला. पण ह्यांच्यासाठी हे सर्व अशक्य झाले होते. हे फारच नर्व्हस झाले. मला म्हणाले माझे ऑपरेशन “फेल’ झाल. मी आता कायमचा अपंग झालो. मला म्हणाले ऑपरेशन केल नसत तर बर झाल असत. कमीतकमी घरातल्या घरात काठीच्या आधाराने का होईना चालू शकत होतो. बिछान्यावर पडल्यावर घरी जरी स्वत:च्या हाताने पायाने चादर अॅडजेस्ट करु शकत नव्हतो त्यासाठी कुणाचीतरी मदत लागायची. पण काठीच्या आधाराने घरातच चालू शकत होतो. आता मात्र मी कायमचा अपंग झालो. हे ऐकून मी घाबरले. तशी मी घाबरली होतीच. कारण ऑपरेशन नंतर ह्यांना बिछान्यावर कुणाच्या मदतीशिवाय हलणे अशक्य झाल होत, पाय टेकवणे दुरच. बर, ह्यांच्याबरोबरच ऑपरेशन झालेले ईतर पेशंट दोन दिवसात वॉकर घेऊन चालायला लागले होते. माझी मुलं सचिन, राहूल ही घाबरले होते.

             शेवटी मी जानकी आईंची पोथी वाचायला सुरवात केली. जानकीआईंना प्रार्थना केली की ह्यांना चालता येऊ दे. मी तुझ्या दर्शनाला ह्यांना गणदेवीला घेऊन येईन. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी हे उभे राह्यले. वॉकरच्या साहाय्याने चालू लागले. ही सगळी जानकी आईंची कृपा.

          काही दिवस फीजीओ थेरपी घेतल्यानंतर आता हे स्टीकच्या साहाय्याने आणि घरात स्टीकशिवाय चालतात. ३ महिन्यानंतर २९ जानेवारीला डॉक्टर वाकणकरांनी फॉलोअपसाठी बोलावले होते. तपासले, पाय उचलून बघीतला आणि सांगितले तुमचा पाय पुर्णपणे बरा झालाय. तुम्ही फीट आहात. फीजीयो थेरपी नको.

             ही सगळी जानकी आईंची कृपा. जानकी आईंना भक्ताने मनापासून श्रद्धेने हाक मारली तर त्या भक्तांसाठी धावुन येतात. मला तर अनेक कठीण प्रसंगी जानकी आईंनी संकटातून बाहेर काढले आहे. मी गेली अनेक वर्षे मधुन मधुन पोथी वाचते. बाईजी बावनी मात्र न चुकता रोज वाचते.

सौ. मृणाल अशोक कारखानीस (कांदिवली)

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *