
॥जय जानकी दुर्गेश्वरी ॥
द्वितीय पारितोषिक
सावली – अर्थात जानकी आईंचे चरित्र. यात जरी जानकी आईंच्या लीलांचे गुणवर्णन असले तरीही मला नेहमी संतचरित्रे ही केवळ त्या त्या संतांचे लीलावर्णन नसून ते त्यांच्या भक्तांचे चरित्र देखील असावे असे वाटते. जानकीआई हयात असतांना त्यांच्या सावलीत’ आलेल्या भाग्यवान भक्तांचे जीवन जानकी आईकडे येण्याआधी कसे होते? त्यांच्या दर्शनानंतर ते कसे बदलत गेले? या भक्तांनी आपले जीवन, आपापला प्रपंच नेटका सांभाळत असतांनाही, जानकी आईंच्या चरणी स्वतःला कसे समर्पित केले आणि त्यायोगे परमार्थ साधला याचा परामर्ष म्हणजे ‘सावली’ हा ग्रंथ, असे मला वाटते.
गुजरात मधील गणदेवी या व आजूबाजूच्या काही गावांतील भक्तगणांना जानकीआईंचे प्रत्यक्ष दर्शन, कृपाशिर्वाद लाभला. पण आपण कधी असा विचार केला आहे कां की का फक्त इतक्याच लोकांना हे भाग्य लाभले? इतरांना का नाही? यावर विचार करताच या भक्तांचे वेगळेपण जाणवते. त्यांची गुरुमाऊलीप्रती अनन्य श्रद्धा, विश्वास आणि त्यांचं शारण्य हे महत्वाचे गुण यास कारणीभूत आहेत. यांतील कैक भक्त काम्य भक्तीची कास धरुन, प्रपंचातील लहान-मोठ्या अडचणींनी त्रस्त होऊन उपाय मिळवण्यासाठी जानकी आईकडे आले होते हे मान्य. आणि त्यात काही गैर आहे असेही मला वाटत नाही. मात्र सद्गुरुदर्शन घडल्यावर, आपले कार्य सफल झाल्यावरही ते लोक जानकी आईंच्या चरणी नतमस्तक राहिले, भक्ती-सेवाकार्य करत राहिले हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे.
या ग्रंथाच्या नावातच हे दर्शवलेले आहे की या संत कृपेच्या सावलीत/छायेत जो आला तो तरला. ही सावली, ही मायेची पाखर ज्यांनी त्यांच्या जितेपणी अनुभवली ते तरुन गेलेच पण ज्यांना हे भाग्य मिळू शकले नाही त्यांचे काय ? त्यांच्यासाठी ही सावली नामक अजरामर कलाकृती दीपस्तंभाचे कार्य करत आहेच.
भगवंतानी भगवद्गीतेत सांगितल्यानुसार तो परमात्मा अवतार घेत असतो ‘परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृतां’ हे ब्रीद सार्थ करण्यासाठी आणि मग आपल्या अवतार कार्यात मानवातील भक्तीचे पुनरुज्जीवनही तो करतच असतो. भोळ्या भाबड्या सामान्य जीवाला देखील ‘हा माझा देव आहे आणि तो माझ्यासाठी आलाय हा विश्वास वाटावा म्हणून, त्यांच्याकडून चुकत माकत होत असलेली किंवा होत नसलेली भक्ती सुनियोजित, नियमित करुन घेण्यासाठी. कारण त्यास हे पूर्णपणे ठाऊक असते की हा भक्तीमार्गच या सामान्य जीवांना तारुन नेणारा एकमेव सोपा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. आपण विचार केला तर हे लक्षात येईल की स्वामी समर्थ, साईनाथ, गजानन महाराज, जानकी आई यांसारखे अनेक संत अवतरीत होऊन हेच कार्य करत होते. भक्तीमार्गाचे दृढीकरण. तो निर्गुण निराकार परमात्मा एकच असला तरी सामान्य मानवाला त्याला पाहणे, अजमावणे अशक्यच. म्हणून या भोळ्या भाबड्यांसाठी तो सगुण साकार रुपात येतो तेव्हा त्यांच्यापैकीच एक होऊन येतो. त्याचं हे ‘साजिरं रुपडं’ आपलंसं वाटून मग त्याचे हे भक्त त्याला भजू-पुजू लागतात. म्हणजे हे सगुण साकार रुप घेणं ही त्याची गरज नसून आपली आहे.
जानकी आईंनीदेखील स्वतःच्या जीवनकार्यात हेच परमात्म्याचे नियम पाळले. त्या सामान्य मानवाच्या घरी सामान्य माणसाप्रमाणेच राहिल्या, वागल्या. सामान्यपणे जीवन जगत असतानादेखील असामान्यत्व प्राप्त करता येते हे जनांस दाखवून देण्यासाठी.
ईश्वरी अवतार म्हणून जरी त्या आल्या असल्या तरीही सामान्य मानवाच्या योनीत जन्म घेतल्यामुळे कर्माचा अटळ सिद्धांत त्यांनाही लागू होताच. त्यानुसार त्यांनी संसारात राहुन सामान्य मानवाप्रमाणेच सारी सुख-दुःखे भोगली. तसेच प्रारब्धाचे भोग हे कोणालाही चुकले नाहीत हे ही त्यांनी स्वतःवर , स्वतःच्या मुलींवर, नातवंडांवर आलेल्या विविध आपत्तीतून दाखवून दिले. त्या त्या आपत्तीतून प्रत्येक जण तरुन गेला ते त्या ‘सद्गुरुतत्वाच्या’ अकारण कारुण्यामुळे आणि भक्तांच्या श्रद्धा-विश्वासाच्या जोरावर.
भगवद्भक्तीत राहून रंजल्या गांजल्यांची सेवा करत असतांना आदर्श जीवन कसे व्यतीत करायचे याचा वस्तुपाठ म्हणजे जानकी आईंचे आयुष्य. उद्या कोणी जानकी आईतर देवच होत्या म्हणून त्यांना शक्य झाले आमचे असे कुठे? असे विचारही करु नयेत म्हणूनच त्यांनी हे सामान्यत्व स्वीकारले. त्यांनी त्यांच्या जीवनात दाखवलेल्या अनेकानेक लीला यांना ‘चमत्कार’ म्हणू नये व त्या दृष्टीने कृपया बघितले जाऊ नये. असे चमत्कार दाखवून आपल्याभोवती गर्दी जमवणे हा उद्देश त्या परमेश्वराचा कधीच नसतो आणि हीच खूण आहे खरा सद्गुरु ओळखून बुवाबाजीला खतपाणी न घालण्याची. श्रद्धा व अंधश्रद्धा या दोघींत एक पुसटशी रेषा असते जी ओळखता यायलाच हवी. सावलीच्या आठव्या अध्यायातील सुळे पती पत्नींची जानकी आईंनी बुवाबाजीच्या दुष्टचक्रातून केलेली सुटका आपणांस हेच तर शिकवते. जानकी आईंनी केलेल्या प्रत्येक लीलेमागे उदात्त हेतू होता.
लीला याचा अर्थ आहे सहज स्वभाव. या परमेश्वराचा सहज स्वभाव आहे त्याचं अकारण कारुण्य, प्रत्येक सजीव, निर्जीव जीवावर त्याचं असलेलं लाभेविण प्रेम आणि या प्रेमाचा आविष्कार म्हणजे त्याची लीला असते. सावली या ग्रंथात वर्णन केलेल्या जानकी आईनी दाखवलेल्या कोणत्याही लीलेमागे हे ‘लाभेविण प्रेम’च असलेलं दिसून येतं. मग ते गंगावतरण करुन घर पिशाच्चमुक्त करणे असो वा दूरच्या भक्तावर आलेले संकट दूर करणे असो किंवा बब्बड नामक एखाद्या भोळ्या भाबड्या जीवाचा प्रवास नास्तिकतेकडून देवयानपथावर – अर्थात भक्तिमार्गावर सुरु करुन देणे असो.
येथे अजुन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जानकी आईंनी ज्या लीला दाखवल्या त्या सर्व परमेश्वरी नियम – अर्थात सत्य, प्रेम आणि आनंद यांच्या नियमात राहूनच. प्रत्येकाला मिळालेल्या कर्म स्वातंत्र्याचा आब राखत त्यानुसार त्याच्या वाटेस आलेले प्रारब्ध भोग जानकी आईंनी कमी करुन त्या जीवाची पुढील प्रगती कशी होत राहील यानुसार त्यास गती दिली.
कोणतीही अपौरुषेय कलाकृती जन्मते ती त्या सद्गुरुतत्वाच्या इच्छेने व प्रेरणेमुळेच. अपौरुषेय याचा अर्थ कोणत्याही काळात ती खरी ठरेल, दीपस्तंभागत मार्गदर्शक बनेल अशी. आजच्या संगणकीय युगात त्या विषयांवर आज शेकडो पुस्तके निघाली असतील पण उद्या विज्ञानाने अधिक प्रगती करताच हे त्या क्षेत्रातले आजचे सगळे ज्ञान निरर्थक ठरत असते. मात्र ‘अपौरुषेय ग्रंथांबद्दल हे कधीही संभवत नाही. ‘सावली’ हे असेच भगवद्गीता, साईसच्चरित’ सारख्या अपौरुषेय ग्रंथाचे उदाहरण.याचे लेखन जानकीआईनी स्वयंप्रेरणेने लेखकाकडून पूर्ण करुन घेतले आहे.
सावली लेखक श्री. मधुकर सुळे यांनी याच ग्रंथात जानकी आईंचे स्वर्गारोहण आणि त्यांनी मालूसह केलेली गणदेवीची यात्रा याचे यथासांग वर्णन केले आहे. पैकी जानकी आईंचे स्वर्गारोहण हे काल्पनिक आहे असे ते लिहितात. तर गणदेवीच्या यात्रेबद्दल ते लिहीतात की तुम्ही जर श्रद्धेने येथे आलात तर तुम्हांस जानकी आई या वास्तूत सदेह असतांना घडलेले प्रसंग दिसतील, अनुभवता येतील. हे दोन्ही प्रसंग – स्वर्गारोहण व गणदेवी यात्रा हे मला ध्यानमार्गाला अनुसरुन केलेला भक्ताचा प्रवास दर्शवतो. आपल्या आराध्याचे ध्यान करत असतांना भक्त आपल्या आंतरमनात, ज्ञानचक्षुसमोर अशीच कल्पनासाकृती निर्माण करीत असतो व त्या आधारे आपली उन्नती साधत असतो. इथे लेखक स्वतः जानकीआईच्या कृपाशिर्वादाने सावली वाचकाचा हात धरुन त्याच्याकडून ही ध्यानधारणा करवून घेत त्याची प्रगती साध्य करुन घेत आहेत असे मला वाटते.
पुढे लेखकाने मानसपूजा कशी करावी याचे उत्तम वर्णन एका अध्यायात केले आहे. तो भगवंत जरी निर्गुण , निराकार असला तरी त्याचे सगुण साकर रुप भक्ताला भावते, आपलेसे वाटते. त्या रुपाचे कोड कौतुक करण्याची इच्छा ही मानसपूजा भक्ताकडून करुन घेत असते. नवविधा भक्तीतील ‘अर्चन’ भक्तीचाच हा एक आविष्कार. मला जसे आवडते तसे षोडशोपचारे मी माझ्या आईला सजवतो, नटवतो आहे हा भक्ताचा भाव आणि त्या भावात मग्न होत केलेली ध्यानधारणा, नामस्मरण. _ या एकाच ग्रंथात जानकी आईंनी आपणांस भक्ती मार्गातील विविध पैलुंची ओळख करुन दिली आहे.’गरबा’ या भक्ती प्रकाराचे महत्व विषद करुन सांगितले आहे, जसे आपले वारकरी ‘जय जय राम कृष्ण हरी’ च्या गजरात विठुरायाच्या नामात तल्लीन होऊन जातात तसंच गरब्याच्या गाण्यात ताल धरुन नाचणे म्हणजे त्या जगन्माऊलीला आळवणेच.!! नाम-माहात्म्य सांगून परमेश्वराचे नाम मुखी सतत ठेवून कर्म करत रहाणे हे स्वतःच्या आचरणातून वेळोवेळी दाखवून दिले आहे. तर सावली लेखकामार्फत ध्यानधारणा, अर्चन, वंदन, मानस पूजा या मार्गाने ही भक्ती करता येते हे विषद केले आहे. ज्याला जो भावेल तो मार्ग त्याने स्वीकारावा शेवटी ते सर्व मार्ग त्या एकाच आदिमातेच्या चरणी जाऊन पोहोचतात.
शेवटी एक नम्रपणे नमूद करावेसे वाटते की ‘सावली’ या जानकी आईंच्या ग्रंथ वाचनाने मला काय वाटले हे लिहीणारी मी अगदी यः कश्चित सामान्य जीव. पण या स्पर्धेबद्द्ल वाचून सावली ग्रंथाचा मला जमेल तसा तोडका मोडका अभ्यास करण्याचा एक क्षीण प्रयत्न केला आहे. त्या सद्गुरुमाऊलीनेच स्फूर्ती देऊन ही पोथी वाचून मला काय वाटले ते सुचवले, किंबहुना माझा हात धरुन गिरवून घेतले, इतकेच. यात काही तृटी असू शकतात. कुणाच्याही भावना, श्रद्धा दुखावण्याचा यत्किंचितही हेतू नाही. तसे झाले असल्यास क्षमस्व !
सौ. कांचन आशिष देशमुख
मो. ९९६७००७९३५ (कुर्ला)