
॥जय जानकी दुर्गेश्वरी॥
देवाला प्रत्येक ठिकाणी असणे शक्य नाही म्हणून देवाने आईची निर्मिती केली असावी. प्रत्येक आई ही देवा समान असते. पण जानकी आई देव समान नाही तर प्रत्यक्ष देवच होती. केवळ मानवी शरीरात असलेली देवता!
आता मानवी शरीर म्हटले तर शरीराला सलग्न असलेल्या व्याधी, उपाधी आल्याच. त्या जानकी आईला ही होत्या, पण त्या उपाधींचा पडदा बाजूला सारला तर दिसते ते तीचे भव्य, दिव्य स्वरूप, श्रीकृष्ण, श्री राम यांचे उदाहरण घ्या. त्यांना ही यातना, दुःख भोगावे लागले. संत सखू, मुक्ताई प्रमाणेच जानकी आईला ही दारिद्र्य, अपमान, दुःस्वास, काबाड कष्ट भोगावे लागले. लोकांची धुणी भांडी करून, लाकूड तोडी करून चणे कुरमुरे खाऊन तर कधी उपाशी दिवस काढावे लागत. तिच्या कडे अंगावर केवळ लाज राखण्यापुरते वस्त्र असे. शिंप्याच्या दुकानांत जाऊन चिंध्या गोळा करून ठिगळे झाकून केलेली चोळी जानकीला घालावी लागत होती. असे कंटकमय जीवन ही हरीची इच्छा मानून जानकी आई विनातक्रार शांतीने आणि निमूटपणे दैवाचे सर्व घाव सोसत राहायची. त्याचा कधी बाऊ, भांडवल, बहाणा केला नाही, ऊलट स्वत: दुःख-त्रास सोसून प्रसन्नपणे परपीडा दूर करणे हाच आपला कर्म समजून कल्याणमयी जानकी आई इतरांना सुखावत असे. सोशीकतेचा कळस म्हणजे जानकी आई. मी एक सामान्य व्यक्ती. आई इतकी मणभर सोशीकता मला कधी जमणार नाही. पण कठीण प्रसंगात तिच्यातली कणभर तरी सोशीकता माझ्यात आणायचा प्रयत्न करते.
आई फारशी शिकलेली नव्हती, पुस्तकी अथवा शालेय दृष्टीने अशिक्षितच म्हणावी लागेल. पण तिला अनेक भाषा येत असत. कुठले ही औपचारिक शिक्षण घेतलेले नसूनही जानकी आईला अनेक गरबे, गीते, ओव्या येत असत, आणि अगदी जाणकार गायका प्रमाणे मंत्र मुग्ध करणारी गीते जानकी आई गात असे. हा दैवी गुणच नाही का? या गुणांचा अहंकार, बडेजाव, देखावा जानकी आईने कुठेही केला नाही. मी आईकडून तेच शिकले.
जानकी आई अतिशय मायाळू होती. दुसऱ्याचे दुःख ती सहज समजून घेई, आपल्या पतीने त्यागलेल्या पहिल्या पत्नीला परत घरी आणण्याची विनंती अनेकदा आईने केली. आईने मृत नणंदेच्या मुलांचा प्रेमाने सांभाळ केला. तिचे कोपिष्ट पती गोठ्यातील गुराढोरांना मार देत असत. जानकी आई तोमार स्वत:च्या पाठीवर झेलत असे, आणि त्या मुक्या जनावरांच्या पाठीवर मायेने हात फिरवत असे. त्यांची गोठ्यात जाऊन नित्य सेवाच नाही तर पूजन करत असे. त्यांचे दूध-तूप केवळ स्वत:साठी न ठेवता गोरगरीब, बाळ बाळंतिणीला देऊन त्यांना तृप्त करीत असे. केवळ घरातील पाळीव प्राण्यांना नाही तर जखमी मणि-धारी नागाला ही जानकी आईने निडरपणे आपल्या मायेची ऊब दिली. त्याची सेवा करून त्याला अभयदान दिले. कुणावरही निस्वार्थी प्रेम कसे करावे ह्याची शिकवण बायजी आईने सर्वांना दिली.
आईला कसली भीती म्हणून नव्हतीच. अगदी लहान वयात सुद्धा मालुस्ते गावाच्या मालजाई ग्राम देवतेच्या शिवपिंडी समोर ठेवलेले दूध जानकी आई समोर प्रत्यक्ष भूजंग येऊन पिऊन गेला. तसेच गावाच्या सीमेवर असलेल्या आळूच्या वृक्षावर वावरणाऱ्या सर्पांना जानकी घाबरत नसे. ऊलट सर्पच जानकीला पाहून पळून जात आणि जानकी आळूची फळे तोडून आणून मुलांना वाटीत असे. आषाढ महिन्यातील भरपूर पाऊसामुळे आलेल्या बैंगणीया नदीच्या पूरात असंख्य सर्प वळवळत होते. घराबाहेर पडायला गावक-यांना भीती वाटली. तेव्हा जानकी आईने तीर्थ पाण्यात ओतून पूर शांत केला. परिसरातील सर्प रूपी भुतांचा स्वत:च्या कृपाप्रसादानें उद्धार केला आणि गावकऱ्यांना भयमुक्त केले. रानातील वाघ, सर्प आणि गोठ्यातील गाई म्हाशी, गावात गोंधळ घालणारा दणकट आडदंड, मस्तवाल झालेला देवीचा बैल हे सर्व आईच्या आज्ञेत होते. प्राणीच कशाला पंचमहाभूतांवरही आईचा अधिकार होता. आकाशातल्या चंचल विजेला खोळंबवण्याचे सामर्थ्य त्या ब्रह्मांडाच्या नायिकेलाच शक्य झाले. त्या किमयाकारी देवीला शतश: प्रणाम.
कुठल्याही देव देवतेला भूत, वर्तमान आणि भविष्याचे ज्ञान असते. जगज्जननी जानकी त्याला अपवाद कशी? राजपुतांची वस्ती, युद्धांत मारले गेलेले पूर्वज आणि सैनिक, त्याचे मृतात्मे, युद्धांत लूटून घरांत पुरलेली संपत्ती, खोल आत जमिनीत असलेली सर्प भुजंगांची वस्ती अश्या गत काळातील घटना, तर भक्तांच्या अंगावर येणारी वीट, नानाच्या पत्नीचा मृत्यु योग, स्वातंत्र्य पूर्व काळातील चळवळींचे परिणाम, टिळकांचा कारावास, बंदिवासात गौरवपर लेखन, गांधीची अहिंसा चळवळ, भारताचे स्वतंत्र्य आणि गांधी हत्या आणि स्वत:चे प्रयाण असे होऊ घातलेल्या घटानंची आई कडे नोंद त्या पूर्वीच होती.
जनसेवेचे व्रतच जानकीने घेतले होते. गणदेवी गावांत जेव्हा प्लेगची साथ आली आणि अनेक लोक मृत्युमुखी पडू लागले तेव्हा त्या कल्याणमयी जानकी ने सीमेवर पीठ टाकून भयंकर सांथीला सीमेवर रोखून ठेवले. गावात फिरून मृत उंदिरांना शोधून गोळा करून टाकले. तसेच लागण झालेल्यांना कबुतराची विष्टा स्वत:च्या हाताने लावून त्यांची सेवा केली. व्यक्तीश: किंवा सामुहिकरित्या आईने सर्वांवर माया केली. गुरे शिरलेल्या शेजारच्या शेताच्या मालकाचा अहंकार, सदाशिवाचा गैरसमज, दादांचा प्रचंड क्रोध भाबडे सुळे ह्या देवभक्ताला लुटणाऱ्या साधूचा ढोंगीपणा, ज्ञानाचा टेंबा मिरवणाऱ्या बब्बड रावांचा नास्तिक पणा, बाबूच्या वडिलांचे दारूचे व्यसन, दारुवाड्यातील घराच्या पूर्वीच्या मालकाचा हव्यास अश्या अनेक चूका माफ करून त्या सर्वांना उत्तम वागणुकीचे धडे दिले. त्यांना आत्मज्ञान देऊन भक्तिमार्गाला लावले. त्रिंबक राजेला नदीत बुडताना जिवदान, ताम्हणेंच्या मुलाच्या देवी रोगाचे निराकरण, घश्यात माश्याचा खवला अडकलेल्या कामगाराच्या वेदनांचे हरण, बाबूला दृष्टी, विद्रुप जन्मलेल्या मुलीचे रोग निवारण अश्या अनेकांना शारीरिक व्याधी मुक्त करून त्यांना पिडारहित केले.
