Sawali Saurabh
Sawali Saurabh

‘श्री कालीकाई जानकी आई’

‘सदगुरु’ 

           आपल्याला वंदन करून मी माझे हे अनुभव सगळ्यांना सांगणार आहे. मी सौ. मनिषा हेमंत वैद्य राहणार पनवेल, माझी ती जानकी आई सावलीच्या रूपाने माझ्या घरी आली २००५ साली नक्की तारीख, महिना आठवत नाही. पण माझी मोठी नणंद सौ शिला चंद्रकांत चिटणीस यांनी मला सहज वाचायला म्हणून सावली दिली. त्यांनी वाचून झाल्यावर परत दे अस आवर्जुन सांगितले होते. २००५ सालीच माझ्या मोठ्या मुलाचे चि. कपिलचे लग्न बडोदा निवासी विजय रणदिवे यांची मुलगी किन्नरी हिच्याबरोबर ठरले. काही कारणांमुळे मी शीलाताईंना परत द्यायला घेतलेली सावली मी परत देऊ शकले नाही. आणि सावली माझ्या सोबतच राहिली. आज बारा वर्ष होऊन गेली माझी आई सतत माझ्या सोबत आहे. खूप अनुभव आहेत.

           आमच्या कडे कार्यात विघ्न येत असत. पण तेव्हा प्रथमच सुवाष्णीच्या आदल्या रात्री माझ्या मोठ्या जाऊ सौ. भावना मुकुंद वैद्य यांच्या माध्यमातून येऊन मला सांगितले काळजी करु नकोस तुझे कार्य व्यवस्थित होईल. आणि खरच आम्हा उभायतांवरचा चिंतेचा भार उतरला, कार्य खूपच सुंदर झाले. आज आईच्या कृपेनी मला चि. पावनी, आणि चि. दिव्या अशा गोड नाती आहेत. आणि आई सतत माझ्या पाठीशी आहे.

             दोन वेळा आम्ही इंदूर, उज्जैन येथील ज्योतीर्लिंगाच्या दर्शनाला जायचे ठरवले. पण दोनही वेळेला आम्ही जाऊ शकलो नाही. तिसऱ्या वेळी ज्या दिवशीचे आमचे आरक्षण होते त्याच दिवशी बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाले आणि मुंबईतील सर्व व्यवहार थंडावले आम्हाला वाटले आता पण आपले रद्द होणार पण प्रयत्न करावा म्हणून निघालो. आईचे नाव घेतले. डॉकयार्ड रोडवरून टॅक्सी मिळाली तर करणार होतो. स्टेशनबाहेर आलो एकही टॅक्सी येण्यास तयार नव्हती. पोलिसांनी पण परत जाण्यास सांगितले. पण तेवढ्यात ताडदेव डेपोची बस समोर आली. कंडक्टरने सांगितले चला लवकर आम्ही खूप आनंदलो आम्ही कंडक्टरला विचारले बस अजून कशी चालू आहे. तो म्हणाला सगळ्यांना बंद करण्याच्या सुचना मिळाल्या पण मला अजून सुचना आली नाही. पण आता बहुतेक ताडदेवला बंद करावी लागेल. जणू आमची आई आमच्या साठी धावली आम्ही व्यवस्थित पोहोचलो दर्शन घेऊन धन्य झालो.आमचा एक परिचीत तरुण विजय गुप्ता अगदी निराश झाला होता. त्याच्या त्या निराशाजन्य परिस्थितीत माझ्या यजमानांनी त्याला ‘सावली’ दिली आज तो दुबई येथे नोकरीत असुन सतत सावलीचे वाचन करतो. जानकी आईवर दृढ श्रद्धा बसली आहे. २०१४ साली माझ्या यजमानांना झालेला खोकला तो सुद्धा आईच्या कृपेने बरा झाला.

             माझा धाकटा मुलगा चि. रोहन तो व्यवस्थित बोलू शकत नाही. पण आईच्या कृपेने आज त्याला छोटी नोकरी आहे. आज पण माझ्या जाऊ सौ. भावना वहिनी मला त्याच्या बाबतीत मला खूप मदत करतात. तीन वर्षांपूर्वी त्याला किडनी स्टोनचा खूप त्रास झाला. डॉक्टरांनी अगदी निक्षून सांगितले होते ऑपरेशन ताबडतोब करा. हा स्टोन औषधाने विरघळणार नाही. मी भावना वहिनींना फोनवरच त्याची व्यथा सांगितली जानकी आईने त्यांच्या माध्यामातून काही उपाय सांगितले आणि आश्चर्य म्हणजे लगेच केलेल्या सोनोग्राफित खडा फुटलेला दिसला. डॉक्टरांना रिपोर्ट दाखवले तेव्हा डॉक्टर देखील अचंबित झाले. अशी ही माझी आई सदैव पाठीशी उभी राहते. माझी मोठी नात पावनी आठ वर्षांची आहे. पण छोटी दिव्या जेव्हा हात धरून मला देव्हाऱ्यात ‘आजी ही पहा जानकी’ अस सांगते. तेव्हा मला जाणवत की माझ्या घरात सगळ्यांच्या मनात जानकीआई विसावली आहे. खूप अनुभव गाठीशी आहेत पण मर्यादे मुळे मला नाईलाजाने थांबावे लागत आहे. अशी ही सावली तुम्हा आम्हा सगळ्यांच्या पाठीशी सदैव राहो. हीच जानकी आईच्या चरणी प्रार्थना.

।।जय जानकी दुर्गेश्वरी।।

सौ.मनिषा हेमंत कृ. वैद्य (बडोदे)

मो. ९३२४१००२१८

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *