॥ जय जानकी दुर्गेश्वरी ॥

प्रोत्साहनार्थ
जानकी आईबद्दल मी व माझे पति आम्हा दोघांच्याहि मनात अपार श्रद्धा, भक्ति व प्रेम होतेच. “सावली” ह्या आईच्या चरित्राचे वाचन मी स्वतः अनेक वेळा केलेच पण इतर अनेक लोकांना “सावली’ (पुस्तक) देऊन त्यांना सुद्धा भक्तिचा आनंद मिळवून देण्याचा छोटासा प्रयत्न केला.
खाली दिलेल्या प्रसंगानंतर आम्हा दोघांचे मन भारावून गेलेच, पण आईच्या भक्तावरील प्रेमाचा अनुभव आला.
२००६ साली आम्ही दोघं कोल्हापूरच्या ट्रिपला गेलो व तेथील एका हॉटेलमध्ये राहीलो. प्रथम अर्थातच श्री महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन आम्ही रोज टॅक्सीने जवळपासच्या देवस्थानांमध्ये दर्शनासाठी जात होतो. त्या दिवशी आम्ही नृसिंहवाडी (नरसोबाची) वाडी येथे श्री दत्तगुरुंच्या दर्शनासाठी निघालो. तेथे आम्ही आगोदरहि गेलो होतो, परंतु त्या दिवशी तेथे खूपच दुकाने उघडली होती आणि दुकानात ओट्या विकावयास ठेवल्या होत्या. आम्ही एका दुकानदाराला विचारले, तेव्हा तो म्हणाला “सध्या नदीचा उत्सव सुरु आहे आणि नदीची ओटी भरण्यासाठी ही व्यवस्था केली आहे. पुढे नदीची मूर्ती आहे, आपण एक ओटी घ्यावी”.
मी एक ओटी मागितली ती त्याने एका थाळ्यात भरून दिली. त्यात फुले, वेणी, नारळ, हळद, कुंकू वगैरे ओटीचे सर्व सामान होते. ओटीचे ताट घेऊन आम्ही दोघं पायऱ्या चढून वर जात होतो. दुपारची वेळ होती व फारशी गर्दी नव्हती, वयोमानाप्रमाणे आम्ही सावकाश पायऱ्या चढत होतो. आम्ही जेव्हा काही पायऱ्या चढून वर गेलो तेव्हा आचानक तेथे एक बाई आल्या व मला सांगू लागल्या “माझी ओटी भर, माझी ओटी भर’, त्या बाईचा तेज:पूंज चेहरा स्वच्छ कपडे, नाकांत ठसठशीत सोन्याची नथ पाहून मी माझ्या पतिकडे पाहिले त्यांनी होकाराची मान डोलावल्यावर मी माझ्या ओटीच्या थाळीतील एक एक पदार्थ त्या बाईंनी आपल्या पदराची झोळी माझ्यासमोर पसरली होती, त्यात टाकू लागले. बाकी वस्तु हलक्या असल्यामुळे मी चटकन त्यांच्या पदरांत टाकल्या, परंतु नारळ जड असल्यामुळे पदराच्या झोळीत हात आतमध्ये घालून नारळ सावकाश सोडण्यासाठी मी पदराचा (झोळीचा) खालील भाग (तळ) हाताला लागावा म्हणून चाचपू लागले, पण आश्चर्याची गोष्टी म्हणजे त्यांच्या पदराच्या झोळीचा तळच माझ्या हाताला लागेना, मी संपूर्ण हात झोळीत घातला तरीही हाताला झोळीचा तळ लागेना बरं, नारळ तसाच सोडावा तर खाली पडला तर उगीच अपशकून होईल. म्हणून मी घाबरत होते, अखेरीस मनाचा हिय्या करून मी नारळ सोडला पण तो झोळीत समावला मला बरं वाटले. वर दक्षिणा म्हणून माझ्या पतींनी त्यांच्या खिशातून थोडी नाणी बाहेर काढली, ती मी ओटीत टाकली. आम्ही दोघांनी त्या बाईना नमस्कार केला व आशिर्वाद घेतला.
नंतर माझ्या पतिंनी माझ्या हातात थोडे पैसे दिले व मला सांगितले, “मी येथे थांबतो तू खाली जाऊन नदीसाठी दुसरी ओटी घेऊन ये” मी पांच मिनिटांत दुसरी ओटीघेऊन आले. तेव्हा माझे पति इकडे तिकडे पहात होते. त्यांनी मला विचारले “त्या बाई कुठे गेल्या गं? तुला पैसे दिल्यावर मी मागे पाहिले तर त्या बाई मला दिसल्याच नाही इतक्या थोड्या वेळांत इतक्या पायऱ्या उतरून त्या कशा जाऊ शकतील?”
त्यानंतर आम्हा दोघांच्या डोळ्यासमोर ती सोन्याची ठसठशीत नथ दिसली. त्या नथीच डिझाईन, जाड, सोन्याची काडी अगदी जानकी आईच्या नथीशी तंतोतंत जुळणारं होत. दुसर वैशिष्ट्य म्हणजे त्या आमच्यापेक्षा दोन पायऱ्या खाली उभ्या होत्या तरीहि त्यांचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्यासमोर येत होता. नंतर आम्ही दुसरी ओटी घेऊन नदीची सुंदर मूर्ती होती तेथे गुरुजींजवळ दिली.
त्यादिवशी आमची खात्रीच झाली की ज्या बाई आम्हाला भेटल्या त्या जानकी आईच होत्या परंतु त्यावेळेस आम्हाला त्यांची ओळख पटली नाही. असो त्यांचा आशीर्वाद तर मिळाला.
आईंच्या पदराचा तळ हाताला सापडला नाही ह्यांत नंतर काही आश्चर्य वाटले नाही. श्री जानकी आईचा हा पदर त्यांच्या लाखो भक्तांना “आभाळाची छाया आणि महासागराइतकी माया पुरवतो. संकटात तारतो अशा त्या पदराचा अंत:पार माझ्या सारख्या सर्व सामान्य स्त्रीला थोडाच लागणार आहे? ।।धन्य धन्य जानकी दुर्गेश्वरी माता ।।
सौ.दीपा नंदकुमार देशपांडे (घाटकोपर)
मो.८४५४८२१९६८