कोनाड्यातून येणारे हजार भर नारळ, सुंदर पऱ्यांच्या सोबत झोके घेत दृश्य अदृश्य होत नखशिखान्त सुंदर दिसणारे ‘दुर्गा भवानी’ चे रूप, ओटीतून प्रसाद म्हणून येणारे कुंकू, उदबत्तीच्या धुरांत साईबाबांच्या शिरडीचे, धुनीचे, द्वारकामाईचे, बाबांचे दर्शन, कधी आरश्यात कृष्णलीला, गोपीसमावेत रासक्रीडा करणारा श्री हरी, चिचुंद्र्याची झालेली गुलाबाची फुलें, चिंबोऱ्यांची झालेली द्राक्षाएवढी तीन छोटीशी लिंगे, यातून श्रावण महिन्या पासून वाटीभर केशर मिश्रित निघणारे गोड तीर्थ, श्रावण सोमवारी बेलाच्या झाडाजवळ पानेंपाचोळा गोळा होऊन उभी राहिलेले शिवलिंग असे साक्षात देवदर्शन कुटुंबियांना देवप्रिया जानकीने घडवले.
काळी कांती, लांब लाल बाहेर डोकावणारी जीभ, डोक्यावर सुंदर मुकुट, सतेज शरीर, अष्टभुजा असलेली विश्वरूप महाकालिकेचे दर्शन, हातावर येऊन ठेपलेली शेंदुराची गणेशमूर्ती, आत्मा बदलून परकायेत प्रवेशलेल्या आत्म्याला मुक्ती, श्रीमंत लग्न घरात चोरीच्याआळे नंतर नखशिखांत सोने, रत्न माणिक, हिरे अलंकाराने सजलेले सुंदर रूप, आईने दिलेला सात वर्षांनंतर ही पाण्यासह आंतून ताजा राहिलेला नारळ, आंधळ्याला दृष्टी, गर्भाशय पुन्हा निर्माण करून देऊन झालेला पुत्र जन्म, धों धों वाहत अंगणा मधून येणारा गंगेच्या थंडगार प्रवाह आणि तिचे जमिनीत गुप्त होणे हे सर्व चमत्कार कुणा मानवाने केलेले नाही. ते होते देवी जगदंबा जानकी आईने सहज केलेले खेळ!
स्वत:च्या प्रयाणापूर्वी आणि नंतर ही निरंतर, निःस्वार्थ, निरपेक्ष भावनेने खरे तर जानकी आईने मायेची सावली सर्व लेकरांवर धरून भक्तांची सेवाच केली. आईचे छत्र आपल्या डोक्यावर नेहमीच आहे हे मला वेळोवेळी जाणवते. एखाद्या स्त्रिच्या भावना दुसऱ्या स्त्रिला सहज कळतात. त्यापेक्षाही तिच्या आईलाच त्या अधिक कळतात. म्हणूनच एखादे वेळी जे मी कुणाचकडे बोलू शकत नाही ते माझ्या मनातले सर्व काही मी जानकी आईला सांगते. मग मला तिचा आधार वाटतो आणि मनातून मोकळे आणि निश्चिंत वाटते. सुखदायिनी आई सर्व काही पाहून घेईल आणि प्रसंगातून सहज बाहेर काढेल याची खात्री वाटते. सर्व भकांना मनोवांच्छित सुख देण्यासाठी आणि त्यांच्या समाधानासाठी ती वरदायिनी सतत झटली आणि अजून ही ती आपल्या बरोबर आहेच. तिच्या ह्या प्रेमाची परत फेड कधी ही होणे शक्य नाही. तिचे अनंत उपकार आपल्या सर्वांवर आहे. तिचे नित्य स्मरण आणि तिच्या मार्गदर्शना प्रमाणे आपले जीवन प्रपंच आणि परमार्थ करून उद्धारणे हेच आपले कर्त्यव्य राहते. आपल्या लेकरांच्या मानवी जीवनाची अशी प्रगती झालेली पाहून आपली आई नक्कीच आनंदी होईल यात शंका नाही. तिचे आशिर्वाद आपल्या पाठीशी आहेतच. हे कार्य सिद्धीस न्यावे ही तिच्या चरणी प्रार्थना.
सौ. मीनल गद्रे (USA) अटलांटा